Sunday, December 30, 2007

'सकाळ करंडक'मध्ये गाजलेल्या एकांकिका


सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचे दुसरे वर्ष तरुणांच्या उत्साहात रंगले. वेगळे विषय आणि त्याला लाभलेला समर्थ कलाकार चमू यामुळे एकांकिका खुलत गेल्या. ३६ एकांकिकांतून काही निवडक प्रभाव पाडणासकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचे दुसरे वर्ष तरुणांच्या उत्साहात रंगले. वेगळे विषय आणि त्याला लाभलेला समर्थ कलाकार चमू यामुळे एकांकिका खुलत गेल्या.

कंडिशन अप्लाय- गिरीश दातारने बॉलिवूडमध्ये येण्याच्या ध्येयाने घर सोडून झगडणाऱ्या दोघींची कथा ताकदीने रेखाटली आहे. इथे गुणाबरोबर त्यांना खूष करण्यासाठी सोबत करण्याच्या मागण्या केल्या जातात. एक लेखिका तर दुसरी आहे स्टार रोल मिळण्याची स्वप्ने पाहणारी. संवादातून उलगडत जाणारी ही एकांकिका मृण्मयी देशपांडेनी तेवढ्याच परिणामकारकपणे सादर केली. दिग्दर्शन आणि लेखिकेच्या भूमिकेत तिने स्वतःचे श्रेष्ठत्व पटवून दिले. गती आणि छोट्या प्रसंगाची केलेली गुंफण यामुळे वेगळा थाट साधला गेला आहे. तिला साथ दिली अनुजा साठेने. वाचिक आणि देहबोलीतून अनुला उत्कटतेने घडविली. दोघींनी ज्या ताकदीने विषय मांडला तेवढी उंची दुसरा कुठलाही संघ गाठू शकला नाही. नेपथ्य, प्रकाश आणि पार्श्‍वसंगीताने परिणामकारता अधिक वाढविली. संवादात ताकद. मांडणीत नेमकेपणा आणि विषय समजावून घेऊन केलेली रचना सारेच सुरेख. मैत्रीतून उलगडत जाणारा विषय दोघींनी गुंतवून ठेवला.

दळण- दमांच्या कथेचे बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले नाट्यरूपांतर पडदा उघडल्यापासूनच पकड घेत गेले. विनोदी प्रसंगाची गुंफण. मुलांचा वात्रटपणा. खुलत गेलेले प्रसंग. मास्तरांनी मुलांशी केलेल्या करामती. मास्तरने घरी शिकवणी घेण्यासाठी केलेले चाळे.आणि आईवर डोळा ठेवून शिकवणीला गेल्यानंतर झालेली फजिती. सारेच फर्मास. रसरशीत. मास्तराच्या अभिनयातून झिरपत गेलेली एकांकिका संघाच्या यशाचे शिक्कामोर्तब करत होते. उठावदार दिग्दर्शनातून, माफक पण साध्या संगीतातून आणि सांघिक कौशल्यातून दळण बहरली. अभय महाजन, निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ (मास्तर)सह साऱ्या चमूचे हे सांघिक यश. यात गंधार संगोरामच्या संगीताचाही समावेश आहेच.

तमासगीरांच्या आजच्या व्यथेची दखल घेणारी "फड' आयएलएसची निर्मिती होती. अभिजित ढेरेने ती लिहिली आणि सादर केली. प्रथमतः तिने प्रभाव साधला, पण नंतर सादरीकरण ढेपाळले.

तरुणाईची नशा, धुंदी आणि मस्त जगणे याची चुणूक अनुभवली एम. ए. रंगूनवाला कॉलेजच्या "व्होडका'मधून. अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी पुतळ्याच्या विटंबनेचा घाट घातला जातो. यात मित्राचा बळी जातो. खेळ अंगाशी येतो वाटतानाच कथेला कलाटणी दिली गेली. मित्र गेला नसून मुस्लिम मित्राला मदत मिळावी म्हणून केलेली ही क्‍लृप्ती होती. सुरेश शिंदेचे लेखन आणि ओंकार हरिदासची मांडणी यातून व्होडका अंगावर येते. व्यक्तिशः अभिनयापेक्षा सांघिक परिणाम अधिक साधला गेला.

डिमॉलिशन- झोपड्यांची जमीन घशात घालण्यासाठी बिल्डरचा प्रभाव आणि यामुळे वस्तीत होत असलेली वाताहत पुरेशा गांभीर्याने दाखविली आहे. झोपडी दादांची दादागिरी. पात्रांच्या नात्याचा गुंता. वयात येणाऱ्या मुलींचे प्रश्‍न सारेच प्रभावदार साकारले गेले. संहिता, रचना आणि परिणामकारक नेपथ्यातून सादर झालेला प्रयोग नौरोसजी वाडियाच्या विद्यार्थ्यांनी वास्तवपणे मांडला.

मन झुला झुलताना- मानसोपचार करणाऱ्या डॉक्‍टरकडे आलेल्या एका स्त्रीची ही कथा. आपला मुलगा अकाली गेल्याच्या भासातून सतत तणावाखाली वावरणारी ही दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाची उकल इथे केली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोथरूड(पुणे) ची ही निर्मिती. गौरी तांबे यांनी चेहऱ्यावरचे भाव, आवाजातले बदल आणि ताणाचे भान ठेवून केलेला अभिनय आजही ताजा वाटतो. पार्श्‍वसंगीत, नेपथ्य आणि प्रकाशाचा यथार्थ वापर करून संघाने परिणाम साधला.

धोंडूमामा साठेची "ऍबसर्ड' आणि वाघोलीच्या आर्युवेद कॉलेजची "सन्मती' दोन्हीही परिणामकारक होत्या. कथाकाराच्या परिणामकारक सादरीकरणाने ऍबसर्ड लक्षात राहते. सादरीकरणात प्रामाणिकता होती. संवादाबाबत दाद मिळत होती. रंगमंचीय तांत्रिकतेचा पुरेसा वापर करून संघाने आपला ठसा उमटविला.

सन्मती- कंपवात आणि विस्मृती असलेल्या दोन आजाराचे परिणाम दाखविणारी मांडणी करताना प्रेमात पडलेल्या, पण आईविना एकाकी पडलेल्या तरुणीची फरफट. समाजाचे या माणसांकडे होत असलेले दुर्लक्ष. यातूनच घडलेल्या कथेतून बाहेर आलेली कथा. व्यक्तिरेखांचे भान ठेवून नातेसंबंध जपताना साखरपुडा झालेल्या पतीशी चाललेला स्वतःचा झगडा प्रचिती सुरूंनी प्रभावीपणे साकारून स्वतःला श्रेय मिळविले आहे. तांत्रिकतेचा पुरेसा वापर करूनही साचेबद्ध मांडणीमुळे स्पर्धेत ती टिकाव धरू शकली नाही.

रिमांडहोममधल्या मुलांचे गुन्हेगारीविश्व आणि एका चुकीमुळे आयुष्यातली महत्त्वाची वर्षे अंधाऱ्या खोलीत काढणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने मांडली. वेगळा विषय आणि बोलके सादरीकरण करून त्यांनी छाप पाडली. मात्र शब्दातच गुरफटलेल्या एकांकिकेत घडत काहीच नव्हते. रंगमंचीय भाषेचा पुरेसा वापर न केल्याने त्यांचे सादरीकरण टू द पॉइंट नव्हते.

शेवटचा दिवस गाजला तो डॉ. कलमाडी ज्युनिअर कॉलेजच्या "तळातला वर्ग"मुळे. ढ मुलांना आलेल्या सुंदर शिक्षकांच्या प्रभावामुळे अभ्यासात आणि दंग्यात सुधारणा झालेल्या एका वर्गाची ही कहाणी. मेघना हेगडे यांनी ती फुलविली छान. आणि ती सादर करण्यात दिग्दर्शत म्हणून अंबर गणपुलेनी बजावलेली कामगिरी दोन्हीतून तळ्यातला वर्गचा खेळ रंगला. मुलांनी शिक्षक आणि बाईंचे प्रेम फुलविण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या घटनांतून हे सादरीकरण रंगत गेले. बाई आणि मुलांच्या सहजसुंदर वावरण्यातून या एकांकिकेचा प्रभाव वाढत गेला. संगीतातूनही हा प्रभाव उठावदार बनला. वास्तवात घडत गेलेली ही कहाणी स्पर्धेत वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

- सुभाष इनामदार
subhashinamdar@esakal.com

Friday, November 16, 2007

रूप मनोहारी


हवी चतुराई देवा नको मूकरूप
पहायाला मन माझे दावी विश्वरूप

सोहळा प्रेमाचा दाटे घरी-दारी
ओढ लागे तुझी देवा सत्वरी

काळ लागे मागे ऊठ लवकरी
डोळे उघड आता पहा धरणीवरी

जाता दिवस वाटे आहे का भास ?
नको दावू आता उरलासे निश्‍वास

करू किती श्रम थकलो रे आता
पहाया रूप तुझे विसावे मी आता

सोहळा नेत्रातून पाहायाचा आहे
मीच मात्र माझा उरलागे आहे

चराचरी साठला नाद तुझा भारी
सत्वर दावी आता रूप मनोहरी


सुभाष इनामदार.

आले निराशेचे ढग

आले निराशाचे ढग गेले आशेचे किरण

नित नव्या विचाराने श्‍वास गेले दमून

उभा राहता टाकली कात त्याने झीजलेली

कधीतरी धग येई हिच आशा मन तारी

गेले गेले ते दिवस उजाडता नवा दिस

लाभे शांत मनाला दावी पालवी ग आता

मन पळे कुठेतरी मी धावतच आहे

मन माझे हादरले तरी आशा अंधुकशी

येतील रे दिस तुझे नको होऊ तु निराश

अंधाराची रात्र सरता येई आशेचा प्रकाश

येई आशेचा प्रकाश


सुभाष इनामदार.

Tuesday, November 6, 2007

सण आनंदाचा, स्वानंदाचामनातल्या संवादांना मोकळी वाट करून सारे मिळून करूया दिवाळी ही साजरी.नकोत ताण.नको विचार. आता हवा एकच आचार जो जपेल कुटुंबाला ,त्यातल्या रेशीमधाग्याला.
दिवाळीचा प्रकाश वाहे साऱ्या घर भर.घरही नाचे,उजळेही माजघर.
माजघरातला अंधार चला आपण दूर करूया.आनंदाने .स्वानंदाने
एक विचाराने एक एक आचाराने घट्ट धागे विणा.

शब्दांना धार नका देऊ.शब्दांतून प्रेंम वाहूद्या.शब्दातून नाती जोडा.
जोड़लेली

नाती अधिक बळकट करूया.
मित्रहो, स्वतःताला विसरलात तरी चालेल पण आपल्यापेक्षा आपल्या शेजाऱ्यांशी चांगली नाती जोडा.
संपत्ती पेक्षाही मित्रांची संपत्ती कमवा.टिकवा आणि वाढवा.
धागा प्रेमाचा .धागा मांगल्याचा.धागा सृजनतेचा.... ओवा.
मंगलमय.आनंददायी .प्रकाशमय..... दिवाळी साजरी करा.....

.परिसराचा विचार करा.
वृध्दांना आधार व्हा.
मुलांचा आनंद ओळखा.
घरातला आनंद जगाला कळूद्यात !


सुभाष इनामदार.

Thursday, October 25, 2007

गंभीर विषयावरचे विनोदी नाटक "सारखं छातीत दुखतय !"

थोडं जरी छातीत दुखायला लागलं तरी माणसाला शंका येते ती हृदयरोगाची. "सारखं छातीत दुखतंय!' नाटकाने याच गंभीर विषयावर चिंता दूर करणारे भाष्य केलेय, पण सहज, सोप्या आणि विनोदी धाटणीने. मध्यमवर्गीय माणसांना दिलासा देता देता छोट्या छोट्या गोष्टींचा आपण किती बाऊ करतो. त्यामुळे स्वतःचा तर गोंधळ उडतोच, पण घरचेही घाबरतात.संजय मोने यांनी गंभीर विषयातून लिहिलेले हे नाटक तुम्हाला सहजपणे विषयाकडे लक्ष द्यायला तर लावते, पण त्यानिमित्त आजाराची काळजी करा- बाऊ करू नका, असा सरळ सरळ संदेशही देते. अशोक सराफ असले तरी विनोदाचा अतिरेक नाही. निवेदिता सराफ आणि अशोक यांना एकत्रित काम करताना पाहण्यातला आनंदही देते. विजय केंकरे, संजय मोने आणि अशोक सराफ, राजन भिसे या चौकडीने सादर केलेला प्रयोग पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.कैलास तायशेट्ये हा कंपनीतून व्हीआरएस घेतलेला संशयी माणूस. छातीत कुठं खुट झालं की आपल्याला काहीतरी होणार या शंकेने डोक्‍यात विचार येणार. डॉक्‍टरांकडे जाऊन सगळे रिपोर्ट काढून तुम्हाला काहीही झालेले नाही असे एकदा कळले, की थोडी निश्‍चिंती लाभणार. शंकेला फूस मिळावी तशी डॉ. आत्माराम देसाई (संजय मोने) यांच्या घरी येण्याने दुसऱ्याच पेशंटची कहाणी ऐकताना ते आपल्याविषयीच बोलतात, असा कैलास समज करून घेतो. नाट्याला इथून रंग भरतो. आपण पंधरा दिवसांचे सोबती आहोत, या कल्पनेने ऍड. सदाशिव तुराडकर (विनय येडेकर) या मित्राशी पुढच्या भविष्याची चिंता चर्चिली जाते. कैलासच्या बायकोला- मालनला (निवेदिता सराफ) कैलासच्या स्वभावामुळे आधीच वैतागलेल्या संसारात अचानक तिच्या कॉलेजमधल्या मित्राचा (राजन भिसे) मनोहर देवचा प्रवेश होतो. संशयी कैलासच्या बघण्यात फरक पडतो. आपल्यानंतर या दोघांनी एकत्र यावं, अशी इच्छा मनात धरून त्यांना सिनेमाला पाठवितो. मात्र स्वतःच्या लायब्ररीतील मदतनीसाला मदत करण्यामुळे घरात संशयाची पाल चुकचुकते. मालन-कैलासचा सुखी संसार आधीच आजाराच्या संशयी वृत्तीने हललेला असतो. आता नव्या काळजीने दुभंगण्याची भीती निर्माण होते. प्रेमाच्या त्रिकोणाचा फुगा फुटतो आणि आजाराची काळजी अवश्‍य घ्या, पण बाऊ करू नका, सल्ला देऊन नाटकाचा पडदा पडतो.विश्राम बेडेकरांच्या "वाजे पाऊल आपुले'ची आठवण करून देणारे हे नाटक. संजय मोने यांनी मध्यमवर्गीय लोकांच्या आजाराच्या संशयी वृत्तीवर बोट ठेवून हा गंभीर विषय साध्या प्रसंगांतून फुलविला आहे. लेखनात सहजता आहे. साहित्यिक, पुस्तकी भाषा नाही. सोपी पण रोज वापरली जाणाऱ्या बोली भाषेतून नाटक घडविले आहे. संशयकल्लोळाचा खेळ निर्माण करताना रंगविलेला मनोहर देव झकास. कैलासच्या संसारातली गोडी वर्णन करणारे दोनच प्रसंग नाटकाची पोत आणि श्रीमंती वाढवितात. मोनेंनी औषधाचा डोसच पाजलाय, पण उत्तम वातावरणनिर्मिती करून.विजय केंकरेंचे दिग्दर्शन प्रसंगातील नेमका आशय व्यक्त करण्यात यशस्वी ठरले आहे. हालचालीत संयमितता आहे. भाषेतला सोपेपणा त्यांनी व्यक्तिरेखेतून खुलविला आहे. कैलासचे संशयीपण मालनचे पतिप्रेम, ऍड. तुराडकरचा वकिली डाव, मनोहरमधला थेटपणा, सारेच विजय केंकरेंच्या दिग्दर्शनातून व्यक्त होतात.अशोक सराफसारखा विनोदाचा बादशहा नाटकात असून कुठेही नाटक कलाकारांच्या आहारी जात नाही. संयमित आणि सहजपणा हे नाटकाचे वैशिष्ट्य ठरावे.राजन भिसे यांच्या श्रीमंती घरात नाटक रंगते. घरातला थाट उच्चमध्यमवर्गीय घराचे रूप दृष्टीलाही सुख देते. नजर घरातल्या वस्तूंवरही जाते. देखणेपणा आणि गरज दोन्ही भागविते.अशोक सराफ यांचा संयमित अभिनय. शब्दांमध्ये दडलेला विनोद ते शारीरिक अभिनयाने प्रेक्षकापर्यंत पोचवितात. ते भूमिका थेट पोचवितात. विचारी, पण संशयी व्यक्तिरेखा बंदिस्त चौकट राखून ते उत्तम सादर करतात. भाषेचे सौंदर्य अधिक खुलविताना कैलासच्या भूमिकेचे कंगोरे उलघडून दाखवितात.त्यांना तेवढीच संयमित साथ दिली आहे मालनच्या रूपातल्या निवेदिताने. दोघांचे प्रसंग पाहताना ते तुम्हाला नक्की दिसेल. व्यक्तिरेखेला त्या स्वतःचा चेहरा देतात. विनय येडेकरांनी हशे घेतलेत. नाटकात ते रमतात. रसिकांना बरोबर घेऊन जातात. राजन भिसे दिसतातच प्रभावी. वावरतातही आत्मविश्‍वासाने. त्यांचे बोलणे. मैत्रीचा धागा पकडून ते मालनबरोवरचा मोकळेपणा ते सहजी व्यक्त करतात. संजय मोनेंच्या छोट्या भूमिकेतही ते फॅमिली डॉक्‍टर म्हणून घरातलेच एक बनतात.अशोक पत्की यांचे पार्श्‍वसंगीत आणि शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटकाला अधिक खुलविण्यात यशस्वी झाली आहेत.अजित भुरे यांनी सादर केलेले आणि स्वाती कारूळकरांनी निर्मिलेले हे नाटक पाहणे म्हणजे एक अनुभूती घेणेच आहे. नाटक पाहिल्यावर त्याच्या आठवणी जरूर घरी घेऊन जाल.
सुभाष
इनामदार.
subhashinamdar@esakal.com

Sunday, October 21, 2007

प्रसन्नतेची पखरण
सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले. शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात) तिथे टाकला गेला. दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली. आज घराला बागेचे रूप आले आहे. मी माळी न घेता बाग फुलवली. घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मिळतो. जागा किती हे महत्वाचे नाही. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.


हिरवळीने सकाळची वेळ आधिक प्रसन्न बनते. डोळे तृप्तीचे ढेकर देतात. दिवस चांगला जाणार याची खात्री पटते.कधीतरी, स्वप्नात असेल कदाचित असे घर मनात घर करून होते. पण ते साकारायला वयाची पन्नाशी यावी लागली.खाजगी नोकरी. घरच्या जबाबदाऱ्या यातून स्वतःचा कधी फ्लॅट होईल याची खात्री नव्हती. पण पत्नीचे सहकाय, मिळकतीतील काही भाग गुंतवणूक करण्याची वृत्ती, आजचे न पहाता उद्यासाठी राखून ठेवण्याची मानसिकता यातून घर झाले आणि तेही रो-हाऊस. घेताना उडी मोठी मारली. साठविलेली पुंजी दोन नंबरचे पैसे देण्यात सोडून दिली. घर ही कल्पनाच अशी आहे. तीथे कुणीही ओढ घेईल.रो-हाऊसचा घास मोठा असल्याने घर सजवायचे कसे? यापेक्षा पैसे कुठे वाचवू शकू ? याचीच यादी मनात तयार होत होती. घर तर होऊ दे, आतले फर्नीचर, सजावट-पडद्यांचे नंतर बघू, असाच विचार असायचा.


मोकळी जागा किती मिळेल याची कल्पना आधी नव्हती. पाठीमागे थोडी जागा मिळणार .त्यात भांडी घासायची जागा होणार. इतकेच वाटत होते. पाया, प्लींथ, पायऱ्या आणि स्लॅब पडत गेली.आणि घरासमोरची भिंतही झाली. गेट बसले. नेमकी जागा लक्षात आली. सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. मागे सव्वाशे. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? माळी किती घेतो? माती, खते अणि रोपांसाठी किती पैसा लागेल? साराच खेळ पैशात सुरू झाला. कंजूष वृत्तीचा इथे उपयोग झाला.यासाठी एकच केले. राहण्याआधी वास्तुशांत करून घेतली. मात्र दुसरीकडे राहायची सोय असल्याने बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले.


पुरती माती बिल्डकडून टाकून घेतली. अर्थात त्यात आली शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात). दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली.तिरक्‍या वीटा लावणे.फरशी सफाईदार बसवणे आणि माती टाकून बागेची रचना सिध्द झाली. प्रश्‍न आली रोपे कोणती आणायची? अर्थातच फुलांच्या रोपांची निवड झाली. गुलाब, जास्वंद, मधुमालती, जाई, जुई, शेवंती आणि तगर, मोगरा यांच्याबरोवरच बोगनवेलीची रोपे व्यवस्थीत अंतरावर लावली .मार्च महिना असल्याने पाण्याची गरज होती; पण हळूहळू रोपांची वाढ होताना पाहण्यात ते श्रम वाटत नव्हते. मागे तुळस लावली; पण ती टिकत नव्हती. कारण शोधण्यासाठी एकदा परसदारी ठिय्या मारून टिकाव आणि खोरे घेऊन जमीन उकरून पाहिली; तर आत फरशांचे तुकडे, सिमेंटची मोकळी पोती खिळे, दगडांची चवड, लाईटच्या बॅटन पट्ट्या असा सांग्रसंगीत माल सापडला. रोपे यात कशी वाढणार ?रोपे पुन्हा लावली. पुन्हा मेहनत घेतली. जगवली आणि आज तिथे तगर, पांढरी जास्वंद, शेवंती, कळीचे जास्वंद आणि शोभिवंत रोपांची सावली आल्हाददायक वाटते आहे.कुणाकडे काही नवे पाहिले की त्याचे रोप घेऊन लावायचे. यात कॅंटीन मधल्या नारळाच्या रोपनेही साथ दिली. सुपारी आली. चिक्कू रूजला. मनीप्लॅंटतर सुसाट वाढला. पारिजातक, कडीपत्ता रूजला. आळी करून तण काढले गेले. माजलेले गवत काढत गेलो. तरी दर वेळी तण रहातातच. त्यातून दुर्वा मिळाल्या. तांबडी, पिवळी, गुलाबी, तपकीरी, पांढरी अशी विविध रंगी फुलांची रेलचेल झाली.आता खरंतर दाटी झाली आहे. पण स्वतःच लावलेल्या रोपांना कसे उपटायचे म्हणून ती डोलतच आहेत. मोकळ्या जागेत कोथींबीर, मेथी, पालक, टोमॅटो, मिरची घेणे सुरू केले. शोभेबरोबर घरच्या भाज्या मिळू लागल्या. दहा रुपयांची कोथिंबीर पेंडी मला विनामूल्य मिळाली.


त्यासाठीची मेहनत किती तर सव्वामहिना !बागेचे रूप आले आहे. आम्ही घरात रहातो आणि बागेत फिरतो, पानात रमतो. आजूबाजूची मंडळी फुले नेतात. मात्र फांद्या ओढून ओरबाडून फुले नेताना कुणी दिसले की मन दुखावते. फुले झाली अनंत आता हवी फळझाडे. असे मनात आणले.मोठ्‌या-मोठ्या सिंमेटच्या कुंड्या थेट गच्चीवर थाटल्या. डाळींब, अंजीर अणि कागदी लिंबाची रोपे आणली. माती-खत आणि घरातल्या खताने उन्हात उभ्या असलेल्या रोपांना माया दिली. उद्या तीच झाडे आम्हाला फळे देणार आहेत.गच्चीवर काकडी, कारले, दुधीभोपळ्याचे वेल लावलेत. वेल वाढतील, बहरतील आणि खालच्या खोल्यांना सावलीही देतील.आज मधुमालतीचा वेल तिसऱ्या मजल्यावर फुलांनी डवरलाय. काही वर्षांनी नारळ येतील. काही दिवसांनी रामफळे येतील. चिकू खाता येतील. भाज्याचे प्रकार लावता येतील.बागेची फारशी माहिती नसताना, कुठलाही बागकामाचा अनुभव पाठीशी नसताना आपली बाग आपणच फुलवायची याच जाणीवेतून ही निर्मिती झाली. आज बाहेरून कोणेही सांगेल की, बाहेर गुलाबी जास्वंद .पारिजातक आणि जाईची फुले दिसतात ना तेच त्यांचे घर.रोपांना ठिकाण माहित नसते. पण त्यांना जाणवतो किंबहुना स्पर्श ओळखू येतो. मालकाच्या प्रेमाचा. त्याच्या जिद्दी स्वभावाचा.मी माळी न घेता बाग फुलवली आहे. आता पैसा वाचविणे हा हेतू नाही. ती अधिक विस्तारीत करून फुलांपेक्षा फळांनी डवरलेली ठेवणे.त्यात मन रमवणे. बागेत काम म्हणजे चिंतापासून दूर.हात-पाय तंदुरूस्त राखण्याचा उपाय.वेळ कसा गेला ते कळत नाही.घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मीळतो.जागा किती हे महत्वाचे नाही. तुमची इच्छा हवी. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.घरात भिंतीइतकेच महत्त्व विविध कुड्यांना द्या. रासायनीक खते न वापरताही अगदी डबा किंवा बादलीतही ती तुमची सोबत करतील.

Friday, October 5, 2007

सध्या काही काळ मी बागेत काम करतो.


सध्या काही काळ मी बागेत काम करतो.
तसे बागेत काम ते काय असणार ? प्रश्‍न बरोबर आहे.पावसाळा संपला .मातीचे गठळे होतात.ते खुरप्याने वेगळे करावे लागतात.अती पावसाने माती रापली जाते. ती वेगळी करून बाजुला टाकून नवी माती टाकावी लागते. कस वाढतो.बागही बहरू लागते.सांगायला हे फार सोपे.प्रत्यक्ष बागेत शिरलात की वेळ कसा जातो ते समजत नाही.त्याचा फायदा मनाला आणि शरीराला होतो. मनात दुसरे विचार येत नाहीत.आणि बागेतला शुध्द प्राणवायुही मिळतो.वाढलेले गवत काढताना.नको असलेली झुडपे काढा.ज्यादा वाढलेल्या फुलांच्या मोठ्या फांद्या तोडा.त्या दुधाच्या पिशवीत माती भरून त्यात त्या फांदीला खोवा. बघा आठ दिवसात फांदीला नवी पालवी येते.


आलेल्या प्रत्येकाला एक रोप भेट द्या.तुमची कायमची आठवण रहाते की नाही ?

विकत आणू नका रोप तुम्ही तुमच्या बागेतून निर्माण करा.स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधेल.आनंद वाटण्यातला आनंद वेगळाच आहे.
असे काही अनुभवले तर मला जरूर सांगा. शक्‍य झाल्यास ते मी प्रसिध्दही करण्याचा प्रयत्न करेन.

Wednesday, October 3, 2007

माझी माय

सह्याद्रीवर माझी माय ही नामवंत कलावंतांनी सांगीतलेली मालिका आहे।मुलगा कितीही मोठा झाला तरी आईला तो लहानच.आईला मानणारा आणि आईला विचारणारा असे दोन गट पडतात.केदार शिंदेनी सांगीतले की, जन्मदात्री आई थोरच पण मला खरं वाढविले माया दिली ती माझी आजी.तीच माझी

माय.असाच एक अमुभव वाचनात आला। वाटले तुम्हालाही तो वाचायला द्यावा.

माय कुठे?

मंत्रालयात डॉ. अविनाश दिसला. मी त्याला हाक मारली, तो थोडा गोंधळला, मग सावरत म्हणाला, "अरे श्रीकांत तू, फार वर्षांनी भेट झाली'."इथे कुठे?' मी विचारलं."अरे, मंत्रालयात काम होतं. आपल्या गावाला नवीन हॉस्पिटल बांधावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्याच गडबडीत आहे' असं बोलून तो निघून गेला. त्याचा फोन नंबर घेण्याचंही भान राहिलं नाही.मला सर्व लहानपणीचं आठवलं. आम्ही दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होतो. मी जरा हुड होतो, मस्ती, मारामाऱ्या करण्यात दादा होतो. अविनाश साधा, शांत व सर्वांना मदत करणारा होता. आमच्या ऐसपैस घरासमोर त्याचं छोटं घर होतं. घरात तो, त्याचे बाबा आणि एक बहीण राहत. आम्ही श्रीमंत होतो. घरात पैसा, प्रेम नुसतं वहात होतं. सर्वांचा लाडका होतो. काय हवं नको ते एका क्षणात मिळत होतं. बाबा फिरतीवर असत. आई देव देव करे, पण सर्वांना मदत करण्यातही तत्पर असायची. तिला श्रीमंतीचा तोरा नव्हता. मी लाडका होतो तसा अविनाशसुद्धा माझ्या आईचा लाडका होता. तो नेहमी आमच्या घरात असायचा आम्ही खेळायचो, कधी कधी भांडणंसुद्धा होत. असंच एकदा माझं आणि अविनाशचं भांडण झालं. भांडता भांडता मी त्याला बोलून गेलो, "तुला माय कुठं आहे, मला माय आहे, मायचं प्रेम आहे.' त्याचं अवसान गळून पडलं. तो रडत घरी गेला. आईला ते समजलं. मला बोलावलं. अविनाशला हाक मारली. आणि मला आईने मार मार मारलं. शेवटी अविनाशच मध्ये पडला आणि आईला अडवलं. तिच्या कुशीत रडत बसला. आईने प्रेमाने त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत त्याला स्वयंपाक खोलीत नेऊन जेवू घातलं. मी हमसून हमसून रडत होतो. आई माझ्याकडे मात्र लक्ष देत नव्हती. आम्ही हळूहळू मोठे होत होतो. मी शिक्षणात एवढा हुशार नसल्यामुळे मी बी. ए.पर्यंत मजल मारली. अविनाश हुशार होता. त्याला डॉक्‍टर व्हायचं होतं. आमचे आई-बाबा त्याला सर्वतोपरी मदत करत होते. मला मुंबईला मंत्रालयात नोकरी लागली. मी गाव विसरलो. पूर्णतः मुंबईकर झालो. पगार सोडून अन्य मार्गाने माझ्याकडे पैसा खेळू लागला. आईची पत्र येत होती. प्रथम प्रथम माझीसुद्धा उत्तरं जात होती. हळूहळू तीसुद्धा कमी होत गेली. मी माझ्या कामात व्यस्त होतो. या पैशापायी मी आई, गाव मित्र सर्व विसरलो. संसार थाटला, तसा पैसा सुद्धा जास्त लागू लागला. हाव वाढली. बायका पोरांच्या इच्छा वाढल्या. घरापेक्षा ऑफिसमध्ये माझा वेळ जास्त जाऊ लागला. गाव, आई-बाबा यांना विसरलो. कुणाची कामं करायची, कुणाची नाही हे तो किती पैसे देतो यावर ठरू लागलं. आईने केलेले संस्कार सगळे विसरून गेलो.मंत्रालयात गावची माणसं येत.
मोठा डॉक्‍टर झाला. तो तुझ्या आईला फार मानतो. डॉक्‍टरची पदवी मिळाल्यावर त्यांने पहिल्यांदा आईच्या पायावर ठेवली व शपथ घेतली की मी माझी सेवा गावासाठी वापरीन, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. आईने व सर्व गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला. गावात मिरवणूक काढली. तीसुद्धा आईला बरोबर घेऊन, अशा एकेक गोष्टी मला कळत होत्या. हे ऐकून मी आईला पत्र लिहिलं, पण आईचं उत्तर काही आलं नाही.पण इथे मीही आता जास्तच मस्तीत वावरत होतो. मुंबईतील बिल्डरांची माझ्या ऑफिसमध्ये रांग लागत होती. रोज रोज पैशाचा हिशोब होत होता. तशातच एकदा गावावरून आई खूप आजारी असल्याची तार आली. मी माझ्या कामात व्यस्त होतो. आईपेक्षा मला त्या बिल्डरची काळजी जास्त होती. त्याचा पैसा, नुकसान जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मी गावाला जाऊ शकलो नाही. पण तोच अविनाश मुंबईतील अतिमहत्त्वाचं काम अर्धवट सोडून आईच्या सेवेला धावून गेला. आईवर उपचार केले. त्याच्या बायको-मुलांनी माझ्या आईची सेवा केली.काही दिवसांनी बाहेर गावी कामानिमित्त जावं लागलं. गाव तिथून जवळ होतं. तेव्हा मी माझ्या गावी जायचं ठरवलं."काय आलात चिरंजीव, आहे मी जिवंत आहे. पण मी मेल्यावर तरी येशील की नाही याचीच शंका वाटत होती मला...पण आलास आधीच'""आई असं काय बोलतेस, मी तुझा मुलगा आहे.'"हो आहेस. पण "नावा'पुरता. मुंबईकर झालास. पैशात लोळतोयस. आईची आठवण कशी येईल.''मला काही जास्त वाद घालायचा नव्हता. घालूच शकलो नसतो. एका अर्थी आईचं बोलणं बरोबर होतं. मला त्याची लाज वाटत होती. शरमेनं माझी मान खाली गेली."आला आहेस तर घर तुझ्या नावावर करून जा. पण मी एक करणार आहे, गावाबाहेर आपली बरीच जमीन पडलेली आहे. ती मी गावासाठी हॉस्पिटलला देणार आहे. तुझ्या होकाराची वाट नाही बघत. पण तुझ्या कानावर घालते. आणि मी या घरात राहणार नाही. बाजूला एक खोली आहे तेथे राहीन. ज्या घरात मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले, पण ते वाया गेले. त्या घरात मला आता रहावयाचे नाही?'ती बरंच काही बोलली. मी बोललो नाही. कारण माझ्याच चुका होत्या. शिवाय मला मुंबई गाठायची होती. मी आईच्या पाया पडलो व निघतो आता असं म्हणून मी निघालो. तेव्हा आई म्हणाली, ""बघ, पैसा जमवू नको. माणसं जमव. तुझ्या बापानी ते केलं. माझ्या हातूनसुद्धा थोडं फार सत्कार्य घडलं. म्हणून मला गाव विचारतो. मला इथे काही कमी पडत नाही. बघ प्रयत्न कर. तुला असं जमतं का?''मी घराबाहेर पडलो. समोर डॉ. अविनाश व त्याचं कुटुंब भेटलं. अविनाश माझ्या जवळ आला. त्याने वहिनी, मुलांना माझ्या पाया पडायला लावलं.ते सगळे आत निघून गेले. अविनाश आणि मी रस्त्यात बोलत थांबलो. अविनाशला राहवलं नाही. तो मला जवळ घेऊन म्हणाला - "लहानपण आठवतं? तू मला म्हणाला होतास.तुला माय कुठे? तोच प्रश्‍न आज मी तुला विचारू शकतो...'
-राजीव

Monday, September 24, 2007

धमाल विनोदाचा शिडकावा करणारे "ए भाऊ'

प्रसंगातून फुलणारे सहजी विनोद. अतुल परचुरेने रंगमंचावर साकारलेली अफलातून भूमिका. त्याला हृषीकेश जोशीने दिलेली उत्तम साथ. संतोष पवारांचे दिग्दर्शन कौशल्य आणि अभय परांजपेंचे शब्दातून धमाल उडविणारे लेखन... साऱ्यांनीच "ए भाऊ डोके नको खाऊ'द्वारे निखळ मनोरंजनाचा आनंद दिला आहे.बायको लेखिका, तर नवरा सीरियल दिग्दर्शक. दोघेही स्वतंत्र विचारांचे. अर्थातच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. भावनिक नाते जपण्यापेक्षा तडजोडी स्वीकारणारे दिवाकर (हृषीकेश जोशी) आणि सुरुची (नीला गोखले). दर बुधवारी सामान्य बावळट माणसाला पार्टीत आणून त्याच्याकडून आपले मनोरंजन करणाऱ्या क्‍लबचा दिवाकर सभासद. अशा माणसाच्या शोधात असताना त्रिंबक शिंत्रे (प्राप्तिकर खात्यातला लिपिक) अर्थात अतुल परचुरे भेटतो. हा प्रकार मान्य नसल्याने सुरुची घरातून रागाने निघून जाते. त्यातच त्रिंबक शिंत्रेची एंट्री. घर सोडून गेलेल्या बायकोचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्रिंबक शिंत्रे कल्पना लढवीत नाटकात काय गमती घडतात, ते शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद हिरावून घेणे योग्य नव्हे.प्रसंग आणि संवादातून फुलणारे नाटकअभय परांजपे यांनी लिहिलेले हे नाटक "भेजा फ्राय' या हिंदी चित्रपटाशी मिळतेजुळते आहे. पण नाटकातले प्रसंग, मराठी भाषेतला अस्सल विनोद आणि संवादातली मजा नाटकातून अधिक अंगावर येते. त्रिंबक शिंत्रेच्या संवादात सामान्यातल्या भाबडेपणाच्या जाणिवा अधिक ठळकपणे नाटकात व्यक्त होतात. संवादातूनही नाकाने गमती घडविल्या आहेत. सीरियलचे प्रसंग लिहिताना ज्या गतीने त्या पाडल्या जातात, त्याचे गांभीर्यही प्रकट होते. डॉक्‍टर, मोना आणि हॉस्पिटलच्या छोट्या प्रसंगातून रंगमंचाच्या मर्यादा ओळखून विविध घटना नाट्य विविध पातळ्यांवर घडविले आहे. शिंत्रेच्या व्यक्तिरेखेतले अनेक बारकावे इथे दिसतात. झालेल्या चुका दुरुस्त करताना नव्याने चुकांमुळे भांबावलेपणा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मोठे मन सारेच.संतोष पवारांनी नाटकाला स्वतःचा चेहरा दिला आहे. त्यांच्या दिग्दर्शन स्पर्शाने नाटक फुलते आणि प्रेक्षकांना हसवत ठेवते. सामान्यातले असामान्यत्व बाहेर काढताना अतुल परचुरेंकडून जे पैलू बाहेर काढले आहेत, त्याचे श्रेय द्यायलाच हवे. शब्दात साठलेला आशय नटांकडून बाहेर काढून तो खुलविण्यात संतोष पवार सरस ठरले आहेत.अंकुश कांबळींनी दिग्दर्शकाचे घर उभे करताना एकाच रंगमंचाचा अनेक पातळ्यांवर कसा उपयोग करता येईल, ते अभ्यासून नेपथ्य निर्माण केले आहे. सेट डोळ्यांना आणि मनाला आनंद देतो. सरकता आणि फिरता अशा दोन्ही रंगमंचाचा वापर इथे केला आहे. राजन ताम्हाणे यांच्या प्रकाश योजनेत नाटक घडते.अतुल परचुरेंचा उत्तम अभिनयत्रिंबक शिंत्रेच्या अफलातून भूमिकेतून अतुल परचुरे इथे व्यक्त होतात. वाचिक, शाब्दिक आणि देहबोलीतून सफाईने त्यांनी ती साकारली आहे. त्यांनी नाटकाला खुलविले आणि भूमिकेला खेळविले आहे. सहजता आणि कमालीचे भान ठेवून नाटकाला स्वतःचा चेहराच त्यांनी दिला आहे. हृषीकेश जोशीने अतुलच्या जोडीने सफाईदार सहजता दाखविली आहे. रंगमंचावर दोघेही धमाल उडवून देतात. रसरशीतपणा आणि विनोदाचा तोल सांभाळून नाटकात आनंदा कारेकरांचा डॉक्‍टर आणि बलदेव या दोन्ही भूमिकांत स्वतःची छाप पाडतो. नीला गोखलेंची सुरुची, अतुल महाजनांचा सचिन आणि लक्ष्मी खानोलकर, राजन वेलणकर आणि चंद्रकांत लोकरेंनी निखळ विनोदी नाटक रंगमंचावर आणून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे

Friday, September 14, 2007

निनादत आलाय गणराय दारी

टोपी,उपरण्यातून गणराय आले
घंटा,झांजांचे पेवच झाले

गणपती सजवायची कल्पकता आहे
त्याला मिरवायला वेळही आहे

सार्वजनिक मंडळात भटजी येतात
प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त सतत बदलतात

घरात पाहुण्याचे स्वागत होते भारी
सदरेवर,फ्लॅटावरी गर्दीच सारी

बघणाऱ्यांची,नाचणाऱ्यांची इथे "काय ती" भक्ती
धार्मिकतेला इथेच सुचते नको ती "उक्ती"

मंदिरातली मूर्ती वाट पाही भक्तांची
मिरवणूक रस्तोरस्ती मांडवातल्या मूर्तींची

सोहळा गणरायाचा होतसे साजरा
उत्साहाला उधाणाचा दिसे इथे पसारा

बघुनिया दिपणार आता त्याचे नेत्र
माणसाने केले किती केवढे हे सत्र

नांदा आता सौख्यभरे सारे आलबेल
धर्माच्या भक्तीलाही इथे लाभे बळ

Monday, September 10, 2007

आईचा स्पर्श

खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.
लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.
पुरणपोळी,बेसनाचे लाडू,करंज्या खाव्या तर आईच्या हातच्याच
आज बायको घरी सारे करते.
पण तो स्पर्श नाही. ती चव नाही.
पदार्थात काय किती घातले
यापेक्षा मन आणि आपलेपणाचे तिखट-मिठ आणि साखर जी आईने त्यात मळली त्याला तोड नाही.
आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.

Sunday, September 9, 2007

वाजत गाजत गणराय येणार

वाजत गाजत गणराय येणार.
घर अन घर .गल्ली-गल्लीत ढोल ताशा वाजणार.
सर्व कार्यक्रमांचा विघ्नदाता गजानन निनादत मुहूर्तानंतर कधातरी
मांडवात बसणार.
झांज गुलालाने,ढोल काठ्यांनी
तरूणांच्या उत्साहाने गणराज येणार !
मूर्तीकारांना,कलाकारांना,मांडवाच्या कामगारांना
हाताला काम देणाऱ्या
घामाला मोल देणाऱ्या
सणाला उत्साह देणाऱ्या
आनंदाला उधाण देणाऱ्या
धर्माच्या नावाला प्रेरणा देणाऱ्या
गणेशोत्सवाचा आरंभ होतोय
परंपरा,संस्कृतीची आठवण देणारा हा उत्सव
महाराष्ट्रात देशात आणि परदेशातही गाजणार वाजणार बरसणार !

धांर्मिकतेचे प्रतिक मिरवणारा तो येतोय.
गोंगाटाला दूर करा. सभ्यतेची भाषा करा.
वर्गणीचा सोस टाळा.
भव्यते पेक्षा सामाजिकतेकडे लक्ष ठेवा
स्पिकर भिंती कमी करा.
जेष्ठांकडे ध्यान द्या
पर्यावरणाचे भान ठेवा.
मन मोठे करा,भान जगाचे ठेवा !

हृदय अजून मराठी आहे

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

Tuesday, September 4, 2007

धमाल विनोदाचा शिडकावा करणारे "ए भाऊ'

प्रसंगातून फुलणारे सहजी विनोद. अतुल परचुरेने रंगमंचावर साकारलेली अफलातून भूमिका. त्याला हृषीकेश जोशीने दिलेली उत्तम साथ. संतोष पवारांचे दिग्दर्शन कौशल्य आणि अभय परांजपेंचे शब्दातून धमाल उडविणारे लेखन. साऱ्यांनीच "ए भाऊ डोके नको खाऊ'द्वारे निखळ मनोरंजनाचा आनंद दिला आहे.
बायको लेखिका, तर नवरा सीरियल दिग्दर्शक. दोघेही स्वतंत्र विचारांचे. अर्थातच अपापल्या क्षेत्रात यशस्वी. भावनिक नाते जपण्यापेक्षा तडजोडी स्वीकाणारे दिवाकर (हृषीकेश जोशी) आणि सुरुची (नीला गोखले). दर बुधवारी सामान्य बावळट माणसाला पार्टीत आणून त्याच्याकडून आपले मनोरंजन करणाऱ्या क्‍लबचा दिवाकर सभासद. अशा माणसाच्या शोधात असताना त्रिंबक शिंत्रे (प्राप्तिकर खात्यातला लिपिक) अर्थात अतुल परचुरे भेटतो. हा प्रकार मान्य नसल्याने सुरुची घरातून रागाने निघून जाते. त्यातच त्रिंबक शिंत्रेची एंट्री. घर सोडून गेलेल्या बायकोचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्रिंबक शिंत्रे कल्पना लढवीत नाटकात काय गमती घडतात, ते शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद हिरावून घेणे योग्य नव्हे.
प्रसंग आणि संवादातून फुलणारे नाटक
अभय परांजपे यांनी लिहिलेले हे नाटक "भेजा फ्राय'च्या हिंदी चित्रपटाशी मिळतेजुळते आहे. पण नाटकातले प्रसंग, मराठी भाषेतला अस्सल विनोद आणि संवादातली मजा नाटकातून अधिक अंगावर येते. त्रिंबक शिंत्रेच्या संवादात सामान्यातल्या भाबडेपणाच्या जाणिवा अधिक ठळकपणे नाटकात व्यक्त होतात. संवादातूनही नाकाने गमती घडविल्या आहेत. सीरियलचे प्रसंग लिहिताना ज्या गतीने त्या पाडल्या जातात त्याचे गांभीर्यही प्रकट होते. डॉक्‍टर, मोना आणि हॉस्पिटलच्या छोट्या प्रसंगातून रंगमंचाच्या मर्यादा ओळखून विविध घटना नाटक विविध पातळ्यांवर घडविले आहे. शिंत्रेच्या व्यक्तिरेखेतले अनेक बारकावे इथे दिसतात. झालेल्या चुका दुरुस्त करताना नव्याने चुका करतानाचा भांबावलेपणा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मोठे मन सारेच.
संतोष पवारांनी नाटकाला स्वतःचा चेहरा दिला आहे. त्यांच्या दिग्दर्शन स्पर्शाने नाटक फुलते आणि प्रेक्षकांना हसवत ठेवते. सामान्यातले असामान्यत्व बाहेर काढताना अतुल परचुरेंकडून जे पैलू बाहेर काढले आहेत त्याचे श्रेय द्यायलाच हवे. शब्दात साठलेला आशय नटांकडून बाहेर काढून तो खुलविण्यात संतोष पवार सरस ठरले आहेत.
अंकुश कांबळींनी दिग्दर्शकाचे घर उभे करताना एकाच रंगमंचाचा अनेक पातळ्यांवर कसा उपयोग करता येईल ते अभ्यासून नेपथ्य निर्माण केले आहे. सेट डोळ्यांना आणि मनाला आनंद देतो. सरकता आणि फिरता अशा दोन्ही रंगमंचाचा वापर इथे केला आहे. राजन ताम्हाणे यांच्या प्रकाश योजनेत नाटक घडते.
अतुल परचुरेचा उत्तम अभिनय
त्रिंबक शिंत्रेच्या भूमिकेतून अतुल परचुरे अफलातून भूमिकेत इथे व्यक्त होतात. वाचिक, शाब्दिक आणि देहबोलीतून ज्या सफाईने त्यांनी ती साकारली आहे. त्यांनी नाटकाला खुलविले आणि भूमिकेला खेळविले आहे. सहजता आणि कमालीचे भान ठेवून नाटकाला स्वतःचा चेहराच त्यांनी दिला आहे. हृषीकेश जोशीने अतुलच्या जोडीने सफाईदार सहजता दाखविली आहे. रंगमंचावर दोघेही धमाल उडवून देतात. रसरशीतपणा आणि विनोदाचा तोल सांभाळून नाटकात आनंदा कारेकरांचा डॉक्‍टर आणि बलदेव या दोन्ही भूमिकांत स्वतःची छाप पाडली आहे. नीला गोखलेंची सुरुची, अतुल महाजनांचा सचिन आणि लक्ष्मी खानोलकरांची मोना "ए भाऊ'ला उठावदार बनवितात.
राजन वेलणकर आणि चंद्रकांत लोकरेंनी निखळ विनोदी नाटक रंगमंचावर आणून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

Wednesday, August 29, 2007

श्रावण- एक आनंदोत्सव

भारतातल्या अठरापगड जातीतल्या प्रत्येक गटाला श्रावण महिना असा अमाप उत्साहाचे उधाण आणणारा असतो. एकात्मता साधणारा एक आनंदोत्सव असतो......नववधूसारखा जणू हिरवागार शालू नेसलेली धरती, तिच्या अंगावर पिवळ्याधमक ऊन्हाचा झुळझुळीत शेला, शेल्याला इंद्रधनुष्याचा सप्तरंगी काठ, रिमझिमत येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरींनी तिच्या अंगांगावर रोमांचासारखी फुललेली गवताची कोवळी पाती.... सगळ्या चैतन्याला जणू उधाण येतं आणि "आला श्रावण, आला श्रावण' असा सृष्टीच्या अणूरेणूतून नाद उमटतो.
सृष्टीतला हा उत्सव माणसाच्या मनात भिनत जातो. फुललेल्या मनाची सर्जनशीलता साहित्य, काव्य, नृत्य, नाट्य, चित्र, संगीत अशा निरनिराळ्या कलाविष्काराचं रूप घेते. श्रावण असा निसर्ग आणि मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सम्राट बनतो.
धार्मिक दृष्टीनं श्रावण अत्यंत पवित्र महिना मानला जातो. देवदेवतांच्या पूजा, व्रतवैकल्यं करून भरपूर पुण्यसंचय करून ठेवावा. श्रावणाला शिवमास असंही म्हणतात. कहाण्यांप्रमाणे श्रावणात समुद्रमंथन झालं आणि त्यातून आलेलं हलाहल शंकरानं प्राशन केलं. यासाठी श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करतात, शिवामूठ वाहतात, उपवास करतात. मंगळवारी नववधू पार्वतीची पूजा करून मंगळागौर साजरी करते. शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी तिला साकडं घालतात, सवाष्ण जेवायला घालून साखर-दूध फुटाण्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुवारी गुरुचरित्राचे पाठ. रविवारी आदित्याची पूजा. सत्यनारायणाची पूजा... असा श्रावण आध्यात्मिक दृष्टीनं गजबजलेला महिना असतो.

सणांचा राजा- श्रावण
भारतीय संस्कृतीत सणांचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण हा चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचा महिना. त्यामुळे अनेक सण साजरे केले जातात. निसर्गावर आधारित सणांमध्ये नारळीपौर्णिमा येते. नारळ हा कल्पवृक्ष आणि धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचा! ओटी भरण्यासाठी, ज्येष्ठांचा सत्कार करण्यासाठी, पूजेमध्ये नारळाचा मान मोठा! या नारळाच्या झाडाविषयी कृतज्ञता म्हणून हा सण. कोळी लोकांना तर या सणांची फार अपूर्वाई असते. त्यांना अन्न देणाऱ्या समुद्राची ते पूजा करतात. त्याला नारळ अर्पण करतात. या आधी चार महिने मासेमारी बंद असते. त्या काळात माशांच्या पिल्लांची वाढ पूर्ण होते. पावसाळ्यात खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो. नारळीपौर्णिमेला प्रथम रंगरंगोटी केलेली होडी समुद्रात घालतात.
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे सणांमध्ये शेतकऱ्यांचे उपकारकर्ते नाग आणि बैल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी आणि बैलपोळासारखे सण साजरे केले जातात. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करणारे नाग, साप यांची पूजा नागपंचमीत केली जाते. बत्तीसशिराळा, भीमाशंकर इथे लाखो नाग-सापांचे प्रदर्शनही भरते. बैलपोळ्याला शेतात वर्षभर काम करणाऱ्या बैलांना झूल घालून, रेश्‍मी गोंडे, घुंगराच्या माळा, बाशिंगं बांधून सजवलं जातं. पूजा करून गोडधोडाचा घास भरवला जातो.

नातेसंबंधांवर आधारित सणही
राखीपौर्णिमा हा असाच बहीण-भावांचा पवित्र नात्याचे बंध अजून भक्कम करणारा सण श्रावणात येतो. पूर्वी उत्तर भारतात प्रजा राजाला राखी बांधत असे. राजाकडून त्यामुळे संरक्षणाचे आश्‍वासन मिळे. आज ई-राखीसुद्धा पाठविली जाते. सामाजिक आशयाने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांना राखी बांधली जाते. हॉस्पिटल, अनाथाश्रम, कारागृह अपंग वसतिगृह, वृद्धाश्रम इथेही राखीपौर्णिमा मुद्दाम आयोजित करून सामाजिक बांधिलकी व्यक्त केली जाते. मातृदिन हा पिठोरी अमावास्येला साजरा करून मुलांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.
"कृष्ण' हे तर भारतीय संस्कृतीला पडलेलं सुरेख स्वप्न आहे. श्रावणातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णजन्म झाला. त्यामुळे गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात. मथुरा-गोकुळ, वृंदावन, द्वारका इथे तर उत्सवाचा विशेष थाट असतो. कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा म्हणजे तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळतो. "गोविंदा आला रे आला'च्या तालावर मानवी थर उभे करून दहीहंडी फोडली जाते.
श्रावणातील वेगवेगळ्या उत्सवात वेगवेगळी पक्वान्नं केली जातात. श्रावणाची सुरवात होते तीच कणकेच्या दिव्याच्या बेताने! नागपंचमीला उकडलेले पुरणाचे दिंड, श्रावणी शुक्रवारी आणि बैल पोळ्याला पुरणपोळ्या, नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाच्या करंज्या खाण्यापिण्याची धमाल असते.
या सर्व उत्सवात काही ना काही कारणाने नाच, गाणी येतातच ! नागपंचमीला स्त्रिया मेंदी काढतात, झोपाळे बांधतात, झिम्मा, फुगड्या असे खेळ रंगतात, मंगळागौरी तर रात्र रात्रभर "खुर्ची का मिर्ची', पिंगा, उखाणे, फुगड्या असे खेळ खेळत जागवतात, नारळी पौर्णिमेला कोळ्यांची नृत्यं, गाणी रंगात येतात. श्रावणावर आधारित अनेक लोकगीतं आपल्याकडे म्हटली जातात. उपशास्त्रीय संगीतातही सावनी, कजरी, झुला यासारखे गायन प्रकार या ऋतूवर आधारित आहेत.
सासुरवाशिणींना श्रावण ही पर्वणी वाटते.
"सावनके झूले' लागले की माहेरी जायला मिळतं. सर्व सणांना शाळांना भरपूर सुट्या म्हणून विद्यार्थी खूष असतात. पूजा, धर्मग्रंथ वाचन, प्रवचन यांनी देवळात भरपूर कार्यक्रम म्हणून ज्येष्ठ मंडळी आनंदात असतात. पौरहित्य करणाऱ्या गुरुजींना भरपूर काम असतं. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना अनेक कार्यक्रम असतात. १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सणही याच महिन्यात येतो म्हणून राजकीय क्षेत्रातही धावपळ असते.

Monday, August 27, 2007

“कोरियन लोणचे…....”

“कोरियन लोणचे” काय, मस्त मूड झाला ना? पण लोणचे आणि तेही कोरियन? या उत्सुकतेने थोडेसे भांबावलेही असणार! आंबा, करी, लिंबू अशा एक ना अनेक प्रकारचे लोणच्याचे आपण जबरदस्त फॅन! मग याच्याशी कोरियन लोणच्याचा काय संबंध? कोरियन लोकांचा जेवणातील अविभाज्य घटक. त्याची आपल्या लोणच्या सारखीच मुरवण्याची पद्धत, थोडयाशा तिखट चवीमुळे जगातही तितकाच लोकप्रिय असणारा हा पदार्थ आहे तरी काय?
“खिमची” हे या कोरियन लोणच्याचे नाव. कोरियन खिमची ही जगातही तितकीच प्रसिध्द आहे. खिमचीचा आहारातला भाग हा खूपच महत्वपूर्ण आहे. तिच्यातील पदार्थानुसार पोषकता ही बदलत जाते आणि हेच कोरियातील थंड हिवाळ्यासाठी शरीरास खूपच फायदेशीर ठरते. खिमचीमध्ये कमी कॅलरीज्, साखरेची लेवल असते. याउलट जीवनसत्वे अ, ब, क, लोह यांचे भरपूर प्रमाण आढळते. मुरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेले लॅक्टिक अँसिड, अँसेटिक अँसिड हे जंतू पासून संरक्षण करतात. अशा मुरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेली घटके, सूक्ष्मजीव शरीरास फारच फायदेशीर असतात. खिमची तयार करण्याची पध्दतीत भागानुसार, वातावरणानुसार आणि कुटुंबाच्या परंपरेनुसारही थोडे बदल आहेत. ह्या खिमचीची चव सुध्दा त्यातील वापरण्यात येणा-या मीठ, मसाल्याचे पदार्थ, सीफूड यांच्या प्रमाणानुसार बदलते. कोबी, फ्लॉवर, कांदा, लाल मिरची, काकडी, मुळा अशा विविध भाज्यांपासून खिमची बनवितात. गोड, आंबट, तिखट, खारट विविध चवींची खिमची बनवितात तरी कशी?


खिमची बनविणे हा सर्वांसाठी एकञित येण्याचा कार्यक्रम असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खिमची साधारण ऑक्टाबर पासून सुरुवात करतात. कुटुंबाच्या व्यक्तींनुसार तयार करण्याचे प्रमाण ठरते. यास २ ते ३ दिवस लागतात. तेव्हा ते कुटुंब त्यांना मदत करण्यास आलेल्या सर्वांसाठी जेवण करतात आणि एवढेच नाही तर त्या प्रत्येकास थोडी खिमचीही देण्यात येते. पण बदलत्या जीवनमानानुसार या धावपळीच्या जगात हे एकञ येण्याचा आनंद हरवून बसले आहेत, नाहीतर ही मजा काही औरच आहे! खिमची बनविण्यासाठी प्रथम वापरण्यात येणारी भाजी म्हणजे उदा. कोबी स्वच्छ धुवून घेऊन त्याचे तुकडे करतात. नंतर मीठाच्या पाण्यात ६ ते ८ तासांसाठी ते भिजवितात. याचे कारण असे मीठ हे हानीकारक जंतू निर्माण होण्यास प्रतिबंध करते. नंतर हे पाण्यामध्ये ३ ते ४ वेळा धुवून चांगले वाळविण्यास ठेवतात. हिरवा कांदा, मुळा, रेड कापतात. आले, लसूण बारीक कापतात. त्यानंतर फिश पेस्ट तयार करुन त्यात लाल मिरची, तांदळाची पेस्ट सर्व एकञ करतात. मग सर्व पदार्थ आता तयार केल्या नुसार एकञ करतात. हे सर्व कोबीच्या पानांमध्ये भरुन खिमचीच्या भांडयामध्ये ठेवतात आणि वर कोबीचे पान ठेवून थोडे मीठ टाकतात. खिमचीचे भांडे हे विशिष्ट प्रकारचे असते. यांचा खिमची जास्त काळासाठी चांगली ठेवण्यास मदत होते व याशिवाय भांडयांचा आकार आत हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. हे भांडे २ प्रकारचे असते एक माती व दुसरे लाकूडा पासुन तयार केलेले.


खिमची शिवाय कोरियन जेवण आणि जेवणाचा टेबल अपूर्ण आहे. त्याशिवाय जेवणाची व्याख्याच अधूरी आहे. त्यातील पोषकता लक्षात घेता आज तरूण पिढीमध्ये खिमचीच्या नवीन पाश्चिमात्य चवीने चांगलीच आवड निर्माण केली आहे. ख़िमची सूप,खिमची पिझ्झा, खिमची फ्राईड राईस, खिमची सॅंडविच, खिमची करी अशा डिशेस् खूप लोकप्रिय झाल्या आहेत.


कोरियात दरवर्षी खिमची फेस्टिवल साजरा होतो. अशा या खिमचीचा इतिहास खूप जुना आहे.

Monday, August 20, 2007

सण रक्षा बंधनाचा गे होतसे साजरा ।।

बहीण भावाची नाती गे वेगळी
त्यांच्या बंधनाची गे पोतच आगळी ।।


सांगे बहिण भावाला रक्ताचे गे नाते
हाती धरीला हाताने बांधली गे राखे ।।


हातावरी डुलते गे भाव राखीने साजीरा
सण रक्षा बंधनाचा गे होतसे साजरा ।।

Friday, August 17, 2007

।। धरणीचे चैतन्य ।।
थेंबा थेंबानं धरणी आज न्हावून निघाली
तिच्या कोमजल्या मनी चैतन्याची जाग आली ।।

कसे कळायचे तुला त्याचे मनीचे ग गाणे
रोमारोमात भिनली त्याच्या देहाचे गे वारे ।।

तापलेल्या मातीलाही आज वाटे शांतशांत
धारा निघताना वाटे देह झाला ग निवांत ।।

नाती गोती तिथे वाटतात दूरदूर
आला पाऊस ग तेव्हा थेंबाथेंबाचे ग सर ।।

धारा पडल्या ग येथे न्हाली धरणी देवता
नको थांबूच नये ग त्याच्या मुखीची आर्तता ।।

आली जाग तेव्हा माय म्हणाली ग मला
उठ लेक उठ आता धरणी दुभंगली तेला ।।

वाटे पडावा पडावा तोच माझ्या मनातून
नको होवावी पहाट झाले चिंब माझे मन ।।

- सुभाष इनामदार
५, दत्तश्री, ६३४-६ बिबवेवाडी
पुणे - ४११ ०३७.
(9881099056)

Thursday, August 16, 2007

निमित्त होते शंभर वर्षाच्या तरूणाच्या वाढदिवसाचे

कौटुंबिक सोहळ्यातील अविस्मरणीय प्रसंग साजरा झाला. साक्षिदारही होते वय वर्षे ७५ पासून सव्वा वर्षे वयाच्या उमेदवारांपर्यतचे.असा सोहळा पुन्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यादेखत घडेल याची खात्री देता येत नाही.
तुमच्याकडेही असे काही घडत असले तर नक्की मला पाठवा.

नाती जपण्याचे सुखही तेवढेच महत्वाचे नाही काय ?

Tuesday, August 7, 2007

निमीत्त पावसाचे

नको नको हा पाऊस असा पुन्हा सुर उमटु लागला आहे.तुम्हाला काय वाटले ?पावसाच्या या बरसण्याने तुमच्या मनात काय येते ?थोडे व्यक्त व्हा .