Wednesday, August 29, 2007

श्रावण- एक आनंदोत्सव

भारतातल्या अठरापगड जातीतल्या प्रत्येक गटाला श्रावण महिना असा अमाप उत्साहाचे उधाण आणणारा असतो. एकात्मता साधणारा एक आनंदोत्सव असतो......नववधूसारखा जणू हिरवागार शालू नेसलेली धरती, तिच्या अंगावर पिवळ्याधमक ऊन्हाचा झुळझुळीत शेला, शेल्याला इंद्रधनुष्याचा सप्तरंगी काठ, रिमझिमत येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरींनी तिच्या अंगांगावर रोमांचासारखी फुललेली गवताची कोवळी पाती.... सगळ्या चैतन्याला जणू उधाण येतं आणि "आला श्रावण, आला श्रावण' असा सृष्टीच्या अणूरेणूतून नाद उमटतो.
सृष्टीतला हा उत्सव माणसाच्या मनात भिनत जातो. फुललेल्या मनाची सर्जनशीलता साहित्य, काव्य, नृत्य, नाट्य, चित्र, संगीत अशा निरनिराळ्या कलाविष्काराचं रूप घेते. श्रावण असा निसर्ग आणि मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सम्राट बनतो.
धार्मिक दृष्टीनं श्रावण अत्यंत पवित्र महिना मानला जातो. देवदेवतांच्या पूजा, व्रतवैकल्यं करून भरपूर पुण्यसंचय करून ठेवावा. श्रावणाला शिवमास असंही म्हणतात. कहाण्यांप्रमाणे श्रावणात समुद्रमंथन झालं आणि त्यातून आलेलं हलाहल शंकरानं प्राशन केलं. यासाठी श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करतात, शिवामूठ वाहतात, उपवास करतात. मंगळवारी नववधू पार्वतीची पूजा करून मंगळागौर साजरी करते. शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी तिला साकडं घालतात, सवाष्ण जेवायला घालून साखर-दूध फुटाण्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुवारी गुरुचरित्राचे पाठ. रविवारी आदित्याची पूजा. सत्यनारायणाची पूजा... असा श्रावण आध्यात्मिक दृष्टीनं गजबजलेला महिना असतो.

सणांचा राजा- श्रावण
भारतीय संस्कृतीत सणांचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण हा चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचा महिना. त्यामुळे अनेक सण साजरे केले जातात. निसर्गावर आधारित सणांमध्ये नारळीपौर्णिमा येते. नारळ हा कल्पवृक्ष आणि धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचा! ओटी भरण्यासाठी, ज्येष्ठांचा सत्कार करण्यासाठी, पूजेमध्ये नारळाचा मान मोठा! या नारळाच्या झाडाविषयी कृतज्ञता म्हणून हा सण. कोळी लोकांना तर या सणांची फार अपूर्वाई असते. त्यांना अन्न देणाऱ्या समुद्राची ते पूजा करतात. त्याला नारळ अर्पण करतात. या आधी चार महिने मासेमारी बंद असते. त्या काळात माशांच्या पिल्लांची वाढ पूर्ण होते. पावसाळ्यात खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो. नारळीपौर्णिमेला प्रथम रंगरंगोटी केलेली होडी समुद्रात घालतात.
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे सणांमध्ये शेतकऱ्यांचे उपकारकर्ते नाग आणि बैल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी आणि बैलपोळासारखे सण साजरे केले जातात. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करणारे नाग, साप यांची पूजा नागपंचमीत केली जाते. बत्तीसशिराळा, भीमाशंकर इथे लाखो नाग-सापांचे प्रदर्शनही भरते. बैलपोळ्याला शेतात वर्षभर काम करणाऱ्या बैलांना झूल घालून, रेश्‍मी गोंडे, घुंगराच्या माळा, बाशिंगं बांधून सजवलं जातं. पूजा करून गोडधोडाचा घास भरवला जातो.

नातेसंबंधांवर आधारित सणही
राखीपौर्णिमा हा असाच बहीण-भावांचा पवित्र नात्याचे बंध अजून भक्कम करणारा सण श्रावणात येतो. पूर्वी उत्तर भारतात प्रजा राजाला राखी बांधत असे. राजाकडून त्यामुळे संरक्षणाचे आश्‍वासन मिळे. आज ई-राखीसुद्धा पाठविली जाते. सामाजिक आशयाने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांना राखी बांधली जाते. हॉस्पिटल, अनाथाश्रम, कारागृह अपंग वसतिगृह, वृद्धाश्रम इथेही राखीपौर्णिमा मुद्दाम आयोजित करून सामाजिक बांधिलकी व्यक्त केली जाते. मातृदिन हा पिठोरी अमावास्येला साजरा करून मुलांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.
"कृष्ण' हे तर भारतीय संस्कृतीला पडलेलं सुरेख स्वप्न आहे. श्रावणातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णजन्म झाला. त्यामुळे गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात. मथुरा-गोकुळ, वृंदावन, द्वारका इथे तर उत्सवाचा विशेष थाट असतो. कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा म्हणजे तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळतो. "गोविंदा आला रे आला'च्या तालावर मानवी थर उभे करून दहीहंडी फोडली जाते.
श्रावणातील वेगवेगळ्या उत्सवात वेगवेगळी पक्वान्नं केली जातात. श्रावणाची सुरवात होते तीच कणकेच्या दिव्याच्या बेताने! नागपंचमीला उकडलेले पुरणाचे दिंड, श्रावणी शुक्रवारी आणि बैल पोळ्याला पुरणपोळ्या, नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाच्या करंज्या खाण्यापिण्याची धमाल असते.
या सर्व उत्सवात काही ना काही कारणाने नाच, गाणी येतातच ! नागपंचमीला स्त्रिया मेंदी काढतात, झोपाळे बांधतात, झिम्मा, फुगड्या असे खेळ रंगतात, मंगळागौरी तर रात्र रात्रभर "खुर्ची का मिर्ची', पिंगा, उखाणे, फुगड्या असे खेळ खेळत जागवतात, नारळी पौर्णिमेला कोळ्यांची नृत्यं, गाणी रंगात येतात. श्रावणावर आधारित अनेक लोकगीतं आपल्याकडे म्हटली जातात. उपशास्त्रीय संगीतातही सावनी, कजरी, झुला यासारखे गायन प्रकार या ऋतूवर आधारित आहेत.
सासुरवाशिणींना श्रावण ही पर्वणी वाटते.
"सावनके झूले' लागले की माहेरी जायला मिळतं. सर्व सणांना शाळांना भरपूर सुट्या म्हणून विद्यार्थी खूष असतात. पूजा, धर्मग्रंथ वाचन, प्रवचन यांनी देवळात भरपूर कार्यक्रम म्हणून ज्येष्ठ मंडळी आनंदात असतात. पौरहित्य करणाऱ्या गुरुजींना भरपूर काम असतं. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना अनेक कार्यक्रम असतात. १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सणही याच महिन्यात येतो म्हणून राजकीय क्षेत्रातही धावपळ असते.

Monday, August 27, 2007

“कोरियन लोणचे…....”

“कोरियन लोणचे” काय, मस्त मूड झाला ना? पण लोणचे आणि तेही कोरियन? या उत्सुकतेने थोडेसे भांबावलेही असणार! आंबा, करी, लिंबू अशा एक ना अनेक प्रकारचे लोणच्याचे आपण जबरदस्त फॅन! मग याच्याशी कोरियन लोणच्याचा काय संबंध? कोरियन लोकांचा जेवणातील अविभाज्य घटक. त्याची आपल्या लोणच्या सारखीच मुरवण्याची पद्धत, थोडयाशा तिखट चवीमुळे जगातही तितकाच लोकप्रिय असणारा हा पदार्थ आहे तरी काय?
“खिमची” हे या कोरियन लोणच्याचे नाव. कोरियन खिमची ही जगातही तितकीच प्रसिध्द आहे. खिमचीचा आहारातला भाग हा खूपच महत्वपूर्ण आहे. तिच्यातील पदार्थानुसार पोषकता ही बदलत जाते आणि हेच कोरियातील थंड हिवाळ्यासाठी शरीरास खूपच फायदेशीर ठरते. खिमचीमध्ये कमी कॅलरीज्, साखरेची लेवल असते. याउलट जीवनसत्वे अ, ब, क, लोह यांचे भरपूर प्रमाण आढळते. मुरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेले लॅक्टिक अँसिड, अँसेटिक अँसिड हे जंतू पासून संरक्षण करतात. अशा मुरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेली घटके, सूक्ष्मजीव शरीरास फारच फायदेशीर असतात. खिमची तयार करण्याची पध्दतीत भागानुसार, वातावरणानुसार आणि कुटुंबाच्या परंपरेनुसारही थोडे बदल आहेत. ह्या खिमचीची चव सुध्दा त्यातील वापरण्यात येणा-या मीठ, मसाल्याचे पदार्थ, सीफूड यांच्या प्रमाणानुसार बदलते. कोबी, फ्लॉवर, कांदा, लाल मिरची, काकडी, मुळा अशा विविध भाज्यांपासून खिमची बनवितात. गोड, आंबट, तिखट, खारट विविध चवींची खिमची बनवितात तरी कशी?


खिमची बनविणे हा सर्वांसाठी एकञित येण्याचा कार्यक्रम असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खिमची साधारण ऑक्टाबर पासून सुरुवात करतात. कुटुंबाच्या व्यक्तींनुसार तयार करण्याचे प्रमाण ठरते. यास २ ते ३ दिवस लागतात. तेव्हा ते कुटुंब त्यांना मदत करण्यास आलेल्या सर्वांसाठी जेवण करतात आणि एवढेच नाही तर त्या प्रत्येकास थोडी खिमचीही देण्यात येते. पण बदलत्या जीवनमानानुसार या धावपळीच्या जगात हे एकञ येण्याचा आनंद हरवून बसले आहेत, नाहीतर ही मजा काही औरच आहे! खिमची बनविण्यासाठी प्रथम वापरण्यात येणारी भाजी म्हणजे उदा. कोबी स्वच्छ धुवून घेऊन त्याचे तुकडे करतात. नंतर मीठाच्या पाण्यात ६ ते ८ तासांसाठी ते भिजवितात. याचे कारण असे मीठ हे हानीकारक जंतू निर्माण होण्यास प्रतिबंध करते. नंतर हे पाण्यामध्ये ३ ते ४ वेळा धुवून चांगले वाळविण्यास ठेवतात. हिरवा कांदा, मुळा, रेड कापतात. आले, लसूण बारीक कापतात. त्यानंतर फिश पेस्ट तयार करुन त्यात लाल मिरची, तांदळाची पेस्ट सर्व एकञ करतात. मग सर्व पदार्थ आता तयार केल्या नुसार एकञ करतात. हे सर्व कोबीच्या पानांमध्ये भरुन खिमचीच्या भांडयामध्ये ठेवतात आणि वर कोबीचे पान ठेवून थोडे मीठ टाकतात. खिमचीचे भांडे हे विशिष्ट प्रकारचे असते. यांचा खिमची जास्त काळासाठी चांगली ठेवण्यास मदत होते व याशिवाय भांडयांचा आकार आत हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. हे भांडे २ प्रकारचे असते एक माती व दुसरे लाकूडा पासुन तयार केलेले.


खिमची शिवाय कोरियन जेवण आणि जेवणाचा टेबल अपूर्ण आहे. त्याशिवाय जेवणाची व्याख्याच अधूरी आहे. त्यातील पोषकता लक्षात घेता आज तरूण पिढीमध्ये खिमचीच्या नवीन पाश्चिमात्य चवीने चांगलीच आवड निर्माण केली आहे. ख़िमची सूप,खिमची पिझ्झा, खिमची फ्राईड राईस, खिमची सॅंडविच, खिमची करी अशा डिशेस् खूप लोकप्रिय झाल्या आहेत.


कोरियात दरवर्षी खिमची फेस्टिवल साजरा होतो. अशा या खिमचीचा इतिहास खूप जुना आहे.