Sunday, December 30, 2007

'सकाळ करंडक'मध्ये गाजलेल्या एकांकिका


सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचे दुसरे वर्ष तरुणांच्या उत्साहात रंगले. वेगळे विषय आणि त्याला लाभलेला समर्थ कलाकार चमू यामुळे एकांकिका खुलत गेल्या. ३६ एकांकिकांतून काही निवडक प्रभाव पाडणासकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचे दुसरे वर्ष तरुणांच्या उत्साहात रंगले. वेगळे विषय आणि त्याला लाभलेला समर्थ कलाकार चमू यामुळे एकांकिका खुलत गेल्या.

कंडिशन अप्लाय- गिरीश दातारने बॉलिवूडमध्ये येण्याच्या ध्येयाने घर सोडून झगडणाऱ्या दोघींची कथा ताकदीने रेखाटली आहे. इथे गुणाबरोबर त्यांना खूष करण्यासाठी सोबत करण्याच्या मागण्या केल्या जातात. एक लेखिका तर दुसरी आहे स्टार रोल मिळण्याची स्वप्ने पाहणारी. संवादातून उलगडत जाणारी ही एकांकिका मृण्मयी देशपांडेनी तेवढ्याच परिणामकारकपणे सादर केली. दिग्दर्शन आणि लेखिकेच्या भूमिकेत तिने स्वतःचे श्रेष्ठत्व पटवून दिले. गती आणि छोट्या प्रसंगाची केलेली गुंफण यामुळे वेगळा थाट साधला गेला आहे. तिला साथ दिली अनुजा साठेने. वाचिक आणि देहबोलीतून अनुला उत्कटतेने घडविली. दोघींनी ज्या ताकदीने विषय मांडला तेवढी उंची दुसरा कुठलाही संघ गाठू शकला नाही. नेपथ्य, प्रकाश आणि पार्श्‍वसंगीताने परिणामकारता अधिक वाढविली. संवादात ताकद. मांडणीत नेमकेपणा आणि विषय समजावून घेऊन केलेली रचना सारेच सुरेख. मैत्रीतून उलगडत जाणारा विषय दोघींनी गुंतवून ठेवला.

दळण- दमांच्या कथेचे बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले नाट्यरूपांतर पडदा उघडल्यापासूनच पकड घेत गेले. विनोदी प्रसंगाची गुंफण. मुलांचा वात्रटपणा. खुलत गेलेले प्रसंग. मास्तरांनी मुलांशी केलेल्या करामती. मास्तरने घरी शिकवणी घेण्यासाठी केलेले चाळे.आणि आईवर डोळा ठेवून शिकवणीला गेल्यानंतर झालेली फजिती. सारेच फर्मास. रसरशीत. मास्तराच्या अभिनयातून झिरपत गेलेली एकांकिका संघाच्या यशाचे शिक्कामोर्तब करत होते. उठावदार दिग्दर्शनातून, माफक पण साध्या संगीतातून आणि सांघिक कौशल्यातून दळण बहरली. अभय महाजन, निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ (मास्तर)सह साऱ्या चमूचे हे सांघिक यश. यात गंधार संगोरामच्या संगीताचाही समावेश आहेच.

तमासगीरांच्या आजच्या व्यथेची दखल घेणारी "फड' आयएलएसची निर्मिती होती. अभिजित ढेरेने ती लिहिली आणि सादर केली. प्रथमतः तिने प्रभाव साधला, पण नंतर सादरीकरण ढेपाळले.

तरुणाईची नशा, धुंदी आणि मस्त जगणे याची चुणूक अनुभवली एम. ए. रंगूनवाला कॉलेजच्या "व्होडका'मधून. अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी पुतळ्याच्या विटंबनेचा घाट घातला जातो. यात मित्राचा बळी जातो. खेळ अंगाशी येतो वाटतानाच कथेला कलाटणी दिली गेली. मित्र गेला नसून मुस्लिम मित्राला मदत मिळावी म्हणून केलेली ही क्‍लृप्ती होती. सुरेश शिंदेचे लेखन आणि ओंकार हरिदासची मांडणी यातून व्होडका अंगावर येते. व्यक्तिशः अभिनयापेक्षा सांघिक परिणाम अधिक साधला गेला.

डिमॉलिशन- झोपड्यांची जमीन घशात घालण्यासाठी बिल्डरचा प्रभाव आणि यामुळे वस्तीत होत असलेली वाताहत पुरेशा गांभीर्याने दाखविली आहे. झोपडी दादांची दादागिरी. पात्रांच्या नात्याचा गुंता. वयात येणाऱ्या मुलींचे प्रश्‍न सारेच प्रभावदार साकारले गेले. संहिता, रचना आणि परिणामकारक नेपथ्यातून सादर झालेला प्रयोग नौरोसजी वाडियाच्या विद्यार्थ्यांनी वास्तवपणे मांडला.

मन झुला झुलताना- मानसोपचार करणाऱ्या डॉक्‍टरकडे आलेल्या एका स्त्रीची ही कथा. आपला मुलगा अकाली गेल्याच्या भासातून सतत तणावाखाली वावरणारी ही दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाची उकल इथे केली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोथरूड(पुणे) ची ही निर्मिती. गौरी तांबे यांनी चेहऱ्यावरचे भाव, आवाजातले बदल आणि ताणाचे भान ठेवून केलेला अभिनय आजही ताजा वाटतो. पार्श्‍वसंगीत, नेपथ्य आणि प्रकाशाचा यथार्थ वापर करून संघाने परिणाम साधला.

धोंडूमामा साठेची "ऍबसर्ड' आणि वाघोलीच्या आर्युवेद कॉलेजची "सन्मती' दोन्हीही परिणामकारक होत्या. कथाकाराच्या परिणामकारक सादरीकरणाने ऍबसर्ड लक्षात राहते. सादरीकरणात प्रामाणिकता होती. संवादाबाबत दाद मिळत होती. रंगमंचीय तांत्रिकतेचा पुरेसा वापर करून संघाने आपला ठसा उमटविला.

सन्मती- कंपवात आणि विस्मृती असलेल्या दोन आजाराचे परिणाम दाखविणारी मांडणी करताना प्रेमात पडलेल्या, पण आईविना एकाकी पडलेल्या तरुणीची फरफट. समाजाचे या माणसांकडे होत असलेले दुर्लक्ष. यातूनच घडलेल्या कथेतून बाहेर आलेली कथा. व्यक्तिरेखांचे भान ठेवून नातेसंबंध जपताना साखरपुडा झालेल्या पतीशी चाललेला स्वतःचा झगडा प्रचिती सुरूंनी प्रभावीपणे साकारून स्वतःला श्रेय मिळविले आहे. तांत्रिकतेचा पुरेसा वापर करूनही साचेबद्ध मांडणीमुळे स्पर्धेत ती टिकाव धरू शकली नाही.

रिमांडहोममधल्या मुलांचे गुन्हेगारीविश्व आणि एका चुकीमुळे आयुष्यातली महत्त्वाची वर्षे अंधाऱ्या खोलीत काढणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने मांडली. वेगळा विषय आणि बोलके सादरीकरण करून त्यांनी छाप पाडली. मात्र शब्दातच गुरफटलेल्या एकांकिकेत घडत काहीच नव्हते. रंगमंचीय भाषेचा पुरेसा वापर न केल्याने त्यांचे सादरीकरण टू द पॉइंट नव्हते.

शेवटचा दिवस गाजला तो डॉ. कलमाडी ज्युनिअर कॉलेजच्या "तळातला वर्ग"मुळे. ढ मुलांना आलेल्या सुंदर शिक्षकांच्या प्रभावामुळे अभ्यासात आणि दंग्यात सुधारणा झालेल्या एका वर्गाची ही कहाणी. मेघना हेगडे यांनी ती फुलविली छान. आणि ती सादर करण्यात दिग्दर्शत म्हणून अंबर गणपुलेनी बजावलेली कामगिरी दोन्हीतून तळ्यातला वर्गचा खेळ रंगला. मुलांनी शिक्षक आणि बाईंचे प्रेम फुलविण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या घटनांतून हे सादरीकरण रंगत गेले. बाई आणि मुलांच्या सहजसुंदर वावरण्यातून या एकांकिकेचा प्रभाव वाढत गेला. संगीतातूनही हा प्रभाव उठावदार बनला. वास्तवात घडत गेलेली ही कहाणी स्पर्धेत वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

- सुभाष इनामदार
subhashinamdar@esakal.com