Sunday, February 17, 2008

......भिंतीनाही भावना कळते

भिंतीनाही भावना कळते
मी आलो होतो. पण अगदी दरवाजापासून बसलेल्या कोचापर्यंत कुठेही स्वस्थता दिसत नाही. कुठेतरी फ्लॅटमध्ये असमाधान अंगावर येत होते.
खिडक्‍यांचे पडदे बरेच दिवसांत न धुतलेले. ट्यूबांवर धुळीने स्वतःचे अस्तित्व गडद करत रंग बदललेला. काचांनाही रंग असतो हे दाखवून दिलेले. एकूणच सुस्तावलेल्या गृहिणीची मळकट मुद्राच समोर येत होती.
घर सांगत होते, इथे फार वेळ बसू नकोस. तुझ्या बोलण्याने शांतता हरवेल. नाद अनामिक होईल.
नुकतीच एका घरात पंधरा मिनिटे घालविली. गृहिणी सतत आत जाऊन सासऱ्यांना काही तरी देत होती. मी आपला वाट पाहत बोलण्याची लिंक जुळवत होतो. प्रत्येक वेळी तार जुळवायचा प्रयत्न करत होतो. धागा मागचा पकडून विचारत होतो. तुटणारा धागा सांधत सांधत पुन्हा पुन्हा संवाद करत होतो. मात्र त्यात एकसंधता नव्हती. एकवाक्‍यता येत नव्हती.
आत गेल्यावर मी शोधत होतो घरातील अव्यवस्था आणि रंगांचे पोपडे गेलेल्या भिंती. मन अस्वस्थ. पुन्हा केव्हा बाहेर पडेन असे. वातावरण बाहेर बोलवत होते. मोकळ्या हवेचे महत्त्व पटत होते.
जळमटं, धुळीचे साम्राज्य, आणि घर भरल्यासारखे वाटणारी आळसटलेली दाटी. सारंच नको नकोसं. आधीच बेल शोधायला लागलेला वेळ. आतून येणारा संथ प्रतिसाद.
बोलता बोलता जाणवलेली उदासीनता. मागितल्यानंतर हाती येणारा पाण्याचा ग्लास. येताना असलेला उत्साह नकळतच विरून गेलेला.
... आणि ही भिंत !
तर दुसरीकडे येण्याआधीच तुमचीच वाट पाहत होतो म्हणणारी गृहिणी दार उघडून स्वागताला तयार असते. सारीकडे स्वच्छतेचा आभास. टापटीप. साधीच पण व्यवस्थित लपेटलेली साडी. पाण्याचा ग्लास देताना "काय हे, केवढा वेळ!' ऐकूनच आपली प्रतीक्षा किती होती ते सांगणारे कानावर येणारे शब्द.
आत देवघरातून दरवळणारा मंद सुगंध. देवावर लटकलेला तो मंद हास्य दाखविणारा प्रकाशाचा गोळा. टी पॉयवर आजची वर्तमानपत्रे, काही मासिके आणि लगबगीने पण स्वतःच्याच विचारात असलेली त्यांची छकुली हसत हसत पाहत आईला कानात विचारून धूम ठोकते.
कामाचे बोलून निघतानाही "असंच केव्हाही यायचं 'आश्वासन घेताना खरेच येण्याचे वचन आपण पाळावे, असे मनात वाटावे असे ते स्वागतमय घर.
भिंती त्याच. पण त्यावरचे रंग, प्रकाश, पडदे यातून घराचे दर्शन घडविणारे माणसांचे अंतरंग.
भिंती सांगतात तुम्हाला त्यांचे वय. त्यांचे समाधान.
चार भिंतींच्या रंगाने सांगितले माणसांचे सौंदर्य.
त्यात लपलेले त्यांचे
कर्तृत्व दडलेले
आहे तरी त्यांना इतरांचे कौतुक नाही
येत कधी त्यांच्या ओठावर.
जुळताना तुटतात तारा.
मन होते स्वैर भैर
वेध घेत असते मन
माणसांच्या कंगोऱ्याचे
कशाला यावे कधी निघायचे
सारेच सांगताना भांबावलेले
निघताना तर वाटावे.
परतून नाही फिरायचे.

e-mail: subhashinamdar@gmail.com

2 comments:

Jaswandi said...

paTala!
tumachaa blog vachun chhan waTala!
mast aahe! :)

Anonymous said...

ghre rekhtan pahile. avadle. navin kahi lihitach sanga.
Nakki kalvin.