Friday, June 13, 2008

"शिवसृष्टी' उभी आहे "अकलूज किल्ल्यात'

गोब्राह्मण प्रतिकालक क्षत्रीय कुलावतौंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज... यांची कारकीर्द अकलूजच्या किल्ल्यात १६ जूनपासून अवतरत आहे होऽऽऽऽऽ!
ज्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आजपर्यंत होते ते औरंगजेब यांचा मुक्काम काही काळ अकलूजच्या किल्ल्यात होता. छत्रपती संभाजीराजे यांना त्याने इथे किल्ल्याच्या कोठडीत डांबून ठेवले होते. अकलूजच्या जुन्या गावातल्या आंबेडकर चौकातून किल्ल्याकडे जावे लागते. अकलूज गावात किल्ला आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व आजपर्यंत झाकाळून गेले होते. तसा दुर्लक्षित असलेला हा किल्ला आता अवतरत असलेल्या "शिवसृष्टी'मुळे पुन्हा महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.


ती कशी उभी राहत आहे याची झलक पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

याचे श्रेय आहे विजयसिंह मोहिते-पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिल्पकार दिनकर थोपटे आणि त्यांच्या बहात्तर सहकाऱ्यांना. यात थोपटे यांची दोन मुले अविनाश अणि दीपक तसेच जे जे स्कूल ऑफ आर्टचे १९ शिल्पकार यांचा प्रामुख्याने सहभाग आहे.

छत्रपतींच्या जीवनातले वीस प्रसंग इथे शिल्पातून साकारण्यात आले आहेत.
शिवाजी महाराजांच्या बी. आर. खेडकरांनी उभ्या केलेला अश्‍वारूढ पुतळा आणि त्यावर फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज "शिवसृष्टी'कडे आकर्षित करेल... चारी बाजूंची तटबंदी आणि त्यावर पहारा देणारे मावळे इथे दिसतील. भव्य प्रवेशद्वाराच्या वर उभा राहिला आहे तो नगारखाना. तिथे प्रत्याक्षात नगारा-चौघडा वाजविणारी शिल्पे अवतरली आहेत.
भव्य प्रवेशद्वारातून आत येताच पराक्रमी शिवबाची सृष्टी मनाने तुम्हाला शिवकालात घेऊन जाईल. शिवकालातल्या प्रसंगांची एकेक शिल्प पाहताना तो क्षण इथे टिपला गेलाय. शिवाजीचा जन्मसोहळा आणि छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा हे याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकूणच प्रसंगांत आणि किल्ल्याच्या तटावर १६० पूर्णाकृती पुतळ्यांतून परिसर शिवमय होऊन जाईल.
शिवसृष्टीत उभी राहताहेत नयनरम्य कारंजी. लाईट अँड साउंड शोचे रेकॉर्डिंग पुण्यात सुरू आहे. पंचेचाळीस मिनिटांचा साउंड ट्रॅक उदय चित्रे तयार करताहेत, तर त्याचे लेखन खुद्द बाबासाहेव पुरंदरे यांचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंग जणू आता घडतोय असेच भासेल. दिवाळीपर्यंत तो अनुभवण्याची संधी मिळेल. किल्ल्यातल्या एका दालनात महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दालन साकारणार आहे. त्यासमोर सुंदर बगीचा तयार केला जाणार आहे.
डेरवणची शिवसृष्टीची प्रेरणा घेऊन त्यापेक्षा सुंदर असे शिल्पकाम उभे करण्याचा थोपटेंचा हा प्रयत्न होता. राज्याभिषेक सोहळ्यातले शिवाजी महाराज साकारणे हे दीपक थोपटे यांच्या दृष्टीने सर्वांत कठीण काम होते. करारी मुद्रा, पराक्रमाचा आत्मविश्वास आणि लाखांच्या पोशिंद्याचे शिल्प अवतरले आणि आम्ही सुखावलो.
नीरा नदीच्या काठावर साकारलेली शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे अनुभविण्यासाठी तुम्हाला अकलूजच्या किल्ल्यात साकारलेली शिवसृष्टी पाहायलाच हवी.

-सुभाष इनामदार
e-mail: subhashinamdar@gmail.com

No comments: