Friday, August 8, 2008

सावनी शेंडे "हृदयस्वर' उलगडणार नव्या बंदिशींच्या रचनांतून!


गायिका सावनी शेंडे-साठ्ये लिखित "हृदयस्वर' या स्वरचित बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी पं. जसराज यांच्या हस्ते पुण्यात होत आहे.


यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद,


"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात. रागदारी संगीतात चारच ओळी असतात. त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात. आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे. यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.
सावनी शेंडे या केवळ गायिकाच नाही, तर त्यांना बागेची आवड आहे, निसर्गाचे वेड आहे, हे त्यांच्याशी केलेल्या गप्पांतून समजते. निसर्गातून आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते, की त्याच्यातूनच काही बंदिशी घडल्या माझ्या, असे त्या सांगतात. घरातल्या वृक्षांवर तयार केलेली पक्ष्यांची घरटी दाखवितात. बागेतली उमलणारी नवी फुले लक्ष वेधतात. याशिवाय पेंटिंग, वेगवेगळ्या कागदी फुलांची निर्मिती करणे, असे छंदही त्या जपतात आणि जोपासतात.
साठ्येंच्या घरात गेल्यावरही सासूबाईंपासून नवऱ्यापर्यंत सारेच जण गुणी सावनीचे कौतुक करत संगीतासह साऱ्याच कलांना प्रोत्साहन देतात.
गप्पांमध्ये सासूबाई, आई आणि गुणी बहीण बेला शेंडेही सहभागी झाल्या होत्या.

कॅमेरा, स्टोरी - सुभाष इनामदार

No comments: