Wednesday, October 1, 2008

क्षणांचा पडला सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा
किती वेचू, किती आठवू
क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....

ओंजळीत वेचलेली फुले मनात दरवळतात
किती घेऊ, किती टिपू
क्षणांचा सहवास सादही मला घालतात....

न्हालेल्या केसांतून गळतात टपटप मोहरा
किती झेलू, किती सोडू
क्षणात दिसतात, पाहतात तो चेहरा....

स्पर्शाचा बहर नटलेला, स्वर्ग हलताना दिसतो
किती ओंजळी, किती वेळा
क्षणांची निसटतात पिसे, मोहवतात, भिरभिरतात....

वर्षांची उलटतात पाने, विरतात कागद
किती शोधू, किती साठवू
क्षणांच्या त्या भाग्याने, ओंजळीतल्या कशिद्याने....

क्षणांचा हिशेब क्षणातच उलगडतो
किती मोजू, किती नाचवू
क्षण मात्र वेढतात पुढच्या क्षणांचा तिढा...

सडा पारिजातकाचा आहे क्षणभंगुर
किती भरू, किती निवडू
क्षणांवर कोरलाय क्षणांमधला भावांकुर.....

कधी विसरू म्हणता विसरता येत नाही
किती देऊ, किती घेऊ
क्षणांचेही त्या सांगता येत नाही....

बेईमान न होता, सोबत करीन तुला
किती शपथा, किती सांगता
क्षणाला झेलण्यासाठी क्षणांचा करीन झुला...

सारे जीवन म्हणजे पारिजातकाचा सडा
किती साठवू, किती निवडू
क्षणांच्या साक्षीने क्षणांवरच झालो मी फिदा.....

सुभाष इनामदार,
पुणे.
३० सप्टेंबर २००८

1 comment:

Anonymous said...

Kawita aani wachan aawadale!Tu kawita chhan japali aahes ajoon yacha kharokhari hewa watato! -Subhash Naik,Pune.
4/10/2008.