Saturday, March 29, 2008

नाणकशास्त्रातील विदुषी

डॉ.सौ. शोभना गोखले यांच्या साध्या स्वभावातच त्यांचा मोठेपणा दडलेला आहे.शिलालेखांचे संशोधन अणि प्राचिन नाण्यांवर केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव संशोधनाच्या या क्षेत्रात गाजले.आज त्या ऐंशा वर्षाच्या आहेत.आदिवासी भागातल्या स्त्रीयांशी संशोधनाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क आला.प्रत्येक ठिकाणी त्यांना विचारले जायचे तुम्हाला नवऱ्याने सोडलेय का? पतीशी पटत नाही काय?गावोगावी जावून नाण्यांच्या संशोधनाची कामगीरी पार पाडताना त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांची मुलाखत रंगत गेली.
साठपेक्षा अधिक काळ त्यांनी डेक्कन कॉलेजच्या प्राच्यविद्दया विभागात विविध नविन संशोधनात आयुष्य घालविले.
याही वयात त्यांची उमेद,जिद्द कायम आहे.
त्यांच्या मुलाखतीतून ते तुम्हालाही जाणवेल!
मुलाखत पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा......

Thursday, March 27, 2008

मराठी रंगभूमीचे आसन डळमळीत होऊ घातलय

नवे विचार नव्या तऱ्हेने रंगमंचावर मांडणारा लेखक घडायला हवा
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मुलाखतीतून घडलेले विचारमंथन
पुणे-मराठी प्रेक्षक रोडावत चाललाय. थिएटरकडे वळणारा प्रेक्षक घरातल्या छोट्या पडद्याकडे अधिकाधिक ओढला गेलाय. टीव्ही मालिकांत काम मिळायला लागल्यापासून थिएटर करण्याकडे कलावंतांचाही मूड नाही. नाट्य व्यवसायाला बरे दिवस यावेत यासाठी सरकारने अनुदान जाहीर केलेय. थिएटर भाडे वाढलेय. मायबाप प्रेक्षकालाही तिकिटाचे दर परवडेनासे झालेत. प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर होणाऱ्या नव्या प्रायोगिक नाटकांची संख्या रोडावली आहे. एकूणच मराठी रंगभूमीचे आसन डळमळीत होऊ घातलय. राजाश्रय मिळतोय, पण लोकाश्रय कमी होत चाललाय.नाटक हे समाज प्रबोधनाचे साधन आहे.पण आज ते घडतयं काय असा सवाल करून ज्येष्ठ कलावंत चित्तरंजन कोल्हटकरांनी नवी नाटके,नवे विचार नव्या तऱ्हेने मांडणारा लेखक घडण्याची आवशक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले.

मार्च २७ च्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीच्या आजच्या स्थितीचे हेच वर्णन करावे लागेल. ई-सकाळसाठी काही निवडकांच्या मुलाखतींतून साधारण हाच सूर होता.
चित्तरंजन कोल्हटकर, डॉ.न. म. जोशी. माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, अपर्णा अपराजित, वसंत अवसरीकर, सिद्धेश्वर झाडबुके, विनायक कुलकर्णी, मधुसूदन साठे, प्रदीप कांबळेअशा कांही रंगमंचावर वावरणाऱ्या मंडळींशी चर्चा करून घेतला गेलेला हा आढावा. प्रेक्षकांनी रंगभूमीकडे पाठ केलीय, असेही काहीना जाणवतंय. नवे नाटककार फार नाहीत. तेही व्यावसायिक दृष्टीतूनच नाटकाची मांडणी करताहेत. अभ्यास म्हणून नाटकाकडे पाहणारा वर्ग कमी होत चाललाय.
छबिलदासची चळवळ केव्हाच बंद पडलीय. समांतर रंगभूमीवर पुण्याच्या समन्वयचे प्रयोग सुरू आहेत. पण तेही चित्रपट-सिरियल करण्यात गुंतलेत. गंभीरपणे नाटकाकडे पाहणारा अभ्यासू वर्ग आता काळाआड दडून गेलाय.
संगीत रंगभूमीवर तर नव्या नाटकांचीच वानवा आहे. मुंबईचा साहित्य संघ आणि पुण्याच्या शिलेदार मंडळींची झुंज सुरू आहे. काही प्रमाणात भरत नाट्य संशोधन मंदिर प्रयत्नात आहे. पण तीही जुन्याच नाटकांची रंगावृत्ती करून.नवा नटसंच घेऊन जुनीच नाटके दोन-अडीच तासांत बसवायचा घाट घातला जातोय. त्यातले अती संगीत मारक ठरत होते ते कमी केले जातेय. संगीत नाटके जपायला एवढंच पुरेसं नाही. त्याही पारंपरिक कलेचा वारसा जोपासणारे नवे तजेला आणणारे नाटक घडायला हवे.
घरच्या छोट्या पडद्याला दूर सारून रंगभूमीकडे वळविण्यासाठी रंगकर्मी-नाट्य संस्था आणि अभ्यासकांनी आता याचा विचार करायला हवा. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं साऱ्यांनीच गंभीर होण्याची गरज आहे.

भाग एक

भाग दुसरा