Sunday, June 15, 2008

नवा ऍनिमेशनपट "दशावतार', रंजक आणि भव्य

पुण्यात पूर्णपणे तयार होऊन देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट "दशावतार' ऍनिमेशन क्षेत्रातली भारतीय बनावटीची कमाल दाखविणारा आहे.

त्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

तो रंजक आणि भव्य तर आहेच, पण त्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे तर तो भारतीय संस्कृतीची महती परिणामकारकपणे दाखवितो. लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही तो नक्की आवडेल.
भगवान विष्णूंचे दहा अवतार आणि त्यांची निर्मिती कशी झाली. असुर आणि देव यांच्यात संघर्षची ठिगणी कशाने पडली, याचे अभ्यासपूर्ण वर्णन चित्रपटातील प्रसंगांत अंगावर येते. त्यांचे चित्रण प्रभावी तर आहेच, पण त्याहीपेक्षा आवाजाच्या प्रभावी वापराने त्यातल्या व्यक्तिरेखांना पूर्ण न्याय दिला गेला.

राम, कृष्ण, परशुराम, वामन, नृसिंह या अवतारांच्या मूळ कथा ऐकायचा आनंद आणि माहितीही मिळते.
या पौराणिक कथा वर्षानुवर्षे जपल्या जात आहेत. सर्वांना माहीत असूनही आजही त्यावर तयार केलेल्या चित्रपटात त्या अनुभवताना कंटाळा येत नाही, तर उत्सुकता वाढते. त्यातही ऍनिमेशनच्या रूपातली पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. त्याचे प्रमुख कारण, आधी शब्द तयार झाले, मग त्याबरहुकूम चित्रांना आकार दिला गेला.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवेदनामुळे पडद्यावरचे वातावरण भारावून जाते. सचिन खेडेकर, श्रेयस तळपदे, आशिष विद्यार्थी, टॉम आल्टर, रूपा गांगुली यांच्या आवाजाची जादू चित्रपटाला प्रभावी बनविते.
भाविक ठाकूर यांनी ही कथा लिहिली. पटकथा-संवादाची साथ मिळाली त्यांच्यासोबत सुप्रिया ठाकोर यांची.
संगीत आनंद कुऱ्हेकर यांचे असले, तरी गीते लिहिलीत ती मराठीतले कवी संदीप खरे यांनी. आवाजाने आणि पार्श्वसंगीताने ऍनिमेशनपट परिणामकारक भासतो.

प्रत्यक्ष कलावंतांकरवी सादर केलेला प्रसंग इतका प्रभावी होईल की नाही, अशी शंका यावी असे प्रसंग या ऍनिमेशनपटात आहेत.
हिंदीसह तमीळ अणि तेलुगू या भाषांतही "दशावतार' भारताच्या इतर भागांत झळकला आहे.
फोबस मिडिया क्रिएशनची ही पहिलीच निर्मिती असली, तरी ती त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढविणारी आहे.


सुभाष इनामदार