Saturday, August 9, 2008

प्रदीप पटवर्धनांमुळे सुसह्य होणारे नाटक "आम्ही शहाणे'आम्ही शहाणे' या नाटकात नूतन जयवंत, प्रदीप पटवर्धन अणि मैथिली वारंग

.............................................................................
सुखी संसारात थोडा निवांतपणा हवाच. तो मिळविण्यासाठी चाललेली या तरुण जोडप्याची धावपळ आणि त्यातूनच कधी मित्राचा अतिस्नेह, तर कधी सासू-सासऱ्यांची एंट्री. डॉ. यश आपटेंच्या जीवनात सुगंधी हवा येते ती मेहुणीच्या 'आयटम' रूपात. अलीकडच्या जमान्यातली ही मेहुणी जीजूच्या- जीजू मेहुणीच्या स्पर्शाने बहरतात. आणि सुरू होतो या साऱ्या शहाण्यांचा खेळ.

नाटकातला काही अंश पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

डॉ. अविनाश कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित "आम्ही शहाणे' यात प्रदीप पटवर्धन यांच्या खांद्यावर नाटकाचा सारा भार पेलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक हसवते. कधी गंभीरही बनवते. पण शहाण्यांच्या खेळात नेमके काय सांगायचे तेच कळत नाही. रंगमंचावर कलावंत आपापल्या भूमिका करतात खरे; पण नेमका विषय बाहेर येत नाही. अनेक मालिकांचे वेगवेगळे एपिसोड आपण पाहत आहोत असा भास नाटक पाहताना होतो.
संजय बांदेकर यांनी "नउनी' निर्मित हे नाटक सादर केले आहे. नाटकाच्या नामावलीत प्रथमच लेखक (डॉ. अविनाश कुलकर्णी) वेगळा आणि नाट्यरूपांतर करणारे (अनंत सुतार) दुसरे, अशी नावे दिसतात.
बायकोपेक्षा मेहुणी बरी अशाच थाटात पहिला अंक होतो. तर दोन्ही मुली असलेल्या आई-वडिलांची वानप्रस्थाश्रमात जायची तयारीही होते. त्यांचे नेमके दुःख काय आणि कशामुळे या प्रश्‍नाला स्पर्श करून नाटक पुढे जाते. स्वतःच्याच मुलीला आयटम म्हणणाऱ्या बापाची तिच्या लग्नासाठी चाललेली धावपळ दिसते. तर बहिणीच्या प्रेमलीला पाहून अवाक झालेली मेहुणी प्रकट होते.अखेरीस डॉक्‍टरांच्या मित्राच्या जादुई प्रेमात मेहुणी सापडते आणि हे शहाणे म्हणवणारे कुटुंब आनंदात गाणे म्हणत नाटक संपते.
नाटक सारे फिरते ते डॉ. यश आपटे अर्थात प्रदीप पटवर्धन यांच्याभोवती. ते ज्या ताकदीने आणि प्रसंगी ज्या टायमिंगने ह्युमर डेव्हलप करतात ते पाहण्यासाठी तरी नाटक अनुभवायला हवे.
प्रदीप पटवर्धन यांची भूमिका पाहताना त्यांच्याकडे असलेली अभिनय क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही अशी खंत व्यक्त करावीशी वाटते. विनोदाची, संगीताची आणि तेवढीच गंभीर अशी वेगळी भूमिका त्याच्यासाठी लिहायला हवी. त्यांच्याशी बोलतानाही हे जाणवले. सुलेखा या डॉक्‍टरांच्या पत्नीच्या रूपात मनापासून दाद दिलीय ती मैथिली वारंग यांनी. सहजता हे त्याच्या भूमिकेचे वैशिष्ट्य आहे.
आयटम म्हणून ज्यांना दाखविले आहे त्या नूतन जयवंत भूमिकेची गरज पूर्ण करतात. स्वतःला त्या आकर्षकपणे पेश करतात. जीजूशी असलेली जवळीक आणि सौंदर्याचा स्पर्श लाभणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही त्या करतात.
बऱ्याच वर्षांनंतर रंगमंचावर अवतरलेले कलावंत म्हणजे जनार्दन परब. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनप्रमाणे ते वावरतात. वरवर बावळट; पण आत अस्सल असलेला हा बाप ते छान खुलवितात. त्यांच्या पत्नी झाल्यात सुलभा मंत्री. सुचित जाधवची हिरोगिरी नाटकाला पोषक ठरते.
प्रसाद वालावरकरांचे नेपथ्य पात्रांना वावरायला आणि त्यांच्या श्रीमंती थाटाचे दर्शन घडवायला पुरेसे आहे.
प्रकाश, संगीत या नाटकाला पोषक आहे.
हे कधीतरी आपण कुठल्यातरी नाटकात अनुभवले आहे, असे सतत वाटत असताना नाटक पुढे सरकते. ते खिळवत नाही; पण वेळ मजेत घालवेल.

सुभाष इनामदार
mail - subhashindmar@esakal.com

Friday, August 8, 2008

सावनी शेंडे "हृदयस्वर' उलगडणार नव्या बंदिशींच्या रचनांतून!


गायिका सावनी शेंडे-साठ्ये लिखित "हृदयस्वर' या स्वरचित बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी पं. जसराज यांच्या हस्ते पुण्यात होत आहे.


यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद,


"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात. रागदारी संगीतात चारच ओळी असतात. त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात. आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे. यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.
सावनी शेंडे या केवळ गायिकाच नाही, तर त्यांना बागेची आवड आहे, निसर्गाचे वेड आहे, हे त्यांच्याशी केलेल्या गप्पांतून समजते. निसर्गातून आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते, की त्याच्यातूनच काही बंदिशी घडल्या माझ्या, असे त्या सांगतात. घरातल्या वृक्षांवर तयार केलेली पक्ष्यांची घरटी दाखवितात. बागेतली उमलणारी नवी फुले लक्ष वेधतात. याशिवाय पेंटिंग, वेगवेगळ्या कागदी फुलांची निर्मिती करणे, असे छंदही त्या जपतात आणि जोपासतात.
साठ्येंच्या घरात गेल्यावरही सासूबाईंपासून नवऱ्यापर्यंत सारेच जण गुणी सावनीचे कौतुक करत संगीतासह साऱ्याच कलांना प्रोत्साहन देतात.
गप्पांमध्ये सासूबाई, आई आणि गुणी बहीण बेला शेंडेही सहभागी झाल्या होत्या.

कॅमेरा, स्टोरी - सुभाष इनामदार

अभिनेत्याचा जेव्हा निर्माता बनतो !


प्रशांत दामले फॅन फाउंडेशन ही अभिनेता प्रशांत दामले यांची सामाजिक कार्य करणारी संस्था. या संस्थेतर्फे महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबविले जातात. याच संस्थेतर्फे त्यांचं नवं नाटक येतंय "ओळख ना पाळख'. यानिमित्तानं ते स्वतः निर्माता बनताहेत. नाटकातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

प्रशांत दामले यांच्यासारखा लोकप्रिय अभिनेता एका नव्या नाटकाची निर्मिती करतो तेव्हा कुतूहल निर्माण होतं. अभिनेता ते निर्माता हा प्रवास कसा झाला याविषयी स्वतः प्रशांत दामले बोलताहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्‍लिक करा.

पहिली मंगळागौर


नुकतेच लग्न झालेली नववधू श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी मंगळागौर पुजते, जागवते. एकेकाळी वाड्यात सगळ्या सौभाग्यवती एकत्र जमून मंगळागौर जागवत असत.
मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरवाशीण घरी येते. तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणी येतात. सारी रात्र गाणी, झिम्मा, फुगडी, सुपारी, नमस्कार, कोंबडा असे वेगवेगळे खेळ खेळून मनमुराद आनंद दिला- घेतला जातो.
लग्नानंतर पाच वर्षे मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा आहे. आपले सौभाग्य अखंडित राहावे, यासाठी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात.
आज नोकरी करणाऱ्या मुली असल्याने यासाठी सुट्टी मिळेलच असे सांगता येत नाही. पूजेसाठी मैत्रिणीही मिळणे कठीण होऊन बसते. तरीही पुण्यात काल छोटे-मोठे हॉल मंगळागौरींनी हाऊसफुल्ल केले होते. पारंपरिक पद्धतीने मंगळागौर साजरी व्हावी अशी आजही अनेकांची इच्छा असते, पण तेवढे खेळ माहीत नसतात. गाणीही पाठ होत नाहीत. पण उत्साह तर असतो.
अशा वेळी मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या महिला संघांना बोलावून त्यांच्याकडून ती साजरी होते.
पुण्यात मंगळवारी साजरी झालेली ही अशीच मंगळागौर ई-सकाळच्या वाचकांसाठी चित्रित केली आहे सुभाष इनामदार यांनी.

यात सहकारनगरच्या सखी महिला मंडळाच्या विद्या देसाई यांच्या पुढाकाराने मंगळागौरीचे खेळ, गाणी आहेत. त्यातले उखाणे तर सर्वांनाच आवडतील

Tuesday, August 5, 2008

नथूरामने नाव, प्रसिध्दी दिली- शरद पोंक्षे

मी नथूराम गोडसे बोलतोय !
प्रदीप दळवींचे हे नाटक. या नाटकाने रंगभूमिवर अनेकांना प्रसिध्दीच्या वलयात आणले.
महात्मा गांधींची हत्त्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांच्या चरित्रावरचे हे नाटक हे सांगायलाच नको.
नाटकात नथूरामची भूमिका केली ती शरद पोंक्षे यांनी. अनेक वर्ष बारीक-सारिक भूमिका करणारा हा कलावंत अचानक प्रसिध्दीच्या वलयात आला तो नथूरामच्या भूमिकेने.

नाटकाचा विषय , त्याची भाषा आणि समाजातून झालेला विरोध यामुळे पहिल्या प्रयोगापासून नाटक वलयात आले. आजही नाटक गर्दी खेचते. नथूरामची गांधी हत्येपाठीमागचा विचार .हिंदू एक व्हावा म्हणून केलेले हे साहसी कृत्य. साऱ्यातून नथूराम कसा आहे याची झलक शरद पोंक्षे यांनी एकपात्री प्रयोगात करून देतात.
एका टोकेला नथूराम तर दुसऱ्या टोकाला "झी'च्या मालिकेत गाजलेल्या देवराम खंडागळे ही विरूध्द टोकाची कॅरेक्‍टर.
बाळ कोल्हटकरांच्या "दुर्वांची जुडी' तल्या सुभाषला तुम्ही इथे भेटू शकता. आपल्यातल्या कलावंताची चित्तरकथा ते रंगभूमिवर साकारताना एकाच मंचावर तो आविष्कार घडवितात. ते प्रेक्षकांशी मनमोकळा संवादच साधतात जणू!
यात त्यांच्या वृत्तीची, स्वभावाची वैषीष्ट्ये जाणवतात. करारी, निग्रही आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात असलेल्या नटाचे ते जणू आत्मचरित्रच कथन करतात.
गप्पांतून शरद पोंक्षे उलगडत जाताना पहाणे हा एक थरारक नाट्यानुभवच असावा असाच तो पेश करतात.
हिंदू प्रेम, देशावरची भक्ती, कलांवंताची साधकता, शब्दावरचे प्रेम, मराठी नाटकांवर अणि नाटककारांवर केलेला विचार सारेच ते भडभडा बोलून टाकतात. मात्र ते इतक्‍या तळमळीने बोलतात की, त्यालाही प्रेक्षकांची टाळी मिळते.
नथूरामची भूमिका कशी मिळाली. त्यासाठी कसे प्रयत्न केले. साकारल्यानंतर झालेला आनंद सारेच यातून व्यक्त होते.
एका अर्थाने ती शरद पोंक्षे या कलावंताची बखर आहे. तुमच्या पर्यंत ती पोचली तर तुम्हालाली ती नक्की आवडेल.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
सुभाष इनामदार.
subhashinamdar@gmail.com