Saturday, September 27, 2008

शब्द आणि चालीला न्याय देऊन केलेली सीडी


भावगीतातला प्रत्येक शब्द. शब्दांच्या दृष्टीने येणारी चाल,

चालीतली बारीकशी जागाही अर्थपूर्णरित्या संजीव अभ्यंकरांनी

यात गायली आहे.

"जीवनरंग' सीडीतले प्रत्येक गीत क्‍लासिक

व्हावे असा प्रयत्न संगीतकार केदार पंडीत यांनी केला आहे.


Friday, September 26, 2008

कधी काळी कीव करणाऱ्या कावळ्यांनो......

काव... काव....कावळा

कावळ्याची काव काव कधी काळी कानी
केली काही कीव कोणी कोण्या का-मनी

कारण काय कधीच कळले कुणाला
कोण्या कंपीत काळावर कावळाच काळा

केल्याने कधी कोणाचे काम कमी केलेय
केव्हा कांही कुणी करणी केलीय

.................................................................
( काव्य कंड -१)

जीवनरंग-भावगीतांचा नवा अल्बम (भाग दुसरा)

ख्याल गायकीतून भावगीताकडे वळलेल्या संजीव अभ्यंकरांची ही सीडी.
वयाच्या चाळीशीत संजीव अभ्यंकरांच्या सूरातून शब्दांना पुरेपुर न्याय मिळाला आहे.

जीवनरंगच्या दुसऱ्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.

जीवनाकडे सकारात्मक पाहण्याऱ्या प्रवीण दवणेंच्या रचनातून
हा मराठी गीतांचा आल्बम साकार झालाय. त्याला निवेदनही त्यांचेच आहे.
केदार पंडीत यांनी संगीताच्या सुरावटीतून अकरा रचना ऐकताना
भान विसरून त्या शब्द- सूर आणि संगीतात आनंदाचे क्षण आठवत
त्या ऐकल्या जातील.
संजीव अभ्यंकर यांनी यातले प्रत्येक गीत उत्तम व्हावे यासाठी प्रयन्त केला आहे.
सीडीचे मराठी रसिक स्वागतच करतील असा तीनही कलावंतांना विश्‍वास आहे.

Thursday, September 25, 2008

संजीव अभ्यंकरांची पहिली भावगीत सीडी - जीवनरंग


आजच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या काळात जीवनाकडे कसे सकारात्मक पाहावे,

याचा विचार देणारी "जीवनरंग' ही सीडी ऑक्‍टोबरमध्ये व्हर्जिन म्युझिक कंपनी

बाजारात आणत आहे.
तिचे वैशिष्ट्य म्हणजे
शास्त्रीय संगीतात नाव कमावलेल्या
संजीव अभ्यंकरांची ही पहिली भावगीतगायनाची सीडी.



याची मूळ संकल्पना सांगताना संगीतकार केदार पंडित सांगतात, "

"धकाधकीच्या काळातही जीवन तत्त्वांकडे वेगवेगळ्या अंगांनी कसे बघता येईल.

जीवनाकडे पॉझिटीव्ह दृष्टीने पाहण्याचा विचार भावगीतांच्या माध्यमातून

उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. संजीव अभ्यंकरांचा कसदार आवाज यासाठी निवडला.

प्राध्यापक आणि कवी प्रवीण दवणे यांच्याकडून गीते लिहून घेतली आहेत.

मराठी रसिक या सीडीला भरघोस प्रतिसाद देतील असे वाटते.'

'केदार पंडित यांच्या बोलण्यातून, निसर्गातल्या निर्जीव भावना म्हणजे झऱ्याचे झुळझुळणे,

आईचे थोपटणे कोणत्या शब्दात वर्णन करता येईल?

"निळ्या निळ्या मैफिलीत घुमली हिरवी हिरवी तान,

ऐकायाला तान करूया -

आज फुलांचे कान'


अशा रचना करून त्यांना स्वरात साकार केलेय ते संजीव अभ्यंकर यांनी.

ईएमआय या व्हर्जिन म्युझिक कंपनीने काढलली मराठीतली पहिली सीडी आहे.

लहानपणापासून ख्यालगायकीची तालीम घेऊन शास्त्रीय संगीताचा

पाया पक्का केल्याचे संजीव अभ्यंकर सांगतात.

"माझ्या भावगीत गायनाचा हा पहिला अल्बम. केदार पंडित यांच्या संगीतामुळे गायला मजा आला. प्रवीण दवणे यांची गीतेही मनाला फारच भिडतात,'

असे सांगून त्यांचेच निवेदन या सीडीला लाभल्याची माहितीही संजीव देतात.

केदार पंडित, प्रवीण दवणे आणि संजीव अभ्यंकर

यांचा सहभाग असलेल्या या सीडीविषयी संजीव अभ्यंकर

आणि केदार पंडित दोघेही भरभरून बोलतात.

Tuesday, September 23, 2008

विषय, मांडणीत वेगळेपणा टिपणारी... "पुरूषोत्तम करंडक '


महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतरमहाविद्यालयीन पातळीवरची विद्यार्थी जिवनातली सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा. पुरुषोत्तम करंडक. यंदाचे स्पर्धेचे ४४ वे वर्ष होते.

ऑगस्टमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या नऊ एकांकिकांची

शनिवारी आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात अंतिम स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली.

यंदामात्र ती पाहण्यासाठी सेलिब्रीटी कुणीच नव्हते.

दहशतवाद. हल्ली आयटीच्या जमान्यात येत असलेला ताण. माणस -माणसातले विरळ होत चाललेले नाते. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल. अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे लेखन. सादरीकरणात तंत्रांचा वाढता प्रभाव. विशेषतः संगीताचा प्रभावी वापर करुन वातावरणाला मिळणारी पोषकता. भूमिकांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न. दिग्दर्शन करताना चोख प्रयोग देण्याची कारागिरी. आणि सर्वात महत्वाचे पात्रांच्या तोंडीची भाषा. थेट भिडणारी. आजच्या पिढीला भाषेचे बंधन घालणे आता थोडे अवघडच झाल्यासारखे वाटते आहे. ती बोलताना सहजताही तेवढीच.स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकातून जे दिसले ते थोडक्‍यात नोंदविणायचा हा प्रयत्न....





अतिरेक्‍यांच्या स्फोटांनी देश आणि शेजारी देश हादरला असताना काश्‍मिरमधल्या कुपवाडा भागात सामान्यांना जगणे कसे असहाय्य झाले आहे. बॉंब स्फोटांनी शहरे, राज्ये हादरताहेत. मात्र तरीही स्फोटाच्या दुसऱ्या दिवसापासून सामान्यांचे जनजीवन कांही घडले नसल्यासारखे सुरू असते. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना "चले जाव' सांगण्याचे बळ सामान्यात तेव्हा होते. आज दहशतवादाला संपवण्यासाठी सामान्य जनता काही घडलच नाही असं समजून जगते आहे. राजकीय लोक या प्रश्‍नावर ठोस पावले उचलत नाहीत. यावर भाष्य करणारी 'अब ता आदतसी हो गयी...' ही एकांकिका विषय आणि सादरीकरण म्हणून दोन्ही दृष्ट्या सक्षात रहातेअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेच्या कलावंतांचे ते होते सादरीकरण. विषय रेखाटण्यात वेगळेपण आणि स्वानंद जवळेकरचे दिग्दर्शन साऱ्यामुळेच त्यांचा विषेश उल्लेख करावा लागेल. अश्‍विनी शहा, गायत्री मुळे आमि वैभव तत्ववादी यांच्या अभिनयातून वातावरणाला बदल, तरलतेचा स्पर्श झाला.


बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची "दोन शूर' चाळीस मिनिटे बैलगाडीत घडते. ओम भुतकर यांनी गाडीवानाच्या भूमिकेत साकारलेले बारकावे आणि अक्षय महाजन याने भेदरेलेला तरीही उसने अवसान आणुन साकारलेला सुधीर. दोघेही केवळ अफलातून. आलोक राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेली ही एकांकिका म्हणजे रंगमंचावर बैलगाडीतून साकारलेली एक अनोखी कलाकृती होती. कलावंतांनी शब्दापेक्षाही लुक्‍स मधून उभी केलेली व्यक्तिरेखा दिर्घ काळ लक्षात राहणारी आहे.या स्पर्धेत दोन पात्रांनी खिळवून ठेऊन परिणाम साधणारी एकांकिका म्हणू तिचा उल्लेख करायला हवा.पुरुषोत्तमच्या अंतिमफेरीत वेगळ्या तऱ्हेने साकरलेली आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी दाद दिलेली ही एकांकिका.



एम आय टीची "आर्टिफिशियल इन्टेलिजन्स....' ही विषय आणि परिणामकारक सादरीकरणामुळे प्रभाव टाकते.भावनेला बाजूला ठेऊन आलेल्या संधीसाठी सामोरे जाणे हेच आजच्या जिवनाचे लक्षण सांगणारी ही एकांकिका. उद्या इंजिनियरिंगच्या फायनलची परिक्षा असताना रात्री वडील अपघातात गेल्याचे कळते. मुलाने वडिलांच्या अंत्यसंस्काला जायचे की परिक्षा द्यायची यावर निर्णय घेताना निर्माण होणारी स्थिती इथे मांडलीय. आजची संधी आजच घेतली पाहिजे. वडील तर गेलेच आहेच त्यांनी मुलासाठी जपलेले स्वप्न साकार होण्यासाठी परिक्षा दिलीच पाहिजे असे सांगताना आजच्या ताणाच्या स्थितीचे संवादातून वर्णन करणारी ही एकांकिका.विराट मडके यांनी दिग्दर्शनातून ती वेधकतेने मांडलीय. शब्दातूनच व्यक्त होणारी ही एकांकिका बोलकी होते ती कलावंताच्या प्रभावी आविष्कराने. नेपथ्य, प्रकाश आणि संगीताचा परिणाम विषय अंगावर येण्यासाठी पुरक होतो. कलावंतात सर्वांनीच सारखा परिणाम साधलाय पण पियुष देशमुख आणि ऋषीकेश बर्डे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.


आबासाहेव गरवारे महाविद्यालयाने 'आता पास' ही यतीन माझिरे दिग्दर्शित एकांकीका म्हणजे नेपथ्य , प्रकाश, संगीत आणि सांघिकपणे साकारलेली सुरेख एकांकिका.कोकणातल्या गणपती काळात घडणारी ही कथा. शंना नवरेंची मूळ कथा. कथावस्तू मुळातच भावनेला हात घालणारी. शिक्षण देताना पारंपारिक पध्दत सोडून अनुभवातून दिलेली उदाहरणे देऊन गणितासारखा अवघड वाटणारा विषयही किती सोपा होतो ते सांगणारी. नेमके वातावण निर्माण करुन सादर झालेली ही परिणामकारक एकांकिका. पात्रांचे नेटके संतुलन अणि त्यातून साधलेला सांघिक परिणाम यातून ही एकांकिका उठावदार झाली.


गावाकडे शिक्षण मिळते ती व्यवस्था टिपणारी. ग्रामिण भागात वातावरणातून शिकणारे विद्यार्थी. यांचा वास्तव अनुभव हसत-हसत देणारी ही एकांकिका सादर केली ती आय एल एस विधीमहाविद्यालयाने "आम्ही तुझी लेकरे '.हलगीच्या तालावर थिरकणारी ही मुले. शहरातून गावात आलेला हुशार मुलगा आणि घरच्या परिस्थीतीने शिक्षण घेणेही ज्याच्या जिवावरचे ओझे होते अशा दोन विद्यार्थ्यांची ही भावनेला हात घालणारी गोष्ट. दिग्दर्शक मियाज ईक्‍बाल नियाट मुजावर यांनी ती ताकदीने उभा केलीय. इब्लीस तरीही हुशार अशी टिम त्यांनी छान निवडली आहे.तंत्रापेक्षा सादरीकरणाचा परिणाम ती साधते.

पीआय साटीची "चिल्ड्रन ऑफ हेवन'ही एक साध्या बीजातून उमलेलेली तरल कहाणी. बहिणीचे बुट दुरुस्त करला जाताना भावाकडून ते हरवतात आणि मग सुरू होतात ते परत मिळवण्यासाठी किंवा नवे मिळावेत यासाठी केलेल्या क्‍लृप्त्या. शितल क्षिरसागर यांनी ती दिग्दर्शित केलीय. गरीब परिस्थितीत राहणाऱ्या अली (सौरभ कडकोडी)आणि झारा (अत्रेयी मैती) यांच्या नात्यांची ही वीण. विषयाचे वेगळेपण आणि भारावलेल्या वातावणाचा नेमका परिणाम ही एकांकिका साधते.


मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची "मृगनक्षत्र'ने लक्ष वेधले ते स्नेहल घायाळ या विद्दयार्थिनीच्या धारदार अभिनयाने. चित्रकाराच्या घरी काम करणारी पण भावनेत गुंतत जाणारी शांता तीने फारच छान साकारली. अद्वैत कुलकर्णीचा चित्रकार मात्र एकसूरी होता. छोट्या छोट्‌या प्रसंगातून एकांकिकेने वेगळपण जपले. चेतन डांगे याचा दिग्दर्शक म्हणून प्रयत्न चांगला होता. .संगीत, प्रकाश आणि नेपथ्यातूनही एकांकिकेचा प्रभाव जाणवतो.


मॉडर्नची "साक्ष' मध्ये तीन भिकाऱ्यानी केलेला अफलातून आभिनय उठाव आणतो. कथेची सुरवात आणि शेवट विषयाला दुसरीकडे नेतो. विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणात क्षणोक्षणी जाणवत होती.


पुणे विद्यार्थी गृहाचे आमियांत्रिकी महाविद्यालयाची "नात"ं ने फारसा प्रभाव टाकला नाही. परसत गेलेली आणि नेमका परिणाम न साधलेली ही एकांकिका.तंत्रचा फारसा वापर नसला तरी त्यातही चुका करून प्रयोगाचा परिणाम ती साधू शकली नाही.


एकूणच स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकेतून महाविद्यालयीन तरुणांमधली रग आणि धग जाणवते. त्यांचेकडे वेगळे विषय आहेत. नवो करण्याची जिद्द आहे. मेहनतीला ते मागेपुढे पाहणार नाहीत.त्यांच्यात टॅलेंटही भरपूर आहेत. केवळ योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उद्याच्या कलाजिवनात स्वतःच्या पायावर आपला झेंडा फडकवणारी पिढी आहे हे नक्की.


सुभाष इनामदार,पुणे


subhashinamdar@gmail.com