Sunday, January 18, 2009

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...








छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत. एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत. घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत. घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी. मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.

असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण. घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.

अशी फुलवली
-बागेसाठीजागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्‍चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्‍या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत न घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली. नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्‍वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे न सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला. वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली.

आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली. यासंदर्भात माहितीसाठी "ऍग्रोवन'मधील लेख मार्गदर्शक ठरले.





सुभाष इनामदार, पुणे-५१
संपर्कः ९८८१८९९०५६

3 comments:

Anonymous said...

फारच सुंदर. आपले रो हाऊस नक्की कुठे आहे? पहायला मिळेल का? आपण आपला हा लेख/प्रयोग उपक्रम या माहितीपुर्ण मराठीसंकेतस्थळावर टाकावा ही मनापासून विनंती.

उपक्रमाचा दुवा http://mr.upakram.org/

Aparna said...

बागकामाची आवड जपण्याचा प्रयत्न खरच कौतुकास्पद आहे.

Levitra said...

Great!!!How good it is when we are living in the natural environment with fresh air, green environment, and clean water.This is a very wonderful post!!!