Thursday, August 27, 2009

गाण्यावर स्वतःचा ठसा


आजच्या पिढीतले विचारवंत गायक या यादीत सावनी शेंडे-साठ्ये हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांनी नेटाने केला. घरी आजी- कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या मार्गदर्शनाच्या मुशीतून सावनी यांचे गायन आकाराला येत गेले.

गानवर्धन, सुरेल सभा, सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या मैफलींना जायचा योग त्यामुळेच येत गेला. अनेकांचे ऐकल्यामुळे कानावर आपोआपच संगीताचे धडे नकळत गिरविले जाऊ लागले. डॉ. प्रभा अत्रे, माणिक वर्मा, शोभा गुर्टू यांच्यासारख्या थोर गायकांचे घरात येणे-जाणे होते. त्यांच्या संगीतविषयक चर्चा कानावरून गेल्या. रागांविषयक ज्ञान आणि सुरांचे पक्केपण म्हणजे काय, ते समजले. त्यात फायदाच झाला.

बालपणापासून कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, असा वडिलांनी दंडक घालून दिला होता. तो पाळल्यामुळेच आजीच्या एकसष्टीच्या निमित्ताने झालेल्या मैफलीत नाव पुकारले गेले सावनी शेंडे यांचे. आणि सावनी यांच्या नावामागे शास्त्रीय संगीताची जाण किती आहे, याचा प्रत्यय उपस्थितांना झाला. त्या वेळी त्यांचे वय अवघे दहा वर्ष होते.ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे रीतसर शास्त्रीय संगीताचे शिक्षण सावनी यांनी 12 वर्षे घेतले. संगीत परंपरेची जाणीव अधिक समृद्ध होत गेली.


"बंदिश कशी सजवायची याचे धडे मला आजही उपयोगी पडतात. माझ्यासारखे गाऊ नकोस. तुझे गाणे दिसायला हवे. हा उपदेश मनात साठवून माझी वाटचाल आजही सुरू आहे...' याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.""मैफली अनेक झाल्या; पण राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्यासमोर मैफल करण्याचे आमंत्रण मिळाले, याचा आजही अभिमानपूर्वक उल्लेख करावासा वाटतो. आपल्या वाढदिवसाचा केक राष्ट्रपतींच्या हस्ते कापला जावा यापरते भाग्य ते कोणते,'' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

""आता अनेक राग विस्तृत अंगाने गाता गाता त्या रागातल्या रचना लिहिणे सुरू केले आहे. त्यातूनच नव्या बंदिशींचे पुस्तक प्रकाशित झाले. शास्त्रीय संगीताकडे तरुण वर्ग आकृष्ट व्हावा यासाठी रसिक आणि गायक यांचा संवाद घडावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,'' असे त्यांनी सांगितले.

सुभाष इनामदार,

पुणे

(सावनी शेंडे-साठ्ये यांची मुलाखत पाहण्यासाठी इ-सकाळच्या फिचर्स लिंकवर क्‍लिक करा)

No comments: