Sunday, November 1, 2009

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी


कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर" आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे