Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या प्रतिभेचे देणे

पुलोत्सवाच्या सातव्या महोत्सवात रसिकांनी अनुभवली सुनीताबाई देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
पुलं ऊर्फ भाईंनी लिहिते राहावे. त्यांच्या अंगच्या गुणांनी विविधरंगी बनावे यासाठी सुनिताबाईंनी कित्येकांचा रोष ओढवून घेतला. पुलंजवळ जायचे असेल तर सुनिताबाईंच्या मर्जीत आधी उतरा मग पुलदर्शन घडेल असा संकेतच जणू बनला होता.मात्र स्वतःमधील कला, लेखनाची ताकद, अभिनयाचे पैलू दडवून ठेवून त्यांनी पुलंसाठी एका अर्थाने आपल्या गुणांचा होम करून भाईंचा लेखन कुंड सतत प्रज्वलित ठेवला.
त्या स्वतः कवी नाहीत. पण कवींबद्दल विलक्षण आदर. त्यातूनच मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम ज्या ताकदीने त्यांनी सादर केला त्याला तोड नाही. पुलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आशय संस्थेच्या संयोजकांनी सुनिताबाईंच्या प्रतिभेला रसिकांजवळ उलगडण्याचा प्रयत्न केला.ज्यांनी तो अनुभवला त्यांना धन्य वाटले. आणि सुनिताबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा मान मिळाला.
त्यांच्या ध्वनिचित्रफितीतून जे विलक्षण उलगडले ते थोडक्‍यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला आहे, इतकेच.त्यांच्या कवीतेतल्या सादरीकरणातपण त्यांच्या अंगचे विविधअंगी पैलू स्पष्टपणे दिसून येत होते. पण स्वतःला जाळत पुलंना उजळविण्याचा यज्ञ केवढा महान होता याची दखल घेण्यासाठी हा शब्दप्रपंच.

सुभाष इनामदार,पुणे

सुनिताबाईंच्या आठवणीला समर्पित सातवा पुलोत्सव

आताशा मी नसतेच इथं.... सुनिताबाईंच्या आवाजातल्या या कवितेने सातव्या पुलोत्सवाची सांगता झाली खरी पण ती दुखाःचे सावट घेऊनच.
पुलोत्सव रविवारी आणि सुनीताबाई शनिवारी रात्री निर्वतल्या. शो मस्ट गो ऑन ह्या सुनिताबाईंच्या शिस्तीनुसार ८ ते १८ नोव्हेंबरचा पुलोत्सव रद्द न करता ठरल्यावेळी पार पडला. सर्वच कार्यक्रम पार पडले. पण तरुणाईला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो शेवटच्या दिवशी होतो तो पुढे-मागे करावा लागला इतकेच.समारोप समारंभ सुनितार्बांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अर्पण केला गेला.
मंगला गोडबोले यांनी या खास त्यासाठी लेखन आणि निवेदन करून स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक यांनी सुनिताबाईंच्या पुस्तकातील उतारे वाचून गृहिणी-सखी आणि सचिव म्हणून पु लंच्या आयुष्याला कसे वळण दिले याचे भान रसिकांना आले. डॉ. जयंत नारळीकरांनी लंडन ते आयुकातल्या प्रवासात पु ल आणि सुनिताबाईंनी कशी आस्थेवाईक चौकशी करून आयुकाला देणगी दिली याच्या आठवणी सांगितल्या. प्राध्यापिका रेखा इनामदार-साने यांनी सुनिताबाईंच्या शिस्तीच्या कल्पनांची महती सांगून आहे मनोहर तरी..या पुस्तकाने संसार काटेकोरपणाने सांभाळून पु लं सारख्या लेखकाला कशा पद्धतीने सांभाळल्याचे चित्र तर आहेच पण ते करतानाच स्वतःच्या कवितांची आवड, आणि वाचनाची सवय कायम ठेवली हेच दिसून येते.
सातव्या पुलोत्सवाने सुनिताबाईंचे मोठेपण अधिक व्यापक प्रमाणात रसिकता पोचविले. त्यांच्या कविता सादर करण्याची पद्धती इतकी विलक्षण होती की समीक्षकांनी जे चारशे पानी पुस्तक लिहून सांगता येत नाही ते त्यांच्या स्वाभाविक आणि उत्कट वाचन सामर्थ्याने सहजी कळून येते.त्यांच्या कविता वाचनाची महती आणखी एक की त्याची कुणी नक्कल म्हणूनही सादर करू शकत नाही.
"फलाटदादा" ऐकताना आपण भान हरपून जातो. एवढी शक्ती त्यांच्या कवीता वाचनात असते हे इथे सिध्द झाले.
सुनिताबाईंच्या आयुष्याचा पटच जणू पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साकार होत होता.कधी शब्दातून तर कधी चित्रफीतीतून सुनिताबाईचे आयुष्य इथे उलगडले होते. ते पाहताना एकच जाणवले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभा तर आहेच. पण पुलंमुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले हे नक्की.
आहे "मनोहर" तरी....
या पुस्तकाला नाव काय द्यायचे याची चर्चा सुरू होती. वेगळी नावे समोर येत होती. गाडी चालवत दोघे चालवत असताना इतका बेकरीसमोर थांबली होती. बेकरीचे नाव होते मनोहर बेकरी. पुलंनी सुनतीबाईंना विचारले आहे मनोहर तरी... हे नाव कसे वाटेल. आणि पुस्तकाचे नाव नक्की झाले. आहे मनांहर तरी.कधीतरी आम्हालाही गृहीत धरा... असा टोलाही त्यांनी मारला.

सुभाष इनामदार, पुणे.

Tuesday, November 17, 2009

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


सुभाष इनामदार, पुणे