Tuesday, July 13, 2010

समाज आज कुठे चाललाय....


नियोजन मंडळाचे सदस्य. अर्थतज्ञ. मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु. अशा अनेक पदांवर काम करीत असलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना ऐकताना विविध विषयांबाबतीतली त्यांची नव्याने ओळख झाली.राज्यसभेचे खासदार म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाचारण केलेल्या डॉ. मुणगेकरांची जगण्यातली मुल्ये. त्यांचा लेखी स्त्रीला किती महत्वाचे स्थान आहे. भारतातली विषमता. नोकरशाहीत जबाबदारीचे नसलेले भान.बेस्ट फाइव्ह प्रकरणी महाराष्ट्राच्या अधिका-यांची चालढकल. असे कितीतरी विषयीचे त्यांचे स्पष्ट आणि तडफदार विचार ऐकण्याची संधी लाभली.

खरेच मुणगेकर सर, तुमची साहित्यातील जाण. तम्ही जिवनात केलेला संघर्ष. सारेच यानिमित्ताने कांही प्रमाणात होईना समजले.
बलराज सहानी-साहिल लुधियानवी संस्थेच्या वतीने शिक्षणातल्या ड़ॉक्टरांना आभिनयातल्या डॉक्टरांकडून मिळालेला पुरस्कार हाही एक उत्तम योगायोग होता. तो शनिवारी साधला गेला. नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यातल्या कचरा कुंडी प्रकरणी तयार केलेल्या चित्रपटाचे सर्वसर्वा अतुल पेठे यांचे सामाजिक कार्य पाहून पाच सफाई महिलांच्या हस्ते त्यांचा केलेला सत्कार पाहता आला. समाजतल्या विविध प्रश्नाविषयी सजगपणे पाहताना सामाजिक प्रश्नाविषयी पेठे यांची चाललेली एकनिष्ठ धडपड पाहिली की या पुरस्काराचे मोल कळते.

या निमित्ताने 'मी असा घडलो' या डॉ. मुणगेकरांच्या पुस्तकावरच्या परिसंवादाचे आयोजन करून पुस्तक हे विद्यापीठस्तरावर लावले पाहिजे एवढे छान असल्याचा शेरा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला.
मला निसर्गाने घडविले. मी कसा घडलो यापेक्षा मला आजुबाजूचे वातावण, आई, शिक्षक, मामा, वडील यांनी कसे घडविले याचे चित्रण असल्याचे मुणगेकर सांगतात. पुस्तकाविषयी सांगताना ते भारावून जातात. मोठ्या पदांवर असूनही त्यांचे पाय किती जमिनिवर आहेत ते त्यांच्या भाषणात अनुभवता आले.

समाजात घडणा-या विषम अशा विविध प्रश्नांबद्दची चिड त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

सामाजिक विषमता. जाती-धर्माचे राजकारण. खालावत चाललेली मूल्ये. यांचा पाढाच त्यांनी त्यांच्या भाषणता वाचला.

जे समोर ऐकायला हजर होते त्यांना त्यांच्यातल्या स्पष्टपणाची जाणीव तर झालीच पण किती साधा हा माणूस आणि कीती उच्च कोटीचे विचार आहेत याचे दर्शन घडले.

हजारो वर्षापासून स्त्रीयांना मिळणारी दुय्यम वागणूक याचे दुःख त्यांना बोचते. त्यांच्या मते पुरुषांनी स्वतःला पुरुषी अहंकारातून मुक्त केले तरच स्त्रीमुक्ती साध्य होईल.

एक सुंदर भाष्यकार म्हणूनच त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य लाभणे हे तर मोलाचेच. पण ते अंशतः पोचविण्याची उर्मी आजही जागृत असणे हे त्या ड़ॉक्टर मुणगेकरांच्या भाषणाच्या परिणामातून घडले.


सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail.com

9552596276

1 comment:

Meenal Gadre. said...

मुणगेकर सर माझे अर्थशास्त्रात एम. ए. करतानाचे शिक्षक. ते उत्तम बोलतात. आम्ही त्यांचे एकही लेक्चर बुडवत नव्हतो.