Thursday, July 15, 2010

नवा प्रयोग 'कट्टा कविता.'


पुरूषोत्तम करंडकाच्या स्पर्धेच्या तारखा जाहिर झाल्या की पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधील नाटकांवर प्रेम करणारे सारेच एकत्र येतात. विषयांवर चर्चा होते. एकांकिका लिहिली जाते. आणि चमू तयार होतो. तालमींसाठी.

हा तर पारंपारिक शिरस्ता. याची आठवण करून देणारे काव्य रविवारी ११ जुलैला भरतच्या रंगमंचावर साकारले . तोच आवेश, तीच उर्मी. तोच युवा वर्ग. मात्र इथे फरक इतकाच की हा सारा वर्ग... या सा-यातून बाहेर पडला. आपापली अवधाने सांभाळून पुन्हा काहीतरी वेगळे करायचे या उद्देशाने. डीग्री घेऊन नोकरीच्या निमित्ताने विसावलेल्या तरूणांना पुन्हा काही करायची जिद्द निर्माण झाली आणि तयार झाला एक नवा प्रयोग 'कट्टा कविता.'.

इथल्या कविता इतरांच्या नाहीत. तर त्या त्यांनीच केलेल्या, यात विषयाची विविधता तर आहेच. पण जीवनाच्या अनुभवांचे क्षणही डोकावतात. सोमवार ते शुक्रवार आपापल्या चाकरीत कामकरुन थकणारे हे जीव शनवार-रविवारी कट्टयाच्या निमि्त्ताने एकत्र येतात. वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात. जगण्यातला तो आनंद उपभोगतात. आणि साद घालतात मनातल्या सुप्त उर्मीला.
पुन्हा महाविद्यालयातले दिवस आठविले जातात आणि सुरू होते कट्टयावरची गंमंत. कश्यप देशपांडे, रोहित भोपटकर यांनी शब्दाला महत्व देताना सादरीकरण करताना प्रकाश, नेपथ्य आणि संगीत यांचा नेमका वापर करून याभावना इतक्या सहजपणे रंगमंचावर सादर केल्या की टाळ्यांच्या प्रतिसादाने रसिकांची पावती मिळवून जातात.
स्वतःचे लेखन इतक्या वेगळ्या वातावरणात वलयांकित होते की त्या भावनेला धार येते. शब्दाला वलय येतायेता ते वातावरणही बनत जाते.
अमित सावरगावकर, नंदिता केळकर, सागर गोगटे, कश्यप देशपांडे, आर्या रानडे, अमित कर्वे आणि मयुरा गायकवाड यांनी कट्ट्यावर ज्या पध्दतीने कवीता सादर झाल्या त्या प्रत्यक्षात थिएटरमध्ये पाहणे हा आनंदाचा भाग असेल.

आजच्या जगण्यातील धडपड. प्रेयसीच्या नादात घुमणारे शब्द. मुक्तछंदात व्यक्त झालेल्या मध्यमवर्गींयांच्या व्यथा. लोकशाहीची चाललेली थट्टा. सारेच या 'कट्टा कविता'त सादर होते. पायनापल ग्रुप हा नवा तरूणांचा संच यामुळे एकत्र आला. स्पर्धेतून बाहेर असले तरी यांचा उत्साह तोच आहे हे माझ्या दृष्टिने महत्वाचे.
पुण्यात अशा या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहिला की वेगळा प्रयोग करुन प्रेक्षकांना रंगमंचाकडे खेचण्याची ताकद या प्रकारात आहे याची जाणीव झाली.


-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: