Wednesday, August 11, 2010

मधुवंती भिडे 'असे सूर गातात.'..


पतिसमवेत त्या अमेरिकेत गेल्या. पण जाताना आपले संगीत बरोबरच घेऊन. तिथे डॉ. अलका देव-मारुलकरांनी सराव करून घेतलेला रियाज मात्र चुकविला नाही. गेली १६ वर्षे मधुवंती भिडे गातच राहिल्या. गेल्या शनिवारी त्यांनी गायलेल्या 'असे सुर गावे' या ध्वनिफितिचे प्रकाशन श्रीधर फडके यांच्या हस्ते करवून मराठीतल्या प्रमुंख कवींच्या कवितांना चित्रफितीमधून स्वरसिध्द केले आहे.

मराठी भाषेतले शुध्द उच्चारण व्हावे यासाठी मधुवंती भिडे यांनी विशेष काळजी घेतली आहे. अगदी उच्चारण्यात चूकच निघणार नाही याची खबरदारी घेऊनही काही वेळा कानाला खटकले तरीही मराठी भाषेशी नाळ जोडण्यासाटी केलेल्या ह्या प्रयत्नाला मनापासून दाद द्यायलाच हवी.


कवी जयंत भिडे, संगीत दिले तो नरेंद्र भिडे आणि गायले तेही मधुवंती भिडे असा तिनही भिडे एकाच ठिकाणी भिडलेला हा सोहळाही वेगळाच म्हणावा लागेल.

शास्त्रीय संगीत गातानाही मधुवंती भिडे ह्या सतत मराठी गाण्यांचे कार्यक्रम करतच होत्या. त्यांनी पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनात सुरेश भट यांच्या गझलांवर आधारित कार्यक्रम केला होता. फिलाडेल्फिया आणि सेऍटलमध्ये गायनाचे कार्यक्रम केले. मराठी गाणी तेथल्या मराठी रसिंकाना सतत वेगवेगळ्या माध्यामातून ऐकवून मराटी गाणी तिथे पसरलेल्या माणसांच्या मनात साठवून ठेवण्यात मधुवंती भिडे यांचे योगदान आहे.

जुन्या गाण्यांना वेगळ्या चाली, अतिशय फ्रेश संगीत, अशा विविधतेनं हा अल्बम नटला आहे. एकूण आठ गाणी यात आहेत. बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेलं "माझी माय सरस्वती', जयंत भिडे यांनी लिहिलेले "दिसती तुझ्या खुणा', हे एका अदृश्‍य शक्तीवर आधारलेलं पण भक्तिगीत नसलेलं, शांता शेळकेंच्या लेखणीतून उतरलेलं, मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेली लावणी आणि भावगीत, पद्मा गोळे यांच्याबरोबरच अरुणा ढेरेंचं लोकगीत आणि वैभव जोशी यांचं "फ्युजन' गीतं अल्बममध्ये आहे.या अल्बमच्या रूपातून आपण संगीतातील वेगळा "ट्रेंड' आणण्याचा प्रयत्न केलाय असा दावा किती खरा खोटा ते ऐकणारे श्रोतेच सांगतील.


यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठी भाषा आजही परदेशात टिकली आहे. ती पिढीनुसार वाढत आहे. भाषेत होणा-या विविध गोष्टी पुढच्या पिढीपर्यत पोहोचत आहे याचा आनंद मधुवंती भिडे यांच्या सीडी प्रकाशनाच्या निमित्ताने हा एक आगळा आनंद होतोय.

त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांतल्या संगीताचा आस्वाद घेताना आनंदाबरोबरच अभिमानही वाटला.


सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmauil.com
9552596276

No comments: