Monday, September 27, 2010

भरारी थर्माकोलच्या रामदास माने यांची



खरं तर याला आता दोन-तीन महिने उलटले. मात्र आता आठवू म्हणताना ते क्षण अजूनही स्पष्ट दिसतात.
जेव्हा डीएस कुलकर्णी यांच्या साठीच्या समारंभात सातारकडच्या उद्योजकाचा डिएसके सेल्फ मेड मॅन हा पहिला एक लाखाचा पुरस्कार पुण्याजवळच्या भोसरीतल्या रामदास माने यांना मिळाला तो क्षण.


सूटा बूटातल्या रामदास माने यांनी आपली भरारी ऐकविली...तीही अगदी सातारी शैलीत.... तेव्हाच रामदास माने यांना
भेटण्याचे ठरविले...आणि तो योग आला....



भोसरीतल्या टाटा मोटर्सच्या जवळच्या एमआयडीसीच्या माने इलेक्ट्रीकल्सच्या युनिटमधये प्रवेश केल्यावर तुम्ही थर्माकोलच्या दुनियेत हरखून जाता.
साबुदाणासारख्या शूभ्र दाणेदार पण हलक्या गोळ्यातून इतके जड भासणारे आणि पाण्यात न विरघळणारे . उन्हाळ्यात थंडावा आणणारे आणि थंडीत न तापणारे थर्माकोलचे चौकेनी खांब पाहिले की अजब वाटते. स्वतः या कंपनीवे संचालक रामदास माने यांचे हे विश्व काही वेगळे आहे याची जाणीव होते.

दाण्यातून पाणी आणि हवेच्या प्रेशरमुळे तयार होणा-या भिंतीतून बाहेर पडलेल्या या शुभ्र अशा थर्माकोलच्या ठोकळ्यांच्या सहाय्याने विविध उपयोगी वस्तूंची निर्मिती पाहिली. घर बांधणासाठी तयार होणा-या कमी किंमतीतल्या वीटा पाहल्या आणि या विटा आणि माफक सिमेटच्या मदतीने केलेले घर आणि शौचालये पाहिले की असे घर असताना आपण त्यासाठी किती पैसा आणि वेळ वाया घालवितो ते नजरेत येते.
अधुनिक थर्माकोलच्या सहाय्याने चार तासात घर आणि कुठेही हलविले जाणारे हलके आणि कित्येक वर्ष टिकणारे शौचालय. दोघांचीही उपयुक्तता कळते.

ही मशिनरी तयार तर माने यांनी केलीच पण ती मशिनरी अनेक देशात पाठवून या इको फ्रेंडली पध्दतीच्या निर्मितीचा प्रचार आणि प्रसारही केला. लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातले सर्वात मोठे मशिन बनविणारी कंपनीचे नावही झळकले.

४५ देशात मानेच्या कंपनीने बनविलेली मशीन ह्या अनोख्या कामगीरीचा लाभ घेत आहेत.


आज थर्माकोलचे नाव घेतले की रामदास मानेंचे नाव येतेच. ते माने या उद्योजकांच्या यादीत आले खरे पण त्यासाठी त्यांची यशोगाथा त्यांच्या खास सातारी शैलीत ऐकायलाच हवी.


सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या लोधवडे गावी घरच्या गरीबीतही शिक्षणासाठी राजगार हमीच्या कामावर रोजंदारी करणारा हा उद्योजक.. एक पत्र्याची पेटीत मावेल तेवढे सामान घेऊन सातारला आय यी आयला वायरमनचे काम शिकण्यासाठी आला. दिवसा शिक्षण आणि रात्री सातारा एस टी स्टॅंडवरच्या कॅन्टीन मध्ये काम असे दिवस काढून या परिक्षेत पहिला येतो काय? पुण्याच्या महिंद्र कंपनीत दाखल होतो काय आणि इंजिनियर बनण्याचे स्वप्न ठेउन स्वतःची माने इलेक्ट्रिकल्स ही कंपनी उभी काय करतो.... सारेच अजब आणि धाडसी....


जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज रामदास माने या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे.


अनेक पुरस्काराने स्न्मानित झालेत. बांधकामाच्या क्षेत्रातल्या थर्माकोलच्या वीटांच्या मागणीसाठी डीएसके, कुमार अशा बांधकाम व्यवसायातल्या वजनदार नावात स्वतःची छाप पाडून बांधकामाचा खर्च कमीकरणारा हा व्यवसाय नावारूपाला आणला.

समाजाचे देणे अंशतः देणे लागतो या न्यायाने लोघवडे गावाचा विकास केला. वारक-यांना कमीत कमी किमतीत शौचालये उपलब्ध करून दिली.

वीस रूपयांच्या बळावर पुण्यात दाखल झालेल्या या रामदास मानेंचे उद्योजक म्हणून स्वप्न साकारलेले ज्यांनी अनुभवले ते तर सुखावतीलच पण आजच्या व्यवसायात येऊ पाहणा-या तरूणांनाही हा आदर्श नवी भरारी घेण्यासाठी उपयोगी पडणारा आहे.



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


ते स्वतःची वाटचाल सांगताहेत त्यातून अधिक माहिती मिळेलच....

No comments: