Saturday, June 12, 2010

आजही पु.ल...तुम्ही आमच्या मनात आहात


पु.ल. देशपांडे. मराठी माणसाचा अभिमान, मराठी कलावंतांचा मेरूमणी.

१२ जून २००० ला पु.ल.गेल्याची खबर आली. मात्र त्याआधी काही दिवस त्यांना कृत्रिम रित्या जगविण्यात आले आहे असे समजले होते. प्रयाग इस्पितळात त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ होती. आजही आठवते.

त्या स्मृति अजूनही जात नाहीत.

त्यांनी मराठी भाषेला काय दिले नाही. सूर दिला. संगीत दिले. नाटक दिले. भाषा दिली. मध्यमवर्गींयांना स्वतःचे स्थान दिले. पुणे, मुंबई आणि नागपूरकरांना त्यांचा अभिमान दिला.

चित्रपटाला आशय दिला. शब्दांना उजळ चेहरा दिला.

बोलण्यातली सहजता. मार्मिकता हे तर त्यांच्या व्याक्तिमत्वाचे सारच होते.

मराठी भाषेलाही स्वतःचा बाज दिला. ते जगभरात सिध्द करून दाखविले. सहजपणातही वाह्यातपणा न पाझरता हास्याचा धबधबा निर्माण केला.

शास्त्रीय संगीतातल्या कलांवंतांच्या तानेला पेटीच्या सुरातून स्वर दिले.

भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांचे गाणे समजावून दिले.

रविंद्रनाथ टागोरांच्या कवीतेला मराठी भाषेतून नवनिर्माणाचा गंध दिला.

मर्ढेकर, बोरकरांच्या काव्याकडे पाहण्याचा डोळा दिला.

याच पुलंच्या मागे सुनिताबाईंची संगत होती. धारदार पण नुकीला कट्यार जरी त्यांच्या वाणीत होती तरी त्यामागे भाईंच्या अघळपघळ स्वभावातून लेखकाचा शब्द बाहेर काढण्याची किमया त्यांनी साधली.

बालगंर्धवांचे गाणे, मन्सूरांचे, गंगूबाईचे गाणे पचविले आणि ते सोप्या मराठी भाषेत पुलंनी उलगडून दाखविले.

संगीतातली सहजता त्यांच्या भाषेत होती. भाषेला नाद होता. रूसवा होता. वरवर ती विनोदी वाटायची पण आत संस्काराचे पापूद्रे दडलेले होते.

सुंदर मी होणार , ती फुलराणी एवढेच नव्हे तर तिन पैशाचा तमाशा सारखे नाटक देऊन त्यांना रंगभूमिवर बहार तर आणली पण नटाची कला फुलविण्याची ताकद निर्माण करणारी आस्वादक भाषा फुलविली.

आजही पु.ल आणि सुनिताबाई दोघेही मराठी माणसांच्या मनात आहात.

तुमचे साहित्य. तुमचे संगीत आणि अधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला आम्ही पाहू शकतो. अनुभवू शकतो.

मराठीची पताका जोपर्यंत फडकत राहणार आहे तोपर्यंत तुमची महती अशीच कायम आमच्या मनात राहणार यात संशय नाही.


सुभाष इनामदार,पुणे.
9552596276