Tuesday, October 19, 2010

स्वप्नातले सत्त्य

स्वप्नात जे मी पाहिले सत्त्यात ते उतरले
धावलो शोधाया ते सहजी साध्य जाहले

का किंतूने घर पोखरले ते आता न उरले
वाजवाया गजर आता ना काही नुरले

दिनतमाची साथ ही आज मी अनुभवली
सार्थ माझ्या मस्तकी खंतही आता दुरावली

काय द्यावे तुला हे नकळे शब्द ओठावरी
आनंद बरसे मनमनी सुखवाया चरणावरी
नाद खुळा की बावळा हेही नच सांगावया
साद घाली आज माझी लेवूनी सांजावली

धाव आता घाव झेला रिता रे कितीसा
काय ठावा काय उरला प्रीतीचा तोही वसा
सांग झाली वेळ आता होतसे स्वप्नांची
जागवाया तुला रे किती सोंगे घ्यायची

तू दिलेली शब्द किमया आज झाली अपुरी
येशील पुन्हा माझ्या मनी ना तरी अंधुकशी?


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com

Mob- 9552596276

भविष्याकडे झुकणारे मानवी मन


गुरूजी, मुलगा २९ वर्षाचा आहे. अजून लग्न नाही. अनेक मुली येतात पण कुणी पसंतच पडत नाही. आम्हाला नक्की सांगा. त्याचे लग्न केव्हा होईल?
हे पहा, मुलाच्या जन्माच्या वेळीचे ग्रहमान योग्य नव्हते. त्यामुळे त्याच्या पत्रिकेत दोष आहे. लग्न होईल. पण उशीरा. कळले काय़? एक मात्र नक्की मुलगी कर्तृत्ववान असेल. पण भांडकुदळ असेल. सतत घरात भांडणे होतील. हे मला पत्रिकेत दिसतेय. येत्या दोन महिन्यात जमायला हवे.

गुरूजी, माझे पती ४२ व्या वर्षीच गेले. तेव्हापासून १२ वर्षात घरात एकही शुभकार्य झालेले नाही. मोठया मुलाचे लग्न होत नाही. मधल्या मुलीला स्थळे येत आहेत. पण तीला पसंत पडत नाही. तिचे म्हणणे मी आपल्या जातीतल्या मुलाशीच लग्न करेन हा हेका धरून बसली आहे. आम्ही सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकतच नाही?
हे बघा, काही काळजी करू नका. तिचे लग्न होईल. फक्त तीला तुमच्यापेक्षा उच्च जातीतला मुलगा मिळेल. तीने थोडे नमते घ्यायला हवे. तशी ती स्वतःच्या पायावर खंबीर उभी आहे. पण अहंपणा, स्वतःच खरे करणारी तिची पत्रिका आहे. पण लग्न नक्की होईल. कळले काय?
गुरूजी, हा तिसरा मुलगा आहे. शिकतो आणि नोकरी शोधतोय. त्याला नोकरी मिळेल काय? तो रहाते घर बांधायचे म्हणतोय. पण त्याची अत्त्या, कुरबुरी करतेय. घर दक्षिण-उत्तर आहे. ह्याचे तरी सर्व रांकेला लागेल ना?
हे पहा. याच्या पत्रिकेतले ग्रह उच्चीचे आहेत. शिक्षण नक्की पूर्ण करून तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागेल. पण त्याने कॉमर्सकडे न जाता इंजिनियरिंगची साईड पहिल्यापासून पकडायला हवी होती. ठिक आहे. देरसे आये, दुरूस्त आए. त्याने रहाते घर बांधण्याऐवजी दुसरीकडे फ्लॅट घ्यावा हे उत्तम. या दक्षिण-उत्तर घरात अडथळे दिसताहेत. एक तर कुठलीही जागा मंदिरासमोर असू नये. उत्कर्ष व्हायला अडथळे येतात.
तुमच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे मंदीर येते. शिवाय जागेचे दार दक्षिणेकडे आहे. आणि जागेत अनेक वाटेकरी आहेत. तुम्ही ती जागा बांधण्याचा घाट न घालणे उत्तम.
गेले काही दिवस तुमचे चांगले नाहीत. मात्र एक दोन महिन्यात ग्रह बदलत आहेत. काय समजले?
सर्व काही ठिक होईल. थोरल्या मुलाच्या आधी मुलीचे लग्न ठरले म्हणून काय बिघडले. काळ बदलला आहे. धाकट्याचेही कदाचित लवकर ठरेल.
गुरूजींच्या पाया पडून रितसर पैसे हातावर ठेऊन ही मंडळी निघुन गेली. ह्या माझ्यासमोर घडलेल्या संवादातून आजकाल माणूस किती अडचणीतून जात असतो. नोकरी, घर, लग्न आणि अडचणींनी ग्रासलेला आहे. त्याला यातून हवी आहे ह्यासर्वातून आपण चिंतामुक्त होऊ की नाही याबद्दलची खात्री.
पत्रिकेवर तुमचा विश्वास असो वा नसो. तो तुमचा डॉक्टरच आहे. तथाकथिक ग्रहांच्या गणीतावरून तुमच्या भविष्याची काळजी करतो. तुम्हाला भावनिक आणि मानसिक आधार देतो. तुम्हाला काही काळ तरी बरे वाटते. काही काळानंतर हेच प्रश्न पुन्हा आsss वासून उभे राहणारच आहेत. पण जर हे शास्त्र खरे असले तर उद्याचे दिवस तरी बरे येतील याची ग्वाही त्याला मिळते. एक प्रकारचा मानसिक ताण हलका होतो. पुढचे ताण नाहीसे करायला तो विरंगुळा मिळतो.

हजारो लोक भविष्याला मानत नाहीत. तसे त्यावर विसंबून राहूही नय़े. पण त्याचा सल्ला मानला तर काय होईल? निदान चुकीचे तर काही घडणार नाही. लाखो लोक दैनिकातले भविष्य रोज वाचतात. साप्ताहिक भविष्यही चाळतात. मग थोडे काळ समाधान देणार हा भविष्याचा मार्ग मानवी मनाला दिलासा देणारा आहे.... खरे ना?


सुभाष इनामदार, पुणे
Mob 9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com