Saturday, December 31, 2011

मराठी असे आमुची मायबोली


मराठी असे आमुची मायबोली

जरी आज ती राजभाषा नसे.

नसो आज ऐश्वर्य या माउलीला

यशाची पुढे दिव्य आशा असे.

.

जरी पंचखंडातही मान्यता घे

स्वसत्‍ताबले श्रीमती इंग्रजी.

जरी मान्यता आज हिंदीस देई

उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी.

.

मराठी असे आमची मायबोली

जरी भिन्न धर्मानुयायी असू .

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे

हिला बैसवू वैभवाच्या शिरी.

.

-- माधव जूलिअन (1894 - 1939) कविता संक्षेप

.

maraat'hi ase aamuchi maayboli

j'ari aaj' ti raajbhaashaa nase.

naso aaj' aishvarya yaa maaulilaa

yashaachi pud'he divvya aashaa ase.

.

j'ari panchakhand'aatahi maannyataa ghe

svasattaabale shrimati ingraji.

j'ari maannyataa aaj' hindis dei

udele nave raasht'ra he hindavi.

.

maraat'hi ase aamuchi maayboli,

j'ari bhinna dharmaanuyaayi asu.

jaganmaannyataa his arpu prataape

hilaa baisavu vaibhavaachaa shiri.

.

-- maadhav julian (1894 - 1939) kavitaa sankshep

................................. 2 ...................................

पारतंत्र्यकालात वरील कविता आली.... लोकप्रिय झाली.

कोल्हापूर, सांगली वगैरे संस्थानात मराठी राजभाषा

होती. पण ते अपवाद होते. इंग्रजी साम्राज्य पंचखंडात

अनेक देशात पसरलेले होते. भारताची राजभाषा इंग्रजी

होती.. ही व्यथा कवितेत आली.

.

paaratantryakaalaat varil kavitaa aali... lokapriya

zaali... kolhaapur, saangli vagaire sansthaanaat

maraat'hi raajbhaashaa hoti... pan' te apavaad

hote... ingraji saamraajja panchakhand'aat anek

deshaat pasarlele hote... bhaarataachi raaj-

bhaashaa ingraji hoti... hi vyathaa kavitet aali.

................................. 3 .................................

काही शब्द गैरलागू झाले. कारण 1960 मध्ये महाराष्ट्र

राज्य आले.... मराठी काही प्रमाणात राजभाषा झाली.

तरीही इंग्रजी पंचखंडात आहे, पण स्वसत्‍ताबले नाही.

ब्रिटीश साम्राज्य संपले.... पण 1940 नंतर जगभर

इंग्रजीप्रसार अमेरिकन तंत्रज्ञान व उद्योग यामुळे होत

गेला. भारताने स्वखुषीने इंग्रजी स्वीकारली.

.

kaahi shabda gairlaagu zaale... kaaran' 1960

madhe mahaaraasht'ra raajja aale... maraat'hi

kaahi pramaan'aat raajbhaashaa zaali... tarihi

ingraji panchakhand'aat aahe, pan' svasattaa-

bale naahi... brit'ish saamraajja sample... pan'

1940 nantar jagbhar ingrajiprasaar amerikan

tantradnyaan va udyog yaamul'e hot gelaa...

bhaarataane svakhushine ingraji svikaarli.

................................. 4 ................................

सर्व काम मायबोलीत करावे, पण ! भारत बहुभाषी

देश आहे.. विशाल उद्योगांस विपुल धनराशी लागते.

देशभर पसरलेले भागधारक यांना लाभांश व रिपोर्ट

कोणत्या भाषेत पाठवायचे ? महान संशोधन संस्थांचे

कार्य कोणत्या भाषेत ? अशा कित्येक प्रश्नांचे उत्तर

इंग्रजी ! ती जगाची आणि सुशिक्षित भारतीयांची संपर्क

भाषा आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषात पुरेसे

प्रवीण व्हावे. इंग्रजी व तिच्यामधील तंत्रज्ञान, विज्ञान

यांनी मुद्रण, दूरसंदेश, फोटो वगैरेत क्रांती केली. ती

मराठी साहित्य, कला यांना देखील उपयोगी झाली.

.

sarva kaam maaybolit karaave, pan' !.. bhaarat

bahubhaashi desh aahe... vishaal uddyogaans

vipul dhanaraashi laagte... deshbhar pasarlele

bhaagdhaarak yaannaa laabhaansh va riport'

kon'tyaa bhaashet paat'hvaaych'e ?.. mahaan

sanshodhan sansthaanch'e kaarya kon'tyaa

bhaashet ?.. ashaa kittek prashnaanch'e uttar

ingraji !.. ti jagaachi va sushikshit bhaarati-

yaanchi samparka bhaashaa aahe... maraat'hi

va ingraji yaa donhi bhaashaat purese pravin'

vhaave... ingraji va tichaamadhil tantradnyaan,

vidnyaan yaani mudran', durasandesh, phot'o

vagairet kraanti keli... ti maraat'hi saahittya,

kalaa yaannaa dekhil upayogi zaali.
http://www.mngogate.com

Friday, December 30, 2011

नवी प्रेरणा.... घेऊया


नव वर्षाच्या नव्या आशेला नवी स्वप्ने पडावी
मनातल्या नव किरणांना आयुष्याच्या वाटेवर पसरवत
उद्याचा उषःकाल होणार आहे....
कोमेजलेल्या कळ्या आता नव्या उमेदीने फुलणार आहेत...
संस्कृतीच्या पाऊलखुणा अस्पष्ट होत धूसर बनल्या आहेत
नवयुवकांच्या नजरेमधुनी नवी संस्कृती पाझरत आहे...
नव्या-जुन्चांचा संगमाला नवपालवी बहरणार आहे...
गतस्मृतींना विसरुन जावू
नवी नजर मिळवूया...
स्वागत करुया नववर्षाचे
नवी चेतना , नवी प्रेरणा.... घेऊया...

सुभाष इनामदार,पुणे.

रसिकांना जिंकणारी तू


कलेतली हिरकणी तू
कलावंतातली शिरोमणी तू

वादनातली तरबेज तू
मंचावरची तारका तू

वादनात चपखल तू
आपल्याच नादात तू


नाकासमोर चालणारी तू
वेध कलेचा घेणारी तू

रसिकांना जिंकणारी तू
वाहवा मिळविणारी तू

स्वरातली आर्तता तू
सूरावटीच्या मस्तीत तू

स्वभावात साधी तू
चेह-यात नम्र तू


यशाचे शिखर गाठणार तू
तेव्हाही आठवणार ना तू ?
सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, December 27, 2011

फुलून आले मन


फुलून आले मन माझे, ते तुला कळणार नाही
जाणीवांच्या पलिकडले मन माझे कळणार नाही

उरीच्या वेदनेला फुंकर ही घालून जा
आत रुजलेल्या फुलाला एकदा जोजावित जा

कधी कळणार तुला माझ्या मनीची भावना
समजून घशील तेव्हा थंड झाली भावना
subhash inamdar
subhashinamdar@gmai.com
9552596276

Sunday, December 25, 2011

जन्म अपुरा पडावा यापुढे...
जन्म अपुरा पडावा यापुढे...
माझ्या कुशीत विसावलीस तेव्हा
आकाशही ठेंगणे भासले
उरात धडधड, मनात समाधान
सहज सुलभ भावनांचा तो आवेग
अथांग सागराच्या लाटेला
कधी आवर घालता येतो ?

चेह-यातून तुझा भाव ओसंडत होता
एकरूपतेचे सारे निकष धुळीत मिळवत
सारा एकांताचा प्रवास माझ्या कुशीतून
भरधाव वेगाने धावत होता

देहाचे बंधन झुगारुन
समाधानाने डोळे बोलत होते
अबोल प्रित भासमय वाटत होती
याक्षणांसाठी सारे आयुष्य
प्रत्येकजणच वेचत असेल काय़?
माझीही अवस्था कांहीशी तशीच असेल काय ?

सारा प्रत्यय शरीरीतून स्पर्शत होता
आवेगाच्या मिठीतून सुटण्याची धडपड
मीही आता भारावलेपण जपत
अनुभवत, एकांताची पोकळी
भरुन आसमंतातून
तुझ्याकडे एकाग्रतेने ते पहात
सुखाचे ते क्षण वेचत होतो

आयुष्यातले ते क्षण
आसंडून वाहत होते
प्रेमाच्या वाटेत बसून
स्वर्गसुखाचा वर्षाव झेलत होते

भेटायची यापूर्वीही मला
पण ही ओढ आगळी होती
श्र्वासात गुंतूनही
कणन् कण भारावून सोडत होती

असेच एकत्र येउ या
एकांताची ही ओंजळ
तृप्त मनाने पिऊया
जगाचा विसर संपवून
स्वतःसाठी जगूया
शरीरी शिरशिरी सखये
पिऊन मस्त झिंगूया

मदन, मेनकेची जोडी
आज इथे दिसते आहे
तीव्र भावनेला
उरी तुझ्या कवटाळते आहे

बंध ना तुटावे कधीही
ना विरह व्हावा यापुढे
तुझ्या मिठीत विरघळण्यासाठी
जन्म अपुरा पडावा यापुढे


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

भान हवे


काव्याला शब्दातून बाहेर काढायला हवे
मनमोकळं वागायला शिकायला हवे..

मन सांगते ते ऐकावे
जन सांगतात तसे वागावे..

सांगण्यासारखो खूप आहे
पण, देण्यासारखे एकच आहे..

देताना घेणा-याचेही भान हवे
पेलताना ताकदीचा अंदाज हवा

नव्या जन्मात फुलण्याचे स्वप्न हवे
समाजात वावरताना देहाचे भान हवे

कसे, कुठे कशासाठी प्रश्न विचारायला हवेत
नदी, समुद्राच्या किना-यावरचे शांतपण हवे...

मागितले ते सर्व मिळायला हवे
अपर्ण केल्यापलिकडले विसरायला हवे..

साधनेला सुचितेचे भान हवे
कलावंतात कलेचे भाव हवे...
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@.gmail.com
Mob. 9552596276

दाराआड डोकावताना


दाराआड डोकावताना नजरेत काय होते ?
हूरहूर, प्रेम, व्याकूळता की ओढ होती ?
झपाटलेल्या एकांताची ती साक्ष होती....

विसरुन न येणारा चेहरा पाहताना थोडी भिती होती
साशंकता, संशय दूर सारणारी ती तीव्र भावना होती..

अकर्षकता, प्रेमभाव सारे कसे एकवटलो होते
आशेच्या सोज्वळ नजरेत ते सारेच व्यक्त होत होते...

काळजी करणारा स्वभाव आत मात्र व्यकूळ होता
गुंतून तुझ्यात अखेरपर्यंत विरही मात्र होता...

वेदनेतून उमलत होते प्रेम चेह-यावर दिसत होते
चंद्राच्या शीतलतेची, सूर्याच्या प्रखरतेची किरणेही त्यात सामावली होती...

पुन्हा पुन्हा आठवताना डोळ्यासमोरुन जात नाही
मनातल्या मनात साठवताना स्निग्धता तरीही ओसरत नाही....subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आले पाहिजे


भावनेला आवर घालता आला पाहिजे
शब्दातूनच त्या प्रकटल्या पाहिजेत
प्रेमाला विरोध करता आला पाहिजे
स्पर्शाला दाबून धरता आले पाहिजे
व्यवस्थेचे, समाजाचे बंधन मानले पाहिजे
दिसताना ते कुणालाच कळले ना पाहिजे
दाटून आलेल्या ओलाव्याला दाबता आले पाहिजे
साठवून ठेवलेल्या क्षणांना विसरता आले पाहिजे
नकळत घडलेल्या चूका दुरुस्त केल्या पाहिजेत
दुस-या मनाचे कधीतरी ऐकता आले पाहिजे
सरळ चालताना पाहता आले पाहिजे
सोपे, सहज बोलता आले पाहिजे
स्वप्नातही कधीतरी जगता आले पाहिजे
वास्तवाचे भान तेव्हाही ठेवता आले पाहिजे
समजून आहे, मला बदलता आले पाहिजे
आतल्या त्या मनात समजावता आले पाहिजेsubhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावरती
एक ठिकाण नक्की असते
उमलून येते फांदीवरती
त्याचे जाणे पक्के असते...

नसे कुणाला पृथ्वीवरती
कायमचे वरदान असते
कुणाकुणाला क्षणापुरती
फुल परी ते भेट असते...

काटे रुतता रक्तापरी ते
व्रण तो कायम नसतो
फांदीवरच्या फुलापरी `तो`
जिवलग अलगद स्थिर नसतो...

जीवनाच्या श्वासापरी `तो`
क्षण घटकांचे उरी नसे तो
भासला आपुला परी `तो`
वळणावरचा थांबा असतो....


subhash inamdar,Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आठवणी सुखावणा-या
आठवणी सुखावणा-या
गुंतून, जखडणा-या
बेधुंद, नशील्याही
कधी न संपणा-या
तर कधी त्रोटक

क्षणन् क्षण स्वप्नासारखा
वाचायला गेलं तर घरंगळून जाणा-या
तो स्नेह, जिव्हाळा
लळा लावतो
ती व्य़ाकुळता घायाळ करते
दूरचे दिवे धूसर भासतात
आठवणींचे पंख जवळून भिडतात

तरीही, त्या साठवण्यात अर्थ भरलाय
उधळून आयुष्य, अपुरेपण उरलय....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, December 23, 2011

साधनेला दे बळ नवे

भावनेला दूर सारा
साधनेला बळ द्या
गुंतून प्रेमात त्या
कलेचा गंध घ्या....
आजचा बाजार सारा
धग कुणाची कुणाला
आवरोनी मन आता
चिंतनाला पुजू या...
चित्त हवे स्थिर तेव्हा
रियाजाची बैठक हवी
सूर, तान, तालही
आत्मरंगात रंगूनी जा....
नजर एक, धेय्यही एक
मंत्र जपाया मन हवे
संगीताच्या सूरातून
सप्तरंग झंकारले....
नको घाई करू साधका
गुरूचें स्मरण हवे
चित्त एकाग्र करुनी
साधनेला दे बळ नवेसुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, December 20, 2011

दाराआड डोकावताना

दाराआड डोकावताना नजरेत काय होते?
हूरहूर, प्रेम, व्याकूळता की ओढ होती?

झपाटलेल्या एकांताची चेह-यावर मागणी होती
विसारू न शकणारी आश्वासक धिटाई होती
साशंकता, मार्दवता दूर सारणारी तीव्र भावना होती


अकर्षकता, प्रेमभाव सारेच कसे एकवटले होते
आशेच्या सोज्वळ नजरेत ते सारे व्यक्त होत होते

काळजी करणारा स्वभाव आज मात्र चिंतीत होता
गुंतून तुझ्यात अबोल विरह स्पष्ट होता

सौंदर्यात साठलेले प्रेम एका कटाक्षात पोहचोत होते
चंद्राच्या शितलतेची ,सूर्याच्या प्रखरतेची किरणे त्यात विखुरली होती

पुन्हा पुन्हा आठवताना डोळ्यासमोर तेच येते
मनातल्या मनातली प्रतिमा घुसून आक्रंदत होतीसुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 19, 2011

गोवा मुक्ती संग्राम आठवताना


गोवा मुक्ती लढा आठवतो कारण आज गोवा मुक्ती स्वातंत्र्याचा ५१ वे वर्ष.
पुण्यात या दिवशी भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेने गोमंतक मुक्ती चळवळीवर आधारीत
शशीकांत मांडके लिखित पुस्तकाचे प्रकाशन
केसरीचे संपादक दिपक टिळक यांच्या हस्ते केले.
या निमित्ताने हा मुक्ती संग्रामाचा आठवा...


-----------------------------
१८४५ पासून गोव्याला पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये र्मयादित मताधिकार मिळाला. १९१0 मध्ये पोर्तुगालमध्ये राजसत्ता नष्ट होऊन प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्यामुळे गोमंतकाला प्रांतिक स्वायत्ततेचा फायदा झाला; परंतु १९२६ मध्ये पोर्तुगाल
मध्ये पुन्हा राज्यक्रांती होऊन सालाझारची हुकूमशाही सुरू झाली. त्यामुळे तेथील स्वायत्तता संपुष्टात आली. विसाव्या शतकात पोर्तुगीजांची सत्ता झुगारून देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. १९२८ मध्ये मुंबई येथे गोवा कॉँग्रेस कमिटी स्थापन झाली. १९४८ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर गोवामुक्तीच्या हालचाली अधिक तीव्र झाल्या. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपविण्याचे पोर्तुगालने फेब्रुवारी १९५0 मध्ये नाकारले. सन १९५४ मध्ये दादरा-नगरहवेली हा भाग पोर्तुगालने मुक्त केला; मात्र तेथे आपल्या फौजांना जाण्यासाठी मोकळीक असावी, या मागणीसाठी पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज दाखल केला. १२ एप्रिल १९६0 रोजी त्याचा निकाल पोर्तुगालच्या विरोधात लागला. सन १९५५ मध्ये मोठय़ा संख्येतील सत्याग्रहींनी गोमंतकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन समिती अशा अनेक संघटनांनी गोव्याचे स्वातंत्र्य जवळ आणले. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली. पुढच्याच वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. नंतर निवडणुका होऊन २0 डिसेंबर १९६३ रोजी लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. २२ जानेवारी १९६५ रोजी गोवा विधिमंडळाने हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता; परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित राज्य असावे, असे ठरले. गोव्यात निवडणूक होऊन दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली. बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर १९७३ मध्ये शशिकला काकोडकर त्याच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री झाल्या.

गोव्याचा इतिहास

महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’त (अध्याय ९) आणि ‘स्कंदपुराणा’त (सह्याद्री खंड) ‘गोमंत’, तर ‘सूतसंहिते’त ‘गोवापुरी’ या नावाने गोव्याचा उल्लेख आढळतो. पुरातन काळी गोधनाची विपुलता असल्याने या प्रदेशाला ‘गोवा’ हे नाव पडले असावे. परशुरामाने सोडलेला गौ (बाण) गोव्यापर्यंत पोहोचला. त्या बाणाचा जेथे अंत झाला, तो प्रदेश म्हणजे गौमान्त-गोमन्त-गोमंतक अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते.
इसवीसन पूर्व तिसर्‍या व दुसर्‍या शतकात गोव्यावर मौर्यांचा अंमल होता. अर्बेली (साखळी महाल) येथील गुहेत सापडलेल्या शिलालेखांवरून इसवीसन पहिल्या शतकात गोवा हे मोठे शहर व व्यापारी केंद्र असावे, असा अंदाज लावता येतो. अंत्रूज (फोंडा) महालातील दोन ताम्रपटांप्रमाणे चंद्रपूर (चांदर) येथे चौथ्या शतकात देवराज राज्य करीत होता, असे कळते; परंतु तो कोणत्या घराण्यातील होता, याचा बोध होत नाही. या शतकातच गोव्यात बनवासी येथे कदंबांची सत्ता सुरू झाली. पाचव्या शतकात कदंब बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक बनले; मात्र त्यांची गोमंतकावरील सत्त नष्ट झाली नाही. चालुक्यांशी विवाहसंबंध जोडून जयकेशी कदंबाने आपली सत्ता वाढवली. कदंबांच्या सत्तेचा काळ हा गोव्याच्या भरभराटीचा काळ. या घराण्यातील पहिला व दुसरा गुहल्लदेव, पहिला आणि दुसरा जयकेशी, विजयादित्य हे राजे विशेष पराक्रमी होते. संपूर्ण कोकणपट्टीवर त्यांचा दबदबा होता. कदंब राजांनी आपली राजधानी चांदरहून गोपकपट्टण येथे हलवली. याच बंदरातून परदेशी व्यापार्‍यांशी व्यापार चालत असे. बाराव्या शतकात आपले प्रभुत्व टिकविण्यासाठी कदंबांना होयसळांशी संघर्ष करावा लागला. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी कदंबांना मांडलिक बनवून गोवा आपल्या सत्तेखाली आणला. गोव्यात यादवांची सत्ता १0१ वर्षे होती. त्यांनी गोव्याच्यायांचे योगदान अविस्मरणीय..

भारताच्या लष्करी कारवाईमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळाले खरे; मात्र त्यापूर्वीही पोर्तुगीजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गोव्याच्या मुक्तीसाठी लढणार्‍या या स्वातंत्र्यसैनिकांमुळे पोर्तुगीजांवर दबाव वाढला. भारतभरात क्रांतीची मशाल पेटली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात या विभूतींचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांपैकी काही व्यक्तींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप : वैभवात भर घातली. असे आहे गोवा..गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान, तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे लहान राज्य आहे. ते भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्‍चिमेला अरबी समुद्र आहे. ११ मार्च १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून, वास्को हे राज्यातील सर्वांत मोठे, तर पोतरुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगाव हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे.
गोवा राज्याला निसर्गसौंदर्याची देणगी लाभली असून, तेथील समुद्रकिनारे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहेत. पर्यटन हा गोव्यातील महत्त्वाचा व्यवसाय. प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठीही गोवा प्रख्यात आहे. ‘बसिलिका ऑफ बोम जीझस’ हे आशियातील सर्वांत मोठे ख्रिश्‍चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये जैवसंपदादेखील वैविध्यपूर्ण आहे.
डॉ. टी. बी. कुन्हा
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना गोव्याच्या ‘राष्ट्रवादी चळवळीचे जनक’ म्हटले जाते. डॉ. कुन्हा पॅरिसहून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. सन १९२८ मध्ये गोवा कॉँग्रेस समितीची स्थापना केली. त्यांना पोर्तुगीजांनी अनेकदा अटक करून कारागृहात डांबले. डॉ. कुन्हा यांनी काही काळ ‘फ्री गोवा’ हे वृत्तपत्रही चालवले. डॉ. कुन्हा यांच्या गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाबद्दल आज (दि. १९) त्यांचे तैलचित्र लोकसभा व राज्यसभेत लावण्यात येणार आहे.
डॉ. राम मनोहर लोहिया
ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ काळ लढा दिला. १८ जून १९४६ रोजी गोव्यातील मडगाव येथे त्यांनी मोठी सार्वजनिक सभा घेऊन जनक्रांतीची ज्योत पेटविली. त्यांच्या भाषणातून शेकडो स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली. ‘पोर्तुगीजांच्या राज्यात भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी मूल्यांना काडीचेही मोल नाही. गोमंतक हा भारताचाच भाग असून, भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच गोवादेखील मुक्त झाला पाहिजे’, अशा शब्दांत डॉ. लोहिया यांनी भाषणाला प्रारंभ केला. हे ऐकून पोर्तुगीज अधिकारी कॅप्टन मिरांद यांनी त्यांनी अडवले; मात्र डॉ. लोहिया यांनी निर्भीडपणे भाषण सुरू ठेवले. ते पाहून मिरांदने त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि बोलले, ‘भाषण बंद कर, अन्यथा गोळी झाडेन’; पण डॉ. लोहिया यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कॅप्टन मिरांदला न जुमानता ते बोलत राहिले. शेवटी मिरांदने त्यांना अटक केली.
डॉ. लोहिया यांच्या अटकेनंतर त्यांच्या भाषणाच्या प्रती जनसमुदायाला वाटण्यात आल्या. पुढे ही चळवळ फोफावत गेली. गोवा मुक्तीसाठी देशभरातून सत्याग्रही गोव्याकडे येऊ लागले. काही आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेत पोर्तुगीजांच्या पोलीस ठाण्यांवर हल्ले केले. डॉ. लोहिया यांच्या लढय़ामुळे लोकांमध्ये गोव्याच्या स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतले.
टेलो द मास्कारेन्हस
लेखक, कवी आणि पत्रकार असलेल्या टेलो द मास्कारेन्हस यांनीही गोवा मुक्तीसाठी आयुष्यभर लढा दिला. २३ मार्च १८९९ रोजी गोव्यात जन्मलेल्या मास्कारेन्हस यांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे पोर्तुगीज शासनाने त्यांना तडीपार केले. दहा वर्षांचा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगाल सरकारने सन १९७0 मध्ये सुटका केली.
मुंबईमध्ये असताना मास्कारेन्हस हे सन १९५0 ते ५९ या काळात ‘रिसर्ज गोवा’ या नावाचे वृत्तपत्र प्रसिद्ध करीत असत. पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटून परत गोव्याला आल्यानंतर त्यांनी हे वृत्तपत्र पुन्हा सुरू केले. पोर्तुगीज भाषेत त्यांनी उत्तम कविता लिहिल्या. महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचा त्यांनी पोतरुगीज भाषेत अनुवाद केला. रवींद्रनाथ टागोर यांच्या अनेक कादंबर्‍याही त्यांनी भाषांतरित केल्या. सन १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.
मोहन रानडे
मोहन रानडे हे गोवा मुक्ती संग्रामातील महत्त्वाचे नेते. ‘आझाद गोमंतक दला’चे ते प्रमुख नेते होते. प्रारंभी व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. नंतर मात्र त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. सन १९५५ मध्ये ते पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना २६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करू शकले असते; परंतु सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना पुढेही तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १४ वर्षांच्या कैदेनंतर जानेवारी १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. गोवा मुक्ती संग्रामातील अनुभवांवर रानडे यांनी ‘सतीचे वाण’ (मराठी), ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ (इंग्रजी) ही पुस्तके लिहिली असून, त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने सन १९८६ मध्ये त्यांना गोवा पुरस्काराने, तर भारत सरकारने सन २00१ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
ल्ल याशिवाय महाराष्ट्रातील समाजवादी नेते नानासाहेब गोरे, सेनापती बापट, मधु लिमये, एस. एम. जोशी, संगीतकार सुधीर फडके, सुधाताई जोशी, सिंधूताई देशपांडे, हिरवेगुरुजी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी गोवा मुक्ती संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते.
परकीय आक्रमणे
चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणेवर स्वारी करणार्‍या मलिक काफूरने गोव्यावर हल्ला केला, गोपकपट्टणचा नाश करून मंदिरे पाडली. १३२५ मध्ये मोहम्मद तुघलकाने त्याची पुनरावृत्ती केली. कदंबांची सत्ता खिळखिळी झालीच होती, त्याचा फायदा घेऊन होन्नावरच्या नवाब जमालुद्दिनने गोवा पादाक्रांत केला; परंतु याच काळात दक्षिणेस स्थापन झालेल्या विजयनगरच्या सम्राटांनी गोव्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यांनी गोव्याची भरभराट केली. यानंतर गोव्यावरील सत्तेसाठी विजयनगरचे सम्राट व बहमनी सुलतान यांच्यात संघर्ष सुरू झाला. सन १४६९ मध्ये बहमनी राज्याचा मुख्य प्रधान महमूद गावान याने गोव्यावर स्वारी करून विजयनगरची सत्ता नष्ट केली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून विजापूर येथे स्वतंत्र राज्य स्थापन करणार्‍या युसूफ आदिलशहाने गोवा आपल्या राज्याला जोडला. युसूफने जुन्या गोव्यात आपले राजवाडे बांधले.

पोर्तुगीजांचे आगमन

२२ मे १४९८ रोजी वास्को द गामा या खलाशाच्या रूपाने पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम पाय ठेवला. हिंदी महासागरातील व्यापारातून मुस्लिम राज्यकर्त्यांना हुसकावून लावण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने १६ फेब्रुवारी १५१0 रोजी गोवा हस्तगत केले. त्यात त्याला विजयनगरचा नौदलप्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. १५४२ पासून ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेव्हीअर यांनी गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील युद्धांमुळे १६0३ व १६३९ मध्ये डचांनी गोव्याची नाकेबंदी केली होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी राज्यविस्तार केला.

पोतरुगीज -भारत

‘वास्को द गामा’ने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे सन १५0५ मध्ये केरळमधील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याची पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली आणि तेव्हापासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशाला ‘पोर्तुगीज भारत’ असे म्हटले जात असे. १५१0 मध्ये पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलविण्यात आले. सन १७५२ पर्यंंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंतच्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना ‘पोर्तुगीज भारत’ ओळखले जात असे.

पोर्तुगीजांविरुद्ध उठाव

पोर्तुगीज सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले. पैकी काही स्थानिक स्वरूपाचे होते. गोवा आदिलशाहीला जोडण्यासाठी कास्त्रू या पाद्रय़ाने १६५४ मध्ये, तर १७७८ मध्ये पिंटो मंडळींनी केलेले कट यशस्वी झाले नाहीत. सत्तरी महाल पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यापासून तेथील राणे मंडळींनी पोर्तुगीजांविरुद्ध अनेकदा उठाव केले. त्यातील दीपू राणे (१८५२-५५) व दादा राणे (१८९५-९६) यांची बंडे प्रसिद्ध आहेत. पहिले बंड शेतजमिनीवर लावलेल्या करामुळे उद्भवले, तर दुसरे गोवेकर शिपायांनी आफ्रिकेत पाठविण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी होते. १८७0 मध्ये गोव्यात लष्करी बंडही झाले. १९१२ मध्ये बाळ्ळी महालातील झील सावंत व सत्तरी महालातील हिरबा राणे यांचा उठाव मोडून काढण्यासाठी आफ्रिकेतून सैन्य आणले गेले.ल्ल

अन् ठिणगी पडली..
गोवा मुक्तीसाठी १९५0 पासून संघर्ष जोर धरू लागला. १९५४ मध्ये आंदोलकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीने दादरा-नगरहवेली मुक्त केले. १५ ऑगस्ट ११५५ रोजी गोव्याला मुक्त करण्यासाठी तीन हजार सत्याग्रहींनी आंदोलन सुरू केले. या निशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगालच्या सैन्याने अमानुष गोळीबार केला. त्यात तीन सत्याग्रही मृत्युमुखी पडले. या घटनेने संपूर्ण देशभरातील वातावरण तापले. देशातील वाढत्या दबावामुळे भारताने पोर्तुगालशी राजकीय संबंध पूर्णत: तोडले; मात्र या कालावधीत पाकिस्तान पोर्तुगीजांच्या मदतीला धावला. त्यामुळे भारताच्या बहिष्काराचा पोर्तुगालवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. १९५६-५७ मध्ये जनमत चाचणी घेण्याचा पर्याय पुढे आला; मात्र तो पोर्तुगालने धुडकावून लावला. पुढील पाच वर्षे आंदोलने होत राहिली; परंतु पोर्तुगीजांनी गोव्यावरील ताबा सोडला नाही. भारत कधी ना कधी गोव्याच्या मुक्तीसाठी लष्करी कारवाई करीलच, ही बाब पोर्तुगालचे तत्कालीन पंतप्रधान अँँटोनियो द ओलिवेरा यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी सावध होत ब्राझील, इंग्लंड, अमेरिका व मॅक्सिको या देशांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे पाहून पोतरुगाल संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला. तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. अमेरिकेने आपल्या दुटप्पी भूमिकेचा तेव्हादेखील प्रत्यय आणून दिला. सुरुवातीला अमेरिकेने आपण भारतासोबत असल्याचे जाहीर केले. नंतर पोतरुगाल आणि भारत यांच्यातील मध्यस्थ म्हणून भूमिका निभावली आणि भारताच्या पोर्तुगालवरील लष्करी कारवाईनंतर याच अमेरिकेने भारताला संयुक्त राष्ट्रसंघातून बाहेर काढण्याची धमकी दिली.

Saturday, December 17, 2011

अत्तराची कुपी

`मन`ही अत्तरीची कुपी आहे. अनेक सुखद स्मृतिंच्या आठवणी अत्तराप्रमाणे सुगंध देऊन जातात.
अशा सुगंधी कुप्या आपल्या जवळ असतात म्हणूनच तर आपवे धावपळीचे,
ताणतणावाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आयुष्य सुसह्य होते.
आठवणींचा असा सुंगंधी खजिना प्रत्येकाजवळ असतो. पण तो उघडून त्याचा गंध घ्यायला
आपव्याजवळ वेळ नाही हेच खरे दुखः आहे.

Thursday, December 15, 2011

विठ्ठल नामाची आळवणी


आज विठ्ठल मंदिरात (टिळक रोड, पुणे), टाळ,मृदुंगाच्या नादात पारंपारिक भजनी ठेक्यातून
विठ्ठल नामाची आळवणी केलेली कानावर पडली.
पाय थबकले.... स्वरात कदाचित तो सुरेलपणा नसेल..पण म्हणण्यात आर्तता होती.

जागतिकीकरणाच्या रेट्यात आजही देहभान हरपवणारे भक्तिभान जपणारी ही मेडळी पाहिली की, वेगळाच आनंद मिळतो.

यातही एक वेगळेपण दिसले ते म्हणजे, भजन आपपल्या आवाजात गाणा-या सर्व स्त्रिया होत्या.
त्यांची वयेही ५०च्या पुढची..त्यातल्या दोघी तर २५-३०च्या ....
त्याही तेवढ्याच तन्मयतेने टाळांच्या नादातून भाव आपल्या सूरात आळवित होत्या..

एकूणच हा आनंद पाहण्यात माझा किती वेळ गेला यापेक्षाही ती अनुभूती मला काही सांगण्यास

भाग पाडायला उद्युक्त झाली..हेच महत्वाचे...


सुभाष इनामदार, पुणे

गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात नाही


गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..


आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला. कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.


यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.
डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`
आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.subhash inamdar, Pune
9552596276
subhashinamdar@gmail.com
---------------------------------------------------------------------------------


माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई

न संपलेले
सुकून गेली फुले तरीही
गेध त्याचा मनी दरवळावा....
संपून गेला पाऊस तरीही
ओल्या आठवणी तशाच रहाव्या...
संपून गेले चांदणे तरीही
चंद्र नभीचा मनात दिसावा...
संपून गेला सहवास तरीही
स्पर्श सुखाचा पुन्हा आठवावा...
संपून गेली वाट तरीही
थांबा क्षणाचा सुंदर वाटावा...
संपून गेले शब्द तरीही
भाव प्रेंमाचा तसाच रहावा...
संपून गेले क्षण सुखाचे, तरीही
गोडवा त्याचा कधी न व्हावा....


श्रीकांत आफळे, पुणे
०२०- २४३६७५३२
९८९०३४८८७७

Monday, December 12, 2011

अंकुर आनंदाचे

आमच्या भविष्य जाणणा-या एका मित्राची हा भावना या कवितेतून मांडत आहे....
दाद द्यावी...subhash inamdar
--------------------------------------------------------


अंकुर फुटावे एके क्षणी
आनंदाचे जीवनाला
अन् प्रवाह मिळावा
जीवन सागराला..


शब्द तेच होते कालचे
आज त्यांना अर्थ मिळाला
श्वासात त्या नवा प्राण
आणि नवा गंध मिळाला...

त्रतू आज कोणताही
वसंत वाटू लागला
जीवनाला क्षणोक्षणी
बहर येऊ लागला..


बांध मनाचा आनंदाने
भरुन वाहू लागला
चेह-यावर नवा नवा
रंग खुलू लागला...

जीवनाच्या मैफलीत
एक नवा सूर लागला
जगण्याला एक नवा
अर्थ आज लाभला....


श्रीकांत आफळे, पुणे
श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

सुचले तसे

मंडळी,
अनेक भावभावनांचे कोंब नव्याने पुन्हापुन्हा फुलतात...मी तेच साठवण्याचा प्रयत्न करतो...माझे मुक्तछंदात्मक स्वरुपात ते साठवितो...यात कोणताही आकार अभिप्रेत नाही...जे भासले..दिसले...आणि आठवावेसे वाटले तेच इथ शब्दातून व्यक्त करण्याचा हा एक अंशात्मक प्रयत्न....
मात्र ते सारे एकत्रित असावे यासाठी हा शब्दसोहळा इथे टाकत आहे..कुणाला यात स्वतः भासले तर तो यागायोग समजावा....वृत्त छंद...य़ाच्या पलिकडे जावून अनेक बंधनात मुक्त झालेली ही माझी शब्दांजली.....


सावधान असावे
व्यवधान नसावे
कार्यरत रहावे
सदैवही...

उरी शाती असावी
चित्त स्थिर राखावे
एकचित्त व्हावे
सदोदित...

विचार ऐसा ठेवावा
आचारही उत्तम राखावा
किमया नावाची उरावी
जगामध्ये.....

मैत्र अवघ जोडावे
स्वत्व तेही राखावे
बंधनात रहावे
कधीतरी....

अंती सुखाची आस
परमेशाचा ध्यास
चिंतनशील रहावे
क्षणोक्षणी.....


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
9552596276
---------------------------------------------


तू दिलेला स्पर्श
आठवतो या क्षणी
आवरोनी मी मला
हरवतो या क्षणी
घेतलेला वसा मनीचा
ना कधी विसरणार
दिलेले वचन तुला
अखेरपर्य़ंत पाळणार
---------------------------------
विरले धागे
वस्त्रही उरले
ठिगळ दिसे
फसले सुटले
कधी कुणासाठी
झुरलो नाही
कधी कुणाचा
उरलो नाही
कधी विसावलो
कधी नादावलो
आकंठ बुडालो
तुझ्यामनी
-------------------------------------------
माझे जगणे कुणासाठी
स्वतःच्या मनासाठी
माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या त्या साठी
माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदरते साठी
माझे हसणे कुणासाठी
आनंद घेणा-या त्या साठी
माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी
माझे मी पण कुणासाठी
तुझ्यातल्या हरवलेल्या त्या साठी
-------------------------------------------
दिसताना तु किती साधी वाटते
अनुभवताना तूला
आदरयुक्त भिती वाटते
-----------------------------
आयुष्य ओघळताना
जुनेच क्षण आठवतात
नात्याचे धागे गुंफताना
विषण्णता पसरवतात
---------------------
अक्षदा पडतात पडदा दूर होतो
समोर एक सुंदर चेहरा येतो
मेकपने लगडलेला सुंदर आभास होतो
....कुठून काहीसे भासमय सत्त्यात येते
सकाळचे वास्तव आत्ता कुठे हातात येते
शब्द संपतात ओठ रंगतात
चेह-यावरचे मार्दव लाजून दुर होते
शरीरात हुरुप येतो सहवासाची ओढ लागते
एकमेकांच्या कुशीत शातपणे विसावते

आरंभ होतो...तसा शेवटही होतो
एकमेकांसाठी जगण्याचा अध्याय सुरु होतो
----------------------------------------

मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
गुंतून तुझ्यात
मी माझा कधीच उरत नाही
----------------------------
सांधलेले क्षण
पुन्हा दरवळतात
जडावलेले ओझे
तसेच शुन्य भासतात
------------------------------------

कुंतल काळे मऊ मुलायम
कळी गुलाबी खुलली गं
-हदयी उठली एक शिरशिरी
कळले तुजला उमजेल गं
शरीरी माझ्या उठे कंपना
अशी भरारी घ्यावी गं
अलगद वाटे तुझ्या जवळी
बिलगुनी घ्यावे तुजला गं
एक अनामिक ओढ लागली
कधी तू मजला दिसली गं
भेटीमधले क्षण रुपेरी
मनी माझीया रुतले गं
जावे हरवूनी अलगद वाटे
हात हाती पकडला गं
हेच उरे मनी स्वप्न माझे
मिठीत तुझीया जावे गं
---------------------------------------------

भेटलेल्या प्रत्येक क्षणाची
पुनरावृत्ती नसते
एक क्षण कधीही
दुस-या क्षणासारखा नसतो
------------------------------------

काल तू भेटलीस
मी तुला यापूर्वीही पाहिले
कालची तू ती नव्हतीस
तजेलदारपणा, तडफ
निराळीच होती
एका बाजूला तो तू निवडलेला
दुसरीकडे तो तू निर्माण केलेला
दोघांचा प्रभाव तुझ्यावर..
अलगद..पण स्पष्ट पडलेला
आता सारे नागचे विसरायचे
नव्याने आयुष्याला सामोरे जायचे
भरारी घ्यायची गरुडासारखी
बघ माझी आठवण येते काय....
--------------------------------------------

Monday, December 5, 2011

आनंदपंढरीचा विठ्ठल


भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.


आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.

आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.

`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच क्षीचरणी प्रार्थना...

साश्रुनयनांनी....

आपले पुणेकर रसिक.शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464

सहज भेटलेलं ते फुल


अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..

स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...

सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..

भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.

तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, December 4, 2011

माझे `मी` पण


माझे जगणे कुणासाठी
स्वताः.च्या मनासाठी

माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या `मी`साठी

माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदर `त्या`साठी

माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी

माझे `मी` पण कुणासाठी
तुझ्यातल्या `त्या`साठी

आज प्रत्येक जण काही खास कारणाने सतत धडपड करत असतो..कारण काय?..कुणासाठी...मला सहज सुचलेल्या ह्या ओळी...पहा..तुमच्याही भावना कदाचित याच असतील...


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, November 20, 2011

पैसा हाच प्रमाण -गिरीश कुलकर्णीगिरीश कुलकर्णी उवाच्

अक्षराधार आयोजित माय मराठीच्या ४२१व्या ग्रमथप्रदर्शनाचा समारोप प्रसंगी वळ, गाभ्रिचा पाउस, विहिर आणि देऊळ चे लेखक आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी मुक्तसंवाद केला.त्यावेळी त्यांनी मांडलेले विचार..त्याच्याच शब्दात देंण्याचा हा प्रयत्न...


शालेय शिक्षणात साहित्याची आवड जोपासली गेली. साहित्य हा कलेचा गाभा आहे..तिथेच वाचनाचा छंद लागतो. प्रत्येकाने तो जोपासावा..नविन मराठी शाळा आणि नंतर न्य इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे इथेच तो ध्यास जडला.भेट या जी ए कुलकर्णी यांच्या पुस्तकाने ते शब्दांचे गारुड मनात भरुन सोडले.
वाचताना त्या पात्रांच्या ऐवजी मला माणसे दीसू लागतात..आणि शब्दांमधला आस दिसतो..तो जाणून घेण्याचा विचार चालू होतो... तिच सवय आजही आहे.

अजूनही बाबुजींची गाणी, जुने संगीत, जुने लेखक, जुन्या कविता, तेच जुने पुढारी, सारेच तेच तसेच चालत आहे आहे...त्यांचा ठसा आजही कायम आहे...पूर्वसूरींच्या जीवावर किती काळ जगणार...जरा स्वतःचे नवे तयार करा..
तुमचे गाणं, नवे लेखन, नव्या कविता...आजच्या तपरुणांना जे आपल्याला भावेत ते व्यक्त होणं आवश्यक आहे. याची नितांत गरज आहे.. माझा अन्वयार्थ मी लावणार,,,तसा मी लेखनात लावतो..देऊळमध्ये तेच केले आहे..माझ्या भावना व्यक्त केल्यात...

आज शहरात एकसुरीपणा वाढलाय...त्यात भावना, निसर्ग काहीच शिल्लक खेड्यात आजही माणसं आठवतात..दिसतात ती त्यांच्या निसर्गाच्या परिस्थितीसकट...तेच अधिक भावते.त्यांच्या व्यक्त होण्यात प्रांजळपणा, मोकळेपणा आहे. खरं जगणं. ती मंडळी जगताहेत.. मला ती अधिक जवळची वाटतात...आजही माझे मन मुंबईंच्या शहरी जीवनात रमत नाही...तिथे स्वतः हरविला जातो....काम आटोपून केव्हा एकदा पुण्यात येईन असे होते.

टीव्हीवर दिसणारे सारे कार्यक्रम मालिका टुकार आणि पांचट आहेत. टीआरपी मीळविणारे कार्यक्रम भुक्कड आहेत.
कृतिप्रवण होणे ही आज काळाची गरज आहे...पैशावर नातेसंबंध जपले जात आहेत..त्यात खोटेपणा आलाय...पैसा हाच प्रमाण बनलाय...

( हे अपूर्ण आहे...)

Saturday, November 19, 2011

चारोळ्यांनी पुन्हा केले घायाळ..
`माझे शब्द`च्या निमित्ताने चारोळीकार चंद्रशेखर गोखल्यांनी केला रसिकांशी मनमोकळा संवाद

`मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
ऐकताना गुंतून तुझ्यात
माझा कधीच उरत नाही`

अक्षरधाराच्या ४२१ व्या माय मराठी शब्दोत्सवात चंद्रशेखर गोखले आले..बोलले..आणि आपल्या अर्थपूर्ण गप्पातून आणि सादर केलेल्या भावस्पर्शी चारोळ्यातून चटका लावून गेले...

शनिवारची संध्याकाळ ..१९ नोव्हेंबर २०११.. अकरा वर्षांनी जाहिर कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांसमोर आले ते पुण्यातल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने.
पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणा-याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत

या सहज सुचलेल्या पहिल्या चारोळीच्या अनुभवविश्वात नेवून इथं चंद्रशेखर गोखल्यांनी आपण अनुभवेलला अद्ष्य झालेला काळ पुन्हा दृष्य केला..आपल्या तेवढ्याच भावूक शब्दांतून..

आयुष्य जगताना येणा-या विरोधाभासातून या सहज सुचलेल्या चारोळ्यांनी त्यांच्या आयुष्याच जे परिवर्तन घडविले..विशेषतः `प्रिया तेंडूवकरांनी आपल्या पिशवी तपासताना माझा कवितेची वही उलगडून पाहिली आणि ती वाचतच गेली. तिने भराभर फोन केले...आणि लोकसत्ताच्या कार्यालयात माधव गडकरी यांनी आपल्या सर्व सहका-यांना केबीनमध्ये बोलावून जेव्हा या चारोळ्यांचे वाचन केले तेव्हा..आणि लौकप्रभेत ह.मो. मराठे संपादक असताना चारोळ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिध्द केले तेव्हा झालेला बदल`....ते आनंदाश्रुंच्या मदतीने सांगत गेले आणि रसिक टाळ्यांनी त्याला दाद देत गेले..

शाळेत शिक्षक हुशार मुलाला पुढे बसवितात..त्यांना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची पार्सलिटी करतात....मात्र अभ्यासात कच्च्या असलेल्य़ा माझ्यासारख्या मुलाला वर्गात मागच्या बाकावर बसवू काय बैलोबा..म्हणत..जेव्हा विचारतात..तेव्हा त्यावेळी येणारे नैराश्य..कधी कधी अनेकांच्या जिव्हारी लागते...मला ही ते बोचायचे...म्हणूनच उपस्थितातल्या शिक्षकांनी त्यांनी विनंती केली की, हुशार नसलेल्या मुलातही काही चांगले गुण असतात त्यांना सारखे हिणवू नका...त्यांनाही माणूस म्हणून वागविण्याचे आवाहन केले.

`संघर्ष, कष्ट आणि आयुष्यात नोकरी करायची नाही..या लिखणावर जगायचे ठरविले..आजपर्यंत तेच केले..मात्र ज्यांनी सतत अवहेलना केली त्यांच्या शेजारी मान्यवर म्हणून बसायचा मान मिळतो..तेव्हा..माझे मलाच आश्चर्य वाटते.. आणि असे वाटते ...त्यांनी त्यावेळी आपल्याला योग्य प्रोत्साहन दिले असते तर अधिक कांही माझ्याहातून घडले असते असे वाटते...` ;गोखले सांगत गेले.

आपल्याला इंग्रजी जमत नाही.. आणि तरीही माझे अजूनही कधी अडले नाही...मी नापास झालो..तरीही भावना व्यक्त करण्यात कमी पडत नाही...हुशारात गणला गेलो नाही....तरीही कलेतल्या मान्यवरांचे आशिर्वाद....क्वचित त्यांनी माझ्या सह्या घेतल्या.... सारेच ते बोलत असताना..

मधुनच..एखादी चारोळी सांगतात आणि त्यापाठीमगचे घटना ऐकवतात तेव्हा तर हे यांना कसे सुचते असेच जाणवत रहाते..
अंधेरीला माईकडे रहायलो गेलो..पण आई-वडिल पार्ल्यांला...एके दिवशी माझी पावले सहजपणे जुन्याच पार्ल्याच्या घराकडे वळली..गोखलेच्या घरात सगळे दिवे सुरु होते.. तेव्हा ध्यानात आले..मी चुकीनं इथं आलो..मी माईकडे अंधरीला रहातो...दारातच पावलं थबकली आणि चालतो झालो...आणि ओळी आल्या

प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रतेकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी


आपल्या मित्र नव्हते..आणि फारसे नाहीतच...म्हणून आयुष्यभर मी शब्दांशीच बोललो..आणि लेखनाचे व्यसन लागलं...
घरात पालक सांगतात..मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं रहावं...मुलीला म्हणतात..काय नाचायचं ते त्या घरी जावून नाच... चेद्रशेखर गोशले यांना या वाक्यांचा तिटकारा आहे..ते सांगतात... पालकहो..मुलाच्या पायात बळ देण्याचे सोडून त्याला स्वतंत्रपण सोडून देणं किती बरोबर...मुलीलाही फुलायचे ..उमलायचे..बहरायचे नाचायचे..ते माहेरी..तिला स्वतः अस्तित्व ..जग मिळायला पालकांनीच मदत केली पाहिचे..जग पाहण्याचे आणि अनुभवण्याचे बळ त्यानीच दिलं पाहिजे....
१८ एप्रिल १९९० ला माईंच्या आर्थिक बळावर `मी माझा` पहिले पुस्तक प्रकाशित झालं...मग मात्र आपण मागे वळून पाहिले नाही...

तसा मी लाजरा, बुजरा...इथंही येण्याबूर्वी आपण बोलू शकू की नाही..अशी भिती मनात होती...
मात्र असे म्हणतानाच स्वतःचे आयुष्य उसवत ते मागे मागे..काय घडलं..माणसं कशी भेटली...एका स्टुडिओच्या लिफ्टपाशी माझ्या देवता असलेल्या आशा भोसले यांनी माझ्या समोरचर `मी माझे` पुस्तक पुढे करुन यावर `सही कर` म्हणून दरडावले..तो क्षण आपण आयुष्यात विसरु शकणार नाही..असेच कांही सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे आज वयाची पन्नास वर्ष पूर्ण करताना ( ८ जानेवारी २०११) पाणावताना पाहिले..की आपणही हळवे बनतो...
त्यांचे एकच सांगणे होते माणसाला माणूस म्हणून समजावून घ्या...त्याच्यात लपलेल्या गुणांना शोधा..त्याला प्रोत्साहन द्या....

ही संध्याकाळ बोलती करणारे आमचे मित्र संजय बेंद्रे यांनीही `तू नसतास आलास तर चालले असते... कारण तूझ्या जाण्याचे दुःख अधिक होते...असे सांगून हूरहूर व्यक्त केली.


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, November 13, 2011

समाजासाठी एक वस्तुपाठ-कलागौरव पुरस्कार


मुलाच्या स्मृतिसाठी ...कलावंतांना पुरस्कार
अनंतरंग आर्ट फौंडेशनचे कला गौरव पुरस्कार आणि त्यामागची भूमिका


रविवारी १३ नोव्हेबरला पुण्यात भारत गायन समाजात असंख्य संगीत श्रोत्यांच्या साक्षीने बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते समारंभपूर्वक कलागौरव पुरस्कार श्रीपाद भावे आणि सौ. अस्विनी गोखले यांना तो दिला गेला.
प्रथम तो ३०० रुपयांचा. मग ५०० आणि नंतर ७५० रुपयांचा झाला. आणि गेली काही वर्षे तो १००१ रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन वितरीत केला जातो. त्यासाठी काही लोक स्वेच्छेने पैसे देतात..पण न मागता...पण त्यासाठी स्वबळावर तो देण्याची परंपरा भिड़े कुटुंबीय जपत आहे.

या `अनंतरंग आर्ट फौंडेशनचे` कार्यवाह चित्रगुप्त भिड़े सांगतात... पुरस्कारासाठी आम्हीच नावे ठरवितो. काहींचा सल्लाही घेतो. आत्तापर्यं दिल्या गेलेल्या पुरस्कारात मधुवंती दांडेकर, विजय कोपरकर, कै. शरद गोखले, मुकुंदराज गोडबोले, रविंद्र कुलकर्णी, प्रभाकर करंदीकर, अश्विनी भिडे, सानिया पाटणकर, संजीव मेहेंदळे, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे, आनंद भाटे, राजीव परांजपे, सुचेता अवचट, संपदा थिटे ,उदयन् काळे, मानसी खांडेकर, बिल्वा द्रविड अशा अनेक गायक-वादकांचा समावेश आहे.

अनंत भिडे. हे ज्येष्ठ चित्रकला शिक्षक. अनंतरंग आर्ट फौंडेशन यानावानं ते वयाच्या ७७व्या वर्षी आपली कला जपत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होत असतात. आपल्या मिळालेल्या कमाईतला काही वाटा ते आवर्जुन समाजोपयोगी कार्यासाठी दरवर्षी वापरतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या श्री नृसिंह मंदिरात ते गेली दहा वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला ३०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करतात. यंदा तर त्यांनी पितळी निरांजने विकत घेऊन त्या १५० कायमस्वरुपी प्रकाशांनी मंदिर उजळून निघाले होते.

त्यांचा तिसरा मुलगा जन्मापासूनच मेंदुच्या पक्षघाताने आजारी असायचा. त्याला कुठलाही उपचार नाही. तो उठून बसणेही शक्य नाही. हाताच्या आधाराने बसायचा. मोजकेच अन्न भरवायचे. आई, बाबा, काका आणि आमा एवढेच चार शब्द तो उच्चारु शकायचा. सर्व उपचारानंतर तो जन्मभर तसाच रहाणार. उठणे आणि चालणे शक्य नाही. कधी झटका येईल याची खात्री नाही. त्याही अवस्थेत अनंतराव भिडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली रोजची कामे , नोकरी सांभाळून या मुलाला..त्याचे नाव विश्वजित ...सांभाळले. अगदी २२ वर्षे. बुध्दीत वाढ होणार नाही..म्हणून शाळेत नाव नाही.. केवळ जन्म दाखला..एवढेच... त्या काळात दोघांनी आणि घरातल्या दोन्ही मुलांनी या `विश्वजीत`ला जपले. पेरुगेट भावे हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षकाचे काम ध्यासाने केले. विश्वजीतच्या काळात..कुठे सभा-समारंभात जाणे नाही... नाटक, सिनेमा पहायचा नाही. सारा वेळ मुलाच्या पालनपोषणात...घालविला...

विश्वजीतला बोलता..येत नव्हते..मात्र.. क्रिकेटचे वेड अफाट..टीव्हीवरची सगळी मॅच तो पहायाचा..मात्र लंच झाला की तो संतापायचा...भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत त्याला फार प्रिय होते. गाणे बंद झाले की तो अस्वस्थ असायचा..ते संपण्याआधी ते वडिलांना खुणेने सांगायचा..


आयुष्यातली २३ वर्षे..जपल्यानंतर तो १९९७ साली गेला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही..गेल्यानंतर महिन्याभराने अनंत भिडे यांच्यासमोर हजर झाला आणि मी दुस-यांकडे उत्तम असल्याचा साक्षात दृष्टांत दिला. भावाला `तुम्ही समारंभाला जाता पण माझे पोटाचे काय? `, असे स्वप्नात विचारले..त्यानंतर रोज सकाळी त्याला वरणःभाताचा नैवैद्य दाखवून मगच आम्ही जेवतो...अनंतराव भिडे सांगत होते..

तो तसा मासाचा गोळाच जणू..पण आमच्याकडे जन्माला आला हे भाग्य..आमच्याकडून सेवा व्हायची होती..म्हणून...त्यांचे नाव कुठेच नाही..केवळ जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यापुरते उरले..त्याचे अस्तित्व आणि नाव जागविण्यासाठी त्याला आवडत असलेल्या संगीतात काम करणा-या कलावंतांना गेली १३ वर्षे त्याच्या नावे पुरस्कार देण्य़ाचे व्रत हे कुटुंबीय करतात. स्वतःच्या पैशातून..हे कायम रहावे यासाठी एक लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी दोन कलाकारांना कलागौरव पुरस्कार दिला जातो.

आपल्याकडून समाजासाठी काही करावे यातूनच हा एक वस्तुपाठ अनंत भिडे आणि त्यांचे कुटुंबीय जपत आहेत. आपल्या मुलाचे हाल तर पाहिले..सोसले...त्याला बळ दिले..जगायला दोन हात दिले...आणि तो गेल्यावर त्याचे नाव अशा त-हेने पुरस्कार देऊन समाजासमोर ठेवले..

हा एक आदर्शच आहे..त्यासाठी यात राबणा-या सा-याच हातांचे आभार....सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276

Wednesday, November 9, 2011

“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी”
“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” याची पहिली प्रत माझ्या हातात पडली आणि गेले काही दिवस हे लेखांचे संकलन झपाटल्यासारखे वाचून काढले. जयवंत दळवी, अरूण टिकेकर, श्री. पु. भागवत, वसंत बापट, शांताबाई शेळके, भारतरत्न भीमसेन जोशी किती म्हणून नावे घ्यायची? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व विंदा तर समीक्षानिपुण नाडकर्णी व कुळकर्णी अशा अनेक मनसबदारांची ही मांदियाळी आहे.

पु.लं.च्या पुस्तकांशी माझे नाते मॉडर्न हायस्कूलच्या खाकी हाफ पॅंटमध्ये असताना गुंफले गेले आहे. कोकणची पहिली ओळख अंतू बर्वेतून मला झाली. चितळे मास्तरांसारखे शिकवण्याचे वेड असणारे मास्तर आमच्याही शालेय जीवनात आम्हाला लाभलेले आहेत. टापटीप आणि मुंबईची शान म्हणजे काय मला नंदा प्रधानमुळे समजले. सोकाजी त्रिलोकीकर “ ए साला, कोचरेकर तू तो एकदम इडियट आहे रे”. यांच्यातून मला पारसी समाजाची पडछाया जाणवली .

बबडू व मुंबईंचे नाके यांचे अतूट नाते समीकरण पुण्यात राहून मला पु. लं. मुळे समजले. पुलंनी आमचे बालपण ख-या अर्थाने श्रीमंत केले.

मला माझे पुण्यातले लहानपण आठवते. त्या वेगवेगळ्या आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा, रानडे वक्तृत्वस्पर्धा, नगरची हिवाळे स्पर्धा अशा विविध भाषणबाजीच्या व्यासपीठावरुन पुलंच्या व तात्कालीन साहित्यिकांच्या दाखल्यामधून आम्ही मुलांनी वक्तृत्वाची मूळाक्षरे गिरवली आहेत. पण प्रतिभावान लेखक, भावनासमृध्द कवी अशा छापील खिळ्यांमधून व ठश्यांमधून पुलंची मुद्रित ओळख होऊच शकत नाही.

ते रंगमंचावर आले व नुसते उभे जरी राहिले तरी हास्याची लकेर पसरत असे. का कोण जाणे मला तर ते साक्षात श्री गणेशाचे रुपच दिसत असे.थोडेसे पुढे आलेले सशासारखे दोन दात, लुकलुकणारे बुध्दिमान असे डोळे. हे पाहिल्यावर हा माणूस जीवनाकडे व चराचर जीवांच्या अस्तित्वाकडे किती विलक्षण दृष्टीने पाहात होता याची साक्ष पटते. नेमकी शब्दयोजना, तीही नेमक्या वेळेस करणे हे कुशल लेखकाचे प्रमुख असे अस्त्र आहे. पु.लंचा भाता अशा अनेक दिव्य अस्त्रांनी सदा संपन्न होता. चितळे मास्तरांच्या आर्थिक विपन्नवस्थेचे वर्णन करताना, “ मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोत्ये पडली नाहीत, पण डोळ्यात पडली”,..पुल सहज लिहून जात.

पुलंचे लिखाण ६०-८०च्या दशकांत घरा-घरात नव्हे तर मराठी मना-मनात पोहोचले याला कारण त्याची बैठक सच्चा, मध्यमवर्गातील जीवनमूल्यांवर आधारलेली होती. फ्लॅट सांस्कृतीचा उदय होत होता आणि मानवी वस्तीचा भूगोल जरी अपार्टमेंटमध्ये बंदिस्त होत असला तरी माणुसकीच्या मनाचा इतिहास मात्र चाळीतच अडकला होता. ते प्रेम, सौदार्ह, बंधुभाव पुलंनी अजरामर केले.

त्यांचा विनोद मर्मबध्द असायचा. त्या केवळ शाब्दिक कोट्या नव्हत्या. आजच्या दूरदर्शनवरच्या विनोदाचे दुर्दैवी दशावतार त्यांच्या साहित्यात कधीच दिसले नाहीत. त्या विनोदाला कारुण्याची झालर होती, उच्छृंखलतेची झूल पुलंनी कधीच पांघरली नाही.. काव्य, रसग्रहण, नाटक, चरित्र, व्यकितचित्रण... पारिजातकाचा सडा पडावा अन् नेमके कुठले फूल उचलावे याचा संभ्रम पडावा अशी अवस्था होती. पुणे-ते-मुंबई यापलिकडे जग न पाहिलेल्या आमच्या विश्वाला पुलंमुळे लंडन कळाले. अपूर्वाई, पूर्वरंग, निळाई या सा-या निर्मितींनी आम्हाला परदेशाची चटक लावली.

त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी त्यांना एक पत्र पाठविले होते. कालांतराने त्या पत्राचे टंकलिखित पोस्टकार्ड रुपाने उत्तर प्राप्त झाले. पत्राच्या अखेरीस पुलंनी स्वतःच्या हस्ताक्षरात “ उत्तम डॉक्टर हो हीच श्रीचरणी प्रार्थना”, असा आशिर्वाद दिला होता. गेल्या २५ वर्षात मुंबईत सार्वजनिक रुग्णसेवेतर्फे जे काही कमावले त्याच्या मूळाशी पुलंचा हा आशिर्वादच आहे अशी माझी श्रध्दा आहे.

देवाघरच्या या दूताने दोन्ही हातानी मराठी शारदेच्या ओंजळीत मौक्तिकमणी घातले. “घेता किती घेशील दोन कराने” अशी आम्हा वाचकांची अवस्था करणारा हा अवलिया साहित्य दरबारातला सम्राट होता.

परचुरे प्रराशनाने संकलित व संपादित केलेल्या या पुस्तकामुळे आम्हाला केवळ पुलच नव्हे तर, आज हयात नसलेले अनेक श्रेष्ठ नाटककार, लेखक, कवी भेटले व खरोखर “तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” ही श्री चरणी प्रार्थना करावी असे मनापासून वाटते.

जोपर्यंत मराठी घरात मराठी वाचले जाते, संग्रह केला जातो, तोपर्यंत “ पु.ल. एक साठवण “ नंतर एक दुसरीही आठवण म्हणून हे पुस्तक संग्रही असणे आवश्यक आहे.डॉ. संजय ओक
Dr Sanjay Oak
Director, KEM Hospital Mumbai
(“मला काही सांगायचय्” चे लेखक)


पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुण्यात परचुरे प्रकाशनने ८ नोव्हेंबर २०११ ला समारंभपूर्क तीन पुस्तकांची प्रकाशने कवीवर्य मंगेश पांडगावकरांच्या हस्ते केली. त्यात मला काही सांगायचय या पुस्तकाताही समावेश होता. या निमित्ताने डॉ. संजय ओक यांनी केलेल्या भाषणातील मनोगतातून..साभार...

Saturday, November 5, 2011

राजनभैय्या ६०
`गुरुकी कृपासे शब्द आ रहे है, तो वो उन्हीको अर्पित करना चाहिए`- या भावनेनं, स्वतः तरुणवयात रचलेल्या बंदिशींमध्ये आपले गुरू गायनाचार्य पं. बडे रामदासजी यांचे नाव गुंफणारे...पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांनी २८ आक्टोबरला एकसष्ट वर्षात पदार्पण केले.. या निमित्त रविवारी पुण्यात त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने जाहिर सत्कार समारंभ झाला...त्यानिमित्ताने लेख..


अमानतअलि-फतेअलि, सलामत-नजाकतअलि, लताफत-शराफत हुसेन अशा सहगायकांच्या नामांकित व्दयी शास्त्रीय संगीतात होऊन गेल्या. एकेकाळी बनारस घराण्यातही अमरनाथ-पशुपतीनाथ ही व्दयी सहगायनासाठी प्रसिध्द होती. नंतरच्या काळात बनारस घराण्यानं ठुमरी- कजरीचं गाणं इतकं समृध्द केलं की त्या घराण्याची ख्याल गायनाची महान परंपरा कमी होते आहे की काय असं वाटू लागलं. त्याचवेळी पं. राजन व पं. साजन मिश्रा या बंधुव्दयानं ती महान गायकी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आणि सर्वार्थानं ती पुढं नेली. मातृ-पितृ दोन्हीही घराण्याच्या रक्तातून आलेला संगीताचा वारसा त्यांना दुसरं काही करुन देणारच नव्हता.

पं. सामताप्रसाद, पं. किशनमहाराजजी, आजोबा बडे रामदासजी, काका सारंगीस्रमाट पं, गोपाल मिश्रा, वडिल पं. हुनुमानप्रसाद मिश्रा अशा थोर गुरूंकडून राजन-साजन या बंधुंकडे संगीत विद्या आली आणि कठोर लगन आणि मेहनतीनं त्यांनी ती आत्मसात केली.

भारतरत्न पं. भीमसेनजींना पं. गोपाल मिश्रा सारंगीची साथ करीत. भीमसेनजींचा मुक्कामही बनारसला त्यांचेच घरी असायचा. त्याचवेळी गुरुंच्या सेवेप्रमाणे राजनभैय्या भीमसेनजींची सेवा करीत..अगदी पाय चेपून देण्यापर्यंत... साधारण १९७५ साली भीमसेनजींनी रेडिओवर मिश्राबंधुंचं गाणं ऐकलं आणि पं. गिरिजादेवींकडे ही कोण मुलं गाताहेत याची चौकशी केली. ते दोघे पं. गोपाल मिश्रांचे पुतणेच आहेत हे कळल्यावर त्याच वर्षी पुण्याच्या `सवाई-गंधर्व महोत्सवात` राजन-साजन मिश्रांचे सहगायन ठेवलं. त्यावेळी स्वतः भीमसेनजींनी मागे बसून तानपुरे जुळवून दिले....ही घटना सांगताना दोन्ही भावांचे डोळे पाणावले नवाहीत तरच नवल. पुढे या व्दयींचं गाणे पुण्यात असल्यावर काळी दोनची तानपु-याची जोडी भीमसेनजींकडून जात असे.

राजन-साजन मित्र परिवारात अफाट आणि समाजाच्या सगळ्या थरातील व्यक्ति आहेत....आमचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या उमद्या स्वभावामुळे...त्याचं मैत्रीत कधी रुपांतर झालं व त्यांच्यामधल्या पद्मभूषण. पंडित अशा अनेक बिरुदावल्यांचा दबदबा कधी गळून पडला हे कळलचं नाही. आमच्यासाठी ते फक्त राजनभैय्या- साजनभैय्या होऊन गेले.
गेल्या सवाई-गंधर्व महोत्सवात,,रिहर्सलमध्ये पं. राजन-साजन बिभासचे स्वर आळवीत असताना, एक बाई बरीच मिनतवारी करून आत आल्या व त्यांनी पंडितजींना ..` मी इंदौरहून मुद्दाम आले आहे. २५ वर्षापूर्वी इंदौरला ऐकलेला तोडी परत ऐकण्याची इच्छा आहे`, अशी विनंती केली. त्यांच्या रसिकतेचा मान ठेबून दोघांनी ऐनवेळी अप्रतिम असा गुजरी तोडी सादर केला.

गेल्याच वर्षी कोल्हापूरला देवल क्लबच्या `अल्लादियॉ` संगीत महोत्सवात` राजन-साजनजींचं गाणं होतं. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ११ ला पोचणारी फ्लाईट संध्याकाळी साडेपाचला आली. माझ्या गाडीतून आम्ही तडक कोल्हापूरला निघालो. तरी पोचायला ९ वाजले. तोपर्यंत सोलो तबलावादन करुन अरविंदकुमार आझादजी यांनी खिंड लढविली होती. पण १० वाजता कार्यक्रम बंद करण्याचा निर्बंध असल्यामुळे रसिकांची निराशा होणार होती. राजन-साजन भैय्यांनी स्वरमंचावर जावून उशीर झाल्याबद्दल संयोजक व रसिकांची माफी मागितली आणि दुस-या दिवशी संपूर्ण वेळ कार्यक्रम करण्याचं कबूल केलं. दुस-या दिवशी त्यांनी सादर केलेल्या `जोगकंस`ने तुडूंब भरलेल्या श्रोतृवर्गाचे डोळे वारंवार पाणावत होते. आजही रसिक त्या मैफलीची आठवण काढतात.

राजन-साजन हे पराकोटीचे अव्दैत आहे हे त्यांचं गाणं ऐकताना तर जाणवतंच पण त्यांच्याबरोबरच्या प्रवासात, गप्पांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. कोणतीही गहन चर्चा असो की विनोद ही बंधुव्दयी त्यात रंगून जाते आणि तीही मैफल रंगवून टाकते. `सूरसंगम`या चित्रपटासाठी `धन्य भाग्य सेवा का अवसर पाया` हे गाणं फक्त राजनभैय्यांना गायलं आहे..श्रेयनामावलीत आग्रहानं राजन-साजन मिश्रा असं नमूद करण्यास भागं पाडलं आहे..हेच ते अव्दैत.

गेली ५० वर्ष हे बंधू सहगायनच करत आहेत. अनेकदा मनात योजलेला राग बाजूला ठेऊन रसिकांनी फर्माईश केलेला राग ते गातात आणि..” आम्ही गात नाही तर आमचे गुरुजन व ईश्वर आमचा माध्यम म्हणून वापर करुन तो राग प्रगट करतात”..असं विनण्रतेनं सांगतात. गुरुकृपेमुळं राजनभैय्यांचे सुपूत्र रितेश व रजनीश हेही सहगायन करत आहेत.
अजूनही एकत्र कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवून, मुलांबाळांसह सर्व कुटुंब बनारसला एकत्र नांदते आहे. यात त्यांच्या पत्नींचीही त्यांना मोलाची साथ आहे. अजूनही आमची चूल एकत्रच आहे हे दोघेही अभिमानाने सांगतात.
संगीताप्रमाणे इतर बाबतीतही राजनभैय्या अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या खेळांच्या आवडीप्रमाणे ( कॉलेजमध्ये ते क्रिकेटचे कप्तान होते ) जंगलात-निसर्गात मनमुराद भटकण्याची त्यांना आवड आहे. त्याविषयाचेही ज्ञान आहे. ओशांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन मकरंद ब्रम्हे यांनी या बंधूंच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारित `अव्दैत- संगीत` ह्या ९० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या डॉक्युमेंटरी भागाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे.

एकमेकांच्या घराण्याविषटी अत्यंत आदर बाळगणारे असे महान कलाकार पाहिले की, जाणवतं की विविध घराणी- विविध गायवप्रकार असोत पण त्यांना बांधून ठेवणारं भारतीय संगीत हेच मूळात एक `अव्दैत` आहे.
राजनभैय्या!( आणि साजनभैय्याही) तुमच्याकडून ही संगीतसेवा अशीच वर्षानुवर्षे घडत राहो...अनेक उत्तमोत्तम शिष्यही त्यातून तयार होवोत..आणि तुमच्यातले हे संगीत अव्दैत अखेरपर्यत अखंड राहो..हिच इच्छा.....-विजय मागिकर, पुणे
मोबा- ०९४२३५७७७५३

दोन मने


कोणच्याही क्षणी मन मनाशी दोन संवाद करत असते. एक होकारार्थी आणि दुसरं अर्थाचत नकारार्थी.
तुम्ही कुठेही निघालात तरी ते याच विचाराने काहूर माजते. मात्र ते तुमच्या संवंदनाना जोपर्यंत पूर्ण जागे करत नाही तोपर्यंत त्याची जाणीव नेणतेपणी होत नाही. ती संभ्रमावस्था असते. पण एकदा का निर्णय घेतला मग ती निर्णयअवस्था सतत टोचत ठेवते.
म्हणूनच कांही माणसांचा निर्णय झटकनं होत नाही. मात्र निर्णय. हा एकदाच घ्यायचा असल्यामुळे तो घेतल्यावर त्यात नंतर मात्र ते बदल करत नाहीत.
प्रत्येक जणच आयुष्यात अवेक वेळा नव्हे क्षणोक्षणी निर्णयप्रक्रीयेत अडकत असतो. जसे आपण म्हणतो, बोलण्यापूर्वी विचार करा. अगदी दहा वेळा. पण एकदा शब्द तोंडातून निघाला की मग ‘ जिथून तो जातो तिथे त्याची खूण उरत नाही. पण जिथे जावून पोचतो तिथे मात्र जखम होते.”
साधे प्रवासाचे उदाहरण घेऊ. बराच वेळ तुमच्या शेजारी अनोळखी माणूस बसलाय. दोघेही अबोल. मनाने निर्णय घेतला की त्याला नाव तर विचार.
काय हो, तुमचे नाव काय?
का. तुम्हाला काय करायचयं?
पलिकडून उत्तर आलं.
तर तुम्हा केवळ `सॉरी` म्हणून शांत बसता. पण मन तुमच्या निर्णयाला आव्हान देत रहाते. ते डिवचत असते. कशाला गेलास त्याच्या वाटेला ? काही गरज होती. शात बसून राहिला असतास कर काय झाले असते. घेतलास ना हात दाखवून अवलक्षण करून. नाहीतरी खोडच आहे तुझी जुनी...नको तिथे डिवचायला जातोस आणि मला मात्र निराश करतोस.
एखाद्याचा चेहरा पाहूनच समजते की याच्याशी नको बोलायला.
हे ठरविणारे तुम्ही नसता. नकळत तुमचे मनच तुम्हाला अनाहूत सल्ला देत असते...अगदी क्षणोक्षणी!
मुळातच मोठ्या निर्णयाच्या वेळी तुम्ही मनाचे ऐकण्यापूर्वी किंवा त्याचा निर्णय होण्यापूर्वीच अनेकांशी संवाद साधता.
`त्या` घटनेमागचा पुढचा विचार समजून घेता मगच तुम्ही काय करायचे ते नक्की करता.

अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..
स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...
सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..
भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.
तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....

Thursday, November 3, 2011

नाद-स्वरस्वर निघतो ओंकाराच्या नादातून.
फक्त असतो नाद. नादाला आकार देतो तो माणूस.
आकाराला उच्चार बनून त्याचीच आवर्तने होतात.
अशी अनेक आवर्तने झाली की होते तान.
तान थांबते, थबकते तिथे येतो सम.
समेबरोबर साधली जाते नव निर्मितीची प्रेरणा.
पुन्हा तोच आकार दिर्घ वेळ घेतला की होणारा नाद अवकाशात गुंजत राहतो.
नादमधुरता तिथे जाणवते.
हे सारे बनते त्या आवाजाच्या जादुने. त्यानेच दिलेल्या प्रेरणेतून अनेकविध आवाजाने स्वरसमूह एकत्र होतात. प्रत्येकाच्या पट्टीत त्याची नादमयता बहुआयामी बनते. नानाविध आवरणांची ही किमया माणसाला साधता आली.
स्वराच्या आवर्तनाने ती मिळाली.

आधी येतो गोंगाट...मग एकू येतो नाद... नादातून उमटतो तो स्वर....

एक मनात आले ते टिपले कागदावर. तुम्हापर्यंत पोहचविले.
कांही तुम्हाला यात सांगावासे वाटले तर स्वागत आहे.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, November 1, 2011

कलेवर मनापासून प्रेम करणारी तूस्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर मनापासून प्रेम करणारी तू
आत्मविश्वास आणि करुन दाखविण्याची जिद्द
तारांच्या कंपनातून स्वर निर्माण करण्याचं सामर्थ्य़
कलेत रमणारं तुझं मन
वडिलांची कडक शिस्त
करारी स्वभाव
यातूनच तुझ्यात करुन दाखविण्याची हिंमत आली
पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यामुळे व्हायोलिनवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेस
स्वर शोधण्यासाठी अपार मेहनत घतलीस
अनेक कलावंतांना साथ करताना बिदागीचा विचार केला नाहीस
सतत या ना त्या कार्यक्रमात रसिकांसमोर दिसत राहिलीस
आधी आई-वडीलांच्या घरी, अभ्यासात नंबर कमावून वाद्याची साधना एकाग्रतेने केलीस
स्वतःला झोकून दिलेस
संगीत ऐकलेस
मनन केलेस
स्वतःची छाप वाद्यावर पाडलीस
वाद्यावर हुकमत गाजविलीस
स्वतःचे कलावंत म्हणून स्थान मिळविलेस
साथ करताना मनातून स्वरात
आपल्याच नादात
तन्मयतेने कुशलता मिळविलीस
आकाशवाणी, दूरदर्शनवर स्वतःला सिध्द केलेस
टेलिफोन खात्यात सेवा करतानाही कलेला प्राधान्य देताना संबंध जपलेस
खात्याअंतर्गत स्पर्धेत स्वतःच्या कलेला आणि व्हायेलिनलाही बोलते केलेस
कलावंताची स्वतंत्र ओळख न करुन देता
माणूसकीचे धागे निर्माण केलेस
संबंध दृढ केले, राखले, वाढविले, घडविलेस
सासरी संसारात स्वराला आणि घरातल्या कामांना अग्रक्रम दिलास
नात्यात चांगूलपणा जपलास
सासू-सास-यांवर आनंदाचा वर्षाव केलास
पतीच्या सुखात सुख
दुःखात, कष्टात बरोबरीच्या नात्याने उभी राहिलीस
प्रसंगी त्याच्याही गुणांना वाव दिलास
मुलांना वाढविताना
संस्काराबरोबरच सूरांचे लोण पसरविलेस
घर स्वरसंसारिक केलेस
तपाला फळ येईतो साधनेत रमलीस
कुणाचा दुस्वास केला नाहीस
कुणाला अति महत्व दिले नाहीस
नाती, मग ती संसारातली किंवा सूरांच्या साधकांची असो, कायम राखलीस
रसिकांतही केवळ साथीदार म्हणून लोकप्रियता न मिळविता
स्वतःच्या वाद्याने, क्वचित प्रसंगी आपल्या सूरांनी आपलेसे केलेस
गाणी गुणगुणत राहताना गाण्यांनाही आळविलेस
सुगम संगीताची तालिम मिळविलीस
साधकाची इतिपूर्ती न मानता आजही प्रामाणिकपणे तालीम करत राहिलीस
स्वतंत्र वादन व्हावे अशी रसिकता मिळविलीस
प्रसन्न चेहरा, वादनातील किमया, सौदर्य कायम ठेवलेस
चाळीस वर्षांचा हा कला प्रवास अनुभवलास
पारदर्शीपणा जपत
मनमोकळा संवाद करत राहिलीस
सूरांची संगत सतत मनात घर करुन ठेवलीस
श्रध्देने, रियाजाने आणि चिकाटीने वाद्यावर हुकूमत कमावलिस
असाच सूरांचा सुरेल संसार सुरु ठेवलास
वयाची पन्नाशी आली तरी तोच भाव मनात राखलास
निष्काम कर्मयोग अखंड करत राहिलीस
निकोप आणि सुद्ढ वातावरणात स्वतःला घडविलेस
अशीच सुरांची परंपरा राखत स्वतःचे नाव रेखाटत रहा
हातातल्या बो मधून जसा स्वर तयार करतेस
तसाच सच्चा सूर गळ्यातून..शब्दातून निघू देत
निगर्वीपणा जपत... साधेपणा कायम ठेव
पैशापेक्षाही वेळेला आणि कलेला महत्व दे...
सुखाचा क्षय कधीच होणार नाही....सुभाष इनामदार..
२.११.२०११

शिवराज गोर्ले- जिवनात आनंद फुलवूज्ञानप्रबोधनीत यातून देशाला काय मिळेल..असा विचार करायला लावणारे शिक्षण नाकारून नाटक केल्याने देशाला यातून काय मिळेल? हा प्रश्न विचारला गेला... तेव्हाच मला नाटक करायचं आहे.. यातून देशाचा काय तोटा हेईल? हा विचार करतच..ती ज्ञानप्रबोधीनीची कास सोडली. मग ज्यातून स्वतःला आनंद मिळेल तेच करीत राहिलो.

पूर्वी नाटकात स्वगत जशी असायची तशा पध्दतीने त्यांनीच बोललेल्या शब्दांमधून हे लिहायचा विचार केलाय..म्हणून तसे वाचताना वेगळे वाटत
असेल...


पुढे एमबीए उत्तम गुणवत्तेत पास झाल्यावर त्यावेळी एके काळी नावलौकिक असलेल्या फिलिफ्स कंपनीत पर्सोनेल मॅनेजरची नोकरी स्विकारली...पण तिथेही कामगारांनी एका गुरुवारी पुन्हा वडाच कॅंटींनने दिल्याने ...आणि चहासाठी दूध पुण्यातून येईपर्यंत कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे मिळावेत ही कामगार युनियनने मागणी केल्यावर न पटल्याने राजीनामा दिलेल्या शिवराज गोर्ले यांनी नेकरी न करण्याचा संकल्प केला.

नाटके लिहली, चित्रपट संवाद लिहेले...मात्र इतरांना सांगताना त्यांचे जिवनात आनंद फुलवू शकतो हे सहका-याच्या अनुभवातून समजले...पुढे तेच लेखन करण्याचा निर्णय घेतला. मजेत कसं जगावं? हे स्वतः इतरांना सांगत गेलो...पुढे् तेच पुस्तकातून लिहित गेलो. वाचकांशी संवाद साधत लेखन केलं. वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला...आज इतरांची दुःखे कमी करण्यासाठी आपले लेखन उपयोगी पडल्याची उदाहरणे जेव्हा समोर आली..तेव्हा ठरविले इतरांच्या जीवनात आनंद देण्यासाठी लिहायचे... माझ्या पुस्तकाने आठ-दहा तरुणांच्या आत्महत्त्या रोखू शकलो....

आपल्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभात शिवराज गोर्ले बोलत होते. त्यांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्त्यिक ह.मो.मराठे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्वात झालेल्या या कार्यक्रमात विकोचे अध्यक्ष पेंढरकर यांच्या हस्ते सत्कार केला गेला. राहूल सोलापूरकरांनी गोर्ले यांना बोलते केले. महेश कोठारी यांनी शिवराज यांच्या लेखनाचे कौतुक केले.

आज त्यांची साठी पूर्ण झाली...आयुष्याला कलाटणी देणा-या घटना आळवत ....आपल्याला जे सांगायचे आहे त्यासाठी लेखनाचा मार्ग स्विकारुन आज ते साठीतही मजेत तर आहेतच पण ते इतरांनाही आनंदी बनविण्यासाठी लेखन करताहेत....इंग्रजीतील पुस्तकांसारखी त्यांची जीवनात आनंद देणारी..जगताना येणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी बळ देणारी अनेक पुस्तके विचकप्रिय झाली आहेत.

आज त्यांच्या लेखी लग्न न केल्याने अनेक मैत्रींणींना ते आपले वाटते वाटतात. तीन जणींनी नकार दिल्याचे सांगताना एकीने मित्र म्हणून मैत्री केली. मात्र स्त्रीयांच्या अनेक दुःखांना त्यांनी पुस्तकातून बोलते केले आहे.
बालगंधर्वात रंगलेल्या कार्यक्रमाला चित्रपट, नाटक, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातल्या मंडळींबरोबरच शिवराज गोर्ले यांचे मित्रमंडळींचा भरणा अधिक होता.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552586276

Monday, October 31, 2011

काळाप्रमाणे घडणारी नवी पीढी


- निर्मला गोगटे

“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...

आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..

सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.

वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.

नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.


आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे.
माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.

सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..

पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.

निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....

गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276


Vocalist Ms. Nirmala Gogate

1. Ms. Nirmala Gogate (born 1936) is a well known vocalist in Classical Hindustani Music. She was trained by doyens of Hindustani Music like C R Vyas, B R Deodhar, G D Agni, V R Athavale. She is well known for Natya Sangeet on Marathi and Sanskrit stage. She has authored a book in Marathi on inter-relation of music on Gujarati, Marathi and Kannada. stage. She has given number of public performances in India and United States.
2. She had appeared on TV and radio number of times. Her Marathi record < shrihari god' tujhi baasari (Lord Krishna ! Your flute sounds sweet.) > sung in Raag Bhairavi is well acclaimed by Marathi music lovers. She was honoured to present the Song of Maharashtra when Prime Minister Indira Gandhi inaugurated new Maharashtra Vidhan Bhavan (Legislature Building) at Mumbai in 1981. She was recipient of Balgandharva award of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad (2001). In yesteryears, she played musical heroine roles with Stalwarts like Ram Marathe, Chhota Gandharva and Daji Bhatawdekar.
3. Married to Mr. Madhukar Gogate, she lives in Pune. Her maiden name was Nirmala Bapat.
4. Sampling of a song by Nirmala Gogate - Click here to listen Vad Jaau Kunala Sharana in mp3 format(354KB). If you are on a slow dialup connection please download the file for offline hearing. English meanings are given in brackets below: Symbol-sound relations for Marathi are given in articles (e03.htm, m12.pdf) on this website.

vada (tell) j'aau (may I go) kun'aalaa (to whom) sharan'a ( for protection) ga (oh) ?
karil (will do) j'o (one who) haran'a (removal) sankat'aach'e (of crisis)
mi (I) dharina (shall touch) charan'a (feet) tyaach'e (of him) aga (oh)
sakhaye (dear friend).

This is at start of a song (with musical instruments) in Marathi play Saubhadra, in raag jogiyaa (tunes of pathos). Here princess Subhadra, distressed by lack of support from her family, repeatedly and repeatedly asks her close companion (sakhaye, ga, aga are ways to call a female friend). Tell me dear friend, please tell me, who will resolve this crisis? I shall touch feet of (= bow to ) that person.
Nirmala Gogate while playing a role on Marathi stage
Nirmala Gogate
Nirmala Gogate presenting a favorite song of Dinananth Mangeshkar
Nirmala Gogate presenting a favorite song of Deenanath Mangeshkar, legendary singer on Marathi stage. Veteran film actor Dilip Kumar and world-famous singer Lata Mangeshkar (daughter of Deenanath) were present at a function to rename a road as Deenanath Mangeshkar Road. ( Location -- A hill opposite to Bhatia Hospital in south Mumbai. Around year 1982)
Nirmala Gogate singing at 1978 Marathi Vidnyan Parishad
Nirmala Gogate giving voice culture demonstration, with Sita Tipnis (harmonium) and Prof R V Sovani to explain the related human anatomy. Year 1978 Marathi Vidnyan Sammelan. Nirmala took training in voice culture from renowned vocalist B.R. Deodhar.

Friday, October 28, 2011

दिवाळी पहाट कस्तुरीच्या स्वरांनी बहरली


दिवाळीची पहाट २७ आक्टोबर दिवाळी पाडवा पुण्यातल्या निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहात अहिर भैरव स्वरांच्या आवर्तनाने रंगत गेली.
बाहेर फटाक्यांची आतशबाजी तर सभागृहाच्या आवारात सकाळच्या रागांचे स्वर...
कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या या दिवाळी मैफलीने स्वरांना सकाळच्या सूर्याला अर्घ्य देत उपस्थित रसिक मंडळींना
हा आस्वाद दिला तो सांस्कृतिक पुणेच्या सुभाष इनामदार यांनी...
स्वरांच्या झंकारत रसिकांच्या मनात रसिया म्हरो...या बंदिशीने घर करुन ते सकाळच्या रागाचा आस्वाद घेत होते.
पुण्यात दिवाळीच्या निमित्ताने विविध दिवाळी पहाट आयोजित केल्या होत्या...तरीही निवारा मधल्या दीपस्वरांनी...स्वतःचे वेगळेपण जपत.शास्त्रीय गायनाची ही मैफल रंगत होती.
बेग बेगा आओ मंदिर या एकतालातल्या शब्दांनी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या या शिष्येने आपल्या आवाजी बाजाचा उत्तम आविष्कार सादर केला.

जरा येई रे बाहेरी भघ आसपास
दाही दिशात दाटला आनंद उल्हास
या शांता शेळकेयांनी केलेल्या दिवाळीच्या कवितेच्या ओळी सुभाष इनामदार रसिकांमसोर सादर करीत होते...तेव्हा त्याही शब्दांना तेवढीच दाद टाळ्यांनी मिऴत गेली.
आधी राग अहिरभैरव आणि नंतर निर्गुणी भजनानी कस्तुरी पायगुडे- राणे यांनी आपल्या सुरेल स्वरातून आगळ्या रचना सादर करुन मोहवून सोडले.
अवघा रंग एकची झाला...या अभंगाने रसिकांची मने गुंगवून सोडली.
स्वरातली नादमधुरता, नितळ आवाज, पारदर्शी शब्द, शब्दातली भाव त्या नेमक्या सादर करतात याचा प्रत्यय या पहाटेच्या मैफलीत आला. हा योग जुळवून आणल्याबद्दल अनेक रसिक सांस्कृतिक पुणेचे अभिनंदन करत होते.
कार्यक्रमाली हार्मोनियमची साथ केली ती स्वानंद कुलकर्णी यांनी , तर तबल्यावर समर्थ पणे सिध्द होते ते गणेश तानवडे... तंबोरा साथीला कस्तुरी पायगुडे यांच्या शिष्या कल्याणी शेटे, आभा पुरोहित यांची साथ लाभली होती.

याच निमित्ताने राम पायगुडे गेला ३५ वर्ष सातत्याने काढत असलेल्या रंगतरंग या दिवाळी अंकाचे प्रकाशन सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते रवि चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Sunday, October 23, 2011

एखादी ती पणती असावी
उधळण व्हावी दशदिशांनी
उमलून यावी कमळे किरणांनी
एकच धागा गुंफून घ्यावा
माणूसकीचा धर्म जपावा
सुख देताना मन गुंतावे
दुःख झेलता कधी न क्षमावे
होता होईल दान करावे
दाते व्हावे, जग जिंकावे
ओंजळीत मग प्रेम विसावे
जपून नाते न विसरावे
उरी असावा स्नेह, दिलासा
गंधालाही मोह नसावा
उरी चेतना मंद स्मितावी
एखादी ती पणती असावी

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, October 21, 2011

प्रकाश...लखलखणारा..


प्रकाश...लखलखणारा...

प्रकाश...लखलखणारा...ता-यांसारखा अवकाश उजळविणारा
अंधार दूर सारुन आपली स्वतःची प्रतिमा स्पष्ट करणारा..
कधी मिणमिणता...अंधुकसा ठिपका तर कधी आसंमतात पसरणारा
मनाची चेतना शमविणारा..
रुसलेल्या धरणीवर स्वतःचे अस्तित्व जपणारा..
किती रुपात..किती आकारात...किती वेगात धावणारा
कधी तेलाच्या वातीतून मंदता पसरविणारा..
कधी मानवाच्या सामर्थ्याने लख्ख भासणारा..
नाना रुपात नवचेतना आणणारा...
नाना रंगांची उधळण करणारा...
कौलारु घरातही तेज देणारा...
चौकोनी वास्तुलाही अस्तित्व देणारा..
महाल, वाडे, बंगले तर किल्लेही पाहिले तर लांबून साक्ष पटविणारा...
रुसलेल्यांना हसविणारा...
गहिरेपण जपत शांतपणे तेवणारा..
सूर्यास्ताला नमन करत सूर्यादयाला अर्घ्य देणारा..
गरीब-श्रीमंत यांच्यातला भेद दूर करणारा..
वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...
प्रकाश वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...
...प्रकाश
आनंदाचा ठेवा उधळत...सा-या चिंता दूर करणारा सण प्रकाशाचा
सर्व वाचकांना, मित्रांना, स्नेहीजनांना....नवे रुप देत उजाळा देणारा हा प्रकाशसण....
आपल्या दारी उजळविणारा...
प्रकाशकिरण घेऊन दाखल झालेला... सुभाष इनामदार, पुणे
Subhash inamdar
9552596276
subhashinamdar@gmail.com

होय कटू वागलो


होय आज मी जरा नाही पण बराचसा कटू वागलो. माझे घर अकरा महिण्याच्या करारावर घेण्यासाठी ते करारपत्र रजिस्टर करण्यासाठी परगावहून आलेले. काही मामलेदार कार्यालयातल्या दिरंगाईने आज ते रजिस्टर होऊ शकले नाही.

मागच्या भाडेकरुचा अनुभव पाहता माझा निर्णय ठाम होता. करार रजिस्टर झाल्यावरच घराची किल्ली ताब्यात द्यायची.

ते गृहस्थ तसे माझे परिचयाचे झाले होते. सज्जनही होते. पण मी आज करार नाही. ताबा नाही. हे तत्व कायम धरुन ताबा देण्याचे चक्क नाकारले. माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो.

त्यांनी मोठ्या आशेने आपल्या मुलाला आज रात्री पुण्यात राहता येईल अशा भरोशावर बरोबर आणले.
पण माझ्या या ताठर भूमिकेने त्यांचा व त्याचा मूड गेला.
मागच्या भाडेकरुने आज करार करु..उद्या करु..म्हणत दोन महिने घेतले. शेवटी करार न करताच हरप्रयत्न करत बाहेर काढण्याची वेळ आली. मला हा अनुभव बरेच काही शिकवून गेला.

वास्तविक माझ्या वकीलाने वेळ दिल्याने ते परगावहून आले. पण मामलेदार कचेरीत आज वकीलांचा शेवटचा दिवस. उद्यापासून दिवाळीच्या सुट्टीवर. म्हणून करारपत्र करण्यासाठी ही ही गर्दी. सार मामला जोरदार, कोण काय बोलणार. बीचा-या आशीलाला कोण विचारणार. सारे राज्य कारकून आणि वकील मंडळींचे

आम्ही बापडे लाजीरवाणे.

यात आमचेही भरीत झाले. करार झाला नाही.भाड्याने घेणारे मला म्हणाले आज ताबा यात आमचेही भरीत झाले.
करार झाला नाही.भाड्याने घेणारे मला म्हणाले आज ताबा द्या. त्यांची विनवणी धुडकावून
मी नाही म्हणले....करार आधी मग चावी....
यात माझे काय चुकले?

subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276