Friday, March 18, 2011

पंच्याहत्तरीची सुरेल वाटचाल !
पं. भालचंद्र दामोदर देव

`व्हायोलिन` या वाद्याला `आंधळं वाद्य` असे म्हणतात, कारण त्यावर स्वरांची बोटे बरोबर पडण्यासाठी पडदे किंवा पट्ट्या काहीच नसते. केवळ वादनातल्या कौशल्यामुळेच अचूक स्वर साधता येतात. अशा या अवघड वाद्याबरोबरचा सुरेल प्रवास करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक ,माझे वडील आणि गुरूही, श्री. भालचंद्र देव. परिचितांचे `नाना` २ एप्रिल २०११ रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांच्या आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला धावता आढावा.....

नानांचा जन्म मुंबईचा. माझे आजोबा दामोदर चिंतामण देव, हे नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ते म्युनसिपाल्टीच्या शाळेत संगीत शिकवित असत. ते गाण्याबरोबरच हार्मोनियमही वाजवित असत. प्रसिध्द व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी यांचे ते शिष्य. आजोबांना थोडे व्हायोलिनही वाजवता येत होते. त्यामुळे घरातील संगीताच्या वातावरणामुळे नानांनाही संगीताची गोडी लागली. यामुळेच वयाच्या ११ व्या वर्षी तेही आजोबांकडे व्हायोलिन शिकू लागले.
आजोबांची नोकरी संपल्यावर नाना पुन्हा चिंचवडला आले. (तसे हे देव कुटुंब चिंचवडच्या मोरया गोसावीच्या कुळातले. कामानामित्त मुंबईला जरी गेले तरी पुन्हा परतोनी माघारी म्हणजे चिंचवडला स्थिरावले) शालेय शिक्षण पूर्ण झाल्य़ावर आजोंबांकडे व्हायोलिनचे धडे घेणे सुरूच होते. वाणिज्य शाखेचे पदवी घेतल्यावर आजोबांनी नानांना पं. गजाननबुवांकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठविले.

रोज दहा तास, असे जवळजवळ तीन वर्षे डोंबिवलीत बुवांकडे व्हायोलिनचे धडे गिरविले. बुवांची शिस्त अतिशय कडक. कोणत्याही बंदिशी किंवा स्वररचना लिहून घ्यायच्या नाहीत. हा दंडक. घरी गेल्यावर त्या आठवून त्याचा रियाज करायचा... हे विद्येचे तंत्र. बुवांच्या या धाकामुळे व्हायोलिनशी जवळीक अधिक झाली.. बुवांच्या सहवासामुळे त्यांचे खास गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची कला अवगत झाली. त्यात ते माहिर . तबल्याच्या बोलाचेही तिथे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले... एकूणच गायकी अंगाने वादन आणि तेही तबल्याच्या लयीत वाजविण्याची कारागिरी सहजी प्राप्त झाली.

पुण्यात टेलिफोन खात्यात नोकरीचा कॉल आला..आणि नाना खुद्द पुण्यात दाखल झाले. पुण्यात नोकरी आणि व्हायोलिन दोन्ही गाष्टी एकत्रच सुरू झाल्या. पुण्यात पं. नागेश खळीकर, बबनराव कुलकर्णी, धुंडिराज मराठे यांचेकडेही नानांनी संगीताचे शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांनी शिकविलेल्या व्हायोलिनच्या विद्येत पुरते प्राविण्य आल्यावर मग नानांनी रेडीओची परिक्षाही यशस्वीपणे पास केली. पुण्यात आलेल्या ६२च्या पुराने राहते घर कोलमडून गेले. गोखलेनगरला संसाराचा पुन्हा मांड मांडला. लग्नानंतर आईलाही गाण्याची आवड लक्षात आली. आईने नानांच्या कार्यक्रमांना तंबो-याची साथ केली. आई (सौ. निला भालचंद्र देव) भक्तिगीत आणि अभंग छान म्हणत असे.

नानांचा पहिला कार्यक्रम १९६३साली रेडिओवर प्रथम झाला . त्यानंतर घरी रेडिओ विकत आणला गेला. आईने घरातली सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सर्व जबाबदा-या तिने आनंदाने, समाधानाने पार पाडल्य़ा. नाना घरात व्हायोलिनच्या शिकवण्या घेत असत. कार्यक्रमांना साथ करण्यासाठी बाहेर जात असत. घराची सारी मदार आईवर असायची.. तीही तेवढीच ..कलाप्रेमी आणि मोठ्या मनाची.

घरातल्या संगीताच्या या वातावरणामुळे वयाच्या नवव्या वर्षी मी व्हायोलिन शिकू लागले. तेही नानांच्या कडक शिस्तीत.. मला आठवते.. माझ्या शेजारी रहाणारी मैत्रीण संगीता आणि मी दोघीही क्लासला बसायचो.. आधी शिकविलेल्या रागांच्या आलाप, ताना जर पाठ नसल्या तर नाना मला क्लासला बसू देत नसत..इतकेच नाही तर वाजविताना काही चूक झाली तर हातातल्या बो ने एक जोराचा फटका मारीत....मात्र या मुळेच माझे व्हायोलिन वादन तयार झाले..आज ते सारे मागे वळून पाहताना डोळे पाणावतात.

आज वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांचा वक्तशिरपणा आणि शिस्त तशीच कायम आहे. पण जेवढे ते कठोर शिक्षक तेवढेच समोरच्याचे कौतुकही ते मनापासून करतात.. मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे.
आपल्या इतक्या वर्षांच्या सुरेल प्रवासात त्यांनी कधीही प्रसिध्दीची किंवा कुठल्य़ाही पुरस्काराची अपेक्षा कधीच धरली नाही. आठ ते सत्तर वयोगटातल्या कितीतरी जणांनी नानांकडे शिक्षण घेतले आहे. आजही घेत आहेत.
पण व्हायोलिन हे फार अवघड वाद्य असल्यामुळे शिकायला येणारे फार चिकाटीने ते शिकत नाहीत..अर्धवट सोडून जातात ही त्यांची खंत आहे.

मितभाषी आणि तेवढेच मिश्किल ही त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये सांगता येतील. ते तसे मितहारीपण असल्यामुळे मोजकाच आहार घेऊन सतत उत्साही असणारे आमचे नाना अजुनही बसने प्रवास करून घरोघऱी शिकवण्या घेण्यासाठी तर जातातच पण गेली ४० वर्षे शनिपारच्या भारत गायन समाजात संगीत शिक्षक म्हणून आजही कार्यरत आहेत. अजूनही कोणत्याही कार्यक्रमालाच काय पण तालमिंनाही वेळेवर हजर असतात. त्यांनी हिच शिस्त आम्हा बहीण-भावांना लावली. त्याचा उपयोग आम्हाला आमच्या आयुष्य़ात खूप झाला.
त्यांचा हा संगीताचा वसा मी (व्हायोलिन) आणि माझा मुलगा रविराज( तबला) आणि मुलगी मधुरा(हार्मांनियम) यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे.

निर्मळ मनाचे.. कोणत्याही कलेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले.. व्हायोलिनवरची निष्ठा कायम ठेवणारे... ते वादनाचे धडे पुढच्या पिढीला शिकविणारे...पं. भालचंद्र देव...
तुम्हाला आयुष्याची स्वर-संगत अशीच अखंड लाभत राहो.. कला आणि कलावंत दोघांनाही याचा लाभ होवो...हिच अपेक्षा...
दिर्घायुष्याचे वरदान लाभो
तुमच्या आयुष्या
हिच विनंती करतो आम्ही
परमेशाच्या देशा...
आपलीच,


सौ. चारूशीला गोसावी ( देव )
मोबा.९४२१०१९४९९

No comments: