Friday, March 25, 2011

व . पु. आजही ताजे




आज २५ मार्च वपू यांचा जन्मदिवस.

मानवी नात्यातल्या भावना सहजपणे उलगडून दाखवणा-या शब्‍दांच्‍या जादूगाराला मनापासून अभिवादन...

व.पु. एक लेखक , माणुसही

लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्ट, व्हायोलिन, हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर.
सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेडं असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर
असणाऱ्या माणसांचे चाहते.
म्हणुनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असणाऱ्या, मनांचे कंगोरे
उत्तम निरीक्षणांमुळे मांडता येणाऱ्या ,
विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा.

खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत.
एक व्यक्ती, विचार-आचारांची पध्दत. वपु त्याला `पॅटर्न' म्हणायचे. वपुंनी पॅटर्न्स मांडले.
जे आपल्यासहित, आपल्या अवती-भवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सला दाद मिळते.
विनोदी कथांमधून हसवता हसवता एक शल्य भिडत राहतं आणि चटका लावून जातं.
ही अशीच जीवनाची तर्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. आणि मग
वपु काळे ह्यांना महाराष्ट्र सरकार उत्तम लेखकाचा मानसन्मान देतं.
`पु.भा. भावे' पुरस्कार त्यांना पुरस्कृत करतो. फाय फाऊंडेशन त्यांच्या साहित्याची दखल घेऊन सन्मानित करते
आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद बहाल केलं जातं.
अनेक `रंग मनाचे' दाखविणाऱ्या वपुंना अनेकजण आपला
`पार्टनर' मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे.

25 मार्च 1932 ते 26 जून 2001... आणि गणती पुढे चालूच आहे.
कारण व. पु. काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा `हुंकार' अजूनही
`वन फॉर द रोड' करता दिला-घेतला जातोय. हा `दोस्त' असाच दोस्ती निभावत राहणार
आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार.

http://www.facebook.com/topic.php?uid=130659376946588&topic=459

2 comments:

Unknown said...

सुदैवाने व.पुं.चा सहवास मला लाभला होता. मी पाचवी यत्तेत होतो. 'टिळक रोडच्या' न्यू इंग्लिश स्कूल मध्ये! . ... अण्णा, व.पुं.चे वडिल; पु.श्री.काळे; हे काहि काळ मला चित्रकला शिकवायचा प्रयत्न करत होते! ... ताई; व.पुं.च्या आई; मला रोज छान छान करून खायला घालायच्या. मुलायम, मोरपंखी असे ते अमृत गोडीचे आणि घडते दिवस होते. त्या दिवसांनी माझ्यावर अमिट संस्कार केले आहेत. स्वच्छता, नेटकेपणा, नेमकेपणा, वेळ पाळणे, विचार, चिंतन, मनन आणि मुख्य म्हणजे, आधी सगळ्यांचे सगळेकाही शांत चित्ताने ऐकून घेऊन, आवश्यकता असेल तरच, सगळ्यांच्या विचारांचा योग्य आदर ठेऊन, स्पष्टतेने व्यक्त व्हायचे प्रामाणिक धाडस; मला; व.पुं.च्या पुण्यातल्या त्या प्रभात रोड वरील, "शहरा मधल्या कौलारू घराने" दिले. हा; सुदैव योग!.... . जीवनाला लाभलेल्या स्वाभाविक निष्टा. आपलं; आपल्या आणि आपल्या भोवतालावर जडलेलं सर्वपूरक प्रेम. जाणीव, वात्सल्य. सगळं काही! . ... जे नंतर "व.पुं." म्हणून जगाला सतत भावले. भावते आहे. ... . आजच्या या काहीश्या संपृक्त भासणाऱ्या काळाला; व.पु.,पु.ल.,दळवी, तेंडुलकर,वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेखी अशा किती तरी शेखी न मिरवणाऱ्या प्रातिभांची आवश्यकता आहे. . ... ईश्वराला त्याच्या जगाची चिंता आहेच.

Unknown said...

MALA PHAKT V.P. KALE TYANCHYI
PUSTAKATE ANI KATHAKATHNACHYA CASSET MADHUNACH BHETLE PAN TE AJUNAHI MALA MAZYA BARAOBAR GHARAT
ASLYA SARKHE VATTAT.MANVI MANACHA
EVDHA SUKSHMA SHODH GHENARE PHAR THODE LEKHAK AAHET....