Wednesday, July 13, 2011

राजेंद्र दिक्षित -हरिनामाचा गजर



विठ्ठल गीती गावी

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच. पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.

पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने ११ जुलै रोजी आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.
भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे

Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

2 comments:

saurabh shendge said...

I personally attended it. Though I am not a big god follower I always enjoy to attend mr. Rajendra dixit's sangeet sandhya. Its our pleasure that after late p. Bhimsen Joshi, we get to see his legacy continued.

saurabh shendge said...

I personally attended it. Though I am not a big god follower I always enjoy to attend mr. Rajendra dixit's sangeet sandhya. Its our pleasure that after late p. Bhimsen Joshi, we get to see his legacy continued.