Monday, July 18, 2011

शास्त्रीय संगीतात नाव कोरायचे आहे


कस्तुरी पायगुडे-राणेपार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक
कस्तुरी पायगुडे-राणे

कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.
इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.

थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.

पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.


`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.

कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.

ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.

पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.

पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.

बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.

दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.

पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.


संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.

आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.

आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com

No comments: