Wednesday, November 9, 2011

“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी”








“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” याची पहिली प्रत माझ्या हातात पडली आणि गेले काही दिवस हे लेखांचे संकलन झपाटल्यासारखे वाचून काढले. जयवंत दळवी, अरूण टिकेकर, श्री. पु. भागवत, वसंत बापट, शांताबाई शेळके, भारतरत्न भीमसेन जोशी किती म्हणून नावे घ्यायची? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व विंदा तर समीक्षानिपुण नाडकर्णी व कुळकर्णी अशा अनेक मनसबदारांची ही मांदियाळी आहे.

पु.लं.च्या पुस्तकांशी माझे नाते मॉडर्न हायस्कूलच्या खाकी हाफ पॅंटमध्ये असताना गुंफले गेले आहे. कोकणची पहिली ओळख अंतू बर्वेतून मला झाली. चितळे मास्तरांसारखे शिकवण्याचे वेड असणारे मास्तर आमच्याही शालेय जीवनात आम्हाला लाभलेले आहेत. टापटीप आणि मुंबईची शान म्हणजे काय मला नंदा प्रधानमुळे समजले. सोकाजी त्रिलोकीकर “ ए साला, कोचरेकर तू तो एकदम इडियट आहे रे”. यांच्यातून मला पारसी समाजाची पडछाया जाणवली .

बबडू व मुंबईंचे नाके यांचे अतूट नाते समीकरण पुण्यात राहून मला पु. लं. मुळे समजले. पुलंनी आमचे बालपण ख-या अर्थाने श्रीमंत केले.

मला माझे पुण्यातले लहानपण आठवते. त्या वेगवेगळ्या आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा, रानडे वक्तृत्वस्पर्धा, नगरची हिवाळे स्पर्धा अशा विविध भाषणबाजीच्या व्यासपीठावरुन पुलंच्या व तात्कालीन साहित्यिकांच्या दाखल्यामधून आम्ही मुलांनी वक्तृत्वाची मूळाक्षरे गिरवली आहेत. पण प्रतिभावान लेखक, भावनासमृध्द कवी अशा छापील खिळ्यांमधून व ठश्यांमधून पुलंची मुद्रित ओळख होऊच शकत नाही.

ते रंगमंचावर आले व नुसते उभे जरी राहिले तरी हास्याची लकेर पसरत असे. का कोण जाणे मला तर ते साक्षात श्री गणेशाचे रुपच दिसत असे.थोडेसे पुढे आलेले सशासारखे दोन दात, लुकलुकणारे बुध्दिमान असे डोळे. हे पाहिल्यावर हा माणूस जीवनाकडे व चराचर जीवांच्या अस्तित्वाकडे किती विलक्षण दृष्टीने पाहात होता याची साक्ष पटते. नेमकी शब्दयोजना, तीही नेमक्या वेळेस करणे हे कुशल लेखकाचे प्रमुख असे अस्त्र आहे. पु.लंचा भाता अशा अनेक दिव्य अस्त्रांनी सदा संपन्न होता. चितळे मास्तरांच्या आर्थिक विपन्नवस्थेचे वर्णन करताना, “ मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोत्ये पडली नाहीत, पण डोळ्यात पडली”,..पुल सहज लिहून जात.

पुलंचे लिखाण ६०-८०च्या दशकांत घरा-घरात नव्हे तर मराठी मना-मनात पोहोचले याला कारण त्याची बैठक सच्चा, मध्यमवर्गातील जीवनमूल्यांवर आधारलेली होती. फ्लॅट सांस्कृतीचा उदय होत होता आणि मानवी वस्तीचा भूगोल जरी अपार्टमेंटमध्ये बंदिस्त होत असला तरी माणुसकीच्या मनाचा इतिहास मात्र चाळीतच अडकला होता. ते प्रेम, सौदार्ह, बंधुभाव पुलंनी अजरामर केले.

त्यांचा विनोद मर्मबध्द असायचा. त्या केवळ शाब्दिक कोट्या नव्हत्या. आजच्या दूरदर्शनवरच्या विनोदाचे दुर्दैवी दशावतार त्यांच्या साहित्यात कधीच दिसले नाहीत. त्या विनोदाला कारुण्याची झालर होती, उच्छृंखलतेची झूल पुलंनी कधीच पांघरली नाही.. काव्य, रसग्रहण, नाटक, चरित्र, व्यकितचित्रण... पारिजातकाचा सडा पडावा अन् नेमके कुठले फूल उचलावे याचा संभ्रम पडावा अशी अवस्था होती. पुणे-ते-मुंबई यापलिकडे जग न पाहिलेल्या आमच्या विश्वाला पुलंमुळे लंडन कळाले. अपूर्वाई, पूर्वरंग, निळाई या सा-या निर्मितींनी आम्हाला परदेशाची चटक लावली.

त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी त्यांना एक पत्र पाठविले होते. कालांतराने त्या पत्राचे टंकलिखित पोस्टकार्ड रुपाने उत्तर प्राप्त झाले. पत्राच्या अखेरीस पुलंनी स्वतःच्या हस्ताक्षरात “ उत्तम डॉक्टर हो हीच श्रीचरणी प्रार्थना”, असा आशिर्वाद दिला होता. गेल्या २५ वर्षात मुंबईत सार्वजनिक रुग्णसेवेतर्फे जे काही कमावले त्याच्या मूळाशी पुलंचा हा आशिर्वादच आहे अशी माझी श्रध्दा आहे.

देवाघरच्या या दूताने दोन्ही हातानी मराठी शारदेच्या ओंजळीत मौक्तिकमणी घातले. “घेता किती घेशील दोन कराने” अशी आम्हा वाचकांची अवस्था करणारा हा अवलिया साहित्य दरबारातला सम्राट होता.

परचुरे प्रराशनाने संकलित व संपादित केलेल्या या पुस्तकामुळे आम्हाला केवळ पुलच नव्हे तर, आज हयात नसलेले अनेक श्रेष्ठ नाटककार, लेखक, कवी भेटले व खरोखर “तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” ही श्री चरणी प्रार्थना करावी असे मनापासून वाटते.

जोपर्यंत मराठी घरात मराठी वाचले जाते, संग्रह केला जातो, तोपर्यंत “ पु.ल. एक साठवण “ नंतर एक दुसरीही आठवण म्हणून हे पुस्तक संग्रही असणे आवश्यक आहे.



डॉ. संजय ओक
Dr Sanjay Oak
Director, KEM Hospital Mumbai
(“मला काही सांगायचय्” चे लेखक)


पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुण्यात परचुरे प्रकाशनने ८ नोव्हेंबर २०११ ला समारंभपूर्क तीन पुस्तकांची प्रकाशने कवीवर्य मंगेश पांडगावकरांच्या हस्ते केली. त्यात मला काही सांगायचय या पुस्तकाताही समावेश होता. या निमित्ताने डॉ. संजय ओक यांनी केलेल्या भाषणातील मनोगतातून..साभार...

No comments: