Saturday, November 5, 2011

राजनभैय्या ६०




`गुरुकी कृपासे शब्द आ रहे है, तो वो उन्हीको अर्पित करना चाहिए`- या भावनेनं, स्वतः तरुणवयात रचलेल्या बंदिशींमध्ये आपले गुरू गायनाचार्य पं. बडे रामदासजी यांचे नाव गुंफणारे...पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांनी २८ आक्टोबरला एकसष्ट वर्षात पदार्पण केले.. या निमित्त रविवारी पुण्यात त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने जाहिर सत्कार समारंभ झाला...त्यानिमित्ताने लेख..


अमानतअलि-फतेअलि, सलामत-नजाकतअलि, लताफत-शराफत हुसेन अशा सहगायकांच्या नामांकित व्दयी शास्त्रीय संगीतात होऊन गेल्या. एकेकाळी बनारस घराण्यातही अमरनाथ-पशुपतीनाथ ही व्दयी सहगायनासाठी प्रसिध्द होती. नंतरच्या काळात बनारस घराण्यानं ठुमरी- कजरीचं गाणं इतकं समृध्द केलं की त्या घराण्याची ख्याल गायनाची महान परंपरा कमी होते आहे की काय असं वाटू लागलं. त्याचवेळी पं. राजन व पं. साजन मिश्रा या बंधुव्दयानं ती महान गायकी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आणि सर्वार्थानं ती पुढं नेली. मातृ-पितृ दोन्हीही घराण्याच्या रक्तातून आलेला संगीताचा वारसा त्यांना दुसरं काही करुन देणारच नव्हता.

पं. सामताप्रसाद, पं. किशनमहाराजजी, आजोबा बडे रामदासजी, काका सारंगीस्रमाट पं, गोपाल मिश्रा, वडिल पं. हुनुमानप्रसाद मिश्रा अशा थोर गुरूंकडून राजन-साजन या बंधुंकडे संगीत विद्या आली आणि कठोर लगन आणि मेहनतीनं त्यांनी ती आत्मसात केली.

भारतरत्न पं. भीमसेनजींना पं. गोपाल मिश्रा सारंगीची साथ करीत. भीमसेनजींचा मुक्कामही बनारसला त्यांचेच घरी असायचा. त्याचवेळी गुरुंच्या सेवेप्रमाणे राजनभैय्या भीमसेनजींची सेवा करीत..अगदी पाय चेपून देण्यापर्यंत... साधारण १९७५ साली भीमसेनजींनी रेडिओवर मिश्राबंधुंचं गाणं ऐकलं आणि पं. गिरिजादेवींकडे ही कोण मुलं गाताहेत याची चौकशी केली. ते दोघे पं. गोपाल मिश्रांचे पुतणेच आहेत हे कळल्यावर त्याच वर्षी पुण्याच्या `सवाई-गंधर्व महोत्सवात` राजन-साजन मिश्रांचे सहगायन ठेवलं. त्यावेळी स्वतः भीमसेनजींनी मागे बसून तानपुरे जुळवून दिले....ही घटना सांगताना दोन्ही भावांचे डोळे पाणावले नवाहीत तरच नवल. पुढे या व्दयींचं गाणे पुण्यात असल्यावर काळी दोनची तानपु-याची जोडी भीमसेनजींकडून जात असे.

राजन-साजन मित्र परिवारात अफाट आणि समाजाच्या सगळ्या थरातील व्यक्ति आहेत....आमचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या उमद्या स्वभावामुळे...त्याचं मैत्रीत कधी रुपांतर झालं व त्यांच्यामधल्या पद्मभूषण. पंडित अशा अनेक बिरुदावल्यांचा दबदबा कधी गळून पडला हे कळलचं नाही. आमच्यासाठी ते फक्त राजनभैय्या- साजनभैय्या होऊन गेले.
गेल्या सवाई-गंधर्व महोत्सवात,,रिहर्सलमध्ये पं. राजन-साजन बिभासचे स्वर आळवीत असताना, एक बाई बरीच मिनतवारी करून आत आल्या व त्यांनी पंडितजींना ..` मी इंदौरहून मुद्दाम आले आहे. २५ वर्षापूर्वी इंदौरला ऐकलेला तोडी परत ऐकण्याची इच्छा आहे`, अशी विनंती केली. त्यांच्या रसिकतेचा मान ठेबून दोघांनी ऐनवेळी अप्रतिम असा गुजरी तोडी सादर केला.

गेल्याच वर्षी कोल्हापूरला देवल क्लबच्या `अल्लादियॉ` संगीत महोत्सवात` राजन-साजनजींचं गाणं होतं. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ११ ला पोचणारी फ्लाईट संध्याकाळी साडेपाचला आली. माझ्या गाडीतून आम्ही तडक कोल्हापूरला निघालो. तरी पोचायला ९ वाजले. तोपर्यंत सोलो तबलावादन करुन अरविंदकुमार आझादजी यांनी खिंड लढविली होती. पण १० वाजता कार्यक्रम बंद करण्याचा निर्बंध असल्यामुळे रसिकांची निराशा होणार होती. राजन-साजन भैय्यांनी स्वरमंचावर जावून उशीर झाल्याबद्दल संयोजक व रसिकांची माफी मागितली आणि दुस-या दिवशी संपूर्ण वेळ कार्यक्रम करण्याचं कबूल केलं. दुस-या दिवशी त्यांनी सादर केलेल्या `जोगकंस`ने तुडूंब भरलेल्या श्रोतृवर्गाचे डोळे वारंवार पाणावत होते. आजही रसिक त्या मैफलीची आठवण काढतात.

राजन-साजन हे पराकोटीचे अव्दैत आहे हे त्यांचं गाणं ऐकताना तर जाणवतंच पण त्यांच्याबरोबरच्या प्रवासात, गप्पांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. कोणतीही गहन चर्चा असो की विनोद ही बंधुव्दयी त्यात रंगून जाते आणि तीही मैफल रंगवून टाकते. `सूरसंगम`या चित्रपटासाठी `धन्य भाग्य सेवा का अवसर पाया` हे गाणं फक्त राजनभैय्यांना गायलं आहे..श्रेयनामावलीत आग्रहानं राजन-साजन मिश्रा असं नमूद करण्यास भागं पाडलं आहे..हेच ते अव्दैत.

गेली ५० वर्ष हे बंधू सहगायनच करत आहेत. अनेकदा मनात योजलेला राग बाजूला ठेऊन रसिकांनी फर्माईश केलेला राग ते गातात आणि..” आम्ही गात नाही तर आमचे गुरुजन व ईश्वर आमचा माध्यम म्हणून वापर करुन तो राग प्रगट करतात”..असं विनण्रतेनं सांगतात. गुरुकृपेमुळं राजनभैय्यांचे सुपूत्र रितेश व रजनीश हेही सहगायन करत आहेत.
अजूनही एकत्र कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवून, मुलांबाळांसह सर्व कुटुंब बनारसला एकत्र नांदते आहे. यात त्यांच्या पत्नींचीही त्यांना मोलाची साथ आहे. अजूनही आमची चूल एकत्रच आहे हे दोघेही अभिमानाने सांगतात.
संगीताप्रमाणे इतर बाबतीतही राजनभैय्या अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या खेळांच्या आवडीप्रमाणे ( कॉलेजमध्ये ते क्रिकेटचे कप्तान होते ) जंगलात-निसर्गात मनमुराद भटकण्याची त्यांना आवड आहे. त्याविषयाचेही ज्ञान आहे. ओशांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन मकरंद ब्रम्हे यांनी या बंधूंच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारित `अव्दैत- संगीत` ह्या ९० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या डॉक्युमेंटरी भागाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे.

एकमेकांच्या घराण्याविषटी अत्यंत आदर बाळगणारे असे महान कलाकार पाहिले की, जाणवतं की विविध घराणी- विविध गायवप्रकार असोत पण त्यांना बांधून ठेवणारं भारतीय संगीत हेच मूळात एक `अव्दैत` आहे.
राजनभैय्या!( आणि साजनभैय्याही) तुमच्याकडून ही संगीतसेवा अशीच वर्षानुवर्षे घडत राहो...अनेक उत्तमोत्तम शिष्यही त्यातून तयार होवोत..आणि तुमच्यातले हे संगीत अव्दैत अखेरपर्यत अखंड राहो..हिच इच्छा.....



-विजय मागिकर, पुणे
मोबा- ०९४२३५७७७५३

No comments: