Wednesday, January 19, 2011

चंगळवादाच्या विळख्यात कलांची अवस्था बिकट


- डॉ. अरूणा ढेरे
डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठानामार्फत दिला जाणारा, साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा एक लक्ष रूपयांचा पुरस्कार डॉक्टर अरूणा ढेरे यांना रविवारी १६ जानेवारीला ज्येष्ठ समीक्षक-साहित्यिक चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आला. याप्रसंगी अरूणा ढेरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी हे प्रतिष्ठान साहित्याच्या गौरवाबरोबरच सामाजिक भान ठेवून ही परदेशस्थ माणसे कृतिशिल स्वायत्त संस्थांचा एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत याबद्दल अभिनंदनही केले. त्यांच्या भाषणातला काही भाग मुद्दाम सर्वांसाठी देत आहे....


प्रेमाच्या पहिल्या उच्चाराइतकचं उत्कट गाईन म्हणते मी सारे काही स्वतःमधून
आणि देवाची फूलसुपारी पदरात न्यावी जपून, वारीच्या लोटत्या गर्दी मधून
तशी नेईन म्हणते कविता भवतीच्या कोलाहालातून...
ही दिंडी खरं तर अजून पंढरपूरला पोचलेली नाही. वाटेतच आहे. पण वाटेत कुणीतरी थांबते. ते जेऊ घालतं, पाणी पाजतं आणि म्हणतं, ` बाई, इथवर आलिस ! शाबास तुझा ! आता धरला नेम सोडू नको. `
आज मिळालेला हा पुरस्कार असा आहे...


अशा पुरस्काराचं जसं व्यक्ति म्हणून लेखकाच्या वैयक्तिक वाटचालित स्थान असतं तसं आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जगातही एक स्थान असतं. एखादी मोठी पडझड चालू असताना जो गोंगाट आणि कोलाहाल असतो, त्यातून घातल्या गेलेल्या या दिलाशांच्या हाका असतात. काही चांगलं टिकलेलं आहे, वाचलेले आहे, काही सांभाळलं गेलं आहे, काही नव्याने निर्माण होत आहे- ह्यासाठी समाजाला हाक मारून हे सांगणं आहे.
पडझड तर गेल्या १००-१५० वर्षात अनेक प्रकारची झाली. घट्ट आणि चिरेबंदी कुटुंबव्यवस्थेची झाली. घातक आणि अन्यायी जातिव्यव्स्थेची झाली. आग्रही आणि एकाधिकारी धर्मव्यवस्थेची झाली. स्त्रीच्या कृतिम प्रतिमेची झाली. तिच्यासाठी निषिध्द अशा व्यवस्थेतल्या अनेक परिसरांमध्ये तिच्या अस्तित्वाला जागा निर्माण करून देण्यासाठी झाली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये झाली. साहित्य आणि इतर कलांमधल्या संकुचित भूमिकांचीही झाली.
ही पडझड आवश्यकच होती. पण त्याचबरोबर काही विधायक गोष्टींनाही धक्का लागला आहे. नुसत्या भौतिकवादाच्या नव्हे तर चंगळवादाच्या विळख्यात वाड्मयाची आणि खरे तर सर्वच कलांची अवस्था बिकट होत चालली आहे. जीवनाच्या संदर्भात कलेच्या निर्मितीचा आणि परिणामकतेचा विचार गौण ठरतो आहे आणि साहित्याला काय आणि इतर कलांना काय विक्रयमूल्य देण्याच्य़ा प्रक्रियेला गेल्या दोन दशकांमध्ये कमालीचा वेग आला आहे.

माणसाच्या जगण्यातही नैसर्गिकता नष्ट होण्याची प्रक्रिया काही आजच सुरू झालेली नाही. मानवी संस्कृतिच्या विकासात लगटूनच मानवेतर सृष्टीपासून माणूस दूर होण्याची प्रक्रिया अखंड सुरू आहे. आपला सांस्कृतिक विकास म्हणजे एका बाजूनं प्रचंड भौतिक प्रगतिचा इतिहास आहे. दुस-या बाजूने मानवजातीनं मानवेतर सृष्टीवर मिळवलेल्या वर्चस्वाचा इतिहास आहे.
आपण जीवनाच्या जवळ असण्याला, सृष्टीच्या लयीत असण्याला, चैतन्याचा विस्तारशील अनुभव घेण्याचा उर्मिला कसे पारखे आणि विन्मुख होत आलो आहोत याचा इतिहास आहे. आपण सर्जनाच्या प्रवाहांची मुखं बंद करीत आलो आहोत.

शतकानुशतकं आपण स्त्रियांचा, आदिवासींच्या, व्यवस्थेच्या तळाशी असणा-या माणसांचा आवाज दडपत आहोत. आपण अत्यंतिक व्यक्तिवादाच्या टोकावर चढताना सामूहिक जगण्याचं वळण नव्हे तर भानही गमावत चाललो आहोत.
साहित्यिक म्हणून या भौतिक वास्तवाचा आवाज शब्दात उमटवण्याची जबाबदारीही आम्हा लेखकांची आहे. भोवतालच्या सपाटीकरणाच्या गजबज गर्दीत आपला आवाज आणि आपला अनुभव यांचं प्रामाण्य ठेवून मनुष्यकेंद्री निर्माणात गुंतलेला साहित्यकार हे काळानं निर्माण केलेल्या संहारप्रधान प्रश्नांना सगळ्यात समर्पक आणि सर्जक उत्तर असू शकते ,असा माझा विश्वास आहे.

माणसाला जगायला, टिकायला, समृध्द व्हायला उपयोगी पडणारा या जगातला प्रत्येक लहान मोठा स्त्रोत वाचवू पाहणा-यांची जी एक अल्पसंख्य जमात आहे त्यात मी अभिमानानं सामिल आहे.
यासाठी माझ्याजवळ मदतीला आहे तो शब्द आहे. शेवटी आपलं साहित्य किती टिकेल किंवा किती गाजेल याचा विचार करून आपण लिहित नसतोच. समाजातल्या उदार, समन्वयशील, विधायक रीतीने बंडखोर आणि कसदारपणे परिवर्तनशील अशा विचारधारांचा, संस्थांचा आणि व्यक्तिंचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अभिजतांच्या संस्कृतिला बळ देणा-या लोकसंस्कृतीक बंध-अवबंधांचा शोध घेते आहे. परंपरेच्या जड अशा संदर्भाचौकटीतून भारतीय स्त्रीला बाहेर काढून तिचा जिवंत, संवेदनशील चेहरा न्याहाळण्यासाठी धडपडते आहे.

माझ्या कवितांमधून, कथांमधून, ललित-गद्यामधून—एकूणच सगळ्या लेखनातून स्त्रीविषयक आस्थेचा एक पाझर आहे असं इतरांप्रमाणे मलाही कळतं. पण मला असं खात्रीनं वाटतं की, प्रेम आणि सर्जन या दोन्ही गोष्टींशी आतड्यानं बांधली गेलेली स्त्री आजच्या अस्थिर, पोखरलेल्या आणि तुटलेपणाचा शाप भोगणा-या जगात निर्माणाच्या बाजूनं ठामपणे उभी राहू शकते.
साहित्य ही माणसाला माणूस बनवणारी गोष्ट आहे यावर माझा विश्वास आहे.
आण तूझ्या लालसेची, आण लोकांची आभागी
आण माझ्या डोळियांची, पापणी ठेवीत जागी

मर्ढेकरांच्या या शपथेवर माझा विश्वास आहे. कविता ही आयुष्याचा चेहरा उजळून टाकणारी सोबत आहे यावर माझा विश्वास आहे. माणसांमधल्या आणि माणूस आणि सृष्टी यांच्यामधल्या संवादाच्या शक्यता शोधत राहण्यावर माझा विश्वास आहे.
जातिवंत कार्यकर्त्यांप्रमाणेच जातिवंत लेखकालाही काळानं समोर उभ्या केलेल्या दुःखांचं आणि संकटांचं भय वाटता कामा नये. फक्त त्यातला मनुष्यमैत्रीचा स्पर्श घडविणारी दुःखं नेमकी हेरता आली पाहिजेत. चैतन्यशील संकटं हेरता आली पाहिजेत आणि इतिहासाचा कौल आपल्या बाजूनं मागता आला पाहिजे.


हे शब्द तुमच्या पर्यत पोचविणारा मी नाममात्र....
सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com-

आम्ही खूप बिझी असतोसध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

ईमेलवर पाठवतो ना ई-ग्रीटिन्ज
कोणाच्या गाठीभेटी मात्र घेत नाही
पाठवतो ऑरकुट-फेसबुकवर कलर मेसेजेस
पण समोर आलो तर ओळखतसुद्धा नाही
सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

ऑनलाइन चाटवर आम्ही सदैव हजर
ओह क्रॅप ! समोरासमोर मात्र बोलत नाही
बोलाचीच कढी नेटवर आणि बोलाचाच भात
भेट-गिफ्ट्स प्रत्यक्ष आम्ही कधी देत-घेत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

पत्रा-बित्राचा जमाना गेला कधीच
पोस्ट खात्याला आम्ही त्रास देत नाही
फोनवर बोलायला आहे कुणाला वेळ
"न्यू ईअर विश"चा फोनही आम्ही करत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

‘थर्टी फर्स्ट’ला मात्र रात्रभर आमची पार्टी
एखादं वर्षही अज्जिबात चुकवत नाही
वेळ काढून मुद्दाम एसेमेस् करतो ना फॉरवर्ड
सेंड टू ऑल झटपट, एकाचे नावही सुटत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही
एकदम म्हणजे
एकदमच बिझ्झी !


- अनुराधा म्हापणकर

Monday, January 17, 2011

लातुरोत्सवात विलासरावांची दूरदृष्टी


बुधवारी लातूर शहरात तीन महत्वाचे कार्यक्रम झाले आणि पत्रकारिता, सांस्कृतिक आणि सहकार आशा तिनही क्षेत्रातली मंडळी १२ जानेवारीसा एकत्रित झाली होती. यामुळे लातूर शहराला नवी झळाळी प्राप्त झाली होती. एकीकडे सुरेश भटेवरा यांना एकमतचा पत्रकारितेचा गौरव. तर दुसरीकडे लातूर मध्ये पहिल्यांदाच भरविलेल्या लातूर फेस्टिव्हलचा उत्सव. बुधवारी समारोप समारंभानंतर तर कैलाश खेरच्या गाण्यांनी लातूरकरांना संगीतात न्हाऊन काढले.
आणि एकडे मांजरा सहकारी साखर कारख्यात २० मेगावॅटच्या वीजप्रकल्पाच्या कार्याचा भूमिपूजन समारंभ ..तर कारख्याच्या मळीपासून सुरू झालेल्या रोड ६० हजार लिटर तयार केलेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन. एका मंडपात...आणि मांजरा साखर कारख्यानावर सुमारे ५००० हजार शेतक-यांच्या उपस्थितीत झालेला सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला राजकीय फडांची भाषणबाजी....
या सा-याचे श्रेय निर्विवाद जाते ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग खात्याचा भार वाहणारे लातूर जिल्ह्याचे कर्ते माननिय विलासराव देशमुख यांचेकडे....
साखर कारखान्यातील मळीपासून तयार होणारे इथेनॉलची मागणी लक्षात घेता त्याचा मोठा ग्राहक वाढू शकेल या उद्देशाने मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले. पुण्याच्या युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजला हे युनिट बनविण्याचे काम मिळाले आणि अवघ्या सहा महिन्याच्या आत तो तयारही झाला.
प्रदीप ढोकरे ( कार्यकारी संचालक ), गिरीश देशपांडे (संचालक) आणि सतीश थोरात (संचालक) या तीन मराठी तरूणांनी हा प्रकल्प साकार केला आहे. १९९६ पासून ६० साखर कारखान्यांना विविध पातळीवर प्रकल्प तयार करून देणा-या या कंपनीचा कारखाना पुण्यात तळवडेच्या औद्योगिक परिसरात आहे. या उद्योजकांना लातूरला हा प्रक्लप उभी करण्याची संधी नामदार विलासराव देशमुख यांच्यामुळे प्राप्त झाली.. विलासरावांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ झाला. मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या व्यासपीठावरुन जाहिर भाषणात विलासरावांनी युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजने इथे नुकसानीत काम केल्याचे सांगून टाकले आणि . मांजराचे काम पाहून तुम्हाला आणखी कामे मिळतील असा विश्वास दिला.शिवाय उपस्थित साखर आणि सहकार क्षेत्राच्या मंडळींना युनिव्हर्सलच्या मंडळींना युनिव्हर्स बनविण्यासाठी इतर साखर कारखान्यांनी कामे देण्याचे ठणकाऊन सांगितले.
यात त्यांच्या कामाची पावती तर होतीच पण असे प्रकल्प इतर साखर कारखांन्यांनी राबवून कारखान्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभे राहावे असे आवाहनही होते. कंपनीच्या दृष्टीने विलासरावांची ही शाबासकी पुढे काम मिळण्यासाठी आणि ते तेवढेच यशस्वी करण्याचे बळ वाढविणारेही होते.
हा नविन आधुनिक तंत्रावर मल्टी प्रेशर destiletion अणि continuous फ़ेर्मेन्ततिओन वापरून हा प्रकल्प केला आहे .PLC automation असलेला हा प्लान्ट आहे . त्यातून international दर्जाचे alcohol production होत आहे . Also one can produce RS or ENA or Ethanol from Molasses,या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ५०० लोकांचा हातभार लागला..तेव्हा असे काम यशस्वी करणा-या या कंपनीचे भवितव्य किती उज्वल आहे तेच सिध्द होते.
आत्तापर्यत ५२ पुरस्कार प्राप्त झालेला मांजरा सहकारी साखर कारखाना हा आर्थक दृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. ऊस देणारा शेतकरी कारखाना योग्य भाव देते म्हणून खूष आहे.. तर सहकारी साखर कारखाना कसा यशस्वी चालवावा हे महाराष्ट्राला दाखविणारा आदर्श कारखाना आहे. सहकार खात्याचे मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या मते आता या कारखान्याने राज्यातले तोट्यात चालणारे साखर कारखाने चालवायला घ्यावे अशी विनंतीही इथे केली.
एकूणच मांजरा साखरचा हा कार्यक्रम राज्यातल्या सर्वात मोठ्या साखर कारखान्याचा पसारा पाहण्याची संधी मिळाली याचा अधिक आनंद होतो आहे.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
Mob_ 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com