Friday, March 11, 2011

कणखर आणि कोमलता म्हणजे कुसुमाग्रज



अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावरचा कार्यक्रम त्यांच्याच स्मृतींना उजाळा देउन केला गेला. ज्ञानपीठ विजेते वि. वा शिरवाडकर साहित्यिकांच्या अभ्यासक डॉ. माधवी वैद्य यांनी स्वतःच्या कुसुमाग्रजांच्या आठवणींनी पुन्हा एकदा जागृत केले. त्यांच्या मते कुसुमाग्रजांच्या आठवणी बकुळीच्या फुलासारख्या आहेत. आपण सहजच त्या सुगंधांचा दरवळ मनात घेत रहातो.
यातून उमजलेले कणखर आणि तेवढेच कोमल कुसुमाग्रजांमधील काही कट्ट्यावरून घरी आलेले काही मुद्दे-
- कवीचे शब्द बदलण्याचा हक्क बदलण्याचा कुणालाच नाही, ह्या ठाम मताचे कपसुमाग्रज.
- अत्यंत स्वागतशिर व्यक्तिमत्व.
- तात्यासाहेबांच्या घरी दरबार रोज भरत असे. यात कवी, कलावंत, साहित्यिक, विद्यार्थी यांचेबरोबर माळी, रिक्षावालेही असत.
- नाशिकला त्यांनी सांस्कृतिक, साहित्यिक रूप दिला. नाशिकनेही त्यांना आपले मानले.
- त्यांचे आयुष्य म्हणजे आळवावरचे पाण्यासारखे थेंब..सगळ्यात असूनही कशातच नसल्यासारखे.
- त्यांचा सहवास..त्यांचे घर म्हणजे देवघरासारखे...जिथे तुम्ही सहजच नम्र होता.
- त्यांना पाहिल्यानंतर आपलं दुःख, वेदना सहजपणे हरपून जायचे.
- ओळखलतना सर मला..या कवीतेचा खास उल्लेख... त्यांच्याकडून अनेकांनी आशिर्वाद घेतले.
- पाठीवरती हात ठेऊन..तुम्ही फक्त लढ म्हणा..हा मेत्र मनसेचे राज ठाकरे यांनाही भावला.. त्यांचे आशिर्वाद...
- माती आणि आकाशाशी संवाद साधणारे शब्द-भावनांचे नाते ते आपल्या लेखनात फार वेगळे व्यक्त करीत असत.
- त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास होता.
- कणखर आणि तेवढेच कोमल असे त्यांचे लेखन आणि व्यक्तित्वही होते.

आज कुसुमाग्रज वेगवेगळ्य़ा घटनांमधून व्यक्त झाले. पुण्यातल्या बाजीराव रोडवरच्या बुक गॅलरीच्या सुंदर पुस्तक दालनासमोर..अक्षरधाराच्या कट्ट्यावर... वाचकांची गर्दी फार नव्हती..पण होते माजकेच साहित्यप्रेमी.
आजुबाजूच्या परिसरातही त्यामुळे आपोआपचा साहित्याचा दरवळ पसरला गेला. आत येण्याचे न लक्षात येणारा श्रोता बाहेर उभा राहून कोण काय बोलतोय हे टिपत होता. तसा बाहेर उभा राहूनही तो हा अनुभव घेत होता.
पिंपळाच्या पारावर..पायरीवर अंथरलेल्या बैठकीवर बसून आज तो कुसुमाग्रज अनुभवीत होता..
उद्या दुसरा कोणी... नक्कीच या उपक्रमाला वाचक प्रतिसाद मिळेल..तो साहित्यिकांना आणि वाचकांनीही खेचून आणेल...राठिवडेकर बंधूंना शुभेच्छा....


करीन म्हणतो सेवा...वाचकांची
त्याला देईन म्हणतो..शब्द..जगण्यासाठी
जिवन अधिक सुंदर करण्यासाठी
वाचायला लावेन... वाचकांना
बोलते करेन लेखकाला...त्याच्या भावनेला
करीन की संसार..
हाच..
पुस्तकांचा....प्रदर्शनाचा
आहे की नाही हा छान उपद्व्य़ाप !

सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdr.boogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276

Wednesday, March 9, 2011

जगण्याचं आत्मभान

------------------------------------

अनेक गोष्टींचं वाईट वाटतं….एखादा असा का वागला?…..दुसरा असा का वागला नाही?…..हे मिळालं नाही…ते असच का मिळालं?…सर्वत्र सांसर्गिक असमाधान!!…दुसर्‍याच्या वागणुकिने द्विगुणित झालेलं…

पण काही सल असे काही असे जन्माला येतात…जे फ़क्त स्वत:लाच छळतात….पुन्हा पुन्हा मनाच्या दारावर थाप देत रहातात…आणि आत आत खोल एक “अपराधीपणा” लपून कोडगा झालेला असतो त्याला साद घालत रहातात….

ज्या ज्या वेळी मी भल्या मोठ्या मॉल मधे किंवा मार्केट मधे यथेच्छ खरेदी करुन निघते आणि गाडी सिग्नल पाशी येउन थांबते…तेव्हाच हा सल असा जागृत होतो..रस्त्यावरच्या भिकार्‍यांच्या पोरांच्या रुपाने!!….त्यांचे भुकेले चेहेरे….फाटके कपडे…हाताताली लाल फुलं विकायची धड्पड अतिशय अस्वस्थ करून सोडते…एक कळ उमटते आतमधे….मी त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत नसते…आणि मी परिस्थिती बदलू ही शकणार नसते…मग हा सल नक्की कसला?…गरज नसताना भरमसाठ खरेदी केल्याचा?…की कितिही वस्तू आणा….काहीतरी राहिलचं..असं दामटून मनाला सांगणार्‍या असमाधानाचा?…नक्की त्या क्षणी काहीही कळत नाही….पण खोलवर कुठेतरी मन ओरड्तच…अरे, हे काय चाललय?….सगळं आहे…गाडी आहे,पैसा आहे,घर आहे,ए.सी आहे,..भौतिक सगळ्या सुखसोयी आहेत….या पलीकडे मी खरचं विचार करते का?

…..माझी कामवाली बाई रोज १० घरी कामं करते..जी घरं ५-६ खोल्यांची आहे…तरीही ती आनंदात असते…संध्याकाळी छान जमेल तसा मेकप करून आवरून परत भांड्यांसाठी येऊन जाते…तिचं समाधान मला कधितरी मिळेल का?….तिची कामातली नियमितता तरी माझ्यांत आहे का?

इथे एक मुलगा विद्यार्थी आहे….जो दोन पायांवर उभाच राहू शकत नाही…प्राण्यांसारखं त्याला दोन हात आणि पाय वापरून सर्व शरीर वाकवून चालावं लागत..दोन पायांत आणि दोन हातांत चपला घालून….तो ज्या झपाट्यानं शिकताना,चालताना दिसतो….स्वत:ची अक्षरश: लाज वाटते….कसा आला असेल तो इथपर्यंत…किती झटला असेल..आणि अशी अनेक अनेक उदाहरणं….मग आपण केवढा वेळ नको त्या विषयांवर वाया घालवतो याची बोच सतत पाठलग करते….आणि तो तिथे व्यवस्थित लेक्चर्स,ए़क्झाम्स देत असतो…जिद्दिनं!!

असे अनेक सल घेऊन जगताना…नुसतच काव्यमय लेखन करणही कधी कधी बोचतं….रिऍलिटी नावाची गोष्ट खरचं माझ्या वयाच्या सुखवस्तू पिढिला कधी खरचं कळते का?…..मुलांची ऍड्मिशन, अभ्यासाची काळजी, बॅंक बॅलन्स,घराचे लोन चे हफ़्ते ह्यालाच फ़क्त रिऍलिटी समजणारे आम्ही त्या पलिकडच्या सुन्न करून टाकणार्‍या एका क्रुएल जगासाठी कधी वेळ काढू शकतो का?….मिळमिळीत शब्दांचे चार शाब्दिक फवारे मारून भरल्या पोटी ”कसं झालं पाहिजे या जगात” हे बोलणारे स्वत: त्या दलदलीत उतरू शकतात का?..मी उतरू शकते का?…खूप प्रश्न आहेत…अनेक सल आहेत…एकटी असतानाचे मनाचे असंख्य कंगोरे मलाच चकित करणारे आहेत..सर्व संवेदना बोथट होत नाहीयेत ना अशी भिती वाटते कधी….आपलं व्यवस्थित चालू आहे ना मग बस्स!…हा विचार जिथे तिथे दिसतो आणि आतला सद्सदविवेकबुद्धी चा सल मनाला कुरतडत राहतो..”नुसतं लिहून कशाला शब्दांचे खेळ मांडायचे?” असं म्हणणारे खूप सापड्तील….पण हा सर्व उहापोहच अतिशय व्यक्तिसापेक्ष आहे.

त्या सर्वांसकट जगण्याचं आत्मभान आणि स्व विसरून समाधानाने आला क्षण जगता यावा एवढा प्रयत्न घडला तरी सध्या पुरे…..

सुचेता
Sucheta Joshi Abhyankar
http://blogs.bigadda.com/suc4061538/2010/08/02/%E0%A4%B8%E0%A4%B2/

------------------------------
जे भावते ते लिहिले ....माला वाटते इथे ..केवल मलाच व्यक्त करण्या शिवाय जे कही चांगले लेखन वाचनात आले तर तेहि तुम्हाला सांगावे ... सुचेता जोशी-अभ्यंकर यांचा ब्लॉग वचनात आला...हा त्यापैकीच एक
ते लेखिकेच्या संमतीने तुमच्यापर्यंत पोचवित आहे..
सुभाष इनामदार,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, March 7, 2011

`कोकण विविध दिशा आणि दर्शन`

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ साकार

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!


अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?

ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.

हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे. माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..

असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.

आता कार्यक्रमाकडे वळताना...

`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.

सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते.

यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276
www.subhashinamdar.blogspot.com
and
www.culturalpune.blogspot.com

Sunday, March 6, 2011

भावनांशी प्रामाणिक राहून सादर केलेला नवा काव्य-संगीताविष्कार...अमलताश..


हे निमित्त आहे ते कांही वर्षापूर्वी पुण्यात भावसंगीताच्या क्षेत्रात गाजत असलेल्या सुचेता आणि प्राजक्ता जोशी या दोन सुरेल गायिकेंच्या पुर्नप्रवासाचे... एक संसारानंतर पुन्हा व्यासपीठावर गातेय..त्याच भावूकतेने...हळूवार संवेदनाक्षम सूरात...तर दुसरी सुचेता पुणे सोडून बाहेर पडली..मुंबई नंतर दिल्लीत स्थिरावली.. फिरोदिया करंडकाच्या स्पर्धसाठी तात्काळ रचना करून ह्षीकेश रानडेला गायनाचे प्राईझ देणारी..आणि आता तीच सुचेता आता पुण्यात साकारत होती स्वतः लिहलेल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभात...आणि तीने संगीत दिलेल्या गाण्यांनाही पुण्यात या निमित्ताने चालीला दाद दिली..पुणेकरांनी आणि संगीत क्षेत्रातल्या मान्य़वरांनी..म्हणून तीच्या कार्यक्रमाची ही दखल..

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
------------------------------------------
अभिजात..आश्वासक..अमलताश !



शिशिर प्राक्तन घेऊन बनती
आयुष्याची वळणे दुर्गम,
अशाच वेळी सतेज कांती
घेऊन येतो हा वृक्षोत्तम
देखुन त्याची रूपझळाळी
भविष्यात रे पहा..
सदेव नूतन वेष लपेटी
अमलताश हा पहा !


दुःख, वेदना, निराशा असा नकारत्मक दैवभोगांवर मात करत भविष्याकडे पाहण्याचा आशावादी दृष्टीकोन सूचित करणारा ` अमलताश... ` एक दुर्मीळ वृक्ष .. अभिव्यक्त झाला अमलताश या कविता-संग्रहातून आणि काव्यप्रेमी पुणेकर रसिकांना एका अभिजीत काव्यनिर्मितीची आश्वासक चाहुल या निमित्ताने लागली.. काव्य आणि संगीत या दोन्ही दृष्टीने एक आगळा कार्यक्रम ऐकण्याची संधी लाभली.
सुचेता जोशी-अभ्यंकर या नवोदित कवयित्रीच्या अमलताश या पहिल्या काविता संग्रहाचे प्रकाशन २ मार्चला पुण्यात कविवर्य सुधीर मोघे यांचे हस्ते झाले..आणि कवितांवर आधारित सात गीतांचाही कार्यक्रम रंगला आणि थेट पोचला रसिकांच्या ह्दयात.
मूळचा गोड गळा आणि त्यावर झालेले अभिजात संगीताचे संस्कार यातून सुचेता जोशी प्रथमतः एक गुणी गायिका म्हणून रसिकांना भावली. अमृताची गोडी, मी निरांजनातील वात..अशा अनेक रंगमंचीय आविष्कारातून. त्यानंतर विवाहानंतर सुमारे आठ वर्षांच्या कालखंडात संगीताशी जुळलेले हे नाते कसोशिने जपताना . तसेच मुंबई, दिल्लीत वास्तव्य असताना कविमनाच्या सुचेताला एक अनामिक अस्वस्थता बेचैन करून गेली. याच भावविश्वात ती कवितेच्या रूपाने व्यक्त होत गेली. आणि अखेर साकार झाला पुस्तकस्वरूपातला उत्तम आविष्कार स्वानंद प्रकाशनाने साकारले पुस्तकरूपी ` अमलताश`.
`तरीही वसंत फुलतो` अशा आशावादी शब्दातून व्यक्त होणारे कवी सुधीर मोघे यांनी आपल्या प्रस्तावनेत सुचेता बद्दल लिहितात `..वाट्याला आलेलं आयुष्य..त्यातील सगळ्या चढ-उतारासकट जगत राहिली..स्वतःच्या मनाच्या आंदोलनांना धीटपणे सामोरी जात राहिली.. आणि मग आपसुकच कवियत्री झाली.... स्वतःची कवितांची वही घेऊन इतक्या वर्षांनंतर भेटायला आली. ,,तेव्हा मी नवलाईने आणि कौतुकाने न्याहळत राहिलो. अरे ही तर तिच. आपण बारा-तेरा वर्षापूर्वी पाहिलेली..ऐकलेली गुडिया...आज हलके फुलके परिपक्व होत चाललेल्या एका नव्या रूपात आपल्यासमोर बसली आहे... ही गात रहाणार. .ही लिहित राहणार...` आपल्या मनोगतातून त्यांचं भारावलेपण अक्षरशः अनेक वेळा व्यक्त झाले आहे.
कार्यक्रमातही सुधीर मोघे हे न रहावता शेवटच्या गाण्याच्या सादरीकरणाच्या आधी रंगमंचावर आले..आणि सुचेता मध्ये केवळ आश्वासक नव्हे तर संजीवनी मराठे, पद्मा गोळे आणि इंदिरा संत काव्याची परंपरा आसल्याची भावना व्यक्त करून तिच्या भावी आयुष्य़ाला आशिर्वाद देऊन गेले. इतकेच नव्हे..तर तिने असेच लिहित रहावेच पण असे संगीताविष्कार आपल्या कवितांचा सादर करण्याची वाट स्विकारण्याची विनंती केली...हा कार्यक्रम ही त्याची सुरवात आहे.....
सुचेता जोशी-अभ्यंकर हिने आपल्या मनोगतातून बोलताना संगीताला प्रथम प्राधान्य होते.. तरीही नकळत अनेक विषयांचे पडसाद शब्दातून उमटत राहिले. कधी भावनांचा कोंडमारा म्हणून तर कधी भावनांचा विस्फोट म्हणून . असा निर्मितीमधल्या प्रेरणा स्त्रोतांचा धावता आढावा घेतला.
जोशी कुटुंबीयांचे जवळचे स्नेही संजय पंडित यांनी सुचेता जोशी यांच्या संवेदनाशिल व्यक्तित्वाचा उल्लेख करून त्यांचे संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रीशी असणारे साम्यही नमूद केले.
उत्तरार्धात या काव्यसंग्रहातील निवडक सात कविता प्राजक्ता रानडे ( सुचेताची बहीण ) , ह्षीकेश रानडे, अपर्णा केळकर आणि स्वतः सुचेता जोशी यांनी आपल्या स्वराविष्कारातून सादर केल्या. या सर्व संगीतरचना सुचेता जोशी यांच्या होत्या. त्याला संगीत संयोजन लाभले होते ते केदार परांजपे यांचे.. तेवढेच समर्पक.
कौतुकाने जमलेली पुणेकर रसिकमंडळी नकळत या सुंदर, मोहक आणि अभिजात आविष्कारात रंगून गेली होती. घरी जाताना एक काव्य-संगीताना आश्वस्त करणारा कार्यक्रम दिल्याबद्दल सुचेताचे आभिनंदन करीत पुन्हा असा कार्यक्रम कर..आणि आम्ही नक्की तिकीट काढून येऊ असा आश्वासक आशीर्वाद देउन परतली.
ब-याच कालावधीनंतर काहीतरी शुभ्र, नवे, टवटवीत आणि अभिजीत असे उगवू पहात आहे. त्याची जाणीव ठेऊन दिल्लीवरून सुचेताने येऊन वारंवार आपल्या कवीतांचा संगतमय आविष्कार करावा यासाठी हट्ट करून बसणार आहेत.
घोर काननी गर्द त्या वनी
शीळ घालीत मंजूळ वारा
स्तब्ध तरूंवर हळूच चढतो
गूढ अनामिक एक शहारा
गवसत नाही गरी मला तो
मोह बावरा चित्र देखणे
कधी बहरतो कधी आकसतो
चंद्र मनीचा कलेकलेने....
अशा कलेकलेने फुलत जाणा-या काव्यप्रवासाला आमच्या रसिकांच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि त्याची गीतेही ऐकण्याची संधी मिळावी हिच इच्छा.