Friday, April 8, 2011

पुलं आणि भीमराव पांचाळे




कधीतरी आपणच आपल्या नकळत लिहिलेलं एखादं वाक्य आपल्यालाच आवडून जातं. ‘भीमराव पांचाळे या चार नि तीन सात शब्दांत गझल मराठीत गाते,’ हे वाक्य त्यातलंच. भीमरावांच्या मुलाखतीच्या इण्ट्रोची सुरुवात अशी लिहिली होती. मुलाखत स्मरणिकेसाठी होती. स्मरणिका भीमरावांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी.

कार्यक्रम छानच झाला. रवींद्र नाट्यमंदिर संपूर्ण भरून गेलं होतं. खाली आणि गॅलरी संपूर्ण. पासेस आधीच संपले होते. त्यामुळे लोकांनी आत शिरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. खुर्च्या भरल्या होत्या. घरीही कधीच खाली बसली नसतील अशी माणसं बायकापोरांसकट जमिनीवर बसली होती. गर्दी जशी भरगच्च तशीच त्यांची दादही. भीमरावांची प्रत्येक जागा दाद घेत होती. अगदी त्यांचं सत्कार समारंभातलं हसणंही दाद घेत होतं. भीमरावांचं कौतूक सुरू झालं की ते अंग चोरून ऐकायचे. कुणी कौतूक केलं की ते कान पकडून तौबा करायचे. हे सारं छान होतं. अगदी सुगंधी.


सत्कार समारंभ सुरू असताना माझं नाव घोषित झालं. स्मरणिकेचं प्रकाशन होत होतं. नेमका तेव्हाच भाषणं सुरू होती, म्हणून आमच्या रुद्रला सूसू करायला घेऊन बाहेर गेलो होतो. स्मरणिकेचा संपादकच गायब होता. मी आणि सुनील कुहीकरजी असे आम्ही दोघे स्मरणिकेचे संपादक. खरंतर विदर्भ लोकप्रतिष्ठानच्या मित्रमंडळींनी मला अतिथी संपादक बनवलं होतं. पण अतिथी वगैरे म्हटल्यावर मलाच तिथं परकं वाटू लागलं. म्हणून मग आग्रह करून संपादक बनलो.

कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच स्मरणिकेला दाद मिळाली. राजेंद्र हुंजे भेटला. भीमरावजींबरोबर निखिल वागळे लवकरच ग्रेट भेट करणार आहेत. त्यासाठी रेफरन्स म्हणून ही मुलाखत राजेंद्रला मेल केली होती. मुलाखत वाचून वागळे खुश झाले म्हणे. भीमरावजी खूपच मोठे आहेत. बाबासाहेबांचं नाव घेऊनही जे लोक करू शकत नाहीत. ते भीमरावजींनी किती शांतपणे केलंय, अशा आशयाची प्रतिक्रिया वागळेंनी व्यक्त केली. याचं पुस्तक व्हायला हवं, असं ते म्हणाले. वागळेंच्या संवाद साधण्याच्या आणि वाद घालण्याच्या स्टाईलविषयी आदर असला, तरी त्यांच्याशी सहमत असण्याचे मौके क्वचितच येतात. त्यातला हा एक दुर्मीळ मौका. स्मरणिकेतून भीमरावांचं मोठेपण लोकांपर्यंत पोचावं, अशी इच्छा होती. ती बहुतेक पुरी झालीय. त्याचं श्रेय अर्थातच सुनील तांबेला. मुलाखतीवर सुनील, प्रमोद आणि माझं नाव आहे. पण मुलाखतीची जी पाच सात सेशन्स झाली. त्यात मी अर्धा वेळ आणि प्रमोद पावपेक्षाही कमी हजर होता. यात जे काही चांगलं आहे ते सुनीलचंच.

स्मरणिकेचं अनेकांनी भेटून आणि फोन करून कौतूक केलं. पण तो त्यांच्या सौजन्याचा आणि सभ्यपणाचाच भाग आहे. त्यात अनेक चुका राहिल्यात. ले आऊट, कव्हर चांगलं झालेलं नाही. बहुतांश लेखांवर संपादकीय संस्कारच नाहीत. लेखांचं प्रयोजनच नीट कळत नाहीय. शुद्धलेखनाच्या चुका राहिल्यात. या सगळ्याची जबाबदारी केवळ माझी आहे. अडचणी खूप आल्या. पण आता त्या कशाला सांगायच्या? चुका राहिल्यात हे माहीत असूनही अंक प्रिंटिंगला सोडावा लागला. आम्ही दोघाही संपादकांनी लेख टायपिंगला सोडल्यानंतर थेट प्रकाशन झालेला अंकच बघितला.

स्मरणिका प्रकाशन झाल्याचं कळल्यावर बघायला स्टेजमागे गेलो. आमचा जुना दोस्त मनोज भोयर होता तिथे. त्याने खूप चुका राहिल्यात म्हणत आपलं परखड मत व्यक्त केलं. तो बोलला ते योग्यच होतं आणि माहीतही होतंच. मनोजला इतकी वर्षं ओळखत असल्यामुळे त्याला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, हेही माहीत होतं. पण उगाचच डिस्टर्ब झालो. थोड्या वेळाने स्मरणिका हातात आली. ती बघून तर आणखीनच डिस्टर्ब झालो. दोनेक गझला नीट ऐकताच आल्या नाहीत. मग सगळं डोक्यातून काढून टाकलं. शेवटचे चार दिवस मिळाले की ही रात्री जागवून हे काम चुटकीसरशी निपटून टाकू, असा माज होता. तो सगळा उतरला होता. काही ना काही कारणाने शेवटचे चार पाच दिवस कामाला हातच लावता आला नाही. सगळ डोळ्यासमोर जाताना दिसत होतं. काहीच करता आलं नाही. आमच्या धंद्यातल्या लोकांना चुका दिसल्या. पण सर्वसामान्यांना स्मरणिका आवडलीय. त्यात समाधान मानायला हवं.

दत्ता बाळसराफांनी नवा लेख दिला होता. पण स्मरणिकेत त्यांचा जुना लेखच लागला. गीतवहिनींचाही नवा लेख लिहायचा राहून गेला. त्यामुळे भीमरावांवर स्मरणिका काढण्यासाठी नवं निमित्त शोधून काढायलाच हवं. आणि पुन्हा एकदा भीमरावांची फर्माईशी मैफलही जुळवून आणायलाच हवीय, कारण माझी फर्माईश राहून गेलीय. मैफल सुरू होण्याआधीच मी निवेदक रवी वाडकरांकडे चिठ्ठी दिली. त्यावर फक्त दुष्यन्त एवढंच लिहिलं होतं.

भीमरावांनी दुष्यन्त कुमारची एक गझल बांधलीय, ‘ये ज़ुबाँ हमसे सी नहीं जाती’. ती त्यांनी पूर्वी एकदा कुठेतरी सादरही केलीय. पण मी अद्याप ऐकलेली नाही. विशेषतः त्यातले दोन शेर ऐकायचे होते.

एक आदतसी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती

आणि

मुझको ईसा बना दिया तुमने
अब शिकायत भी की नहीं जाती



पण ही फर्माईश सादरच झाली नाही. भीमरावांनी ही गझल घेतलीच नाही. शिवाय ए. के. शेखासाहेबांची ‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय’ होत नाही म्हटल्यावर बसल्याजागी ओरडूनच फर्माईश केली. वेळेअभावी त्याचेही फक्त दोनच शेर झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशीच फर्माईशी मैफल भरवावी लागेलच. पर्यायच नाही. कदाचित एकसष्टी, काय माहीत?

हा साठीचा योग जुळून आला, यशस्वी झाला. त्याच्यामागे दोन माणसं. एक भीमरावजी आणि दुसरा आमचा प्रमोद चुंचूवार. मला जितकं माहीताय तितकं, हा सोहळा हे त्याचंच डोकं. विदर्भ लोक प्रतिष्ठानही त्याचंच ब्रेनचाईल्ड असावं, अशी मला खात्रीशीर शंका आहे. तरीही तो त्याचा कोणताही पदाधिकारी नाही. तो फक्त संस्थापक सदस्य आहे. सोहळ्याचा कर्ताधर्ता तोच, पण तो स्टेजवर नाहीच. कुणाहीपेक्षा उत्तम भाषण करू शकणारा प्रमोद नेहमीसारखा पडद्याआड. आणखी एक पडद्याआड शांतपणे धावणारा मोठा माणूस मला तिथे दिसला, तो म्हणजे धर्मेंद्र जोरे.

कार्यक्रम विदर्भाच्या नावाने झाला. त्यामुळे त्यात ओतप्रोत विदर्भ असणं स्वाभाविक होतं. पण भीमरावजी सातपुड्यातून कधीच सातासमुद्रापार गेलेत. त्यांना विदर्भात कशाला अडकवून ठेवायचं? भाषणांच्या आधी झालेल्या दोन गझला माणुसकीचं गाणं गात होत्या. त्या फक्त विदर्भाविषयी बोलणा-यांनी ऐकल्या असत्या तर बरं झालं असतं, असं माझ्या बायकोनं, मुक्तानं मला विचारलं. माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. शिवाय भीमरावांचा आजवर हवा तितका सन्मान झाला नाही, यासाठी बामणांना ठोकून काढण्यात आलं. तेही पटणारं नव्हतं. मुळात त्याची ही वेळही नव्हती. आणि भीमरावांच्या आजवरच्या यशात अनेक ब्राम्हणांचं आणि विदर्भाच्या बाहेरच्यांचं खूपच मोठं योगदान आहे. ते कसं नजरेआड करणार? आणि करायचं तरी कशाला?

पुलं आणि भीमराव हा ऋणानुबंध या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा आहे. या विषयावरचा माझा एक लेख स्मरणिकेत आहे. पण तो तिथे आलाय तो डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपात. म्हणून त्यातले संदर्भ घेऊन आणि विश्लेषणाची भर घालून नवशक्तितल्या कॉलमात लेख लिहिला. लेख मोठा झाला होता. म्हणून त्यातला महत्त्वाचा भाग कापला गेला. मूळ लेख सोबत कटपेस्ट केलाय.

४ मार्च १९८९ ला चंद्रपूरला पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे उद्घाटक होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. ते या संमेलनाचं सर्वात मोठं आकर्षण होतं. उद्घाटनपर केलेल्या वैचारिक तरीही अत्यंत रसाळ अशा भाषणाने त्यांनी या संमेलनाला एका उंचीवर नेऊन बसवलं.

या संमेलनात पुलंनी एक कार्यक्रम खूप आग्रहाने करायला लावला. तो म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळेंची गजलमैफल. भीमराव तेव्हा गझलनवाज बनले नव्हते. त्यांना मुंबईत येऊन अवघी सहाच वर्षं झाली होती. संघर्ष सुरू होता. पण पुलंचा हट्टच होता. भीमराव चंद्रपूरच्या संमलनात पाहिजेच. कुणाला साक्षच काढायची असेल तर संमेलनाचे एक मुख्य आयोजक असलेले ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर आहेत. ते या सा-या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत.

संमेलनात भीमरावाची मैफल नेहमीप्रमाणेच रंगली. त्याला पुलं संपूर्ण वेळ आवर्जून उपस्थित राहिले. इतकंच नव्हे तर या मैफिलीचं प्रास्ताविक निवेदन त्यांनी स्वतःहून केलं. त्यात त्यांनी भीमराव, मराठी गजल यांचं खूप कौतूक केलं. तुम्ही विदर्भातले आहात, भीमराव विदर्भातले आहेत. पण भीमरावांची खरी कदर विदर्भाने नाही, तर आम्ही मुंबईकरांनी केली, असं त्यांनी वैदर्भीयांना आपल्या खुशखुशीत शैलीत सांगितलं. भीमरावांच्या गाण्यात शब्द आणि सूर एकमेकांना आलिंगन देऊन लयीत चालतात. असं भरभरून कौतूक करत त्यांनी भीमरावांना असंच गात राहा, असे आशीर्वाद दिले. सोबतचा फोटो त्याच कार्यक्रमातला. नागपूर आकाशवाणीकडे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे.


पुलंची आणि भीमरावांचा ऋणानुबंध खूप जुना. पहिली भेट अकोल्यातली. पुलं अकोल्याला आले की त्यांचा किशोरदादा मोरेंकडे यायचे. किशोरदादा हे भीमरावांचे पालक. त्यामुळे त्याकाळातल्या अनेक मान्यवरांबरोबरच पुलंचाही सहवास भीमरावांना लाभला. एकदा बाबा आमटेंकडे आनंदवनात गेलेले असताना परतीच्या प्रवास पुलं अकोल्याला आले होते. त्यांच्यासोबत डॉ. अनिल अवचट होते. नारायण कुलकर्णी कवठेकर, मांडवगणे अशी अकोल्यातली साहित्यिक मंडळीही होती. किशोरदादांनी प्रत्येक जाणकारासमोर भीमरावांना जाणीवपूर्वक गायला सांगत. तेव्हा भीमरावांचं वय विशीच्या आसपास होतं. त्यांनी त्यांचं एक नवं कम्पोझिशन गाऊन दाखवलं. ती अर्थातच गजल होती. भीमूला पहिल्याच फटक्यात पुलंसारख्या दैवताकडून शाबासकीची थाप मिळाली.

१९८३ साली भीमराव विदर्भातून मुंबईत स्टेट बँकेत बदली घेऊन आले. नरिमन पॉइंटच्या हेड ऑफिसमधे पोस्टिंग होतं. तिथून अवघ्या दोन मिनिटांवर पुलंचं एनसीपीएचं ऑफिस होतं. पुलं तेव्हा एनसीपीएचे अध्यक्ष होते. तिथेच त्यांचं बि-हाडही होतं. पंधरा दिवस ते इथे राहत आणि पंधरा दिवस पुण्याला. तिथे पुलंसोबत काम करणा-या वृंदावन दंडवतेंच्या ओळखीनं भीमराव पुलंना भेटले. ८७ साल होतं ते. निमित्त होतं मुंबई आकाशवाणीने आपल्या हिरकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भीमरावांच्या मैफिलीचं निमंत्रण.

आकाशवाणीच्या मैफिलीला येणं पुलंना शक्य नव्हतं. पण त्याची सव्याज भरपाई त्यांनी एका क्षणात केली. त्यांनी भीमरावांना एक एनसीपीएच्या नावे एक पत्र द्यायला सांगितलं. मला माझी कला सादर करण्यास संधी द्यावं, असं पत्र त्यांनी तिथेच लिहून घेतलं आणि दंडवतेंकडे ठेवायला दिलं. अकोल्याला भीमरावांकडून ऐकलेलं गाणं पुलंच्या लक्षात होतंच. पण दूरदर्शनवरच्या मैफिलीही ऐकलेल्या होत्या. पेपरांत छापून येत होतंच. पुलंनी भीमरावांच्या गाण्याला आणि मराठी गजलला एनसीपीएसारखं जगात नावाजलं जाणारं व्यासपीठ मिळवून दिलं.

२९ जून १९८८ ला ही मैफल झाली. एनसीपीएत ब्लॅक बॉक्स नावाचं एक छोटं सभागृह आहे. त्याची रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की मंचावर टाचणी जर पडली तरी माईकशिवाय शेवटच्या खुर्चीपर्यंत ती नीट ऐकू जाते. मुंबईतच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या जाणकार आणि दर्दी लोकांसाठी तिथे निवडक मैफिली आयोजिल्या जातात. भीमरावांच्या सूरांनी एनसीपीए जिंकलं. अनेक मान्यवरांनी वृत्तपत्रातून भीमरावांचं कौतूक केलं. आजही एनसीपीएच्या लायब्ररीत कुणीही जाऊन या मैफिलीचं रेकॉर्डिंग ऐकू शकतं.

पहिल्याच भेटीपासून पुलंनी भीमरावांसाठी दोघांमधलं सगळं अंतर संपवून टाकलं होतं. त्यांना पुलंच्या ऑफिसात मुक्तद्वार होतं. दुपारी बँकेत लंचअवर झाला की भीमराव पळालेच एनसीपीएला. तिथे दंडवते, वामन केंद्रे, अशोक रानडे अशी मंडळी सोबत असायची. तासन्सान गप्पा चालायच्या. आणीबाणीपासून लोकगीतांपर्यंत अनेक विषयांवर या चर्चा सुरू असायच्या. त्यातून भीमराव कळत नकळत घडत होते. पुलंच्या परिवारातल्या अनेकांशी परिचय होत होता. पुलं अनेकदा भीमरावांना ऑफिसात फोन करत. ऑफिसमधल्यांनाही त्याचं अप्रुप होतं. आणि ऑफिसात काही महत्त्वाचं काम आलं आणि भीमराव ऑफिसात नसतील, तर ऑफिसातून पुलंच्या ऑफिसात फोन जायचा. सगळ्यांना माहीत होतं भीमराव एनसीपीएतच गेले असणार.

पुलं भीमरावांना आग्रहाने चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात घेऊन गेले. पण त्यामधे आलेली एक अडचणही त्यांनी दूर केली. संमेलनाच्या तारखा त्यांनी आकाशवाणी पोर्ट ब्लेअर केंद्राला आधीच दिल्या होत्या. त्यामुळे अंदमानात जाण्याची त्याकाळी दुर्मीळ असणारी संधी सोडावी लागणार होती. पुलंनी संमेलनात नाव सूचवल्यामुळे भीमरावांनी आकाशवाणीला नकार कळवण्याची तयारीही केली होती. पण पुलं दोन्ही कार्यक्रम व्हावेत म्हणून आग्रही होती. त्यांनी आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर असणा-या मधुकर गायकवाडांची भेट घेतली आणि पोर्ट ब्लेअरचा कार्यक्रम पुढे ढकलायला लावला. भीमरावांच्या आग्रहावरून पुलं एनसीपीएच्या वतीनं वैदर्भीय लोकगीतांचा एक कार्यक्रम आयोजित करणार होते. पण विदर्भातले कलावंत आणि अभ्यासकांचा उत्साह मावळल्यामुळे दस्तावेजाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य हा दोघांच्या कॉमन आवडीचा विषय. त्याविषयी भीमराव एक प्रसंग सांगतात, ‘माझी भीड तोपर्यंत बरीच चेपली होती. एक दिवस मी पुलंसारख्या साहित्यातल्या मेरुमणीलाच पुस्तकं सजेस्ट करण्याची हिंमत केली. माझी भूमिका प्रामाणिक होती की आपल्याला आवडलेल्या विनोदाबद्दल त्यांच्याशी बोलावं. एक श्रीलाल शुक्लंचं रागदरबारी. मी रागदरबारीचं नाव काढताच त्यांनी कानाला हातच लावला. त्यातल्या विनोदाचा व्यापक पट आणि अफाट दर्जा याविषयी त्यांनी भरभरून सांगितलं. दुसरं होतं, इटालियन लेखक गुयानी गुरेत्शी. मी म्हटलं, मला त्याचा नावाचा उच्चारही नाही माहीत, पण मला याचा विनोद खूपच भावलाय. पुलंनी लगेच म्हटलं ‘ द हाऊस दॅट निनो बिल्ट’वालाच ना? तू काय वाचलंयस त्याचं. मी गेली अनेक वर्षं शोधतोय. पण फक्त एकच पुस्तक मिळालंय. त्यानंतर माझ्या चेह-यावर आनंद पसरला. कारण अकोल्यावर मुंबईत आल्यावर मी जवळपास दोन वर्षं मुंबईचे सगळे फूटपाथ पालथे घालत गुरेत्शीची सगळी पुस्तकं शोधून काढली होती. मला देशील का रे वाचायला, भाई अगदी काकुळतीला येऊन बोलले. पंधरा दिवसात परत देईन. आणि मी पुस्तक दिल्यावर पंधरा दिवसात एका लिफाफ्यात नीट पॅक करून त्यांनी ती पुस्तकं परत दिलीही. सोबत पुलंनी एक आपलं एक पुस्तक सही करून दिलं, ‘पुलं एक साठवण’. ते असं पुस्तक असं कुणाला सहसा देत नसत. ती साठवण मी जिवाच्या पार जपून ठेवलीय. मी माझ्या गीतालाही त्याला हात लावायला देत नाही.’ इति भीमराव.

गीता म्हणजे भीमरावांच्या पत्नी. लग्नानंतर त्या पुलं आणि भीमरावांच्या गप्पांच्या मैफिलीत जोडल्या गेल्या. त्याही मूळ पुलंसारख्याच सारस्वत. त्यांनी जातीची बंधनं न भीमरावांशी लग्न केलं याचं याचा त्यांना खूप आनंद होता. सारस्वतांच्या स्वयंपाकाविषयी ते त्यांच्याशी नेहमी बोलत. तू चांगला गातोस, यापेक्षाही तुझी बायको गोव्याची आहे, याचा मला जास्त आनंद आहे, असं ते भीमरावांना गमतीनं सांगायचेही.

भीमरावांची गझलेची पहिली कॅसेट ‘एक जखम सुगंधी’ खूप गाजली. तिचं प्रकाशन पुलंच्याच हस्ते झालंय. यातली मराठी गझल एकूण मराठी गाण्यांना नवं वळण देणारी होतीच. रसिकांना ती आजही भुरळ घालतेय. ती इतकी गाजली कारण त्याचा सरस दर्जा होताच. पण पुलंचा लाभलेला परिसस्पर्शही याला कारणीभूत होता. पुलंनी आपली पुण्याई आणि लोकप्रियता भीमरावजींच्या नव्या प्रयोगाच्या पाठिशी उभी केली. पुलंच्याच या परिसस्पर्शामुळेच माध्यमांमधे आणि अभिजनांच्या वर्तुळात भीमरावांचा प्रवेश तुलनेने सोपा झाला. नाहीतर विदर्भाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या, कोणतीही शहरी सांस्कृतिकतेची पार्श्वभूमी नसलेल्या आणि छोट्या चणीच्या भीमरावांना मुंबईतल्या अभिजन वर्तुळाने स्वीकारणं सोपं नव्हतं.

भीमराव हे असं एकमेव उदाहऱण नाही. पुलंनी आजवर अनेक कलावंतांच्या पाठीवर असाच कौतुकाचा हात फिरवला आणि त्या कलावंतांचं सोनं केलं. त्यांनीच दादू इंदुरीकरांना शोधून ‘गाढवाचं लग्न’ महाराष्ट्रासमोर आणलं. मच्छिंद्र कांबळीचं ‘वस्त्रहरण’ मान टाकणारच होतं. पण पुलंची शाबासकी पेपरांत छापून आली आणि त्याने इतिहास घडवला. मराठी मातीतलं अस्सल बानवकशी जे काही गवसलं, त्याला पुलंनी आपल्या लोकप्रियतेची मदत घेऊन कोंदण मिळवून दिलं. महाराष्ट्रभर जे काही नवे प्रयोग होत होते, त्याच्या पाठिशी ते कायम उभे राहिले.

पुलंनी एका प्रगल्भ सामाजिक जाणिवेतून हे सातत्याने केलं. कितीही गुणवत्ता असली तरी सांस्कृतिक स्पर्धेत उतरणं सर्वसामान्य घरांमधून आलेल्या कलावंतांसाठी मुश्किल असतं. धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात जिथे होते, तिथे पोहचण्यासाठीच त्यांना मैलोनमैल धावून यावं लागतं. अशावेळेस कुणीतरी पाठिशी ठामपणे उभं राहावं लागतं. पुलंनी गावागावातल्या धडपडणा-या प्रतिभांना कायम आधार दिला. चंद्रपूरच्या दलित संमेलनातल्या उद्घाटनाच्या भाषणात तर त्यांनी याविषयीचं आपलं जीवन तत्त्वज्ञानच मांडलंय. पण पुलंचा हा चेहरा क्वचितच समोर आणला गेला. भीमरावांसारख्या कलावंतांच्या पाठिशी उभे राहणारे पुलं आज आपल्याला ठावूकच नाहीत. पुलं म्हणजे विनोद, नॉस्टॅल्जिया, पुणं आणि पार्ले एवढंच मर्यादित ठेवण्यात आलं. तेच सा-यांच्या सोयीचं होतं. पण पुलंनी पेरलेलं आज बहराला आलंय. म्हणूच आज भीमरावांची साठी समाधानात आणि मोठ्या सन्मानाने साजरी होतेय. त्याचा पुलंना ते असतील तिथे खूप आनंद होत असेल.

सचिन परब,
क्रिएटिव पत्रकार,
मुंबई


http://parabsachin.blogspot.com/2011/04/blog-post_07.html