Wednesday, July 6, 2011

बेळगावचा नवा चेहरा सई लोकूर
प्लॅटफॉर्म.....
करियर संपवून निघालेल्या तरूणीला एका प्लॅटफॉर्मवर दोन मुलींना गाडीत सोडून निघालेले आई-वडिल दिसतात.
मुली झाल्या म्हणून सोडलेल्या या दोघींचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय ती घेते.
घरचा विरोध..म्हणून घरही सोडते...स्वतःचा स्वतंत्र प्रवास सुरू ठेऊन..
त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी स्वतःचे करियर जिवन वेगळ्या मार्गाने नेणा-या
या धेय्यवादी नायिकेने एका वेगळ्याच बाबीकडे चित्त वेधून घेतलेला हा चित्रपट.

एका अर्थाने मुलगी झाली म्हणून नाके मुरडणा-या..मुलींना फुटपाथवर,
रस्त्यावर सोडणा-या या मुलींच्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारा हा धाडसी चित्रपट घेऊन
बेळगावच्या मराठी भाषिक विणा लोकूर यांनी या चित्रपटातून आपल्या मुलीला या चित्रपटात नायिका बनवून प्लॅटफॉर्म...मध्ये आणून सोडले आहे. आता तिचा पुढचा कलेचा प्रवास
तिचा तिने करायचा असा संदेशही न सांगता दिला आहे.
गेली तिस वर्षे बेळगावात नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांनी मिशन चॅम्पियन नंतर
हा आणखी एक चित्रपट कानडी प्रांतातून मराठी भाषिकांसाठी तयार केला आहे.
या चित्रपटातून त्या कथा, संवाद आणि दिग्दर्शनाच्या तिनही मुख्य गोष्टी स्वतः करून
ह्या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. (यात त्यांच्या जोडीला अरिफ वडगामाही आहेत) हिंदीत जसे
नट, दिग्दर्शक आपल्या मुलांना संधी देतात त्याप्रमाणे मुलगी सई लोकूर हिच्या साठी यातून लॉन्च केले .
सई आता झीवर निवेदनही करते. शिवाय पारंबी आणि आम्ही तुमचे बाजीराव या चित्रपटात भूमिका करून
अभिनयाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द करण्यासाठी आता सिध्द झाली आहे. प्लॅटफॉर्म ही त्याची सुरवात आहे..
नव्हे हे पहिले पाऊल आहे...आईनेच धाडसाने पुढे हाउन टाकायला लावलेले.

शिवानी देशमुखच्या आयुष्यातल्या या खडतर प्रवासाचे साक्षिदार आहेत..नायक तथा खलनायक अस्ताद काळे,
सोबत आहेत मोहन जोशी, शरद पोंक्षे, प्रशांत पाटील, वीणा लाकूर आणि
अक्षता आळतेकर, रविना पाटील हे दोन बालकलाकार.
छायाचित्रण सुरेश देशमाने यांचे असून..अश्विनी शेंडेयांच्या गीतांना निलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे.
१५ जुलैपासून तो पुण्यात आणि मुंबईत एकाच वेळी प्रदर्शीत होत आहे...
पाहू या तो नक्की प्लॅटफॉर्म..वर आलाय की ट्रॅकच्या बाहेर जावून ऑफबिट बनलाय...
सुभाष इनामदार, पुणेMob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Sunday, July 3, 2011

अस्सं सासर सुरेख बाई...खरे म्हणजे आता सारे तरुण लोक स्वंतंत्र रहायचा निर्णय घेतात ..तरीही अशी काही घरे आहेत की जिथे एकत्र कुटुंब टिकून आहेत ...अशीच आमच्या महिला कलावंताला सासरचे सुख शब्दात टिपावेसे वाटले ..तोच अनुभव इथे दिला आहे ...
यावर आपले मत जरुर लिहा वा मेल करा

सुभाष इनामदार , पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.comअस्सं सासर सुरेख बाई...
महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....
सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com