Friday, July 15, 2011

गुरूपौर्णिमेचा भक्तिरंग फुलला
भारत गायन समाजात

गुरूपौर्णिमा आणि बालगंर्धवांचा स्मृतिदिन एकाच दिवशी आल्याने शताब्दि वर्ष साजरा करित असलेल्या पुण्याच्या भारत गायन समाजाने संगीत शिकविणा-या गुरूजनांचा सत्कार शुक्रवारी केला. मास्टर कृष्णरांवांना संगीत दिलेल्या पदांची बहारदार मैफल भक्तिरंग या नावाने समाजात रंगविली.

अतुल खांडेकर या तरूण गायकाला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या हस्ते मालती पांडे पुरस्कार दिला गेला. त्यांनी गायलेली मजला घडावी ही सेवा, पतित तू पावना ही दोन्ही पदे मास्टर कृष्णरावांची आठवण ताजी करून देण्याइतकी समर्थपणे सादर करून रसिकांची दाद घेतली.

जोहार मायबाप जोहार हे पद शिल्पा पुणतांबेकर (पूर्वाश्रमीची दातार. म्हणजे भास्करबूवा बखले यांची नातसून सौ. शेला दातार यांची कन्या) यांच्या आवाजात ऐकताना त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या तयारीची कल्पना येते. शिवाय स्वर-भाव दोन्ही तालांच्या लयीत इतके चपखल बोलत होते की सहज दाद येते...क्या बात है.त्यांनी गायलेला समर्थ रामदास यांचा अभंग तर इतका रंगत गेला की तो संपूच नये असे वाटत होते ...फारच उत्तम गायला. त्याची वहावा द्यायची
तर ती समर्थपणे साथ केलेल्या साथीदार यांचेकडे श्रेय जाते .बोलावा विठ्ठल..पहावा विठ्ठलाच्या गजरात रसिकांना तृप्त करणा-या सौ. सावनी कुलकर्णी यांच्या भक्तिपूर्ण रचनेने सारी सभा नादवून गेली होती.
समीर पुणतांबेकर (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज), राहूल गोळे ( ऑर्गन), आणि नितिन जाधव(तालवाद्ये) यासाथीदारांची साथ ज्या ताकदीचा झाली त्यामुळे गायकांच्या स्वराला वाद्यांचा हा ताल सही सही मैफल कानात साठवत राहिला.
शंकर तुकाराम शिंदे (तबला), भालचंद्र दामोदर देव (व्हायोलिन), सुहास दातार , मधुकर जोगळेकर,सौ. मैत्रेयी बापट आणि सुधिर दातार यांना गुरूपौर्णमेनिमित्त समाजाचे अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले.
काळ बदलला... तरी संस्कृतिच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. पुण्यात आता आजपासून विविध कलावंतांच्या शिष्यांकडून गुरूपौर्णिमा साजरी होईल . कुणी जाहिर तर कुणी खासगीत गुरूंना वंदन करेल.
आपण कुणाचे तरी फॉलोअर आहोत. हे समजून स्वतंत्र पायवाट निर्माण करणारे शिष्य हे गुरूंचे भाग्य.

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com

रसिका तुझ्याचसाठीसो कुल : रसिका तुझ्याचसाठी


ही ‘माझी’ मैत्रिण आहे. असं हजारोंना वाटत असेल. फार गवगवा न करता शांतपणे नव्या भूमिकेत शिरणारी. आपल्याला थक्क करून सोडणारी. स्वत:चं मत असणारी. ते निर्भिडपणे मांडणारी. सूक्ष्मपणे पाहिलं तर
किंचित अलिप्त झालेली, खंत वजा केलेली. ही आपल्या सगळ्यांची मैत्रिण. ह्या वेळी फार अवघड भूमिकेत गेली आहे. आपल्याला निशब्द करून..

ओ रसिकाताई. काय. कुठे पळालात तुम्ही अचानक.? कबूल आहे की तू एक्का अ‍ॅक्टर आहेस. पॉज, लूक, डबलटेक, एंट्री याची तुझ्याइतकी मास्टरी खचितच आमच्या कोणात असेल. पण म्हणून इतकी धक्कादायक एक्झिट घेऊन दाखवायची कायमची? इतके दिवस आम्हाला वाटत होते की तू आमच्यातली आहेस. आमची सवंगडी आहेस.

लेकीन दोस्त. तुम्हारा खेल तो किसी और के साथ चल रहा था! डायरेक्ट खुदा के साथ.. पत्ताच नव्हता आम्हाला. तुझे हात खरंच वपर्यंत पोहोचले होते की.. आम्ही खुळ्यासारखे बघत बसलोय आभाळाकडे..

साधारण ४८ तास होतायत त्या गोष्टीला. म्हणजे तू आमच्यातून निघून जाणे वगैरेला.. आणि स्थळ, काळ, वय, सामंजस्य सोडून मूर्खासारखं रडू येतंय. घळाघळा पाणी गळतंय. ओठ मुडपून चेहरा वेडावाकडा होत हुंडके फुटतायत.
श्वास आणि उच्छ्वासाबरोबर तुझं नाव डोकं ते हृदय असं खालीवर होतंय. तुझा स्पर्श आठवतोय. तुझा रंग आठवतोय.. तुझं भुवया उंच करणं.. तुझं ओठ तिरके करीत हसणं. तुझं ऐकणं. तुझं खो खो हसणं.. छे.. रसिका.. हे आठवताना एक दुखरी कळ उमटतीए हृदयात ती तू सहन केलेल्या वेदनांसाठी.. आम्हाला इतका आनंद देणाऱ्या तुला-
इतक्या असह्य़ वेदना का वाटय़ाला याव्यात?

तुला भेटायचं ठरल्यापासूनच आनंदी असण्याला, हसू येण्याला सुरुवात व्हायची. भेटून काही वेळ, दिवस, आठवडे, महिने, वर्षे झाली तरी त्यातल्या मॅड किश्शांनी, तू सांगितलेल्या मजेदार गोष्टींनी खळखळून हसू यायचं.
खूप लो, लॉस्ट वाटत असताना कधीतरी झालेलं तुझ्याबरोबरचं गप्पासत्रं आठवणीत डोकं वर काढतं आणि शीणच निघून जातो यार. काय तुझी एनर्जी. काय तुझं नेमकं निरीक्षण.. काय तुझ्या टीका-टीप्पण्या. पाच मिनिटं किंवा पाच तास- कितीही वेळ भेटलो, तरी तू फ्रेश विचार करण्याचं, तरतरीत जगण्याचं इंजेक्शन देणार म्हणजे देणारच. त्याच्यावर आम्ही आजपर्यंत तगतोय. मग तुला कॅन्सरचं इंजेक्शन देवानी का दिलं? तू का त्याच्या खेळात भाग घेतलास? मी कधीच त्याला माफ करू शकणार नाही. तुला ओळखणारं कुणीच त्याला कधीही माफ करू शकणार नाही.

तुझं वर्णन करावं आणि श्रद्धांजलीचे लेख लिहावे अशी आणि एवढी नाहीएस गं तू.. तू बास आमची मैत्रीण आहेस आणि तुला आपल्या मैत्रीच्या खेळातून आऊट करणारी कोण ही नियती आणि देव वगैरे.. सब झूट है.. आत्ता चिडीनी रडू येत असताना असं वाटतंय. की बाकी सगळं खोटं असलं.. तरी तुझी वेदना तर खरी होती ना. एवढं स्वच्छ मनाचं आमचं जिंदादिल बाळ किती त्रासातनं गेलं. किती शूरपणे जगलं. किती नेटानी झुंजत राहिलं. त्या बाळाची ती दुष्ट जीवघेणी वेदना कुणीतरी थांबवली असेल. तर त्या कुणाचे तरी आणि कशाचे तरी आभार. आमच्यासाठी तू दहा वर्ष थांबलीस..

रसिका.. खूप पुढे ढकललीस तुझी एक्झिट.. पण तुझ्यासाठी तू पुढे जाणं गरजेचं होतं..

पण तू फार फार हवी आहेस. तू आहेसच. नो पास्ट टेन्स हिअर. तुझी रिंगटोन होती- लग जा गले..
के फिर ये हसी रात हो ना हो.. शायद.. अब इस जनम में मुलाकात हो ना हो.. आवडत्या गाण्यासाठी तू मृत्यूची गळाभेट घेतलीस दोस्त? व्हाईट लीलीमधे गायचीस तू त्या दोन ओळी.. किती सुरेल.. माझं अलीकडचं सगळ्यात आवडतं नाटक आणि तू माझी सगळ्यात आवडती, लाडकी अभिनेत्री!

रसिका अगं दहा दिवस पण नाही झाले. मी व्हाईट लीली- नाईट रायडरच्या पोस्टरचा फोटो काढला शिवाजी मंदीरला.. तुझ्या ग्रेट गाबरेच्या पत्त्यावर पाठवणार होते.. पण आता तुझा पत्ताच पत्ताच नाही..! माझ्या जवळच्या प्रत्येकाकडे मी तोंड फाटेस्तोवर तुझ्या व्हाईट लीलीच्या कामाबद्दल बोलले आहे अगं.. शप्पत. एक पांढऱ्या स्वस्तिकाचं झाड लावलंय मी तुझ्यासाठी पिल्लू. त्याची दोन फुलं लगेच उमलली आणि एक कळीसुद्धा आलीए. का. का. का.
तुझी आठवणसुद्धा इतकी उदार आणि आनंदी का..? आणि तू का नाहीस इथे. जिथे आहेस तिथे तुला एक घट्ट मिठी डार्लीग. छान रहा.

ता. क. गिरीश.. जागा भरून काढण्याचा प्रश्नच येत नाही. तू रसिकासाठी लावलेला सदाफुलीचा ताटवा तुझ्या मनात कायमच ताजा राहील. आपला ध्रुवतारा आकाशात जाऊन अढळपद गाठून बसलाय. पण तो दिसण्यासाठी का होईना.. आम्ही उरलेले काजव्यासारखे आहोत तुला. तू खूप काही केलंस गिरीश. खूप खूप..


सोनाली कुलकर्णी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170161:2011-07-12-21-08-05&catid=329:2011-02-22-08-54-27&Itemid=331

Wednesday, July 13, 2011

मी प्रेमिका... गायिका कस्तुरी पायगुडे-राणेरचनाकार आणि संगीतकार अभिजित कुंभार कॅलिफोर्नियात तर गायिका कस्तुरी पायगुडे-राणे पुण्यात असताना आजच्या काळातल्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाची जोड घेऊन तयार झालेल्या मी प्रमिका या ध्वनिफितीचा प्रकाशन समारंभ २४ जुलैला पुण्यात झाला .

अभिजित कुंभार यांचेही हे पहिलेच पाऊल आहे. आज ते परदेशात असले तरी या निमित्ताने मराठी भाषा जपण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न होत आहे.
नव्या पिढीची गायिका

काळाबरोबर चालणारी. नव्या विचारसरणीची. संस्कृतिची, संस्कारांची आणि सामाजिक बदलाची जाण असणारी. उद्याच्या संगीताच्या क्षितीजावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी पुण्यातली गायिका म्हणजे सौ. कस्तुरी पायगुडे-राणे.
कस्तुरी सुप्रसिध्द गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या. त्यांच्या मार्गदर्शनातून पध्दतशीर रियाज करून गळ्यावर शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार कस्तुरीच्या गाण्यातून दिसतात. तालमीतून तयार झालेला आवाज. वेगवेगळ्या रागांची सौंदर्यतत्व सांभाळत केलेली मांडणी. गमक, तान, मींड अशा गायनातल्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळविलेला आवाज .ज्या सहजतेने ती सादर करते तेव्हा रसिकांची मिळालेली दाद तिच्या संगीताच्या सादरीकरणातून मिळते. शास्त्रीय बरोबरच अशास्त्रीय संगीताचे प्रकारही कस्तुरी तेवढ्याच तयारीने गाते. उदा. दादरा, झुला, गझल, भजन इ.
पुण्यात, पुण्याबाहेर आणि परदेशात असे मिळून दोनशेच्यावर कस्तुरीचे कार्यक्रम झाले असून तिच्या गायकीची प्रशंसा सर्वत्र झाली.
जुलै २०११ मध्ये मी प्रेमिका हा मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बमही प्रकाशित झाला आहे.
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून कस्तुरीने A ग्रेडसह एम.ए. (संगीत) ची पदवी संपादन केली आहे. विशेष योग्यतेसह अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि पुणे विद्यापीठातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्राप्त केली आहे.
कस्तुरीला उच्चशिक्षणासाठी लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. ती २००५ पासून स्पिक मॅकेची पुणे चॅप्टरची प्रमुख समन्वयक तर २००९ ते २०११ पर्यत या चळवळीची नॅशनल एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम केले आहे. या काळात तिने मान्यवर कलाकारांचे ५०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पत्ता-
१२/ अ, श्री विष्णुबाग हौसिंग सासायटी,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे,
शिवाजीनगर, पुणे- ४११०१६
फोन- + ९१ (२२०) २५६६११००
+ ९१ (०) ९८८११३६९४६
ई-मेल- paigude.kasturi@gmail.comपुरस्कार आणि पारितोषिके-
- आकाशवाणी, पुणे. सुगम संगीत कलाकार म्हणून मान्यता.
- सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार फिरोदिया ट्रस्ट- २००१-२००२
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन २००६-२००७ (आम्ही मूमविय करंडक)
- पीस ऐम्बेस्डर २००८- लिला पूनावाला फौंडेशन व आशा फौंडेशन
भारतात सादर झालेले कार्यक्रम-
-य़शवंतराव चव्हाण कल्चरल सेंटर, मुंबई
रत्नागिरी
-अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदौर
-अंबड संगीत महोत्सव, अंबड
-गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव, अक्कलकोट
-सांगवी संगीत महोत्सव, पुणे
-विद्या प्रतिष्ठान , बारामती
-पीपल फौंडेशन, पुणे
-नंदनंदन प्रतिष्ठान, पुणे
- स्वरवेद, नागपूर

परदेशातील कार्यक्रम-
-नेहरू सेंटर, लंडन
-महाराष्ट्र मंडळ, लंडन
-तारा आर्टस्, लंडन
-बैठक, बर्मिंगहम
-ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी, ऑक्सफर्ड

राजेंद्र दिक्षित -हरिनामाचा गजरविठ्ठल गीती गावी

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच. पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.

पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने ११ जुलै रोजी आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.
भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे

Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Sunday, July 10, 2011

जी ए जागविताना...स्त्रीच्या विविध रूपांना जागविताना जीएंचे साहित्य आजही वेगळेपणाचे वाटते. स्त्रीच्या असाह्यतेचा.
त्यांच्या सहनशक्तिचा सभोवतालच्या परिस्थतीचा आणि त्यांच्यातल्या भावनांचा खोलवर घेतलेला मागोवा
`वस्त्र` या कथेच्या नाट्यवाचनाच्या माध्यमातून त्यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त पुण्यात घेतला गेला.
अनुराधा जोशी, उत्तरा बावकर आणि गजानन परांजपे यांनी केल्ल्या अभिनाचनातून
त्यांची व्यक्तिरेखा मांडण्याची रित आणि त्यातली वीण रसिकांसमोर उलगडली गेली.

आपल्या भावाच्या कौटुंबिक आठवणीतून नंदा पैठणकरांची जीएंचे खासगी रूप उलगडताना
त्यांना अवडणा-या दडपे पोहे-खूप खोबरे घातलेले..पुरणपोळी कटाची आमटी...सारेच .

जीएंच्या कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखांबाबत बोलताना डॉ.विणा देव यांनी त्यांच्यात असलेल्या
विलक्षण निरीक्षण शक्तिचे आणि संवेदनाशिल मनाचे दर्शन कथेतल्या स्त्री पात्रांतून कसे पाझरत रहाते
याचा उदाहारणासह खास उल्लेख करताना कथांचे दाखलेही दिले.

समाज, परंपरेने स्त्रीच्या ठायी अनंक बंधने लादल्याचे आणि तिच्या वाट्याला आलेल्या भोगाचे कथेत केलेले
वर्णन करताना वाचताना डोळ्यात अश्रु येतात..आपण त्या व्यक्तिरेखेबरोबर गुंतत जातो. तिच्या वेदनेत..
भोगाचा एक भाग बनतो. त्यांच्या दुःखात सहजपणे विरघळून जातो.
आज त्यांच्या कथेत जी दुःखे स्त्री भोगत आहे त्याचे चित्रण आजच्या काळात थोडे परंपरावादी वाटते पण
तिच्या कौटुंबिक बंधनात आजही फारसा फरक झाला नसल्याचे डॉ. विणा देव सांगतात.

कधीही समाजाला प्रत्यक्ष न दिसलेला पण आपल्या साहित्याने घरात आणि मनात पोचलेल्या
जीएंच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम नंदा पैठणकर गेला काही वर्षे सातत्याने करीत आहेत.
यंदा त्याच्या सोबत पुण्याची साहित्य परिषद सहभागी झाली.

या निमित्ताने जीएंच्या साहित्याविषयीची चर्चा घडते . त्यावर विचार होतो.
या सांस्कृतिक भूमित त्यांची आठवण होते.
जीएंच्या लेखणीचे मोठेपण ( जे अनेकांना ठाऊकही नाही) ठसविले जाते. हेच महत्वाचे .

सुभाष इनामदार, पुणेMob. 9552596276
Mail- subhashinamdar@gmail.com