Friday, July 22, 2011

रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला



-प्र. के घाणेकर

मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....




पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.

इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.

सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.

यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.

समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.


सुभाष इनामदार, पुणे

mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

ध्येयशील निश्चयी जीवाची व्यक्तिरेखा

ही आहे १९३७ सालाची, एक वर्षाच्या दृष्ट लावण्या योग्य, देखण्या बाळाची कथा.

नुकत्याच पाळण्याच्या बाहेर पडलेल्या चिमुकल्या मोहन फाटक ह्या बाळावर पोलिओ नावाच्या रोगाने आघात करून त्याला जन्माचा अधू केले. त्याचा उजवा पाय पूर्णत: आणि इतर शारीरिक अवयव त्या आजाराने कायमचे क्षीण झाले. पण त्या बाळाला आईच्या ममतेची आणि मनोबळाची शक्ती मागे होती. आपल्या मुलाच्या ह्या शारीरिक व्यंगावर न खचता त्यांनी निष्ठेने त्याचे जतन केले. त्याला त्याच्या अपंग अवस्थेची जाणीव सुद्धा येऊ दिली नाही. त्या त्याला कडे वर घेऊन शाळेला न्यायच्या हे सांगणे नलगे.

अशा अतोनात प्रयत्नाने त्यास, त्या मातोश्रीने सुशिक्षित केले. कुबड्यांच्या मदतीने तो पेरू गेट भावे स्कूलला जात राहून तेथूनच मॅट्रिकच्या परीक्षेंत १९५२ साली, पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याच्या शारीरिक न्यूनतेचे निमित्त काढून आमच्या घराच्या मंडळीनी आणि मित्रांनी महाविद्यालयात जाण्याबद्दल त्याला खूप विरोध केला. पण स्वत:च्या दृढनिश्चय आणि चिकाटीच्या बळावर, दूरच्या वाणिज्य महाविद्यालायात त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. दुर्दैवाने त्याला प्रोत्साहित करणारी शक्ती म्हणजे त्याची आई त्याच्या १७व्या वर्षी त्याला पोरका करून दिवंगत झाली.

ह्या अवचित घटनेनी न खचता त्याने मोठ्या आत्मविश्वासाने बी.कॉम, एम.कॉम, एल.एल.बी, एम.एस.सी, एवढ्या पदव्या मिळविल्या. तिथेच न थांबता १९६५ साली अर्थ शास्त्रांत (economics) एम.ए घेऊन, विद्यापीठांत पहिला आला आणि आपले भारतीय शिक्षण पूर्ण केले.

१९६६ साली, फुलब्राईट आणि फोर्ड फौंडेशन सारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी अमेरिकेत पदार्पण केले. अमेरिकेच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या जी. आर. ई. (GRE) ह्या परीक्षेंत ते नुसते उत्तीर्णच झाले नाही तर अर्थ शास्त्रातल्या ह्या परीक्षेत त्यांनी गुणांचा एक नवीन उच्चांक स्थापित केला.

न्यूयॉर्क प्रांतात रॉचेस्टर नावाच्या शहरी तिथल्या विद्यापीठांत पी.एच.डी.शिक्षण चालू केले. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती ही की तिथल्या खडतर हिवाळ्यात मोटार गाडी चालविणे आवश्यकच होते. आपल्या अधूपणाच्या आडोश्याला न जाता त्यावर त्यांनी मात केली. स्वत:च्या प्रयत्नाने गाडी मध्ये असे बदल केले की ती गाडी त्याना फक्त डाव्या पायाने चालविता येणे शक्य झाले. विद्यार्थी जीवनात गाडीची दुरुस्ती ते स्वत:च करीत असत. ह्या मुळे त्या विद्येत पण ते पारंगत झाले.

१९८३ साली म्याक्रो इकोनॉमिक्स (Macro-economics) मध्ये त्यांनी आपली पी.एच.डी संपूर्ण केली. हे शिक्षण चालू ठेवत ते वेगवेगळ्या देशांत राहिले. ह्याच काळांत त्यांनी आपल्या गाडीने पूर्ण अमेरिकेचे तसेच युरोपामध्ये पर्यटन केले. टोरोंटो (कॅनडा), पॅरिस (फ्रांस) व होंगकोंग येथल्या विद्यापीठांत त्यांनी अर्थ शास्त्र शिकविले.

१९८४ साली त्यांनी नवीन आलेल्या संगणक (computer) शास्त्रांत उडी घेतली व ओघा ओघाने त्यातले तज्ञ विश्लेषक (system analyst ) बनले. १९९४ मध्ये ते आपल्या माय देशी म्हणजे भारतात परतले. आपले भारतीय नागरिकत्व त्यांनी जोपासून ठेवले होते. हे स्वदेशावरच्या प्रेमाचे द्योतक आहे.

पुण्यात मोटार गाडी चालविणे अवघड झाले असले तरी त्यांनी आपले गाड्यांच्या दुरुस्तीचा अनुभव वापरून स्कूटर (दुचाकीला) दोन्ही बाजूला चाके लावून आणि हाताची गाडी सुरू-किल्ली (starter) स्वहस्ते बसवून आपली स्वतंत्र भ्रमंती कायम राखली. त्यांचे अनुकरण बरेच लोकांनी केले आणि अजूनही करीत आहेत.

दरवर्षी होणा-या सवाई गंधर्व महोत्सवात ते त्यांची विजेची खुर्चि घेऊन जातात याबद्दल `सकाळ`मध्ये लिहून आले होते.

देव करो त्यांना दीर्घायुष्य देवो.


-सुभाष फाटक

Subhash Phatak
subhash.phatak@gmail.com

Monday, July 18, 2011

शास्त्रीय संगीतात नाव कोरायचे आहे


कस्तुरी पायगुडे-राणे



पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक
कस्तुरी पायगुडे-राणे

कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.




इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.

थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.

पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.


`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.

कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.

ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.

पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.

पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.

बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.

दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.

पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.


संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.

आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.

आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com