Tuesday, August 23, 2011

सीडीमुळे पारंपारिक गान प्रकारांना उजाळा


-
-पतंजली मादुस्कर
पुणे- राग गायनाचे विविध प्रकारांची ओळख आज शास्त्रीय संगीताच्या परिक्षांपुरर्ती राहिली आहे. या सीडीच्या निमित्ताने राग गायनाच्या विविध शैलीदार परंपराचे दर्शन घडले आहे. हे लोप पावत चाललेले रागप्रकार कलाकार प्रत्यक्षपणे आपल्या गायनातून सादर करतील आशी अपेक्षा आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक पतंजली मादुस्कर यांनी केली.
यशकमल प्रस्तुत, स्वरगंगा निर्मित-डॉ. नीता भाभे यांच्या देती साद-स्वर नाद या सीडीचे प्रकाशन मादुस्कर यांच्या हस्ते शनिवारी ( २७ ऑगस्ट), गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विविध रागांची निर्मिती झाली. ते सादर करण्यासाठी विविध फॉर्म तयार झाले. त्यातलीच राग गायनाची ही पारंपारिक परंपरा आज काळाबरोबर नष्ट होत चालाली आहे. निता भाभे यांच्या या सीडीद्वारे पुन्हा एकदा त्याला नव्याने उजाळा मिळाला असल्याचा उल्लेख मादुस्करांनी आवर्जून केला.
याचवेळी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रेवा नातू यांना कै. नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ञ सुनिताबाई खाडिलकर यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी रेवा नातू यांच्या संगीत कारकीर्दीला भरघोस यश लाभावे अशी इच्छा प्रकट करताना खाडिलकरांनी अखंड संगीतात वाहून घेतलेल्या निता भाभे यांचे संगीतविषयक विचार आणि राग गानप्रकारांची माहिती असणारी सीडी निर्माण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि संगीत शिकणा-यांसाठी ती अत्यंत उपयुक्त असून यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात याचा उपयोग नक्कीच करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी नुकतेच ९७ वर्षात पदार्पण करणारे दाजीकाका गाडगीळ समारंभाला कलावंताना शाबासकी देण्यासाठी उपस्थित होते.
डॉ, नीता भाभेयांच्यासह त्यांच्या शिष्या संगीता कुलकर्णी, विनिता सुमंत, स्नेहल खानवेलकर यांनी अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग आणि चतरंगमधील भैरवीतून रागांच्या विविध अंगाचे ,त्यांच्या मधुरतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण रागप्रकारांच्या सादरीकरणात विनित तिकोनकर, अभिजित जायदे (तबला), अविनाश तिकोनकर( पखवाज) आणि संवादिनीची साथ जयंत साने यांनी केली.सुभाष इनामदार, पुणे
मोबा. – ९५५२५९६२७६
E_mail- subhashinamdar@gmail.com


मन ..अद्ष्य शक्ति


मन ..अद्ष्य शक्ति

शरीरात असून दिसत नाही ते..मन
विचार देते पण दिसत नाही ते मन
बोलताना जाणवते पण भासत नाही ते मन
चिंता करते .. शरीर झीजवते ते मन
शब्द सुचविते.. कृती करण्यासाठी भरीस पाडते ते मन
संवेदना उमटते.. गोष्टींना अकार देते ते मन
रागावते.. सोसते.. रूसते..लाडिकपणे बोलते ते मन
प्रेरणा देते. घडविण्याचा सल्ला देते ते मन
कधी आनंदाची साद घालते ते मन
कधी दुखः वाटून घेते ते मन
शरीर थकूनही विचार कायम ठेवते ते मन
झोपेतून प्रसन्न सकाळी जागे करते तेही मनच
गाढ झोपेतही स्वप्न दाखविते तेही मनच
मनाचे वर्णन करताना विचाराशी संघर्ष करते ते मन
स्पर्श..संवेदना..जाणीवा जागृत ठेवते ते मन
प्रेम देता देता राखून ठेवते ते ही मनच
राग, लोभ, यांचा, त्यांचा...सर्वांची जागृती घडविते ते मन
शरीराच्या अखेरपर्यत श्श्वासासह सोबत करते ते मन
सारे करूनही सतत दूरवरही भेटत नाही ते मन
संगणकाची कळ दाबते.. शब्द सुचविते तेही मनचसुभाष इनामदार, पुणे9552596276
subhashinamdar@gmail.com

हे प्रेम असेच राहू द्या


- नाथराव नेरळकर
(औरंगाबाद)

संसार सांभाळणारी पत्नी व मला सांभाळणारे तुम्ही रसिक मिळाल्याने शिस्त लागली. चांगले शिष्य मिळाले म्हणून निर्मिती करता आली; अन्यथा मी झीरोच आहे, असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ स्वरयात्री नाथराव नेरळकर यांनी काढले.

डॉ. मंगला वैष्णव संपादित ‘स्वरयात्री नाथ नेरळकर’ गौरवग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार व उद्योगपती मोरेश्वर सावे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे, सेवानिवृत्त आयुक्त व गायक सुधाकरराव जोशी आणि अमरावतीचे शिक्षण सहसंचालक डॉ. भोजराज चौधरी व प्रतिभा प्रकाशनचे प्रफुल्ल देशपांडे यांची उपस्थिती होती.

यानिमित्त करण्यात आलेल्या सत्काराला भावुक होत या स्वर तपस्वीने उपरोक्त उत्तर दिले. ते म्हणाले, गुरूने दिलेले गाणो बायकोमुळेच सांभाळता आले. शिष्यांकडून रियाज करून घेताना माझाही रियाज झाला. त्यातून नवनिर्मितीची प्रेरणा मिळाली व काही तरी निर्मिती झाली. हे प्रेम असेच राहू द्या.

विविधांगी, सदैव प्रसन्न, मनस्वी संगीताचा तपस्वी असलेले नाथराव स्वप्नाळू, परंतु झपाटलेला, दिलदार माणूस आहे. माझी व त्यांची मैत्री 6क् वर्षे जुनी आहे. त्यामुळे त्यांना घडताना आणि त्यांनी घडविलेले संगीताचे गुरुकुल मी जवळून पाहिले आहे. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी सुशीलाबाई, म्हणजेच अम्माई उभ्या राहिल्यामुळेच त्यांना संगीताचा संसार चांगल्या पद्धतीने करता आला, असे मत यावेळी मोरेश्वर सावे यांनी व्यक्त केले.

या पुस्तकावर भाष्य करताना पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, जो हे पुस्तक वाचेल तो या नाथ संप्रदायाचा सदस्य बनून राहतो. भावनेचे सादरीकरण कसे करावे, मैफल कशी रंगवावी हे नाथरावांकडूनच शिकावे, असे मत सुधाकर जोशी यांनी मांडले. हा ग्रंथ म्हणजे नाथरावांच्या गायकीचा इतिहास असून, तो वहिनीचे स्वप्नदेखील आहे, असे मनोगत ग्रंथाच्या संपादिका डॉ. मंगला वैष्णव यांनी मांडले.

हेमा उपासनी-नेरळकर यांनी प्रास्ताविक केले. सीमा बोठे यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.

(लोकमत दि. २२ .८.२०११ च्या औरंगाबाद अंकातून साभार )

Monday, August 22, 2011

शब्द झाले मायबाप!


कवी वैभव जोशी यांच्या कविता-गीत-गझलांची "संपूच नये असं वाटणारी" मैफल टिळक स्मारक मंदिरात सादर झाली ती मायबोलीकर किरण सामंत, आनंद आणि कौतुक शिरोडकर यांच्या 'सृजन थिएटर्स' निर्मित "शब्द झाले मायबाप" या कार्यक्रमाच्या औचित्याने. मायबोली हे संकेतस्थळ(www.maayboli.com) मराठी साहित्याला वाहिलेल्या अनेक संकेतस्थळांपैकी सर्वात अग्रेसर. स्वत: वैभवने लिहायला सुरूवात केली ती याच संकेतस्थळावर. आपण काहीतरी दर्जेदार लिहू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्यानंतर वैभवचा कविता क्षेत्रातला प्रवास तिथून जो सुरू झाला तो आज "११ मराठी आल्बम्स, ३ आणि नवीन येणा-या ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिकां या सा-यांमधून गेल्या ३ वर्षांत जवळजवळ १५०हून अधिक गाणी" ही जणु काही एक अजून एका मोठ्या पल्ल्याची सुरूवातच आहे इथपर्यंत!

पडदा उघडल्यानंतर स्टेजवर फक्त वैभव आणि सुरूवात ह्या कवितेने "सूर झाला ईश्वर, शब्द झाले मायबाप" हे म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच असावी आणि सचिनने ओपनिंगलाच फटकेबाजी सुरू करावी! आजपर्यंत तरी अशा मैफली पाहिल्या आहेत की ज्या रंगात यायला किमान काही वेळ जावा लागतो. परंतु आज मात्र पहिल्या क्षणापासून ते औपचारिक शेवटापर्यंत ही मैफल रसिकांच्या हृदयात आरपार घुसली होती हे तिथे उपस्थित असलेला कुणीही नाकारू शकणार नाही. मिलींद कुलकर्णी यांच्या संयत आणि चपखल निवेदनालाही दाद दिलीच पाहिजे. कमलेश भडकमकर यांच्या संगीतयोजनेसोबत वैशाली सामंत, राहूल देशपांडे, अमृता नातू, रघुनंदन पणशीकर, मधुरा दातार, दत्तप्रसाद रानडे, जयदीप बागवडकर, जान्हवी अरोरा अशा ख्यातनाम गायकांनी मराठी आल्बम आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेल्या व होत असलेल्या वैभवच्या गाण्यांचे जोरदार सादरीकरण केले.मैफल अजून रंगात आली ती कवी सौमित्र आणि वैभव यांनी सादर केलेल्या वैभवच्या कविता आणि गझलांनी! सौमित्र वैभवची एक गझल सादर करताना थांबून 'व्वा' म्हणाला तेव्हा हे अधोरेखित झालं की आज तिथे जमलेले श्रोतेच नव्हे तर वैभवसकट इतर सारे कलाकार स्वत: एक "श्रोता" झाले होते! सादर करणारा जेव्हा श्रोता होतो, तेव्हा ती मैफल तिच्या अत्त्युच्य बिंदूवर असते. मी जितके काही कार्यक्रम पाहिले आहेत त्यात गायक येतात आणि गाऊन जातात. पण आज प्रत्येक गायकाला वैभवबद्दल काहीतरी जिव्हाळ्याचं बोलायचं होतं. त्याची गझल, गीत सादर करताना प्रत्येकाने प्राण ओतला होता हे सांगण्यात जर्राही अभिनिवेशीपणा नाही. एखाद्या चांगल्या गझलेत जसा प्रत्येक शेर ही एक अर्थपूर्ण कविता असते त्याप्रमाणेच आजच्या कार्यक्रमातला प्रत्येक परफॉर्मन्स ही एक स्वतंत्र आणि विलोभनीय अशी एक मैफिल होती आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे वैभव जोशी!

इतका नितांतसुंदर आणि दर्जेदार मराठी कार्यक्रम रसिकांना दिल्याबद्दल प्रायोजक श्री रामचंद्र चिंचलीकर आणि एलिगंट केअरटेकर संस्था यांचे जितके कौतुक करावे, आभार मानावे तितके कमीच आहे.

टीप: सदर कार्यक्रमात सहभागी असलेले पण या लेखात नाव न येऊ शकलेले अजूनही काही दिग्गज कलाकार असतील तर ते केवळ लेखकाचे अज्ञान समजावे.


-विनायक खांबाते
vinayak khambayat