Saturday, December 17, 2011

अत्तराची कुपी

`मन`ही अत्तरीची कुपी आहे. अनेक सुखद स्मृतिंच्या आठवणी अत्तराप्रमाणे सुगंध देऊन जातात.
अशा सुगंधी कुप्या आपल्या जवळ असतात म्हणूनच तर आपवे धावपळीचे,
ताणतणावाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आयुष्य सुसह्य होते.
आठवणींचा असा सुंगंधी खजिना प्रत्येकाजवळ असतो. पण तो उघडून त्याचा गंध घ्यायला
आपव्याजवळ वेळ नाही हेच खरे दुखः आहे.

Thursday, December 15, 2011

विठ्ठल नामाची आळवणी


आज विठ्ठल मंदिरात (टिळक रोड, पुणे), टाळ,मृदुंगाच्या नादात पारंपारिक भजनी ठेक्यातून
विठ्ठल नामाची आळवणी केलेली कानावर पडली.
पाय थबकले.... स्वरात कदाचित तो सुरेलपणा नसेल..पण म्हणण्यात आर्तता होती.

जागतिकीकरणाच्या रेट्यात आजही देहभान हरपवणारे भक्तिभान जपणारी ही मेडळी पाहिली की, वेगळाच आनंद मिळतो.

यातही एक वेगळेपण दिसले ते म्हणजे, भजन आपपल्या आवाजात गाणा-या सर्व स्त्रिया होत्या.
त्यांची वयेही ५०च्या पुढची..त्यातल्या दोघी तर २५-३०च्या ....
त्याही तेवढ्याच तन्मयतेने टाळांच्या नादातून भाव आपल्या सूरात आळवित होत्या..

एकूणच हा आनंद पाहण्यात माझा किती वेळ गेला यापेक्षाही ती अनुभूती मला काही सांगण्यास

भाग पाडायला उद्युक्त झाली..हेच महत्वाचे...


सुभाष इनामदार, पुणे

गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात नाही


गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..


आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला. कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.


यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.
डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`
आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.subhash inamdar, Pune
9552596276
subhashinamdar@gmail.com
---------------------------------------------------------------------------------


माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.
डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई

न संपलेले
सुकून गेली फुले तरीही
गेध त्याचा मनी दरवळावा....
संपून गेला पाऊस तरीही
ओल्या आठवणी तशाच रहाव्या...
संपून गेले चांदणे तरीही
चंद्र नभीचा मनात दिसावा...
संपून गेला सहवास तरीही
स्पर्श सुखाचा पुन्हा आठवावा...
संपून गेली वाट तरीही
थांबा क्षणाचा सुंदर वाटावा...
संपून गेले शब्द तरीही
भाव प्रेंमाचा तसाच रहावा...
संपून गेले क्षण सुखाचे, तरीही
गोडवा त्याचा कधी न व्हावा....


श्रीकांत आफळे, पुणे
०२०- २४३६७५३२
९८९०३४८८७७

Monday, December 12, 2011

अंकुर आनंदाचे

आमच्या भविष्य जाणणा-या एका मित्राची हा भावना या कवितेतून मांडत आहे....
दाद द्यावी...subhash inamdar
--------------------------------------------------------


अंकुर फुटावे एके क्षणी
आनंदाचे जीवनाला
अन् प्रवाह मिळावा
जीवन सागराला..


शब्द तेच होते कालचे
आज त्यांना अर्थ मिळाला
श्वासात त्या नवा प्राण
आणि नवा गंध मिळाला...

त्रतू आज कोणताही
वसंत वाटू लागला
जीवनाला क्षणोक्षणी
बहर येऊ लागला..


बांध मनाचा आनंदाने
भरुन वाहू लागला
चेह-यावर नवा नवा
रंग खुलू लागला...

जीवनाच्या मैफलीत
एक नवा सूर लागला
जगण्याला एक नवा
अर्थ आज लाभला....


श्रीकांत आफळे, पुणे
श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

सुचले तसे

मंडळी,
अनेक भावभावनांचे कोंब नव्याने पुन्हापुन्हा फुलतात...मी तेच साठवण्याचा प्रयत्न करतो...माझे मुक्तछंदात्मक स्वरुपात ते साठवितो...यात कोणताही आकार अभिप्रेत नाही...जे भासले..दिसले...आणि आठवावेसे वाटले तेच इथ शब्दातून व्यक्त करण्याचा हा एक अंशात्मक प्रयत्न....
मात्र ते सारे एकत्रित असावे यासाठी हा शब्दसोहळा इथे टाकत आहे..कुणाला यात स्वतः भासले तर तो यागायोग समजावा....वृत्त छंद...य़ाच्या पलिकडे जावून अनेक बंधनात मुक्त झालेली ही माझी शब्दांजली.....


सावधान असावे
व्यवधान नसावे
कार्यरत रहावे
सदैवही...

उरी शाती असावी
चित्त स्थिर राखावे
एकचित्त व्हावे
सदोदित...

विचार ऐसा ठेवावा
आचारही उत्तम राखावा
किमया नावाची उरावी
जगामध्ये.....

मैत्र अवघ जोडावे
स्वत्व तेही राखावे
बंधनात रहावे
कधीतरी....

अंती सुखाची आस
परमेशाचा ध्यास
चिंतनशील रहावे
क्षणोक्षणी.....


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
9552596276
---------------------------------------------


तू दिलेला स्पर्श
आठवतो या क्षणी
आवरोनी मी मला
हरवतो या क्षणी
घेतलेला वसा मनीचा
ना कधी विसरणार
दिलेले वचन तुला
अखेरपर्य़ंत पाळणार
---------------------------------
विरले धागे
वस्त्रही उरले
ठिगळ दिसे
फसले सुटले
कधी कुणासाठी
झुरलो नाही
कधी कुणाचा
उरलो नाही
कधी विसावलो
कधी नादावलो
आकंठ बुडालो
तुझ्यामनी
-------------------------------------------
माझे जगणे कुणासाठी
स्वतःच्या मनासाठी
माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या त्या साठी
माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदरते साठी
माझे हसणे कुणासाठी
आनंद घेणा-या त्या साठी
माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी
माझे मी पण कुणासाठी
तुझ्यातल्या हरवलेल्या त्या साठी
-------------------------------------------
दिसताना तु किती साधी वाटते
अनुभवताना तूला
आदरयुक्त भिती वाटते
-----------------------------
आयुष्य ओघळताना
जुनेच क्षण आठवतात
नात्याचे धागे गुंफताना
विषण्णता पसरवतात
---------------------
अक्षदा पडतात पडदा दूर होतो
समोर एक सुंदर चेहरा येतो
मेकपने लगडलेला सुंदर आभास होतो
....कुठून काहीसे भासमय सत्त्यात येते
सकाळचे वास्तव आत्ता कुठे हातात येते
शब्द संपतात ओठ रंगतात
चेह-यावरचे मार्दव लाजून दुर होते
शरीरात हुरुप येतो सहवासाची ओढ लागते
एकमेकांच्या कुशीत शातपणे विसावते

आरंभ होतो...तसा शेवटही होतो
एकमेकांसाठी जगण्याचा अध्याय सुरु होतो
----------------------------------------

मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
गुंतून तुझ्यात
मी माझा कधीच उरत नाही
----------------------------
सांधलेले क्षण
पुन्हा दरवळतात
जडावलेले ओझे
तसेच शुन्य भासतात
------------------------------------

कुंतल काळे मऊ मुलायम
कळी गुलाबी खुलली गं
-हदयी उठली एक शिरशिरी
कळले तुजला उमजेल गं
शरीरी माझ्या उठे कंपना
अशी भरारी घ्यावी गं
अलगद वाटे तुझ्या जवळी
बिलगुनी घ्यावे तुजला गं
एक अनामिक ओढ लागली
कधी तू मजला दिसली गं
भेटीमधले क्षण रुपेरी
मनी माझीया रुतले गं
जावे हरवूनी अलगद वाटे
हात हाती पकडला गं
हेच उरे मनी स्वप्न माझे
मिठीत तुझीया जावे गं
---------------------------------------------

भेटलेल्या प्रत्येक क्षणाची
पुनरावृत्ती नसते
एक क्षण कधीही
दुस-या क्षणासारखा नसतो
------------------------------------

काल तू भेटलीस
मी तुला यापूर्वीही पाहिले
कालची तू ती नव्हतीस
तजेलदारपणा, तडफ
निराळीच होती
एका बाजूला तो तू निवडलेला
दुसरीकडे तो तू निर्माण केलेला
दोघांचा प्रभाव तुझ्यावर..
अलगद..पण स्पष्ट पडलेला
आता सारे नागचे विसरायचे
नव्याने आयुष्याला सामोरे जायचे
भरारी घ्यायची गरुडासारखी
बघ माझी आठवण येते काय....
--------------------------------------------