Monday, May 14, 2012

मुक्ताई आज दोनशेवा प्रयोग




प्रचिती सुरू यांचा मुक्ताई - एक मुक्ताविष्कार

आदिमाया, चित्कला, मुक्ताबाई, आदिशक्ती अशी कितीतरी नामरूपे. पण अर्थ एकच.. मुक्ताई. अवघ्या अठरा वर्षांचे लौकिक जीवन लभलेल्या योगिनी मुक्ताईचा जीवनप्रवास उलगडणारा 'मुक्ताई - एक मुक्ताविष्कार.' प्रचिती प्रशांत सुरू हिने बारा वर्षांपूर्वी सुरू केलेला एकपात्री प्रयोग. येत्या मंगळवारी (दि. १५) या एकपात्री नाट्याविष्काराचा दोनशेवा प्रयोग होत आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन वैद्य प्रशांत सुरू यांचे आहे. कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले, आमच्या आयुर्वेदाच्या गुरू वैद्य दातार शास्त्री यांच्या सांगण्यावरून श्री ज्ञानेश्‍वर माऊली व नाथ परंपरेकडे वळलो. र्शवण, दर्शन, भजन, कीर्तन, स्मरण ही आणि एवढीच भक्तिठेव पालन करीत होतो. अध्यात्मज्ञान सांगणार्‍या मुक्ताईच्या 'ताटीच्या अभंगांनी' भुरळ घातली होती. म्हणून तिथूनच सुरुवात केली. 'ताटीचा नाट्यप्रसंग' व त्यातल्या बालअभिनेत्री प्रचितीचे भाव-अभिनय नावाजले गेले.
प्रचिती बारा वर्षांची असताना साहस करायचे ठरवले. मी, प्रफुल्लता आणि प्रचिती सर्वांनी मिळून मृणालिनी जोशी यांच्या 'मुक्ताई' पुस्तकापासून रवींद्र भट यांच्या 'इंद्रायणी काठी'पर्यंत सगळे वाचून काढले. वाचलेले सर्व नाट्यरूपात मांडण्याचे ठरविले. पहिला प्रयोग २९ मे २000 साली, मुक्ताई महानिर्वाण दिनी भरत नाट्य मंदिरात केला. त्यानंतर सुरू झाला एक प्रवास. या मुक्ताविष्काराचे प्रयोग अमेरिका, ऑस्ट्रेलियातही झाले. विशेष आनंद देणारे प्रयोग ठरले ते पंढरपूर आणि आळंदीतील. याचे संहिता लेखन वैद्य प्रफुल्लता सुरू यांचे आहे.
या प्रयोगाची नांदी बारा वर्षांपूर्वी भरत नाट्य मंदिरात झाली त्याच रंगमंचावर २00वा प्रयोग १५ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होत आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=42

No comments: