Monday, June 18, 2012

गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...



जगायला आयुष्य अपुरे वाटते...
गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...

हासत हासत आयुष्य घालविणारी..चेह-यावरचे हास्य न मावळणारी..माझ्यावर कौतुकाची थाप देऊन आशीर्वादाचे चार शब्द मनसोक्त देणारी माझी मामेबहिण अचानक गेली..कुणाला न कळवता.. न बोलता..कुणालाही न त्रास देता...आपले दुःख उराशी बाळगत तिने देह ठेवला..वयाची ८० वर्षे होतानाही ..पतीच्या निधनानंतरही घराला घरपण देणारी आणि जुने ते घर सांभाळणारी ही बहीण...आज तिच्या आठवणीने मन गलबलून गेले.

पुण्यात मी आलो..तिचा आधार होता..जोगेश्वरीजवळच्या देव वाड्यातले तिचे जुने वाड्यातले घर जपून ठेवले...ओल..खड्डे..अपुरा प्रकाशातही तिने गेली ६० वर्षें जागा जपली..

कित्येकांचा तो एक आसरा होता...पुण्यात आल्यानंतर तिच्या घराची ओढ प्रत्येकाला असायची...
जसे जमेल तसा पाहुणचार करुन शिष्टाचार सांभाळून तिने घर जपले..वाढविले..

तशी ती माझ्या आईवर माया करणारी..वडिलांनाही.आधार वाटणारी...पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची बोलकी..चार सल्ले मनापासून देणारी ....

आज तिच्या दोन मुली तिचा वारसा सांभाळणार आहे...जावई,नातू आहेत. भाऊ बहिणी आहेत...पण तिचे जाणे चटका लावणारे...
तशी तिली गाण्याची आवड...डेक्कनवरच्या घाटेंच्या गायन क्लासचा वारसा होता तिच्याकडे...गाणे शिकायचे होते...पण ते राहिले...पण आवड जबरदस्त....

सासू, दिर,नणंद सा-यांची काळजी घेऊन...आपल्या पतीच्या आजारपणात जीवाचे रान करणारी ती बहिण आज न सांगता...काहीही न बोलता..अबोल झाली....हिच खंत आणि हिच श्रध्दांजली...


जाणारा मागे ठेऊन जातो आठवणींचा खजीना..
त्यावर तर जपत जातो आपला सारा जमाना..





सुभाष इनामदार, पुणे

1 comment:

हर्षद खंदारे said...

सुंदर आहे लेख!