Tuesday, September 11, 2012

कांही नाती पक्षाच्या पलिकडली असतात..


राजकारणातील कांही नाती पक्षाच्या पलिकडली असतात..केवळ मित्रत्वाच्या नात्याने ती जपली जाऊ शकतात. याचा उपयोग समाजात कार्य करणा-या अनेकविध व्यक्तिंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठीही होऊ शकतो याचा आदर्श पुण्यातल्या कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार २०१२ च्या वितरण सोहळ्यात पुणेकरांना अनुभवता आला.


राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ११ सप्टेंबरला झालेल्या समारंभात हे चित्र स्पष्टपणे मनावर उमटले गेले. एवढेच नव्हे तर महिलांवरच्या अन्यायाविऱुध्द आवाज उठविणा-या सातारच्या वर्षा देशपांडे..काच-कागद-कचरा गोळा करणा-या संघटनेच्या लक्ष्मी नारायणन या दोन चळवळीत स्वतःला झोकून दिलेल्या दोघींचा सत्कार हा पुरस्कार देऊन केला गेला.

धनंजय थोरात जाऊन पाच वर्षे झाली..तो कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता..त्याच्या मित्रमंडळाने त्याची संगीताची आवड आणि तबला वादनाची किमया ओळखून संगीत क्षेत्रातल्या कलावंताचाही गौरव करण्याचे ठरविले. गेली पाच वर्ष तो पुरस्कार देताहेत. यंदा तो ज्येष्ठ गायक विजय कोपरकर यांना दिला गेला.

धनंजयचा मित्रपरिवार यात अगदी उल्हासदादा पवार , गिरीश बापट, अंकूश काकडे ते मोहनदादा जोशींसारखे नेतेही समाविष्ट आहेत. दरवर्षी त्याची स्मृती जपण्याचे काम ते करतात...त्यातून समाजात चांगले काम करणारे अनेक कार्यकर्ते लोकांपर्यत त्यांच्या कामातून माहित होतात.

अशा सोहळ्यातून अनेकांना स्फूर्ती मिळते. अनेक विविध मान्यवरांचे विचार ऐकता येतात. खासदार वंदना चव्हाण आणि संगीतकार आनंद मोडक दोघांनीही निवड समितीचे योग्य निवडीबद्दल जाहीर कौतूक केले.

आजच्या समाजाला दिशा देण्याचे काम यातून घडते. दिशा देता देता त्यातून शिक्षणही होते. परंपरा आणि संस्काराचे जतन होते. नव्याचे कौतूक होते. जुने आणि काळाबरोबर वाहून गेलेली जुनेपुराणे साफ होऊन पुन्हा नव्या तजेला घेऊन तरुणांच्या पुढे नवा आदर्श निर्माण होतो...


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांना दहशतवादी ठरवून मोक्का लावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी मंगळवारी येथे केली.
धनंजय थोरात यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देशपांडे, विजय कोपरकर आणि लक्ष्मीनारायण यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना देशपांडे बोलत होत्या. खासदार वंदना चव्हाण, संगीतकार आनंद मोडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. थोरात यांच्या मातु:श्री रमाबाई, आमदार गिरीश बापट, उल्हास पवार, मोहन जोशी, विपिन गुपचूप व्यासपीठावर उपस्थित होते.देशपांडे म्हणाल्या, ""मुली मारण्यात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. राजर्षी शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या राज्यात स्त्रीभ्रूणहत्या इतक्याच मोठ्या प्रमाणावर होते, ही खेदाची बाब आहे. त्यातही हा प्रकार उच्चवर्णीय, शिकल्या-सवरल्या शहरी लोकांनी केला आहे. मूल्य व्यवस्था ढासळल्याचेच हे लक्षण आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली मुलींची सर्रास हत्या करण्यात आली. असे गैरप्रकार टाळण्यासाठी महिलांच्या योजनांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, महिला आयोग अध्यक्षपद चार वर्षांपासून रिक्त आहे ते भरावे, महिला धोरण जाहीर करावे.''

सतेज पाटील म्हणाले, ""आम्हाला आई, बहीण, पत्नी हवी असते. मात्र, मुलगी नको असते. दुसरीकडे चिल्लर पार्टीसारखे प्रकार याच शहरात उघडकीस येतात. हे वातावरण बदलण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे. केवळ कायदे करून या समस्या सुटणाऱ्या नाहीत. उलट कायद्याच्या अंमलबजावणीची मानसिकता समाजाने ठेवल्यास असे प्रकार सहज टळू शकतील. एकविसाव्या शतकातील हे वैचारिक प्रदूषण घालविण्याची वेळ या पुरस्कारानिमित्ताने आली आहे. समाजप्रबोधनाची चळवळ या पुरस्कारानिमित्ताने सुरू व्हावी.''लक्ष्मीनारायण म्हणाल्या, ""कचरावेचकांमुळे पर्यावरणाचे रक्षण होत असूनही त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जात नाही. घरोघर जाऊन कचरा वेचणाऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जावेत,'' अशी मागणी करतानाच पुणे महापालिकेने इतरांच्या तुलनेत बऱ्याच योजना लागू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.कोपरकर म्हणाले, ""संगीत, साहित्य, कला, क्रीडा यांना प्रोत्साहन देणे आवश्य क आहे; अन्यथा चिल्लर पार्टीसारखे प्रकार घडत राहतील. दूरचित्रवाहिन्यांनी सुरू केलेले महागायक, आयडॉल हे प्रकार संगीताबरोबरच तरुण पिढीसाठीही घातक आहेत.'' ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.

http://www.esakal.com/esakal/20120912/5070298357134235573.htm

No comments: