Monday, October 8, 2012

वेदमूर्ति प्रकाश दंडगे गुरूजी एकसष्टीतगेली तीस-बत्तीस वर्षे तोच गोल चेहरा..डोक्यावर पांढरी टोपी. धोतर आणि त्यावर पांढरा फुल नेहरू शर्ट...हाच वेष. एम-५०वर बसून लोकांच्या घरच्या पूजेसाठी घाईत निघालेली ही गुरुमूर्ती..तेवढ्याच लगबाने आकाशवाणीतल्या दालनाकडेही दाखल होते. कुणाची मुंज. कुणाचे लग्न तर कुणा घरी लघुरूद्राचे पठण.. हे झाले नित्य व्यवहार..मात्र जेव्हा ते घनपाठी ब्राम्हण म्हणून पारनेर जातात..तेव्हा ते असतात त्या गुरुकुलाचे आचार्य...मात्र हाच भाव घेऊन जेव्हा परदेशात दौरा करतात..तेव्हा ते असतात पुण्याचे प्रकाश दंडगे गुरूजी...एक घनपाठी ब्राम्हण..

२७ सप्टेंबर २०१२ला गुरूजी साठ वर्ष पूर्णकरुन ६१ व्या वर्षात दाखल होत आहेत. केवळ या एका विद्येवर सातवीपर्यंतची परिक्षा लौकिक अर्थाने पास झालेला हा मुलगा...आज पुण्यातल्या रामेश्वर ऋग्वेदी ब्रम्हवृंद मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संस्था, पुणे वेदपाठशाळा अशा अनेक धार्मिक संस्थाचे पदाधिकारी पद भूषवित आहेत. स्वाहाकार, वेद पारायण, संमेलने या निमित्ताने ते देश-परदेशात प्रवास करताहेत....आज अशा एक व्यक्तिमत्वाला या निमित्ताने तुमच्यापुढे हजर करणार आहे.

महागाव, ता गडहिंग्लज, जि. कोल्हापूर इथून सातवी परिक्षेनंतर प्रकाश नागेशराव दंडगे यांनी १९६६ला घर सोडले आणि सातारचा शंकराचार्यांचा मठ गाठला. वेदमूर्ती शंकरशास्त्री दामले यांच्याकडून संस्कृत आणि नित्यविधीचे प्राथमिक अध्ययनाचे धडे गिरविले. १९६८ला पुण्यात पुणे वेदपाठशाळेत दाखल झाले. वेदाचार्य किंजवडेकर गुरुजींकडे अध्ययनाचे पाठ सुरु झाले. १९७० ते १९८३ या १३ वर्षांच्या कालावधीत सरकारमान्य असलेल्या वेदाध्ययन केंद्र टिळक महाराष्ट्र विद्यापिठात दशग्रंथासह जटापाठापर्यंत अध्ययन व्यंकटेश शास्त्री जोशी यांच्याकडे पूर्ण केले. घनपाठाचे अध्ययन सहस्त्रबुध्दे समाधी मंदिर इथे परिपूर्ण केले. तिथे दिगंबरदास महाराज यांच्या सूचनेनुसार किंजवडेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षण यशस्वी करुन मग ते स्वतंत्रपणे आपल्या व्यवसायाची सूत्रे सांभाळू लागले..

आज आकाशवाणीवर सर्वात जास्तवेळा गीर्वाणवाणी, सुक्तपठण, वेदातील निसर्गवर्ण आणि अथ् तो वेदजिज्ञासा यातले मंत्रपठण..यात दंडगे गुरुजी हमखास असायचेच...त्यांच्या आवाजात एक वेगळा घुमटाकार ध्वनी आहे..त्यांचे मंत्रोच्चार ऐकताना..तो पुन्हा पुन्हा परत तुमच्याभोवती निनादत रहातो..

नीता कुलकर्णी यांनीतर त्यांच्या अनेक स्त्रोस्त्रांचे पठण एकत्र करुन त्याची सीडी बनविली आहे..त्यांनी ती अनेकांना भेट दिली..ती ऐकताना घरातले वातावरण प्रसन्न बनत रहाते असे अनेकांचे मत असल्याचे त्या सांगतात.

ते कसे घडले यापेक्षा त्यांनी कितीजणांना घडविले ते सांगणे उचित होईल. अतिशय निष्ठापूर्वक ही परंपरा त्यांनी वेदपाठशाळेतील अनेकविध विद्यार्थ्य़ांना समाधानपूर्वक प्रदान केली. आज त्यांच्याकडून शिक्षण घेऊन सुमारे ४०० जण या व्यवसायात स्वतंत्रपणे कार्य करीत आहेत.

आपली लौकिक पात्रता नसतानाही या विद्येच्या जोरावर अनेक क्षेत्रातल्या महनीय लोकांचा सहवास लाभला. वेदमूर्ती म्हणून समाजात मान्यता मिळाली. घनपाठाच्या जोरावर अनेक यज्ञात सहभागी होता आले. दशग्रंथ पारायणे, गायत्री महायज्ञ, ऋग्वेद संहिता स्वाहाकार आणि धर्मकृत्त्यात सहभागाची संधी मिळाली यात ते समाधानी आहेत.
  
तीन रॅंग्लर यांची बुध्दीमत्ता एकत्र केल्यानंतर जेवढी बुध्दी होईल तेवढी बुध्दीमत्ता एका घनपाठीमध्ये आहे..असे डॉ. जयंत नारळीकर सांगतात..तेव्हा आपण काही तरी आहोत याची जाणीव होते असे दंडगे अभिमानाने सांगतात.

लौकिक अर्थाने संसार उत्तम पार पडला. कुठेही आर्थिक उणीव निर्माण झाली नाही की कमी पडले नाही...सारे समाधान पदरी पडले आहे..

धनंजय चंद्रचूड, अविनाश भोसले, सुधिर मांडके, दिपक टिळक...आशा अनेकांच्या घरची कार्ये आपल्या हस्ते होतात..यातच आपण धन्य असल्याचा निर्वाळा ते देतात.

अनेक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यातही कांची पीठ, द्वारका पीठ, ज्योतिषपीठाकडून विशेष सन्मान लाभला आहे. यातून धर्मशास्त्राविषची खोलवर माहिती झाली..ती इतरांपर्यत पोहोचवली. शिष्यवर्ग तयार केला..आणखी काय पाहिजे..अखंड ज्ञानदान करावे. नवीन विद्यार्थी घडवावेत. धर्मशास्त्रीय ग्रंथांचे शंकासमाधान करावे आणि आपली परंपरा पुढे जपण्यासाठी अखेरपर्यंत कार्य करावे हिच इच्छा प्रकाश दंडगे गुरुजींच्या मनात आहे..

.
शोभिवंत असणे कुणाला नको असते..
नामवंतात बसणे कुणाला नको असते.
भाग्यवंत होऊन परंपरा जोपासणे कुणाला नको असते..
ज्ञानदान करणे हेच आता काम..
प्रज्ञावंत तयार करणे हे ध्येय्य..


त्यांच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात हीच इच्छा..सुभाष इनामदार,पुणे..
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: