Monday, December 30, 2013

गेलेले दिवस नाही जोडता येत

मित्रहो,
हे सारे वेगवेगळे विचार या एकात व्यक्त झाले आहेत..त्या प्रत्येकाचा स्वतंत्र विचार करा...बघा काही आपल्या  हाती लागते.... की निसटून जाते..

शोधू लागलो आहे सूख
जे आपल्याजवळच आहे
अलगद उचलून क्षणांना
मी मोहरत आहे



गेलेले दिवस उजळून
पुन्हा नाही जोडता येत
विस्तवासारखे शब्द
पुन्हा नाही निखारे होत

 







पुन्हा एकदा धावता येतं
नाती पुन्हा बांधता येतात
बंधने तुटत नसतात
ती दूर असल्यासारखी भासतात

पुढे मात्र सारे काही
मनासारखे करणार आहे
वाटणारे सारे भास
प्रत्यक्षात आणणार आहे

काटे मागे फिरताना
पहातो आहे
पुन्हा एकदा मशाली
पेट घेता आहेत

कुणा सांगावं तो दूरचा
जवळ येऊ पहातो आहे
नव्याने काही
मीही आता विणतो आहे





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 28, 2013

मात- पहावा..तो इशा कोप्पीकर यांच्यासाठी


एखादी मराठी मुलगी परदेशात राहून परत आपल्या घरी आल्यावर जसे मराठी बोलेल तसाच काहीसा संवाद इशा कोप्पिकर हिच्यामार्फत मात या चित्रपटात ऐकावा लागेल. पण तीने काम मनापासून केले आहे.व्यवसायने मॉडेल अशी ती आणि तो स्ट्रक्चरल इंजीनिअर..दोघेही आदी प्रेमात मग लग्नाच्या चौकटीत अडकतात.पुढे एक मुलगी होते आणि ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आवाजाचा मुलीवर काहीच परिणाम दिसत नाही..मग आई-वडीलांच्या लक्षात येते. ही कर्णबधीर आहे ते.



मात या चित्रपटाची कथा इथून सुरु होते..वडील..म्हणजे उच्चशिक्षीत असणारा समीर धर्माधिकारी ..हे सारे तुझ्या वडीलांमुळे घडल्याचे दुषण लावतो आणि या लॅव्हीश कुटुंबात मीठाच खडा पडतो...समीर पुढे करीयच्या मागे परदेशातच जातो..इकडे ती इशा आपले मॉडेलिंगचे करियर सोडून मुलीच्या प्रगतीसाठी पुढे सरसावते..त्याला तिच्या सासूबाईंची साथ मिळते..त्यातून हिला समजतेतीला बुध्दीबळाची जात्याच ओळख पटते आहे.मग ती एकेकाळच्या ग्रॅंड़ मास्टर असेलल्या सुहास पळशीकरकडे जातात..तिथे मिनी आता यातच गती घेणार हे दिसते..पुढे तेच होते..

खरं म्हणजे हि कथा आहे..त्या जिद्दी आई-मुलीच्या यशस्वी संघर्षाची आणि अशक्य वाटणारे सारे काही सहजपण घडू शकते जर तुमच्यात ती ताकद असेल..आत्मबऴ असेल आणि तुमच्या मागे खंबीर भूमिका घेणारे पालकांचा तेवढा सबळ आधार असेल तर...
बुध्दीबळासारखा खेळ असूनही त्यातल्या काही खेळी जर माहित असतील तर हा मध्येतरानंतर फारच बुद्दीबळाच्या खेळींनी व्यपलेला चित्रपट तुम्हाला आवडेल.नाहीतर थो़डे बोअर व्हाल..
बुध्दीबळ आवडणा-यांनी तर पहावाच..पण अंगातल्या गुणांचे चिज करणारे छत्र मिळाले तर काय होऊ शकते याचे ते एक उत्तम उदाहरण आहे.


आजच्या काळात घडणारा एक चकचकीत घरातला हा चित्रपट..वातावरणही ते तसेच...वरवर प्रेम असलेल्या कुटुंबीयासारखे.
आजही इतक्या हल्काय विटचारांचे लोक या सोकॉल्ड श्रीमंती घरात वावरतात..हे दाखविण्यात दिग्ददर्सकाबरोबर कॅमेराही तुम्हाला सांगेल..मराठी चित्रपटात का असू नये पॉश ..झगमगीत घर

समुद्र..ते किनारे...त्या गाड्यातल्या गाण्याच्यां जागा..सारे काही यात आहे...प्रथम हे सारे वरवरचे झपाटलेपण वाटते...पण जेवन्हा मीनीच्या बुध्दीबळाचे प्यादे जसे मात करु लागतात...सुहास पळशीकरांसारखा दमदार कलावंत जेव्हा सारे प्रसंग आपल्याकडे ओढत घेऊन जातात..तेव्हा ती कहाणी बनते त्या हुशार आणि जिद्दी मुलीच्या कर्तृत्वाची कहाणी..
-चित्रपट पहावासा वाटतो..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यामुळे  आणि मीनीच्या हुशारीच्या चालीने..जी चाल शिकविणारे सुहास पळशीकरांच्या आत्मविश्वासात्मक संयमीत गुरुपदेशामुळे..-

-या विषयाचा पुरेसा गृहपाठ करुनच सरवणकरांनी चित्रपट वेगळा बनविला आहे..त्यांच्या दिग्दर्शनाला कलाकारांनी आणि मुख्यतः छायाकारांनी उत्तम दाद दिली आहे.

-व्यवसाय झाला तर तो कुणाला नको आहे..पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या गीत- संगीतकाराच्या जोडीने त्यांचा बाज इथे जपला आणि जपला आहे..शब्दातील भावनांचा चित्रबध्द उत्तम केले ते पडद्यावर.
प्रत्येकाबाबत लिहले नाही तरी चालेल..पण इशा कोप्पिकरचे निवडणे हिच मोठी गोष्ट..तिची मॉडल म्हणून रुळलेली वाट इथे स्पष्ट दिसते..तशी आई आणि प्रेमळ पत्नीही...


-बुध्दीबळातील प्रभावीपणाचा उपयोग करुन जन्मतःच कर्णबधीर मुलींच्या मनात आणि त्यांच्या माता-पित्यांच्या मनाला उभारी देण्याचे एक चांगले काम इश्शा कोप्पीकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने प्रभावीपणे केले आहे.
कलाकारांमध्ये उल्लेख झाला अनेकांचा पण जो राहून गेला पण आवश्यक होता तो मीनीची भूमिका पडद्यावर दाखविणा-या या बालकलाकाराचा..तेजश्री वालावलकर...रमाच्या भूमिकेचे सोने करुन तीच्या वाट्याला येतात ती सा-या भूमिकांना न्याय देते..इतेही तिची कणव आणि बुध्दीची चमक दिसते...यातले महत्वाचे म्हणजे आई-मुलीच्या खुणांच्या भाषेचे जे गुपित जमले आहे..तेही अनुभवायला हवे...आनंद अभ्यंकरांच्या छोट्या भूमिकेतही ती आनंदी वृत्ती चित्रपटाला सुसंगत असीच आहे..

मनोहर सरवणकर या दिग्दर्शकाचे या अवघड कामगीरीबद्दल मनापासून अभिनंदन.निर्माताही तेवढाच महत्वाचा अशा विषयावरचा चित्रपट इतक्या श्रीमंती थाटात तयार करुन आपली वेगळी प्रतिभाही त्यांनी दाखविली आहे..



-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 16, 2013

छाप भीमसेन जोशींची उरतेच..


गेले चार दिवस पुणेकरांनी थंडीही अऩुभवली आणि स्वरांचे तारांगणही पाहिले...१२ ते १५ डिसेंबरच्या पाच सत्रातील स्वरांचा हा यज्ञ थांबला तो किराणा घराण्याच्या गायिका आणि गायनातील सौंदर्यस्थळाची ओळख करुन देणा-या डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी आवाजाच्या स्वराने.
वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने  पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.


अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्‍या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन्‌ "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली. 
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग  साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली. 

खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते  पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आणि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.







- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Saturday, December 14, 2013

तारसप्तकात फिरणा-या तांनाच्या जादूगार




शुक्रवारची दिवस विशेष लक्षात राहिला तो बेगम परवीन सुलताना यांच्या तारसप्तकात फिरणा-या तांनाच्या हुकमी जादुमयी तानांनी.
मारूबीहाग रागाच्या बंदीशीतले सारे काही नाजूक स्वरसमूह त्यांच्या आवाजात असे काही दाखल होत होते की जणू तो राग ती बंदीश त्यांच्यासाठीस रचली गेली असावी..
एकाच वेळी दोन स्वरातली तान त्यांच्या या गायनात फारच मोहक रित्या प्रस्तुत झाली.
वेळेचे बंधन होते नाहीतर त्यांनी रागाचा आविष्कार कितीही वेळ केला तरी तो मोहकपणा कमी झाला नसता..गुरूंकडून मिळालेली विद्या व त्यावर केलेल्या प्रचंड रियाजाच्या मिश्रणातून तयार झालेल्या खास परवीन शैलीत म्हणजे तीनही सप्तकांत सहज फिरणारा सुरेल गळा, अतितार सप्तकातून क्षणार्धात मंद्रात येण्याचे कसब, कधी बुलंद तर कधी मृदू, सादाला प्रतिसादाप्रमाणे येणाऱ्या स्वरावलीतून सादरीकरणाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.
पुन्हा एकदा मोठ्या कलाकालांना या स्वरमंचावर केवळ तास दीडतास गायची वेळ येते. रात्री दहा वाजता गायन थांबवावे लागते ही खंत पुन्हा एकदा परवीन सुलताना यांची जाहिर व्यक्त केली.
इतका चांगला ..योग्यवेळी योग्य अशी दादा देणारा रसिक फक्त याच महोत्वसात दिसतो..हे त्यांनी जाहिरपणे सर्वत्र सांगून त्यांची स्तुती केली. म्हणून तर खास `रसिका तुझ्यासाठी`च्या दोन कडव्यांची रचना अतिशय भावपूर्ण रित्या त्यानी तेवढ्याच तन्मयतेने सादर केली.
पं. मुकुंदराज देव व श्रीनिवास आचार्य यांनी तबला व हार्मोनिअमवरील संगत समर्पक अशीच होती.




- subhash inamdar, Pune
9552596276

Tuesday, December 10, 2013

गच्चीवर डुलणारी बाग


होती आवड. सवडही काढलीय..२००५ ला गच्चीवर हळुहळु एकेक रोपं लावायला सुरवात केली..आज तीच त्यांची बहरदार छबी मला आकर्षित करीत आहे..






नकळत लावलेल्या तुळशीच्या रोपट्यांचा बहर आता चहुकडे पसरला आहे..शिवाय ही कृष्ण तुळस आहे..त्यामुळे रुचीला उत्तम तशी ही आरोग्यालाही चांगली..आता त्यांच्या वासामुळेच मनही आनंदी वनून जात आहे.










अगदी नजर जाईल तिथे ही तुळस मनाला समृध्दी देते...









थोड्या वरुन ह्या तुळशीसमोरच्या कुंडीतही काही फुलांची झाडे डोलताहेत..त्यात कळीचे जास्वंद आणि पांढरी आणि तांबडी जास्वंद रोज देवासाठी उमलून येताहेत..








हिच ती अधिक जवळची छबी..आता त्यांना वर्षही बरीच झालीत..रोज कुठल्याही प्रकारची बाहेरची खते न घालता..केवळ घरातल्या ओल्या कच-यावर ती फुलली आहेत..




अगदी डाळींबाचे रोपही आनंदात डुलू लागले आहे..गणेश डाळींबाला आता फळही येत आहे..किती गोड ना..








आता हेच पहा ना..तुळशीच्या शेजारच्या वाफ्यात आलं आणि लसणाची पात किती झकास उभी आहे..आता ती पात काढायला आली आहे..तीरीही मंडइतल्या भाजीवाल्याकडून खास लसणीच्या पाकळ्या आणून सध्या तर रोज ही पात पंधरा दिवसात पुन्हा उभी रहात आहे...




उतारावर असलेल्या सिंमेटच्या छतावरही कुंड्या ठेऊन..उन्हात संरक्षण मिळते..पावसाची दाहकता कमी होते आणि नजरेला छान फुलांचा मोहरा दिसू लागतो...


असेच एखाद्या कुंडीत कुंदाचे फुलही कसे हळूच डोकावून आपली छबी इथे खास करुन दाखविते आहे..

कळीच्या जास्वंदीची फुलेही मधून डोकावून आपला लालचुटूक रंग खुलून फुललेला नजरेत भरुन येत आहे...

या गच्चीवरचा असाही एक कोपरा या कुंड्यांनी भरून गेला आहे..तरीही भरपूर जागा शिल्लक आहे.
.
मनात असलं आणि आवड असली तरी आपणही गच्चीवर असे काही आनंदाचे मळे फुलवू शकता..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276



Thursday, December 5, 2013

'जगण्याचा' थरार अनुभवण्याची पुणेकरांना

डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे छायाचित्र प्रदर्शन मृत्युच्या जबड्यात 'जगण्याचा' थरार अनुभवण्याची पुणेकरांना संधी मिळणार आहे..

क्षय रोगाने पोखरलेले देह, मेंदूच्या मलेरिया ने कोमात गेलेले रुग्ण, झाडावरून पडून हात पाय मोडलेले रोगी, जीवघेण्या विषारी सर्पांनी घेतलेले चावे, अस्वलांनी चावा घेऊन फाडलेले चेहरे घेऊन शे-दोनशे किलोमीटरचे जंगल तुडवत येणारे माडिया गोंड आदिवासी दवाखान्यात - अंगणात झाडाखाली जागा मिळेल तिथे त्यांच्यावर रात्रंदिवस चाललेले उपचार, कडेकपारीतील पाडे सोडून लिहिणं, वाचणं, जगणं शिकायला आलेल्या माडिया - गोंड मुला-मुलींना गजबजलेली आश्रमशाळा आणि बिबट्या, अस्वल, कोल्हे, साप, मगर, साळींदर, हरीण, मोर, लांडोरीपासून 'करीना' नावाच्या शुभ्र देखण्या गाढवी पर्यंत अनेकानेक अनाथ प्राण्याचं दुखलं - खुपलं पाहत त्यांना सुखाने एकत्र नांदावणार अनाथालय !

हे जग प्रत्यक्षात अस्तित्वात आहे…गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावात ! डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली "लोक बिरादरी प्रकल्पातील" हि अनोखी दुनिया पुणेकरांसमोर खुली होत आहे एका छायाचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने. महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पातल्या गेल्या ४० वर्षातल्या वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचे व बांबू क्राफ्टचे प्रदर्शन भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, औंध, पुणे, दिनांक ६ ते १० डिसेंबर २०१३, वेळ सकाळी १० ते रात्री ८ येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

बांबू क्राफ्ट प्रदर्शन: छायाचित्रांबरोबरच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या बांबू हस्तकलेच्या वस्तूही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा म्हणून लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत बांबू क्राफ्ट प्रशिक्षण व विक्री केंद्र चालविल्या जाते.

पुस्तके व फिल्म: लोक बिरादरी प्रकल्पाच्या कार्यावर आधारित विडीओ फिल्म तसेच प्रकाशवाटा¸ समिधा¸ नेगल¸ रानमित्र¸ एका नक्षलवाद्याचा जन्म इत्यादी पुस्तके सुद्धा प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.
महाराष्ट्राच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात चालणाऱ्या या निरलस कार्याचा प्रारंभ स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांनी १९७३ मध्ये केला. त्यानंतर डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अन्य कार्यकर्त्यान समवेत ही जबाबदारी उचलली. आज हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. लोक बिरादरी च्या आश्रमशाळेत सुमारे ६५० आदिवासी विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. तसेच जंगलतोड आणि शिकारीमुळे मरणाच्या तोंडाशी पोहोचलेल्या अनाथ वन्य जीवांना आमटेज् अनिमल आर्क (वन्यप्राणी अनाथालय) मध्ये अभय देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.

लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे आयोजित या प्रदर्शनाच्या ठिकाणी लोक बिरादरी प्रकल्पाचा थरार पडद्यावर उलगडणारी "अरण्यातल्या प्रकाशवाटा" ही ध्वनीचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे.
पुण्यातील सजाण-जागृत-संवेदनशील नागरिकांनी सह कुटुंब - सह परिवार या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन मित्रमंडळा तर्फे करण्यात येत आहे.
अधिक माहिती करिता श्री. सचिन मुक्कावर - ७५८८७७२८५८ यांच्याशी अथवा लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे च्या कार्यकर्त्या सौ. शिल्पा तांबे - ९८५०६६६७२९ यांच्याशी संपर्क करावा.

आर्थिक मदतीचे आव्हान: आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास रुपये ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. ४ कोटी रुपये देणगी मिळविण्यात प्रकल्पाला यश आले आहे. अजूनही १ कोटी रुपये जमवायचे आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी देणगी स्वीकारण्यात येईल. नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे.


ऑन लाईन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येते.

S.B. Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora S.B. Account No.: 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch) IFSC: MAHB0001108


Tuesday, December 3, 2013

का सांधतो मी कुणाचे




का सांधतो मी कुणाचे
जे आपणास ठावे
कधी बांधीला दुरावा
तो दूर अंतरी दिसे

किती मोह पडावा याचा
अंर्तबाह्य रुपेरी
पडदा पाहून लपला
दूर चेहरा हासरा

का अनंदाचे डोह
पाहता उजळे माथा
किती किरणे नाचती समोर
चमकून मोहवी मजला

हा गोड लाघवी चेहरा
कधी हाती लागे मजला
त्यादिनी एक परंतू
अलगद टिपून गेला




-सुभाष इनामदार,पुणे

Monday, November 11, 2013

शिंत्रे यांचा हा परिवर्तनाचा प्रयत्न आहे

 
`पुष्पाचे प्राक्तन `कथेच्या पुस्तकाचे प्रकाशन
 
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने केवळ `प `या अक्षरातून मिलिंद शिंत्रे यांनी साकारलेल्या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा `पुष्पाचे प्राक्तन `कथेच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातल्या प्रायोगिक समजल्या जाणा-या सुदर्शनच्या रंगमंचावर ज्येष्ठ समिक्षक आणि माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. बि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले.
मिलिंद शिंत्रे यांची गणती पुण्याच्या विक्षिप्त अशा माणसांच्या यादित करण्यात श्रीरंग गोडबोले विसरले नाहीत.. त्यांचा हा वेडेपणाच आणि इतरांपेक्षा काही वेगळा प्रयत्न यालाही त्यानी दाद दिली..
मराठी भाषेत अशा पध्दतीचा एक वेगळा प्रयत्न आपले मित्र मिलिंद शिंत्रे करीत असल्याबद्दल नाटककार चं.प्र. देशपांडे यांनी मराठी भाषेची राज्याकडून होत असलेली हेळसांड आणि इतर राज्यांच्या मानाने भाषेच्या संवर्धनासाठी माणशी १ रुपया आणि अस्थापनासाठी त्यातलेच ५० पैसेच खर्च होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली..आता भाषा टिकविणे हे आपल्याच भाषिक लोकांच्या हाती असल्याने असा वेगळ्या पुस्तकानिमित्ताने पुन्हा मराठी भाषेला जागतिक स्वरुपात कोंदण लाभले असल्याचे अभिमानाने सांगितले.
तर बरोबर उलट मत द.भिं. कुलकर्णी यांनी मांडले..ते म्हणाले की भाषा बुडत चालल्याची ओरड मला मान्य नाही..मराठी भाषा कधीच बुडणारी नाही...ती विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटल्याप्रमाणे मराटी भाषेला काहीही झालेले नाही..तीची नाडी व्यवस्थित सुरु आहे...मराठी भाषेत परिवर्तन होत आहे..शिंत्रे यांचा हा परिवर्तनाचा एक खास प्रयत्न आहे..त्यांचे अभिनंदन..

प्रकाशनाच्यानंतर याच कथेच्या अबिवाचनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला..तो दिली यात स्वत लेखक शिंत्रे, शर्वरी जेमिनीसःफाटक, धीरेश जोशी, गोरी लागू इत्यादिंचा... समावेश होता...केवळ` प` वरून गीत करुन आणि पपपप पपप करुन सनईची वाजंत्री वाजवून ओंकार केळकर यांनी या अभिवाचनाला संगीत दिले होते..
एकूणच हा मराठी भाषेतला
पुस्तक प्रकाशनाचा प्रकर्षाने पचविलेला प्रकार पुन्हा पुन्हा प्रकट प्रवाहा प्रमाणे पराकोटीने पूर्ण पावावा..
 
 
-subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, October 7, 2013

माणसात असूनही स्वतःलाच शोधतोय मी

 
 
गर्दीत हरवेलेला चेहरा शोधतो आहे कधीचा
न्याहळतो आहे माझाच चेहरा मी कधीचा

माणसात राहून स्वतःचा चेहराच हरवलोय मी
दूर जाऊन एकांतात म्हणतो पाहीन मी
किती दिवस झाले मी मलाच ओळखले नाही
चेहरा हरविलेला माणूस होत आहे मी

नव्याने माणूसपण शोधण्याची वेळ आली आहे
एकमेकांना आधार शोधतोय मी
लख्ख प्रकाशातही पाहता येत नाही
डोळे दिपवून टाकणारे भोवताल पाहतो आहे मी

उजळून इतरांना मीच हरवत आहे..
माणसात असूनही स्वतःलाच शोधतोय मी
 
-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, October 4, 2013

नवदिवसांचा जागर ..

दुर्गेच्या रुपांचे आम्ही सारे भक्त
तिजसाठी मांडला नवदिवसांचा जागर
मनोमनी प्रकटावी तुझीच मूर्ती
आस अशी ती करीतो पूर्ती
उदे उदे मुखी गर्जतो
जागरण .गोंधळ नवसाला पावतो..

तुझ्या उपासने वाढते ती शक्ती
माणसात येती चेतना चित्ती
आसूर. दानव यांची दाटी इथे मोठी
भ्रष्ट्राचारी, लाचखोरी चाले इथे सस्ती
कुणालाही नाही वाटे इथे लाज
जो तो मिरवे बिनाघोर

महागाईच्या खाईत पुरते लोटलो
खड्ड्यात भारी दलदल

चित्त स्थिर नाही तुझ्या चरणी आई मागतो हे दान
कृपा करी छत्र देई वरदान
 
 
 
- subhash inamdar, pune

आसरा शोधताना


मनाची अवस्था विचित्र होती
उभे होते सारे पण हात रितेच होते
कवाडं सारी बंद वाटत होती
अंधारून आल्यासारखं झालं
मिळेल त्या कोप-यात मिटून पडावसं वाटलं....

 नवी स्वप्ने पहाण्याचं धाडस होईना
मनही बिथरून विश्वास हरवून बसलं
कोडंवाड्यातल्या जनावरासारखा
सुटकेचा किरण शोधत राहिलो
 कुणास ठाऊक बपर्वा बनलो

 झालं ते पान मिटवून टाकलं.
नवं कोरं सारं असावं तसं..
अचानक क्षण हाती आला
कोप-यात किरण उमटले
शरीराचं सोनं झालं
आकाशातला कोळोख मिटून गेला
लख्ख प्रकाश दिसू लागला
बदल माझ्यात की मी बदललो
उमजेनासे झालं ..


स्थिरतेला पहिला कंदील मिळाला
किरणांना पंख फुटले
आयुष्य आनंदून गेले..



-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, October 2, 2013

पुन्हा एकदा माडगूळकर..‘अजून गदिमा’ मध्ये


गदिमांच्या ९४ व्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या थोरवीची गाथा ऐकण्याचे भाग्य..
आम्हा पुणेकरांना लाभले ते त्यांच्या अप्रकाशित कवीतांचे पुस्तक 
‘अजून गदिमा’त्यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांनी लिहले आणि ते प्रकाशित केलेल कॉन्टिनेंटलच्या  देवयानी अभंय्कर यांच्या वतीने...  या पुस्तकाच्या निमित्तानि पुन्हा एकदा गदिमांची थोरवी रसिकांच्या कानी घातली गेली..खरे पाहता पुन्हा एकदा माडगूळकर पुन्हा जीवंत झाल्यासारखे वाटले..

तरुण पिढिचे लोकमान्य कवी..संदीप खरे ..यांनी माडगूळकरांच्या सहवासात यानिमित्ताने आपल्याला रहाता आले..याचा अधिक आनंद झाल्याचे सांगून आमची पिढी त्यांच्या कवीतांवर आणि गीतांचा आजही किती चाहती आहे हे स्पष्ट केले.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले.


श्रीधर माडगूळकरांनी जयंतीच्या दिवशीच गदिमांच्या जन्माची कथी जी ऐकविली..तेव्हा ड़ोळ्यातून पाणी आले..मृतसमान असलेल्या मांसाच्या गोळ्याला जेव्हा विस्तवाचा स्पर्श झाला आणि जेव्हा पहिला कौहमचा उद्गार आला तेव्हाच हा मोठा होणार याची कल्पना आली...पुरण्याची तयारी असताना सुईणीने केलेल्या या प्रयत्नातून हा महातवी उदयाला आल्याची भावना..फार निराळी आणि चटकालावून जाणारी होती..


आपल्या आईेने बबनराव नावडीकरांच्या १०८ वेळा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला बेलबागेत आपल्याला नेले..तिथेच गदिमांची महती लक्षात आली..मात्र ती गेली त्यानंतर चारच दिवसांनी गदिमा गेले..ह्या दोन्ही घटना आयुष्यात चटका लावणा-या होत्या असेही निफाडकरांनी सांगितले.  ३५ उर्दु शायरांचा परिचय करुन देणारे मै शायर हेपुस्तक आज प्रकाशित होते याबद्दल समाधान व्यक्त करुन माडगूळकरांच्या पुस्तकाशेजारी बसणायचे भाग्य म्हणजे त्यांच्या तरणाजवळ बसण्याचा हा मान आहे..असे समजतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

देवयानी अभ्येकरांच्या निवडीचेही अनेकांनी कौतूक केले. ७५ वर्षीची परंपरा असलेल्या प्रकाशन संस्थेचे आजोबा.अनंतराव, वडील. अनिरुध्द आणि आता काका.रत्नाकर कोणीही नाहित.याची वेदनाही देवयानी यांनी बोलून आपल्या भावना वाचकांसमोर उघड्या केल्या..



-सुभाष इनामदार, पुणे



subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, September 26, 2013

'संहिता - The Script' - येत्या ११ ऑक्टोबरला




दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २० पुरस्कारांवर नाव कोरलेला आणि सहा विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेला चाकोरी बाहेरचे विषय हाताळणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्टस लि.' ने केली असून, प्रस्तूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेची आहे.

साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटाच्या सर्वोत्तम संगीतासाठी असलेला पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना तर सर्वोत्तम पार्श्वगायनासाठी असलेला पुरस्कार आरती अंकलीकर यांनी गायिलेल्या 'पलके ना मोडो… ' या गीतासाठी मिळाला असून हे दोनही पुरस्कार सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' या चित्रपटासाठी मिळाले आहेत. 

ही कथा आहे एका चित्रपट दिग्दर्शिकेची. ब्रिटीश राजवटीच्या काळातल्या म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधी एका शाही संस्थानाच्या काळात या चित्रपटातल्या घटना घडतात, अशी कल्पना ती करते. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे एक राजा, एक राणी आणि एक राजगायक यांची गोष्ट होऊन बसते. त्याचबरोबर त्यात प्रेम, दुरावा, अगतिकता आणि ध्यास याही ओघानेच येतात. गंमत म्हणजे अश्या या सगळ्या कथानकाची कल्पना करता-करता त्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांचेही बेमालूम मिश्रण त्यात होऊन जाते. चित्रपटाचा निर्माता, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शिकेसमवेत इतर तिघीजणी असे सगळेजण मिळून त्या चित्रपटाचा आणि व्याक्तिगत जीवनाचा शेवट देखील समाधानाचा आणि गोड कसा होईल याचा शोध घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर संहिताची गोष्ट ही स्वतः त्या चित्रपट दिग्दर्शिकेचीच आहे. 

 'संहिता - The Script' चे दिग्दर्शन करणारे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी आजवर बारा चित्रपट, चाळीसांहून अधिक लघुपट, पाच टेलिफिल्म्स आणि एक मालिका यांची निर्मिती केली असून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. 

 'संहिता - The Script' या मराठी चित्रपटाची निर्मितीसाठी तीन मान्यवर संस्था एकत्र आल्या असून सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स लि.' ने तसेच अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहयोगाने सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.

 'संहिता - The Script' चे कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुमित्रा भावे यांचे आहे तर गीतलेखन सुनील सुकथनकर यांनी केले आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे असून पार्श्वगायन आरती अंकलीकर यांचे आहे.

 सिनेमेटोग्राफी संजय मेमाणे यांची असून संकलक आहेत मोहित टाकळकर. कला दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि संतोष संखद यांचे आहे तर वेशभूषा गीता गोडबोले आणि सुमित्रा भावे यांनी केली आहे.  'संहिता - The Script' मध्ये देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठये, नेहा महाजन असे प्रमुख कलाकार आहेत.                        
                              

Monday, September 23, 2013

प्रत्येकाच्या मनात ...

शोध घेत आहे..कुठे स्वतःला रमवावं..काय नव करावं ज्यामुळे मनही मानेल आणि काही काम केल्याचा अनुभव येईल..एके काळी काम इतकं असायचं की पडल्यापडल्या कधी डोळा लागला ते कळायचंही नाही..आज मात्र उलटं आहे..आज काय काम काय याचा विचार करावा लागतो. खरं विचार करायचा झाला तर अनुभव असा आहे...कुठलेही काम कमी नाही हे मनात ठरवून काय केलं तर..त्याचा आनंद अधिक घेता येतो.. घरातलीही खूप कामे असतात..ती सहजपणे आपण करुन घरातल्या वातावरणात स्वतःला रमवून घेऊ शकता..


प्रत्येकाचा एक दिवस असतो
तेव्हा कुणी कुणाचा नसतो
उरतो तो स्वतः असतो
विचार न करताही तो दिसतो
मनताही त्याचा विचार पक्का असतो
तिथे कुठलाही अविचार नसतो
फक्त निग्रह कायम असतो

माणसावरचे प्रेम आतप्रोत असते
सारे काही त्या शब्दात सांधते
कितीही झाले तरी त्याचा एक काळ असतो
त्याचा आग्रह मग निग्रह असतो
कुणाचे राज्य त्याच्यावर नसते
तो स्वतंत्रपणे भासत असतो

प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
काहीना काही सांगून जातो
नकळत सारे घडत असते
त्याचेसाठी सारे काही असते
त्याला विचारत सारे काही सुरु असते
त्याचे मत मग महत्वाचे असते


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, September 17, 2013

आपण हे पाळू या...

आपण हे पाळू या...


आयुष्यात दुस-याच्या दुःखात
आणि सुखात
सहभाग घ्या..
...समाधान सहज मिळेल.

दुस-याला मदत करता आली नाही तरी चालेल...
पण विनाकारण डिवचणे चांगले नाही.

घरात आपल्यापासून इतरांना त्रास होईल
असे वागण्यापेक्षा
त्यांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करा..

समाज कार्यात
स्वतःचा स्वाभिमान सोडून तन,मन
आणि जमेल त्या धनाने सामिल व्हा..
मन तृप्त होईल..

आनंदाच्या प्रसंगी आणि
 दुःखाच्या वेळी
मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे जा...
माणूसपण जपले जाईल...

वेदना, विरह यापासून विरक्ति घेऊन
समाधानात सुख मानून..
मनशांत ठेवा



सुभाष इनामदार, पुणे

Saturday, August 24, 2013

'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरुपात



 
बकिंमचंद्र चटर्जी लिखित 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय देश बांधवांच्या भेटीला आले आहे.. गायक - संगीतकार ऋग्वेद देशपांडे व  'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'ची प्रस्तूती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील  युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आले.
 
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे  यांनी केले असून संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि  ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर 
मिसळला असून सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींडे यांनी सातसंगत केली आहे. 
 
या गाण्याचे रेकॉर्डींग ठाण्यात ऋग्वेद देशपांडे यांच्याच 'आरडी म्युझिक' या स्टुडिओत झाले असून   व्हिडिओ स्वरुपातील  गीत 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' ने तयार केले आहे. या  व्हिडिओ  गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. `वंदे मातरम` हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे असे संगीतकार  ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे  
राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी 
विनामूल्य बहाल करीत आहोत असे 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले.

Friday, August 23, 2013

श्रावणात असायचे कहाणीचे पठण.

आजही आठवते ते जुने दिवस...
 श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
 किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...

काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...

Wednesday, August 7, 2013

जयमालाबाइंच्या जाण्याने .संगीत रंगभूमी पोरकी



वय वर्षे ८७ चालू असताना किडनी काम करेनासे झाल्याने जयमालाबाई शिलेदार यांचे बुधवारी उशिरा रात्री २ च्या सुमारास निधन झाले..त्यांच्या दोन्ही कन्या कीर्ती आणि लता दोघीही त्यांच्याजवळ होत्या..त्यांच्यावर गुरूवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वौकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंतीम संस्कार करण्यात
आले..

गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे पार्थीव शरीर दर्शनासाठी..घरुन निघून बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर आणि टिळकस्मारक मंदिरात ठेवण्यात आले. संगीत, नाटक आणि कला क्षेत्रातल्या कलावंतांनी अंतीम दर्शन घेऊन झाल्यावर दुपारी पुण्यातल्या वैकुंठात अंतीम क्रियाकर्म करण्यातक आले. तिथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यांच्याविषयीचे आज गाणे संपले यां शब्दात त्यांच्याविषयीचे वर्णन एका शब्दात केले.


गंधर्वयुगाची परंपरा जपणा-या ..ती परंपरा स्वतः अऩुभवून ती आपल्या नाटकातून प्रज्वलीत करून ..पुढच्या पिढीपर्यंत पोचविणा-या मराठी रंगभूमीवर स्वतःची छाप पसविणा-या श्रेष्ठ ..अभिनय आणि गान कुशल अशा जयमालाबाई शिलेदार यांच्या निधनाने आज खरच मराठी संगीत रंगभूमी आईविना पोरकी झाली.

गेली काही वर्षे त्या सारे काही पाहू शकत होत्या पण बोलू आणि गाऊही शकत नव्हत्या..कीर्ती शिलेदार एका समारंभात मागे म्हणाल्या प्रमाणे ...`तिची आता मी आई झाले आहे.`..इतक्यापध्दतीने जपता जपता आज अखेरीस त्यांच्यावर नियतीने घाला घातला आणि त्यांचे निधन झाले..चेतनेतून त्यांचा देह अचानक अचेतन झाला..

संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणारी आणि बालगंधर्वांच्या बरोबरीने काम केलेल्या कांही हयात असलेल्या मोजक्याच नव्हे तर अखेरच्या या शिलेदाराची आज अखेर झाली असे लिहले तरी ते योग्य होईल.

आपला सारा संसारच त्यांनी मराठी संगीत रंभूमीला बहाल केला..त्यातून दोन रत्ने मराठी रंगभूमीला अर्पण केली कीर्ती आणि लता... स्वतःची मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. जयराम शिलेदारांच्या खांद्याला खांदा लावून ती संस्था त्यांनी जपली, टिकविली, वाढविली...त्यांच्या भूमिकांचे गारूड आजही संगीत रसिक विसरु शकत नाहीत.

रंगभूमीवर कसे दिसावे..गाताने गालावर प्रेक्षकांना आनंद कसा दाखवावा..गाण्यात सहजता कशी अशावी..उत्तम वेशभूषा कशी करावी..अभिनयाचा भाग कितपत आणि किती असावा..इतर पात्रे गात असताना स्वतः कशी दाद द्यावी..सारे काही प्रत्यक्ष करुन दाखविणारी ही कर्तृत्ववान श्रेष्ठ कलाकार आज काळाच्या ओघात स्वतःचा ठसा मागे ठेवत आठवणीतच जगत राहिल्या आहेत.

थोडे मागे वळून पाहताना.. संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात शिलेदार कुटुंबाची घराणेशाही अशीच लोकांनी स्वीकारलेली ,. ‘मराठी रंगभूमी’ ही शिलेदार कुटुंबाची नाटय़संस्था यांनी जयराम आणि जयमालाबाई शिलेदार यांनी संगीत रंगभूमीवर अनेक उत्तमोत्तम नाटके सादर केली.  विवाहापूर्वी जयमालाबाई या प्रमिला जाधव या नावाने रंगभूमीवर सक्रीय होत्याच. १९४२ ते १९६७ हा त्यांच्या नाटय़कीर्दीतील बहराचा काळ. ‘देशांतर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. गोविंदराव टेंबे त्यांचे मार्गदर्शक होते. साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात त्यांनी बालगंधर्वाबरोबर प्रथम ‘सं. शारदा’मध्ये काम केले. पुढे त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. बालगंधर्व जेव्हा केव्हा काही कारणांनी नाटकात काम करू शकत नसत तेव्हा त्या त्यांच्या भूमिकेत उभ्या राहत. त्यांची उणीव सहज भरून काढत. गायनात बालगंधर्व त्यांचे आदर्श होते. त्यांचे अनमोल मार्गदर्शन जयमालाबाईंना  जयमालाबाईंना लाभले. 

सुरेल, लयीबरोबर जाणारे, भावस्पर्शी, लडिवाळ गाणे हे बालगंधर्वाच्या गाण्याचे वैशिष्टय़ जयमालाबाईंच्या गायनातही आढळते. अभिनयाचे धडे तर त्यांनी गणपतराव बोडस व चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या दिग्गजांकडून घेतले. हसरा चेहरा व सहज, लाघवी संवादोच्चार हे त्यांच्या अभिनयाचे विशेष. 


‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. ‘शाकुंतल’मध्ये त्यांनी जयराम शिलेदारांबरोबर प्रथम एकत्र काम केले आणि पुढे त्या त्यांच्या सहचारिणीच झाल्या. उभयतांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली आणि प्रारंभी बाळ कोल्हटकरांच्या ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’ इ. नाटकांची तसेच ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ यांसारख्या नाटकांची निर्मिती केली. जुन्या संगीत नाटकांचे प्रयोगही संस्थेतर्फे करण्यात येऊ लागले. आपल्या संस्थेशिवाय इतर संस्थांतूनही त्या कामे करत. छोटा गंधर्वाबरोबरची त्यांची अनेक नाटके गाजली. . 

त्यांनी नाटकात काम करण्याबरोवरच नवी पिढी जी नाट्यसंगीत शिकू इच्छीत आहेत त्यांना नाट्यसंगीताचे धडे देण्याचे काम केले..म्हणूनच आज संगीता नाटके जरी कमी होत असली तरी नाट्यसंगीता्च्या मैफली बहारदार होताहेत...याचे क्षेय जयमालाबाईंसारख्या काळाच्या पुढे पहाणा-या कलावंताना द्यायाला हवे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानीत अशा या जयमालाबाईंनी वयपरत्वे काम करणे बंद केले.तरीही संगीत नाटकाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती..त्यांचे याही स्थितीत मार्गदर्शन सुरुच असायचे...खरे सांगायचे म्हणजे त्यांनी संगीत नाटके जगविली..त्यांना नवे घुमारे दिले. नवी पिढी तयार केली..आजही कीर्ती शिलेदारांच्या रुपाने संगीत नाटकांचा हा प्रवास एकांडे ध्येयपथीकाच्या रुपात पुढे सुरु ठेवला आहे..

आजही त्यांची ती संगीत नाटकातली मानापनातील `भामिनी`,स्वयंवरीतली `रूक्मीणी`,सौभदातली `सुभद्रा`..एवढेच नव्हे शारदेतली `सिंधू` समोर उभी राहून रसिकांना मनमोहक अशा संगीताभिनयाने मोहवित असल्याचा भास होत आहे...अशा श्रेष्ठ आणि पिढी घडविणा-या ज्येष्ठ आणि सर्वांच्या मनात भरून राहिलेल्या जयमालाबाईंच्या स्मृतीत राहणेच मराठी रसिक अधिक पसंत करतील..

त्यांच्या गाण्यांची मोहिनी काळानुरुप कमी झाली असली तरी त्यांची ती स्नेहल मुद्रा आजही रसिकांच्या मनात तेवढीच जिवंत आहे..त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली..
या रुपाने हिच आमची शब्दांजली....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, August 4, 2013

मैत्री म्हणजे ...

आज मैत्री दिवस साजरा केला जातो..खरे मित्र कोण जो संकटाच्या वेळी उपयोगी पडतो...असे वस्तुतः म्हटले जाते..पण या मैत्री दिवसाचे वर्णन करणारी ही रचना ...



मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे 
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..

मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
 मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..

मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे 
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..

मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची 
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची.. 

मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र 
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...





-संगीता बर्वे, पुणे




Wednesday, July 31, 2013

माणसातला देव शोधणारे सविता भावे


ज्येष्ठ चरित्र लेखक सविता भावे यांचा आज  80व्या वर्षानिमित्त गौरव करण्यात येत आहे.

14 नोव्हेंबर 1933 रोजी मळवली येथे जन्मलेल्या भावे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पेण येथे झाले. पुढे फर्ग्युसनमधून बीए आणि भारतीय विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी घेतली. मात्र तातडीने विवाह करावा लागल्याने वकिलीऐवजी मुंबईतील "वेस्टर्न इंडिया लाइफ इन्शुरन्स'मध्ये नोकरीला त्यांनी प्राधान्य दिले.

नोकरीदरम्यान, "नारळकर इन्स्टिट्यूट'चे एन. जी. नारळकर भेटले. त्यांच्या प्रेरणेतून 1967 मध्ये त्यांचेच पहिले चरित्र लिहिले. त्याचे आचार्य अत्रे यांनी कौतुक करीत "मराठा'तून अग्रलेख लिहिला. त्यातून प्रोत्साहन घेत लोकमान्य टिळक, वालचंद हिराचंद, शंतनुराव किर्लोस्कर, विनोबा भावे, जे. पी. नाईक आदींसह एकूण छत्तीस चरित्रे भावे यांनी लिहिली. निळकंठ कल्याणी यांचे चरित्र लिहिण्याचा योग आला आणि भावे स्थिरावले.

भरभक्कम व्यायाम, संतुलित आहारामुळे प्रकृती ठणठणीत होती. त्यानंतर हृदयविकाराचे झटके येऊनही उदंड उत्साह आणि लिहिण्याची इच्छाशक्ती यामुळे त्यातून तरल्याचे भावे सांगतात. पत्नी कुमुदिनीनेही साथ देत तिन्ही मुलींचा उत्तम सांभाळ केला. आज नातवंडे, पतवंडे असा परिवार पाहण्याचे भाग्य लाभल्याचे ते नमूद करतात.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने घरातून विरोध झाला. घर सोडावे लागले. वकिली करता आली नाही. संसारात पडल्याने राजकारणात जाण्याची इच्छा अपुरी राहिली. मात्र, अनेकांची चरित्रे आपल्या हातून लिहिली गेल्याचा आनंद वाटतो.
 
आपल्या `माणसातील माणूस` या आत्मचरित्रांच्या प्रस्तावनेत सविता भावे यानी नमूद केलेले त्यांचे मत त्यांच्याच शब्दात देत आहे.

आयुष्यातल्या माझ्या सा-याच धडपडीच्या तळाशी एक गोष्ट कायम राहिली आहे, ती म्हणजे माणसाच्या मनाचा आणि त्यातही माणुसकीचा शोध घेणे. थोड्याच काळात मला उमगले की, सर्वांत अनाकलनीय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणूस.  जितका अनुभव जास्त तितके हे कोडे अधिकच गहन होत जाते.  पण प्रत्येक माणूस मुळात चांगलाच असतो, हा विश्वास असल्याने प्रत्येकामधील चांगुलपणा जाणून घेण्याचा माझा यत्न राहिला आहे. 
अगदी क्वचित उदाहरणांमध्ये माणसांच्या ठायी दुष्ट प्रवृत्ती वास करताना आढळते. मलाही आयुष्यात अशा दोघांना सामोरे जावे लागले. पण काय योग असेल तो असो, त्या दोन्ही बाबतीत त्यांना परस्पर शासन घडल्याचेही प्रत्ययाला आले. पण काही अपवाद वगळले तर मला समोरच्या प्रत्येकाच्या ठायी काहीतरी गुण किंवा चांगुलपणा वास करताना आढळतो आणि त्यामुळेच जगण्यातली गंमत कायम रहाते.

स्वतःमधील माणसाचा शोध घेणेही माझे सतत चालू असते. आपल्या वागण्याचा काय अर्थ होऊ शकतो याची मी सदैव फिकीर बाळगतो. आपल्याकडून कुणावरही अऩ्याय होऊ नये यासाठी सतत मी दक्ष राहात आलो आहे. शक्यतो माझे मतही कोणावर मी लादत नाही. म्ङणून कोणत्याही नव्या वृत्तीला किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची माझी तयारी राहिली आहे. .

व्यक्तिगत-व्यावसायिक जीवनात अडचणी, अपेक्षाभंगाचे प्रकार अनेक घडले, पण त्या सा-यातून वाट काढीत पुढे चाता आले. व्यक्तिगत-कौटुंबिक आयुष्य समाधानाचे होते. व्यावसायिक जीवनात कष्टसाध्य पण भरपूर यश पदरी आले. पैश्या -अडक्याला कधी ददाद पडली नाही. ऐहिक सुखे सारी मिळाली. जो छंद जोपासला त्यात यश मिळाले, नाव झाले. प्रकृती उत्तम राहिली.




त्यांच्या सहवासात कांही काळ घालविता आला..त्यांचे स-दय मन आणि त्यांच्यातला माणूल अनुभवता आला..याचे समाधान मला अदिक आहे.माणसातला देव शोधणा-या या.........
 सविता भावे यांना विनम्र दंडवत.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Sunday, July 21, 2013

स्मरण गुरूंचे - पं. भीमसेन जोशी


मला पंडितजींच्याकडे १९७८च्या चैत्री पाडव्यापासून गाण्याचे शिक्षण घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त झाला. नंतर केवळ आठ दिवसातच त्यांच्या बरोबर गाण्याच्या निमित्ताने परगावी प्रवास करण्याचे योग सुरु झाले.

कुठेही प्रवासाला निघताना अत्यंत शिस्तबध्द पध्तीने उदा. प्रवासाला निघताना बॅग भरणे, प्रवासात लागणा-या सर्व वस्तू (स्वच्छ इस्त्री केलेले कपडे, लुंगी,दाढीचे सामान, पेस्ट, ब्रश इ.) व्यवस्थित बॅगेमध्ये आहेत का, हे पहाणे. वेळेच्या आधी किमान अर्धातास तरी इच्छित स्थळावर पोहोचणे याबबाबत पंजितजींचा कटाक्ष असे. अत्यंत शिस्तप्रिय हा एक त्यांच्या स्वभावाचा पैलू होता. 

मी पंडितजींना बाबा म्हणत असे. ते अत्यंत प्रेमळ होते. ब-याच वेळी गाणे शिकण्याच्या निमित्ताने माझा मुक्काम त्यांच्याकडेच असे. दररोज पहाटे चार वाजता ते उठायचे . स्वतः चहा करायचे. एखाद्या वेळेस मला जाग आली नाही तर ते स्वतः मला उठवत असत.  `उठा दात घासा...  तु चहा घे व मलाही दे ...`, असे सांगायचे.  चहा घेऊन झाल्यावर रियाजाला बसायची वेळ असायची. रियाजाला बसताना व गाण्याच्या मैफलीत बसताना मांडीवर तंबोरा घेऊन बसणे त्यांना अजिबात आवडत नसे. तंबोरा उभा घेऊन -अर्थवीरासनात ( मारूती बैठक ) बसायला लावत. सूर्योदय होईपर्यत फक्त खर्जाचा रियाज करायला लावायचे. एकदा असाच रियाज चालू असताना मी मध्य षडजावर चुकून एक स्वर लावला तर बाबांनी खिडकीकडे पहात `अजून सूर्योदय झाला नाही ., एवढे एकच वाक्य बोलले  व `खर्जाचे स्वर लावा `,असे सांगितले.

एकदा असेच गाण्याच्या मैफलीमध्ये त्यांच्या बरोबर गाण्याची साथ करत असताना सुंदरसा `कान्होबा तुझी घोंगडी चांगली `हा अभंग चालू होता. त्यामध्ये अनेक विविध ताना म्हणायला सांगीतले आणि मी मूळ चालीतली ओळ गायली ....त्यावेळी माझ्याकडे बाबांनी कटाक्ष टाकून मी म्हणलेल्या मूळ ओळीतून त्यांच्या चालू असलेल्या विविध ताना घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नेउन परत गाणे चालू केले. ती गाण्याची मैफल संपल्यानंतर मी अस्वस्थ झालो व आपण गाण्यात एवढी मोठी चूक केली या विचाराने मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी पहाटे गुरूजांच्याकडे रियाजाला गेलो तेव्हा मी त्यांचे पाय धरले आणि त्यांना म्हणालो.. `काल गाणे म्हणत असताना मी फार मोठी चूक केली.. `यावर ते मला म्हणाले..`अरे राजा..आपण केलेली चूक लक्षात येणे हे अत्यंत महत्वाचे आहे व आपण केलेली चूक मान्य करणे हा प्रामाणिकपणा व मोठेपणा आहे...अशा व्यक्तिलाच गाणं म्हणता येतं. आता अशी चूक परत तुझ्याकडून कधी घडणार नाही..`

माझ्या गुरुजींना गाडी चालविण्याची खूप आवड होती. असेच एकदा बेळगावला गाण्यासाठी त्यांच्या आवडत्या मर्सिडीज गाडीतून निघालो असताना गाडी सूरू केल्यानंतर मला म्हणाले..`आज काय गाडीचे तंबोरे जुळलेले दिसत नाहीत, जरा बेसूरच बोलती आहे..जरा पंडीत ओटोमोटीव्हमध्ये फोन लाव व बावडेकरांना  सांग की मी बोलावलं म्हणून..``.  श्री. बावडेकर आल्यानंतर त्यांनी गाडीची चाचणी केली व म्हणाले, `गाडी गॅरेजला न्यावी लागेल ..पण मी तुम्हाला एका तासाभरात गाडी आणून देतो` . गाडी परत आल्यानंतर बाबांनी बावडेकरांना विचारले  ,`काय झालं होतं.. `.बावडेकर म्हणाले ,`पंडितजी गाडीचा एक सिलेंडर बंद होता, आता दुरुस्त केला आहे. तुम्ही आता कुठेही घेऊन जावू शकता.. मग आम्ही  पुढील प्रवासाला निघालो..अशा पध्दतीने त्यांच्या रोमारोमात स्वर भिनलेला आहे.

 पंडितजींच्या अनेक अविस्मरणीय मैफलींमध्ये त्यांना मी तानपु-यावर गायन साथ केली. ते नेहमी मला सांगत....`तुम्हाला जेवढं गाणं येतं तेवढं प्रामाणिकपणे मांडा..   मैफलीत रियाज करु नका. प्रत्येक मैफल ही एक महापरीक्षा आहे आणि त्या परिक्षेत आपाल्याला उत्तम गुण मिळवून पास झालं पाहिजे. नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या आवाजाला काय झेपेल तेवढे नेमकेच घेऊन आपल्या गाण्यातले सैंदर्य वाढविता येते. त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गाण्यानी जर आपल्याला आनंद वाटला तरच ऐकणा-यालाही आनंद मिळतो.`

 हे स्वरसंगतीचे सुवर्णाचे क्षण मला माझ्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आता माझे मार्गदर्शक झाले आहेत. माझ्या गाण्याची प्रत्येक मैफल माझ्या गुरीजींना समर्पित आहे. 




 राजेंद्र दिक्षित,पुणे

Thursday, July 18, 2013

उंब-याबाहेरचं जग ...


उंब-याबाहेरचं जग किती वेगळं
सुंदर, आकर्षक, डोलणारं
प्रत्येक दिवस तिथं फुलत असतो
स्वप्नांना रोज झुलवीत असतो


चालताना फुले दिसतात.
पक्षी ऊडताना पाहता येते
वाहनातून शाळेत जाणारी ती पोरं दिसतात
मन पुन्हा शाळेत जाऊन बसतं
तिथली मुले ..शिक्षक..फळा आणि मित्रांसोबत घातलेला धिंगाणा .. सारं..
पुढे काळ बराच गेला..शाळा फुटली
महाविद्यालय दिसले....
बेगळ्याच दुनियेत गेलो 

आयुष्याला बहर आला.. 

सारं काही तेच असतं
वय वाढते
वर्ष ओघळून जातात
दाराबाहेरच जाणं कमी होत
बाहनांची भिती वाटते
दुःखांना झेलणं झेपत नाही
समोरच्यांचा बोलण्याचाही राग येतो..
काही करावसं वाटत नाही
पडून रहावं... शांतपणे
मग बाहेर कधीतरी पडलं..
तर मन मागे जातं...
बस्स आता एवढचं



- subhash inamdr,pune
subhashinamdar@gmail.com

Thursday, July 11, 2013

नाटकावरुन चित्रपट...`श्रीमंत दामोदरपंत`

पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.

१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे.

अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे  केदार शिंदे सांगतात.


माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी  उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`

रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.

श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..


`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.

वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.

सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, July 9, 2013

साधनाताई ,असंख्य मनाच्या श्रद्धास्थान

 साधनाताई ह्या असंख्य मनाच्या श्रद्धास्थान आहेत … आज  ९ जुलै हा साधनाताईंचा स्मृतिदिन … त्या निमित्ताने….

साधनाताई आमटे


श्रद्धेय साधनाताई,

सादर प्रणाम,

तुम्हाला आमच्यातून जाऊन आज ९ जुलै रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात तुमचे स्मरण झाले नाही असा दिवस माझा निघत नाही. तुमच्या बद्दल असलेली आंतरिक ओढ ही कायम होती आणि आहे. मला माहित नाही पण, बाबांपेक्ष्या मला तुमच्या बदल जास्तीचा आदर, आणि प्रेम होते. तुम्ही आयुष्यभर घेतलेले अपार कष्ठ. दु:खी, कष्ठी, अनाथ, अबाल, वृद्ध, मुके, बहिरे, कुष्ठरोगी, पिडीत, वंचित, यांच्या बद्दलची प्रचंड आपुलकी, सहानुभूती, ममत्व, करुणा, आणि वात्सल्य तुमच्या रोमारोमात होते. म्हणून तुम्ही आणि बाबा मोठ विश्व उभा करू शकलात.

“समिधा” वाचताना तुमचे अवघे जीवन किती कष्ठातून गेले आहे हे लक्षात येते, बाबांसोबत चा संसार, आनंदवन उभे करण्या पासून ते तुमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत महारोगी सेवा समितीचा झालेला भव्य दिव्य विकास, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, अशोकवन, मुळगव्हाण पासून सारे प्रकल्प केवळ तुम्ही बाबा, डॉ.विकास,  डॉ.प्रकाश आणि बाबांच्या सर्व सहकाऱ्यांनी समाजाच्या गरजे पोटी आत्मीयतेने उभे केले. लोकांनी प्रामाणिक साथ दिली.  अनेक मराठीच्या साहित्यिकानी, कलावंतांनी तुम्हाला व बाबांना मदत केली. त्यात पु.ल.देशपांडे, सुनिता देशपांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले. त्यांचा आणि तुम्हा उभयतांचा ऋणानुबंध कायम राहिला. 


‘समिधा’ वाचताना तुम्ही घेतलेल्या सर्वव्यापी कामाचे, कष्टाचा आलेख तुम्ही मांडला आहे. बाबांबद्दल चे तुमचे प्रेम आणि तुमची त्यांना मिळालेली साथ प्रकर्षाने जाणवते.

ताई, तसा माझा आणि आनंदवन चा संपर्क आला तो मुळात तो १९८६ साली. १९८५ साली बाबांनी तरुणांना घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी राष्ट्रीय एकात्मते साठी सायकल यात्रा काढायची ठरवले आणि अंबाजोगाईच्या शैला लोहिया यांच्या मुळे मला या यात्रेत जायला मिळाले. आणि तिथून मग आपला व आनंदवनचा संपर्क आला. पुढे अधून मधून आनंदवनला जाणे-येणे होतेच. पण सोमनाथ च्या श्रम संस्कार छावणी साठी मात्र मे महिन्याच्या त्या अति प्रचंड कडक उन्हात शिबिराला येत असे. 


पुढे बाबा आणि तुम्ही नर्मदेच्या बचाव साठी मध्य प्रदेशच्या बडवानी, कसरावद ला गेलात आणि ८-९ वर्ष फारसा संपर्क झाला नाही. `मासळ’च्या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी आणि तत्पूर्वी बाबांच्या वयाला ७५ वर्ष झाली म्हणून हेमलकसा येथे मोठा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. प्रकाश चा ५० व वाढदिवस, डॉ.दिगंत म्हणजे `पिल्लू` चे वैद्यकीय शिक्षणपूर्ण झाल्या नंतर त्यानेही हेमलकसा येथेच काम करण्याचा निर्णय घेतला ...तो त्याचा लोकार्पण सोहळा असा त्रिवेणी संगम घडून आला होता. त्याचा साक्षीदार म्हणून मी तिथे हजर होतो. त्या नंतर आपली भेट झाली ती तुम्ही नर्मदे वरून परतल्यावरच. पण तुमच्या पश्च्यात डॉ. विकास व डॉ.भारती यांनी `आनंदवन `आणि डॉ.प्रकाश व डॉ.मंदा यांनी `हेमलकसा` येथील काम वेगवान केले होते.

२००५ नंतर माझे परत आनंदवनात जाने येणे वाढले, त्याचे कारण होते आपण परत आलात आणि `स्वरांनदवन` चे महाराष्ट्र तील प्रयोग. मी या ओर्केट्रा सोबत दौरा असलो कि जायचो. त्यातील अंध, अपंग, निरोगी कुष्ठरोगी, मुकबधीर मुलेमुली असा १२५ जणांचा चम्मू आणि त्याना या दौ-यात मदत करणे. पण आपल्या व आनंदवन च्या संस्काराने जे प्रेम, माया, आदर, ममत्व तुम्ही जागे केले होते, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची आपली उर्मी आम्हालाही बसू देत नव्हती. 


आम्हीच नव्हे तर `आनंदवनात` जे कोणी येत असे त्यांची आपण किती काळजी घेत असा ते तेंव्हा येणा-या व भेट येणा-या प्रत्येक पाहुण्यांना माहित आहे. कोण आले आहे, त्यांची निवास, भोजन, आणि इतर सोयी झाल्या की नाही हे आपण जातीने पहायच्या आणि कांही सूचना असतील तर त्या तुम्ही देत असा..

किती बारकाईने तुम्ही हे काम करता हे मी पहिले आहे. त्यावरून तुमचे जगण्याची शैली समजून जाई..तुम्हाला आणि बाबांना पहाटे आणि सायंकाळी फिरण्याचे आणि गप्पांचे खूप वेड होते. नवे विचार आणि समाजासाठी आणखी काय करायला हवे हे चिंतन त्यात चाले. तुमच्या या कामाची दखल जगाने, देशाने आणि उभ्या महाराष्ट्राने घेतली. अनेक पुरस्कार बाबांना, तुम्हालाही मिळाले. पण तसूभरही गर्व तुम्हाला आला नाही. हे महत्वाचे. तुम्ही कामाला आधीक महत्व दिले.

२००७ नंतर २-३ महिन्यातुन एकदा असे माझे आनंदवनला जाने येणे वाढले होते. बाबा २००८ साली गेले त्यानंतर जेंव्हा जेंव्हा मी तुम्हाला भेटायला आलो तेंव्हा आग्रहाने तुमच्या सोबत सायंकाळी फिरायला यायचो. माझ्या सोबत फिरायला येतोका? असा तुम्ही प्रश्न विचारला  कि, आनंदाने मी तुमच्या सोबत यायचो. अनेक वेळा तुम्ही माझ्या साठी ३-४ मिनिटे वाट पाहत थांबलेल्या आहात. मला खूप अस्वस्थ व्हायचे, कि साधनाताई या कर्तृत्वाने किती मोठ्या आणि किती साधे पणाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी साठी वाट पाहत थांबत असत. 


असेच एकदा मी आनंदवनला आलो होतो. अमेरिकेतून चंदा आठल्ये आल्या होत्या त्या दर वर्षी अमेरिकेतून भारतात आल्या कि आनंदवनला यायच्या. आज फिरायला तुमच्या सोबत मी, चंदा आठल्ये, नेहमीचे नामदेव आणि कोणी तरी एक बाई सोबत होती. हल्ली तुम्ही गाडीने जायचा. पायी चालणे बंद झाले होते. मग संपूर्ण आनंदवन चा फेरफटका. फेरफटका मारताना तुम्ही सोबत चॉकलेट, किंवा मुलांसाठी खावू ठेवायचात, मग गाडी जवळ आली कि मुल ताई, आजी नमस्कार म्हणून अदबीने हात पुढे करायची आणि मग तुम्ही त्याला कांही तरी बोलून हसवायचात, आणि मग ते चोकलेट हातात पडल्यावर त्या मुलांना काय आनंद व्हायचा,ते त्यांचे हास्य आजही आठवते, 

फिरायचे वेळी रस्त्याचा दोन्ही बाजूला आनंदवनचे कार्यकर्ते, कुष्ठरोगी, मुकबधीर मुले,अंध मुले-मुली अदबीने तुम्हाला नमस्कार करायची, तुमची गाडी दिसली, किंवा आवाज आला कि लोक हात जोडून उभे असायची. हा केवढा आदरभाव, सन्मान होता, ताई. तुम्हीही गाडी थांबवून कधी, चालत्या गाडीतून ख्याली, खुशाली विचारायचात. असे करत करत, मग बाबांच्या समाधीचे दर्शन, समाधीला दिवा-वात करणे आणि निघणे. आज तुम्ही गाडी खाली उतरला नव्हता. तेवढेही त्राण राहिले नव्हते., मग मी चंदा आठल्ये आणि नामदेव ने बाबांच्या समाधीला फुले वाहिली, दिवा बत्ती केले आणि परतलो. मी माझ्या रूमवर लोटीरमणला गेलो. तेवढ्यात तुमचा सांगावा घेवून नामदेव आला. ताईनी बोलवले आहे जेवायला. तुमची मेस उत्तरायण. तुम्ही शेवट पर्यंत इथेच जेवण घेतले, सर्वांसोबत सामुहीक. तुमचा निरोप येताच मी धावत आलो तर खुद्द तुम्ही, आनंदवनचे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, चंदा आठल्ये आणि इतर सर्व तिथे होते. सर्वांची ताटे तयार होती आणि तुम्ही चक्क माझी वाट पाहत होता. मी किती भरून पावलो, ताई माझ्या साठी जेवायचे थांबल्या....! पण यात तुमचे किती मोठे पण होते तो लपून राहिला नाही. तुम्ही सहज घेतले पण मी आजही विसरलो नाही.

तुमची जगण्याची जिद्द आणि संकटावर मात करण्याची प्रबळ इच्छा याला तोड नव्हती. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अन्न वर्ज्य केले नाही पण खाण्याचे प्रमाण कमी केले, “शरीर आपल्या हातून गेले कि जगण्यात काय अर्थ आहे” हे तत्वज्ञान तुम्हीच आम्हाला सांगितले. अश्या परस्थितीत तुमच्यावर कर्क रोगाने घाला घातला. नागपूरच्या दवाखान्यात तुमच्यावर शास्राक्रिया झाली. मी भेटायला आलो, तसे अनेक जण भेटले, त्या सगळ्यांना तुम्ही जातीने अश्याही अवस्थेत चहा द्या, पाणी द्या, जेवण झाले का? कुठे थांबला,कधी आलात? कधी जाणार? असले प्रश्न विचारत होता. तुमचा वाढदिवस इथेच नागपूरला दवाखान्यात साजरा केला तो शेवटचा होता. सारे आमटे कुटुंबीय यावेळी एकत्र होते.....


तुम्हाला मी दवाखान्यात न्याहाळत होतो, आणि मला एकदम एक छायाचित्र आठवले, तुम्ही  एका अनाथ मुलीची वेणी करतानाचा. त्यात तिचा आणि तुमचा चेहरा किती फुललेला आहे आनंदाने. किती भाग्य या मुलीच्या वाट्याला आले होते, हे असे प्रेम, ममत्व मिळण्यासाठी मी का अनाथ, अंध, मुकबधीर, कुष्ठरोगी झालो नाही? असा प्रश्न पडला....मी जरा गंभीर झालो. पण तुमचे प्रेम हे असेच सर्वत्र पसरलेले होते, सगळे तुमच्या प्रेमात नाव्हून गेले होते. पण मी हे ही अनुभवले कि तुमचा, तुमच्या हातातल्या काठीचा दरारा आणि आदर केवढा मोठा होता.

तुम्ही अंबाजोगाईला यावे या साठी कांही तरी कार्यक्रम आयोजित करण्याचे मी ठरवीत होतो. बाबांना न्यावे असे वाटत होते, पण त्यांनी जे काम हातात घेतले होते, ते सोडून त्यांना इथे बोलावणे शक्य नव्हते. नंतर तर त्यांची तबेत बरीच खराब झाली. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. मग २५ व्या रौप्य महोत्सवी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपात तुम्ही पाहुणे म्हणून यावे व तुमच्या हस्ते त्यातले पुरस्कार देण्याचा घाट तुम्हाला मी घातला. तुमचे वय, तुम्हाला असलेले पथ्य – पाणी, हे सगळे मला मान्य होते, पण तुमचा देवावर असलेला विश्वास,आणि श्रद्धा यावर माझा विश्वास होता, आणि तुम्हाला अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवी चे दर्शन घडवावे, तिथून अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जावू, असे म्हटल्यावर तुम्ही किती चटकन तयार व्हाल अशी अपेक्षा होती ....पण तुम्ही चक्क नकार दिला. मी माझे गांधीयन अस्त्र काढले, मी तुम्ही हो म्हणे पर्यंत, जेवणार नाही आणि आनंदवनातून वापस जाणार नाही असा हट्ट घरला. सुधाकर कडू, डॉ. पोळ, प्रभू,सदाशिव ताजने आणि अन्य लोकांनी तुम्हाला विनंती केली, माझ्या बद्दल तुम्हाला आपुलकी होती आणि जेंव्हा डॉ.विकास, कौस्तुभ, आमटे कुटुंबीयांनी अंबाजोगाई ला जाण्याची परवानगी दिली आणि तुम्ही अंबाजोगाई ला आलात हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले तेंव्हा तुमच्या साठी वर्षानु वर्ष आमच्याकडे या असा आग्रह करण्यार्यानी आश्चर्य व्यक्त केले.आणि तोंडात बोटं घातली. अंबाजोगाईतही लोक तिसरे आश्चर्य म्हणू लागले. तुम्ही आलात, देवीचे दर्शन झाले. 


यशवंतराव चव्हाण कधी काळी आनंदवनला येवून गेले होते तो धागा पकडून तम्ही छोटेसे भाषण केले. आणि भाषणात “मला अंबाजोगाई ला आणले या बद्दल दगडू ला नोबेल दिले पाहिजे” असे जाहीर सांगितले. तुमच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. ज्या हाताने पुरस्कार घेण्याचेच काम केले त्या हातानी पुरस्कार प्रदान केले. केवढे आमचे भाग्य होते, जाताना तुम्ही न थांबता अंबाजोगाई ते आनंदवन असा ५०० किलोमीटरचा टप्पा पार करून तुम्ही सगळ्यांना चकित केले. ८५ व्या वर्षी ही तुमची व्हीलपावर आजच्या पिढीला काय संदेश देवून जाते? अनंत उपकार तुमचे माझ्या वर आणि अंबाजोगाईकर यांच्या वर झाले.....!

आता तुमची तबेत बरीच खालावली होती, तुम्ही अन्न पाणी फारच कमी केले होते, असे निरोप अधून मधून येत. मी महिन्याला तुम्हाला भेटायला येत होतोच, आणि ७ जुलै ला तुम्हाला आनंदवनला भेटून परत अंबाजोगाईला आलो आणि ९ जुलै रोजी तुम्ही गेलात असे समजले. तत्काळ आनंदवन निघालो, अनेक पट डोळ्यातून पुढे सरकत होते, तुमचे निरागस, दु:खी, कष्ठी, अंध, अपंग, मूक, अनाथ लोकांसाठी साठी जे कष्ठ घेतले, त्यांना ममतेने वागविले, माणूस म्हणून उभा केले. त्यांच्या डोळ्यात तुमच्या आठवणीचे पाणी तरळणारच ना....

आणि हो, तुम्ही अनेक दगडांचे मैल मागे ठेवून गेलात. कित्येक अनाथ मुले तुम्ही आनंदवनात प्रत्येक कुटुंबात दिलेत सांभाळायला. आम्ही केत्येक वर्ष तिकडे आलो पण असे कधी कुठे जाणवले नाही कि हि मुले कधी काळी आईवडिलांची छ्याया गमावून बसले होते. इतके सहज त्यांना आनंदवनातील या पाल्यांनी नुसते सांभाळे नाही तर त्यांना शिकविले, चांगले शिकविले कि, आज ते वेगवेगळ्या पदांवर नौकरी ला आहेत, अनेकांची लग्न झाली, सुखी संसार चालू आहे, बाळ गोपाळ त्यांचा घरात खेळत आहेत, पण तुमचा हात या बाळांच्या डोक्यावरून फिरावा हे स्वप्न आता स्वप्नच राहिले... तुम्ही गेलात....आणि पोरके पणा काय असतो? हे आम्ही आणि आनंदवन मधली मंडळी अनुभवले,अनुभवत आहोत.

तुमची आठवण, आता आठवणच आहे.... असे वाटते कि तुम्ही कुठून तरी मागून येणार, आणि मिश्कीलपणे काठी उगारणार आणि मग हसून पाठीवर हात फिरवून विचारणार, कधी आलास? कधी जाशील?, कुठे थांबलास? जेवलास का?

आम्ही आता तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातून, अंधुकश्या नजरेने पाहत बसतो......या लवकर परत अशीच हाक देतो.





तुमचा
दगडू लोमटे.