Saturday, January 26, 2013

नाट्यपदांची दखल घेतली पद्म पुरस्काराने


पद्म पुरस्काराची कधी अपेक्षाच केली नव्हती. त्यामुळे एकप्रकारे "सरप्राईज' मिळाले. खूप आनंद झाला.
मराठी संगीत नाटकात आणि नाट्यसंगीतात स्वतःचे स्वतंत्र नाव केलेल्या जयमाला शिलेदार यांची ही होती पुरस्कार जाहिर झाल्यानंतरची तातडीची प्रतिक्रिया..

 आज त्या फारसे बोलण्याच्या अवस्थेत नाहीत..त्यांना फार चालणेही अशक्य नाही.  वयही आता ८६ आहे.
खरं सांगायचे म्हणजे त्या आता नाटकातच काय पण बाहेरही फारशा दिसू शकत नाहीत.
खरे म्हणजे पुन्हा तिच खंत व्यक्त करावीशी वाटते....या कलावंतांना ऐन उमेदीच्या काळात जर असे पुरस्कार मिळाले असेते..तर सा-यांची उमेद अधिक वाढली असती..नाही काय?
मात्र त्यांच्या भूमिका पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या संगीत नाटकांच्या रसिकांच्या मनी त्यांची प्रतिमा अजुनही ताजी टवटवीत आणि सुरेल पदांनी नाटकात संगीताचा रंग भरणा-या एका श्रेष्ठ कलावांताची असावी अशीच आहे.
त्यांचे ते मधुर भाषण आणि तेवढीच सुमधूर पदे यांनी त्यांच्या प्रत्येक नाटकाने संगीत रसिकांवर मोहिनीच पाडली आहे. त्यांची कन्या कीर्ति  त्यांची आई होऊन काय हवे नको ते पहाते..त्यांच्या या नव्या पुरस्काराने खचित सा-या संगीत नाटकात काम केलेल्या अनेक कलावंतांनाही खूप आनंद  होत असेल.

संगीत रंगभूमीच्या इतिहासात ज्या अनेक नामवंत आणि गुणवंतांची नावे अजरामर झाली आहेत, त्यामध्ये जयराम आणि जयमाला शिलेदार ही नावे ठळकपणे दिसतात.  संगीत रंगभूमीसाठी सतत मनापासून प्रयत्न करणाऱ्या एका गुणी, कष्टाळू कलावंताच्या योगदानाला मिळालेली ही एक पावती होय.


रंगभूमीच्या या पडत्या काळात तिला जगवण्यासाठी ज्या कलावंतांनी प्रचंड कष्ट घेतले त्यामध्ये शिलेदार कुटुंबीयांचे नाव अग्रभागी आहे.

जयमालाबाईंना संगीताची तालीम मिळाली तीच गोविंदराव टेंबे यांच्याकडून. माहेरच्या प्रमिला जाधव यांनी टेंबे यांच्या ‘वेषांतर’ या नाटकात पहिल्यांदा भूमिका केली आणि त्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरचा रंगही पुसला नाही आणि गळय़ातील अभिजात संगीताची साथही सोडली नाही. १९५० मध्ये त्यांचा जयराम शिलेदार यांच्याशी विवाह झाला, तेव्हा ‘रामजोशी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ते लोकप्रिय झाले होते; परंतु त्यांचा जीव  मात्र संगीत रंगभूमीवरच रमला. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळातही रसिकांची पावले नाटय़गृहाकडे वळण्यासाठी शिलेदार पतीपत्नींनी खूपच कष्ट घेतले. त्या काळात गाजलेल्या बहुतेक सर्व संगीत नाटकांचे प्रयोग त्यांनी सादर केले आणि त्यांना रसिकांनीही उत्तम साथ दिली.

‘मराठी रंगभूमी’ ही त्यांची संस्था रसिकमान्य झाली आणि गेली पन्नासहून अधिक वर्षे ती कार्यरत आहे. शिलेदार कुटुंबाला सारा महाराष्ट्र गाणारे कुटुंब म्हणून ओळखतो.


संगीत अलंकार परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जयमालाबाईंना नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे तीनही पुरस्कार मिळाले आहेत. मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला आहे. पतिनिधनानंतरही जयमालाबाईंनी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटय़ सेवा ट्रस्ट’ ही संस्था सुरू केली. पुढील पिढीतील कलावंत घडवण्याचे कामही त्यांनी आवर्जून केले.

त्यांना मिळालेल्या या पुरस्कारचे मोल खरेच अनमोल आहे.त्यांच्यासारख्या अनेकांना यामुळे नवी उभारी येईन अशी आशा..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: