Friday, January 25, 2013

विजयदुर्गावर तिसरे दुर्ग साहित्य संमेलन भरणार


 दुर्गप्रेमी गोनीदांच्या नावाने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रियजनांकडून ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम भरवले जातात. त्या उपक्रमांपैकीच एक आहे ‘दुर्ग साहित्य संमेलन’. संमेलनाचं येणारं वर्ष हे तिसरं वर्ष. येत्या वर्षात म्हणजे २५ ते २७ जानेवारी २०१३ या कालावधीत हे संमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग समुद्रात असणा-या किल्ल्यावर घेण्यात येणार आहे.

यापूर्वी राजमाची, कर्नाळा या दोन किल्ल्यांवर ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवण्यात आलं होतं. त्यापैकी राजमाची हा गिरी दुर्ग आहे. तर कर्नाळा हा भुई कोट. त्यामुळे तिसरं संमेलन जलदुर्गावर घेण्याचा संस्थेचा मानस होता.

‘विजयदुर्ग’ हा छत्रपती शिवरायांच्या अभेद्य आरमारातील एक महत्त्वाचं जलदुर्ग! अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील भोज राजाने विजयदुर्ग किल्ला बांधला. १६५३मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. आणि हा किल्ला मराठय़ांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र बनला. जंजि-याच्या सिद्दीपासून ते इंग्रज, डच, पोर्तुगीजांसारख्या अनेक विदेशी शक्तीचे या किल्ल्यांने पराभव पाहिले आहेत. तर अशा कित्येक ऐतिहासिक घटनांनी विजयदुर्ग भारावलेला आहे. त्यामुळे तिस-या दुर्ग साहित्य संमेलनासाठी विजयदुर्गची निवड करण्यात आली. भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अ‍ॅडमिरल मनोहर आवटी हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. तर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघोजी आंग्रे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

‘विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’तर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तीनदिवसीय संमेलन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. ‘शोध किल्ल्यांचा’, ‘दुर्ग संवर्धन चळवळ’, ‘दुर्ग साहित्याचा प्रवास’, ‘मराठ्यांचे आरमार’ हे विशेष परिसंवाद सोहळय़ाचं आकर्षण असतील. ‘विजयदुर्गचं रहस्य’ या विषयावर निनाद बेडेकरांचं विशेष व्याख्यान होईल. संमेलनात दोन प्रदर्शनं भरतील. भारतीय पुरातत्त्व विभाग किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवेल. दुस-या प्रदर्शनात कोकणाची वैशिष्टय़ं सांगणारी भास्कर सगर यांची जलचित्रांची चित्रमालिका पाहता येईल. गो.नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळय़ावर आधारित ‘ही तो श्रींची इच्छा’ या कादंबरीचं अभिवाचन केलं जाणार आहे. त्यात डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, रुचिर कुलकर्णी, विराजस कुलकर्णी यांचा सहभाग असेल. 

संमेलनात किल्ल्यांचं महत्त्व सांगणारे माहितीपट दाखवले जातील. या माहितीपटांत पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेचा माहितीपट पाहता येईल. सोहळय़ात उपस्थित मान्यवरांचं मनोरंजन करण्यासाठी मर्दानी खेळ, दोन लेझीम स्पर्धा, ग्रंथदिंडी, दशावतारी नाटक या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विजयदुर्गाचं समुद्रातून चौफेर दर्शन घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांच्या दिमतीला छोट्या होड्याही असणार आहेत.No comments: