Saturday, January 26, 2013

आनंदकल्लोळ



सकाळ झाली तीच भारलेल्या वातावरणाने. सूर्याचा लख्ख प्रकाश पडलाय. वातावरण तापू लागले होते. अपयश काही केल्या पाठ सोडत नव्हते. मन बेचैन होते. आपली वाट आपलव्यलाच शोधायला हवी असा ध्यास मनात होता. नकळत त्याने मन घट्ट केले..
वडीलांना आणि आईला सांगितले,`आता झाले तेवढे पुरे झाले. मला माझा रस्ता शोधू द्या.`
आई काहीशी नाराज भासली. पण शब्दातून धीर देत तिनेही, `जा बाळा कुठेही जा..पण स्वतःला जप..आमची गरीबी आहे. आम्ही न शिकलेले..पण गरीबीतही दोन घाक देऊ शकलो..आता तुझा मार्ग तुच निवडला आहेस...जपून जा..`
शब्दातली आर्तता कळत होती. कवळ धीर नव्हता तर ते आशीर्वाद होते.
मनातली ती आशा बळावत चालली..दिशा दिसत नव्हती..पण आशा होती..पुढे काही तरी नक्की घडेल....पुढचा प्रवास सूरु झाला..
तीव्र अशी इच्छाशक्ती आणि त्याला मिळालेली वातावरणाची साथ..सारेच मोलाचे होते. असे आता तरी वाटत होते...
मार्ग खुणावत होता...उद्याचा सूर्य..इथे नाही तरी कुठे तरी नक्की दिसणार होता...
 

थोडा काळ मागे वळून पाहू लागलो..घरातले सारे चित्र धुसर होते..मातीच्या भिंतीतून पावसाळ्यात पाणी भरुन रहायचे. पत्र्याच्या छतातून पाणी गळायचे. ते पाणी टिपण्यासाठी बादल्या, भांडी, आणि तपेली यांचा संसार मांडला जायचा. छतावरुन गळणारे पाणी साठवून ठेऊ ते वापरायला घ्यायचे. रात्री जर पाऊस आला तर झोपायच्या गाद्यावरही पावसाच्या पाण्याचे तुषार त्या बादल्यातून अंगावर झेपावत यायचे.
पण याही परिस्थितीत घरात वातावरण आनंदी असायचे. हा भाग एखाद्याच्या कथेत असावा असा आहे..पण ही कथाच आहे. पण ती कल्पनेत नाही ते सत्य होते.
आर्थिक परिस्थितीचे चटके आणि त्यात घरातले सारेच जण हे ना ते काम करत आमच्या आयुष्यात संस्काराचे मर्म ओतप्रात भरुन राहले होते.



अजुनही आठवताते ते दिवस. सकाळ झाली की सूर्यदेवाचे दर्शन खिडिकतल्या गजातून व्हायचे. थंडीच्या दिवसात तर हे ऊन मन मोहरुन टाकायचे. 
 मागच्या अंगणात तगरीच्या झाडावर पांढरी शुभ्र फुले उमलेलेली असायची . मुकी जास्वंदाची नाजुकशी फुलंही झाडावरही देवासाठी सज्ज झालेली असायची. देवासाठी भरुन ठेवलेलल्या गडूतल्या पाण्य़ाने पूजा सहजपणे पार पडायची..देवासाठी अर्धी चमचा साखरही भरपूर वाटायची.




एकूणच मन प्रसन्न करणारी ती सारी स्थिती आठवून पुन्हा ते दिवस यावेत यासाठी देवाकडे मागणं मागावे इतके ते दिवस मोहरलेले होते. मुख्यतः घरातल्या सा-या वातावरणातील आई-वडीलांचा तो जिव्हाळा..ती माया..
त्या दिवसातला आनंद आजही हवाहवासा वाटतो...कजाचित पुन्हा त्या दिवसात जाण्यासाठी मनाची तयारी आहे..पण वय..वर्षे आणि गेलेले दिवस पुन्हा येण्याचे कौशल्य आपल्य हात नाही म्हणून..



सुभाष इनामदार,पुणे
(अपूर्ण)


No comments: