Thursday, May 23, 2013

विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता


 एकमेव नाव म्हणजे कृष्णदेव मुळगुंद...


कृष्णदेव मुळगुंद सरांची जन्मशताब्दी २७ मे पासून सुरू होत आहे. यानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 



मनात असते सदैव त्यांच्या

कलागुणांची आस

विकास होतो सहजी त्यांचा

प्रयत्न करिता खास


कृष्णदेव मुळगुंद सरांच्या ड्रॉइंगच्या तासाला त्यांनीच फळ्यावर लिहिलेल्या या ओळी तीन वर्षं मी रोज वाचत असे. रोज वाचून त्या पाठही झाल्या होत्या; पण आता इतक्‍या वर्षांनंतर त्यांचं आकलन होत आहे. त्या वेळी त्या शब्दांचा अर्थ समजला होता; पण त्यामागची मेहनत, ध्यास, झपाटलेपणा आता कुठं लक्षात येत आहे. सरांच्या आयुष्यात ते एक झपाटलेपण होतं! मी या व्यवसायात 35-40 वर्षं काढल्यावर सरांचं ते झपाटलेपण आज मला कळतंय...!

मी सरांच्या सान्निध्यात आले ती शाळेमध्ये. साधारणतः सातवी-आठवीत असताना आमचाच एक वर्ग असा होता, की ज्याला गायन, वादन आणि चित्रकला यांपैकी एक विषय निवडायची मुभा होती. मी चित्रकला या विषयाची निवड केली. तिथं ते आमचे ड्रॉइंगचे शिक्षक होते. माझ्याकडं नृत्याचं अंग आहे, हे सरांना ठाऊक असल्यामुळं त्यांनी मला, "बालनाट्यात काम करशील का?' असं विचारलं. "मंतरलेले पाणी' या नाटकात मला तीन नृत्यं होती आणि भूमिका होती राजकन्येच्या मैत्रिणीची - झुलारीची. या नाटकात ससे, कबूतरं असे खरेखुरे प्राणी-पक्षी स्टेजवर असायचे. त्यांच्याशी खेळताना, त्यांना हातात घेताना खूप छान वाटायचं. प्रेक्षकांनाही त्यांचं भारी अप्रूप असे. या नाटकाच्या तिसऱ्या अंकातला एक प्रसंग अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. तो एक ड्रीम सिक्वेन्स होता. त्यात ढग, तारे, नानाविध माळा, पऱ्या आणि बरंच काही होतं. अशा कल्पकतेनं केलेल्या सजावटीमुळे संपूर्ण स्टेज जणू स्वर्ग असल्यासारखंच दिसत असे आणि प्रेक्षागृहातून तर "अय्या।।' "कित्ती मस्तंय...' "व्वा...' "ही।।' "आ।।।' अशा प्रतिक्रिया आम्हाला स्टेजवर ऐकू येत असत. खासकरून मुलांसाठी तर ती एक मोठी पर्वणीच होती. त्यानंतर "जादूनगरीतील राजकन्या' या नाटकात माझी भूमिका नव्हती; पण मी नृत्यात सहभागी होते. अशा प्रकारे नाटकात माझं मन रमलं. "जंगलातला वेताळ', "असा मी काय गुन्हा केला?' अशी काही नाटकंही केली. राजन मोहाडीकर, दीपक माहुलीकर, दिलीप जोगळेकर, मोहन जोशी, शिंदगीकर, लक्ष्मण मंकणी, मनोहर यादव, उदयसिंह पाटील, सुधीर साने...आणि बरीच मुलं... आमचा छान ग्रुप जमला होता.

आपल्या विद्यार्थिदशेत आई-वडील आणि आपले शिक्षक हेच आपल्या सर्वांत जास्त जवळ असतात. माझ्या आई-वडिलांसोबतच मुळगुंद सर आणि बाई हे माझे दुसरे आई-वडील झाले होते. सर माझ्या घरापासून अगदीच जवळ राहायचे; त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तालमींसाठी सरांच्या घरी नियमितपणे जाणं-येणं सुरू झालं. बाईंबरोबर स्वयंपाकघरातही लुडबुड सुरू झाली. सरांचं घर हे माझ्यासाठी जणू दुसरं घर होतं. आता या सगळ्याचं खूप नवल वाटतं... सरांचा संसार तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नटला होता. वाड्यात शिरल्या शिरल्या गेटच्या उजवीकडं बैठकीची एक खोली. पुढं गेल्यावर वाड्यात स्वयंपाकघर आणि वाड्यात अंगणाच्या डावीकडं जिन्यावरून पहिल्या मजल्यावरती अभ्यासाची खोली. ती खोली म्हणजे "अलिबाबाची गुहा'च होती. इथं सरांचा हरहुन्नरी स्वभाव जवळून पाहायला मिळाला.



सरांचं अक्षर तर सुंदर होतंच, तसंच त्यांचं लेखनही. त्यामुळं नाटकाचं संपूर्ण स्क्रिप्ट पाठ व्हायचं. सरळ, सोपी तोंडात बसणारी भाषा. इतकंच नाही तर नाटकाचे सर्व दागिने, अगदी मुकुट, गळ्यातले हार, मनगट्या, कंबरपट्टे सर्व सरांनीच हातानं बनवलेलं असायचं आणि त्याला सामग्री काय, तर पुठ्ठे, बेगड, तऱ्हेतऱ्हेची पदकं, ब्रश, सोडावॉटरचे बिल्ले...! पण तो "दागिना' तयार झाला, की इतका मस्त दिसायचा! जणू खराखुराच आहे की काय, असं वाटे. एकीकडं शिक्षक, चित्रकला, नाट्यलेखन, नृत्य, नृत्याचं गीतलेखन, वेशभूषा अशी विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता सरांनंतर कुणामध्येच एकत्रितरीत्या पाहायला मिळाली नाही.

खरं तर सर मूळचे चित्रकार आणि नर्तक. ते नृत्य बसवायचे आणि आमची शाळा "फोक डान्स कॉम्पिटिशन'मध्ये नेहमी पहिली यायची. सरांनी मणिपुरी, नागा, सिलोनी, रशियन, कोळीनृत्य, कातकरी, भिल्लनृत्य अशा साधारणतः 30 लोकनृत्यांचं काव्यलेखन, त्यांची वेशभूषा आणि दिग्दर्शनही केलं होतं. त्यातल्या काही गीतांना राम कदम, दादा चांदेकर, मनोहर केतकर यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी चाली बांधल्या होत्या. पुण्यात मुलींच्या भावे स्कूलमध्ये (म्हणजे आत्ताची रेणुका स्वरूप शाळा) प्रवेश करण्यापूर्वी मी सरांची लोकनृत्यं पाहिली होती. त्यामुळं हायस्कूलमध्ये येताना माझ्या मनात त्याचं मोठं आकर्षण होतं. पण मी ज्या वर्षी पाचवीत गेले, त्याच वर्षी आमच्या शाळेनं स्पर्धेत भाग घेणं बंद केलं. त्यामुळे माझा विरस झाला होता; पण सुदैवानं नाटकात काम करायची संधी मिळाली आणि मला वेगळी दिशा मिळाली. मी शाळेच्या शेवटच्या वर्षात पोचले. त्यानंतर मॅट्रिक, कॉलेजमध्ये सायन्स शाखा, एनसीसी. त्यामुळे वेळ कमी मिळायला लागला. पुढं मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेले. पुण्याला येणं कमी झालं आणि सरांकडं जाणंही कमीच झालं. सरांचे सगळे विद्यार्थी पुढं गेले. आपापली वाटचाल करू लागले; परंतु "सर कुठं असतील? काय करत असतील?' याचा विचार माझ्या मनात यायचा. मात्र, माझ्या कामाच्या वाढत्या व्यापामुळं, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं मनात असतानाही सरांशी पुढं तितका संपर्क राहिला नाही. आता सर नसताना मात्र त्याची जास्तच जाणीव होत आहे आणि सरांशी पुढं आपला संपर्क तेवढा राहिला नाही याचा सल राहून राहून मनाला बोचत आहे; पण बालपणात जे आपल्याला मिळतं, ते आयुष्यभर पुरतं. बालपणात माझ्या मनावर जे चांगले संस्कार झाले, त्यात मुळगुंद सरांचा वाटा मोलाचा आहे.

सरांनी "घाशीराम कोतवाल', "जाणता राजा' या नाटकांसाठी नृत्यदिग्दर्शन केल्याचं कळलं होतं, तेव्हा मला खूप बरं वाटलं. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळालं; पण ते प्रसिद्धिपराङ्‌मुखच राहिले. सरांनी जी नृत्यं बसवली त्या नृत्यांचं किंवा त्या स्टेप्सचं कुणीच कुठंही डॉक्‍युमेंटेशन केलं नाही. त्यामुळं पुढच्या पिढ्यांचं बरंच नुकसान झालं, असं मला वाटतं. मात्र, त्यांचा नातू कवी-गीतकार वलय मुळगुंद हा आजोबांचं भरीवकार्य समाजापुढं आणत आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवत आहे. 



-रोहिणी हट्टंगडी, मुंबई
( `सकाळ, सप्ततरंग`  च्या सौजन्याने)

 

No comments: