Monday, July 8, 2013

त्यांना बालगंधर्व असे दिसले...

उतारवयातल्या गलीतगात्र झालेल्या बालगंधर्वांची एक खाजगी मैफल. नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात नारायणराव बालगंधर्व! मराठी संगीत रंगभूमीचा बादशहा, सम्राट!
पुण्यास किर्लोस्कर मंडळींच्या `गुप्तमंजुष` नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला योग आला आणि बालगंधर्वांचे काम मी प्रथमच पाहिले. त्या वेळी त्यांचा चेहरा भरलेला नव्हता,  त्यामुळे त्यांचे नाक पारशिणीच्या नाकाप्रमाणे चेह-याच्या मानाने मोठे वाटे. तरीपण सांग आकर्षक दिसे. नवीनपणामुळे नेसण्यासवण्याची टापटीपही दिसून येत नव्हती.

त्या दिवशीतर आवाज चिप्प बसला होता. मी आणि गु. भास्करबुवा शेजारी बसलो होतो.
आकाशाच्या गाली गुलाबी लाली निघाली..हे नंदिनीचे पद चालले असता आपला आवाज तार षडजाला जाणार नाही, म्हणून तानेला मध्येच मुरडून घेऊन आवाजातला दोष त्यांनी इतक्या मोहकपणे झाकून घेतला की, त्यांच्या भावी उज्ज्वल यशाचा त्याचवेळी कयास बांधता आला.

हा मुलगा पुढे नशीब काढणार असे आम्हा उभयतांनाही वाटले. संगीताबद्दल बालगंधर्वांमध्ये अनेक गुण आहेत. जवारीदार सुरेल आवाज, अत्यंत लवचिक गळा, दाणेदार तान, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा...याशिवाय त्यांच्या  गळ्यात अशी कांही लडीवाळ  लटक होती की जणू काय मुलीच्या कानातले डूलच जणू!  निर्व्याज लिलेने ते केव्हा व कोठे हलतील आणि वेड लावतील याचा काही नियम नाही...एकंदर गाण्यातील संथपणा व संयम (Restraint ) त्यांच्याइतका क्वचितच पहायला मिळेल. गायनाच्या शास्त्रीय प्रमादाचे गालबोट त्यांना दृष्टीच्या तिटीसारखे शोभादायक ठरते.  

अगदी सर्वसामान्य रागातील पदात ते एखादा विसंवादी अशास्त्रीय स्वर लावतील, किंवा तो अभावितपणे लागून जाईल , पण तो इतक्या सहजपणे व असा झोकाने की, त्यायोगे रागाला नाही, तरी चालीला नवीनच शोभा यावी.. त्यांच्या गळ्याला तान म्हणजे तर तळहाताचा मळ.. `नको नको` म्हणता गळ्याला लागून जायची, आणि तीत पुसटपणा नाही की तालासुराला धक्का नाही. 

अशा गायनाची जाणत्या-नेणत्या आबालवृध्दांवर मोहिनी पडावी व ती चाळीस वर्षे अबाधति रहावी, या पलीक़डे परमेश्वरी प्रसाद तो काय असू शकेल...शिवाय, घणघणीत आवाज, जुन्या प्रकारची गायकी, व जुन्या घाटाच्या किंना जुन्या थाटामाटाच्या नायिका ही साग्रगी मानवण्यासारखी त्या वेळच्या तरुण पिढीची मनोवृतीही नव्हती.

बालगंधर्वांच्या आवाजाची जात जवारीदार, गोड, पण बसकट..परंतु ती नाजूक असल्यामुळे व बोलण्यातही जुन्या बायकांचा कोरीव कमानदारपणा व ठेच नसल्यामुळे , त्यांचे संभाषण त्या वेळच्या तरुण- तरुणींना अनुकरणीय व अनुकरणसुलभ झाले. किर्लोस्कर मंडळीला त्या वेळी कॉलेज-विद्यार्थ्यांचाच  तीन तचुर्थांश समाज मिळत असे, हे याचेच द्योतक होते.



 (बालगंधर्वांविषचीचा हा उतारा घेतला आहे.`मर्मबंधातली ठेव ` या बाळ सामंत यांच्या पुस्तकातून. 
किर्लास्कर संगीत मंडळी याविषयी गोविंदराव टेंबे यांनी लिहलेल्या  जीनववीहार या त्यांच्या आत्मचरित्रातून...     श्रीविद्या प्रकाशनाच्या सोजन्याने..)


जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सर्व रसिकांना द्यायचं या हट्टापायी नाटकांचे पडदे, गालिचे, झुंबरं इत्यादींवर त्या काळातदेखील अक्षरश: लाख्खो रुपये खर्च केलेला, ज्याची शोफर्ड ड्रिव्हन गाडी होती, ज्याच्या कोटाला सहा सहा सोन्याची बटणं असत, ज्याच्या नाटक कंपनीत कलाकार आणि नोकरचाकर यांच्याव्यतिरिक्त रोजचं पन्नास-साठ पान सहज उठत असे बालगंधर्व!
त्यांचे वार्धक्य विपन्नावस्थेत जावे या परीस दुसरी शोकांतिका ती कोणती?
त्यांना पेन्शन मिळावं आणि दोन वेळचा भात तरी सुखाने खाता यावा म्हणून पुलंनी सरकार दरबारी खेटे घातले होते, पत्रव्यवहार केला होता!
पण 'दादा ते आले ना?' असा संवाद म्हणत स्वयंवरात 'नाथ हा माझा'च्या स्वरांची मनमुराद उधळण करणारा तो बादशहा सरकारी पेन्शनवर फार काळ जगलाच नाही! आणि नाही जगला तेच एका अर्थी बरं!
अहो सगळ्यांनाच सुनिताबाईंसारखी कणखर आणि तेजस्वी पत्नी नाही लाभत! नाहीतर बालगंधर्वांसारखेच पूर्णत: व्यवहारशून्य असलेल्या भाईकाकांचीही तीच गत झाली असती हे नि:संशय! आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती!
असो,
शेवट जरा कटू होतो आहे, भरकटतोही आहे पण त्याला माझा इलाज नाही. क्षमा करा..
नारायणरावांच्या 'नाथ हा माझा' करता मात्र आजही जीव तुटतो!
-- तात्या अभ्यंकर.


No comments: