Tuesday, July 9, 2013

साधनाताई ,असंख्य मनाच्या श्रद्धास्थान

 साधनाताई ह्या असंख्य मनाच्या श्रद्धास्थान आहेत … आज  ९ जुलै हा साधनाताईंचा स्मृतिदिन … त्या निमित्ताने….

साधनाताई आमटे


श्रद्धेय साधनाताई,

सादर प्रणाम,

तुम्हाला आमच्यातून जाऊन आज ९ जुलै रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात तुमचे स्मरण झाले नाही असा दिवस माझा निघत नाही. तुमच्या बद्दल असलेली आंतरिक ओढ ही कायम होती आणि आहे. मला माहित नाही पण, बाबांपेक्ष्या मला तुमच्या बदल जास्तीचा आदर, आणि प्रेम होते. तुम्ही आयुष्यभर घेतलेले अपार कष्ठ. दु:खी, कष्ठी, अनाथ, अबाल, वृद्ध, मुके, बहिरे, कुष्ठरोगी, पिडीत, वंचित, यांच्या बद्दलची प्रचंड आपुलकी, सहानुभूती, ममत्व, करुणा, आणि वात्सल्य तुमच्या रोमारोमात होते. म्हणून तुम्ही आणि बाबा मोठ विश्व उभा करू शकलात.

“समिधा” वाचताना तुमचे अवघे जीवन किती कष्ठातून गेले आहे हे लक्षात येते, बाबांसोबत चा संसार, आनंदवन उभे करण्या पासून ते तुमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत महारोगी सेवा समितीचा झालेला भव्य दिव्य विकास, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, अशोकवन, मुळगव्हाण पासून सारे प्रकल्प केवळ तुम्ही बाबा, डॉ.विकास,  डॉ.प्रकाश आणि बाबांच्या सर्व सहकाऱ्यांनी समाजाच्या गरजे पोटी आत्मीयतेने उभे केले. लोकांनी प्रामाणिक साथ दिली.  अनेक मराठीच्या साहित्यिकानी, कलावंतांनी तुम्हाला व बाबांना मदत केली. त्यात पु.ल.देशपांडे, सुनिता देशपांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले. त्यांचा आणि तुम्हा उभयतांचा ऋणानुबंध कायम राहिला. 


‘समिधा’ वाचताना तुम्ही घेतलेल्या सर्वव्यापी कामाचे, कष्टाचा आलेख तुम्ही मांडला आहे. बाबांबद्दल चे तुमचे प्रेम आणि तुमची त्यांना मिळालेली साथ प्रकर्षाने जाणवते.

ताई, तसा माझा आणि आनंदवन चा संपर्क आला तो मुळात तो १९८६ साली. १९८५ साली बाबांनी तरुणांना घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी राष्ट्रीय एकात्मते साठी सायकल यात्रा काढायची ठरवले आणि अंबाजोगाईच्या शैला लोहिया यांच्या मुळे मला या यात्रेत जायला मिळाले. आणि तिथून मग आपला व आनंदवनचा संपर्क आला. पुढे अधून मधून आनंदवनला जाणे-येणे होतेच. पण सोमनाथ च्या श्रम संस्कार छावणी साठी मात्र मे महिन्याच्या त्या अति प्रचंड कडक उन्हात शिबिराला येत असे. 


पुढे बाबा आणि तुम्ही नर्मदेच्या बचाव साठी मध्य प्रदेशच्या बडवानी, कसरावद ला गेलात आणि ८-९ वर्ष फारसा संपर्क झाला नाही. `मासळ’च्या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी आणि तत्पूर्वी बाबांच्या वयाला ७५ वर्ष झाली म्हणून हेमलकसा येथे मोठा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. प्रकाश चा ५० व वाढदिवस, डॉ.दिगंत म्हणजे `पिल्लू` चे वैद्यकीय शिक्षणपूर्ण झाल्या नंतर त्यानेही हेमलकसा येथेच काम करण्याचा निर्णय घेतला ...तो त्याचा लोकार्पण सोहळा असा त्रिवेणी संगम घडून आला होता. त्याचा साक्षीदार म्हणून मी तिथे हजर होतो. त्या नंतर आपली भेट झाली ती तुम्ही नर्मदे वरून परतल्यावरच. पण तुमच्या पश्च्यात डॉ. विकास व डॉ.भारती यांनी `आनंदवन `आणि डॉ.प्रकाश व डॉ.मंदा यांनी `हेमलकसा` येथील काम वेगवान केले होते.

२००५ नंतर माझे परत आनंदवनात जाने येणे वाढले, त्याचे कारण होते आपण परत आलात आणि `स्वरांनदवन` चे महाराष्ट्र तील प्रयोग. मी या ओर्केट्रा सोबत दौरा असलो कि जायचो. त्यातील अंध, अपंग, निरोगी कुष्ठरोगी, मुकबधीर मुलेमुली असा १२५ जणांचा चम्मू आणि त्याना या दौ-यात मदत करणे. पण आपल्या व आनंदवन च्या संस्काराने जे प्रेम, माया, आदर, ममत्व तुम्ही जागे केले होते, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची आपली उर्मी आम्हालाही बसू देत नव्हती. 


आम्हीच नव्हे तर `आनंदवनात` जे कोणी येत असे त्यांची आपण किती काळजी घेत असा ते तेंव्हा येणा-या व भेट येणा-या प्रत्येक पाहुण्यांना माहित आहे. कोण आले आहे, त्यांची निवास, भोजन, आणि इतर सोयी झाल्या की नाही हे आपण जातीने पहायच्या आणि कांही सूचना असतील तर त्या तुम्ही देत असा..

किती बारकाईने तुम्ही हे काम करता हे मी पहिले आहे. त्यावरून तुमचे जगण्याची शैली समजून जाई..तुम्हाला आणि बाबांना पहाटे आणि सायंकाळी फिरण्याचे आणि गप्पांचे खूप वेड होते. नवे विचार आणि समाजासाठी आणखी काय करायला हवे हे चिंतन त्यात चाले. तुमच्या या कामाची दखल जगाने, देशाने आणि उभ्या महाराष्ट्राने घेतली. अनेक पुरस्कार बाबांना, तुम्हालाही मिळाले. पण तसूभरही गर्व तुम्हाला आला नाही. हे महत्वाचे. तुम्ही कामाला आधीक महत्व दिले.

२००७ नंतर २-३ महिन्यातुन एकदा असे माझे आनंदवनला जाने येणे वाढले होते. बाबा २००८ साली गेले त्यानंतर जेंव्हा जेंव्हा मी तुम्हाला भेटायला आलो तेंव्हा आग्रहाने तुमच्या सोबत सायंकाळी फिरायला यायचो. माझ्या सोबत फिरायला येतोका? असा तुम्ही प्रश्न विचारला  कि, आनंदाने मी तुमच्या सोबत यायचो. अनेक वेळा तुम्ही माझ्या साठी ३-४ मिनिटे वाट पाहत थांबलेल्या आहात. मला खूप अस्वस्थ व्हायचे, कि साधनाताई या कर्तृत्वाने किती मोठ्या आणि किती साधे पणाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी साठी वाट पाहत थांबत असत. 


असेच एकदा मी आनंदवनला आलो होतो. अमेरिकेतून चंदा आठल्ये आल्या होत्या त्या दर वर्षी अमेरिकेतून भारतात आल्या कि आनंदवनला यायच्या. आज फिरायला तुमच्या सोबत मी, चंदा आठल्ये, नेहमीचे नामदेव आणि कोणी तरी एक बाई सोबत होती. हल्ली तुम्ही गाडीने जायचा. पायी चालणे बंद झाले होते. मग संपूर्ण आनंदवन चा फेरफटका. फेरफटका मारताना तुम्ही सोबत चॉकलेट, किंवा मुलांसाठी खावू ठेवायचात, मग गाडी जवळ आली कि मुल ताई, आजी नमस्कार म्हणून अदबीने हात पुढे करायची आणि मग तुम्ही त्याला कांही तरी बोलून हसवायचात, आणि मग ते चोकलेट हातात पडल्यावर त्या मुलांना काय आनंद व्हायचा,ते त्यांचे हास्य आजही आठवते, 

फिरायचे वेळी रस्त्याचा दोन्ही बाजूला आनंदवनचे कार्यकर्ते, कुष्ठरोगी, मुकबधीर मुले,अंध मुले-मुली अदबीने तुम्हाला नमस्कार करायची, तुमची गाडी दिसली, किंवा आवाज आला कि लोक हात जोडून उभे असायची. हा केवढा आदरभाव, सन्मान होता, ताई. तुम्हीही गाडी थांबवून कधी, चालत्या गाडीतून ख्याली, खुशाली विचारायचात. असे करत करत, मग बाबांच्या समाधीचे दर्शन, समाधीला दिवा-वात करणे आणि निघणे. आज तुम्ही गाडी खाली उतरला नव्हता. तेवढेही त्राण राहिले नव्हते., मग मी चंदा आठल्ये आणि नामदेव ने बाबांच्या समाधीला फुले वाहिली, दिवा बत्ती केले आणि परतलो. मी माझ्या रूमवर लोटीरमणला गेलो. तेवढ्यात तुमचा सांगावा घेवून नामदेव आला. ताईनी बोलवले आहे जेवायला. तुमची मेस उत्तरायण. तुम्ही शेवट पर्यंत इथेच जेवण घेतले, सर्वांसोबत सामुहीक. तुमचा निरोप येताच मी धावत आलो तर खुद्द तुम्ही, आनंदवनचे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, चंदा आठल्ये आणि इतर सर्व तिथे होते. सर्वांची ताटे तयार होती आणि तुम्ही चक्क माझी वाट पाहत होता. मी किती भरून पावलो, ताई माझ्या साठी जेवायचे थांबल्या....! पण यात तुमचे किती मोठे पण होते तो लपून राहिला नाही. तुम्ही सहज घेतले पण मी आजही विसरलो नाही.

तुमची जगण्याची जिद्द आणि संकटावर मात करण्याची प्रबळ इच्छा याला तोड नव्हती. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अन्न वर्ज्य केले नाही पण खाण्याचे प्रमाण कमी केले, “शरीर आपल्या हातून गेले कि जगण्यात काय अर्थ आहे” हे तत्वज्ञान तुम्हीच आम्हाला सांगितले. अश्या परस्थितीत तुमच्यावर कर्क रोगाने घाला घातला. नागपूरच्या दवाखान्यात तुमच्यावर शास्राक्रिया झाली. मी भेटायला आलो, तसे अनेक जण भेटले, त्या सगळ्यांना तुम्ही जातीने अश्याही अवस्थेत चहा द्या, पाणी द्या, जेवण झाले का? कुठे थांबला,कधी आलात? कधी जाणार? असले प्रश्न विचारत होता. तुमचा वाढदिवस इथेच नागपूरला दवाखान्यात साजरा केला तो शेवटचा होता. सारे आमटे कुटुंबीय यावेळी एकत्र होते.....


तुम्हाला मी दवाखान्यात न्याहाळत होतो, आणि मला एकदम एक छायाचित्र आठवले, तुम्ही  एका अनाथ मुलीची वेणी करतानाचा. त्यात तिचा आणि तुमचा चेहरा किती फुललेला आहे आनंदाने. किती भाग्य या मुलीच्या वाट्याला आले होते, हे असे प्रेम, ममत्व मिळण्यासाठी मी का अनाथ, अंध, मुकबधीर, कुष्ठरोगी झालो नाही? असा प्रश्न पडला....मी जरा गंभीर झालो. पण तुमचे प्रेम हे असेच सर्वत्र पसरलेले होते, सगळे तुमच्या प्रेमात नाव्हून गेले होते. पण मी हे ही अनुभवले कि तुमचा, तुमच्या हातातल्या काठीचा दरारा आणि आदर केवढा मोठा होता.

तुम्ही अंबाजोगाईला यावे या साठी कांही तरी कार्यक्रम आयोजित करण्याचे मी ठरवीत होतो. बाबांना न्यावे असे वाटत होते, पण त्यांनी जे काम हातात घेतले होते, ते सोडून त्यांना इथे बोलावणे शक्य नव्हते. नंतर तर त्यांची तबेत बरीच खराब झाली. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. मग २५ व्या रौप्य महोत्सवी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपात तुम्ही पाहुणे म्हणून यावे व तुमच्या हस्ते त्यातले पुरस्कार देण्याचा घाट तुम्हाला मी घातला. तुमचे वय, तुम्हाला असलेले पथ्य – पाणी, हे सगळे मला मान्य होते, पण तुमचा देवावर असलेला विश्वास,आणि श्रद्धा यावर माझा विश्वास होता, आणि तुम्हाला अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवी चे दर्शन घडवावे, तिथून अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जावू, असे म्हटल्यावर तुम्ही किती चटकन तयार व्हाल अशी अपेक्षा होती ....पण तुम्ही चक्क नकार दिला. मी माझे गांधीयन अस्त्र काढले, मी तुम्ही हो म्हणे पर्यंत, जेवणार नाही आणि आनंदवनातून वापस जाणार नाही असा हट्ट घरला. सुधाकर कडू, डॉ. पोळ, प्रभू,सदाशिव ताजने आणि अन्य लोकांनी तुम्हाला विनंती केली, माझ्या बद्दल तुम्हाला आपुलकी होती आणि जेंव्हा डॉ.विकास, कौस्तुभ, आमटे कुटुंबीयांनी अंबाजोगाई ला जाण्याची परवानगी दिली आणि तुम्ही अंबाजोगाई ला आलात हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले तेंव्हा तुमच्या साठी वर्षानु वर्ष आमच्याकडे या असा आग्रह करण्यार्यानी आश्चर्य व्यक्त केले.आणि तोंडात बोटं घातली. अंबाजोगाईतही लोक तिसरे आश्चर्य म्हणू लागले. तुम्ही आलात, देवीचे दर्शन झाले. 


यशवंतराव चव्हाण कधी काळी आनंदवनला येवून गेले होते तो धागा पकडून तम्ही छोटेसे भाषण केले. आणि भाषणात “मला अंबाजोगाई ला आणले या बद्दल दगडू ला नोबेल दिले पाहिजे” असे जाहीर सांगितले. तुमच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. ज्या हाताने पुरस्कार घेण्याचेच काम केले त्या हातानी पुरस्कार प्रदान केले. केवढे आमचे भाग्य होते, जाताना तुम्ही न थांबता अंबाजोगाई ते आनंदवन असा ५०० किलोमीटरचा टप्पा पार करून तुम्ही सगळ्यांना चकित केले. ८५ व्या वर्षी ही तुमची व्हीलपावर आजच्या पिढीला काय संदेश देवून जाते? अनंत उपकार तुमचे माझ्या वर आणि अंबाजोगाईकर यांच्या वर झाले.....!

आता तुमची तबेत बरीच खालावली होती, तुम्ही अन्न पाणी फारच कमी केले होते, असे निरोप अधून मधून येत. मी महिन्याला तुम्हाला भेटायला येत होतोच, आणि ७ जुलै ला तुम्हाला आनंदवनला भेटून परत अंबाजोगाईला आलो आणि ९ जुलै रोजी तुम्ही गेलात असे समजले. तत्काळ आनंदवन निघालो, अनेक पट डोळ्यातून पुढे सरकत होते, तुमचे निरागस, दु:खी, कष्ठी, अंध, अपंग, मूक, अनाथ लोकांसाठी साठी जे कष्ठ घेतले, त्यांना ममतेने वागविले, माणूस म्हणून उभा केले. त्यांच्या डोळ्यात तुमच्या आठवणीचे पाणी तरळणारच ना....

आणि हो, तुम्ही अनेक दगडांचे मैल मागे ठेवून गेलात. कित्येक अनाथ मुले तुम्ही आनंदवनात प्रत्येक कुटुंबात दिलेत सांभाळायला. आम्ही केत्येक वर्ष तिकडे आलो पण असे कधी कुठे जाणवले नाही कि हि मुले कधी काळी आईवडिलांची छ्याया गमावून बसले होते. इतके सहज त्यांना आनंदवनातील या पाल्यांनी नुसते सांभाळे नाही तर त्यांना शिकविले, चांगले शिकविले कि, आज ते वेगवेगळ्या पदांवर नौकरी ला आहेत, अनेकांची लग्न झाली, सुखी संसार चालू आहे, बाळ गोपाळ त्यांचा घरात खेळत आहेत, पण तुमचा हात या बाळांच्या डोक्यावरून फिरावा हे स्वप्न आता स्वप्नच राहिले... तुम्ही गेलात....आणि पोरके पणा काय असतो? हे आम्ही आणि आनंदवन मधली मंडळी अनुभवले,अनुभवत आहोत.

तुमची आठवण, आता आठवणच आहे.... असे वाटते कि तुम्ही कुठून तरी मागून येणार, आणि मिश्कीलपणे काठी उगारणार आणि मग हसून पाठीवर हात फिरवून विचारणार, कधी आलास? कधी जाशील?, कुठे थांबलास? जेवलास का?

आम्ही आता तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातून, अंधुकश्या नजरेने पाहत बसतो......या लवकर परत अशीच हाक देतो.

तुमचा
दगडू लोमटे.

No comments: