Saturday, January 26, 2013

आनंदकल्लोळ



सकाळ झाली तीच भारलेल्या वातावरणाने. सूर्याचा लख्ख प्रकाश पडलाय. वातावरण तापू लागले होते. अपयश काही केल्या पाठ सोडत नव्हते. मन बेचैन होते. आपली वाट आपलव्यलाच शोधायला हवी असा ध्यास मनात होता. नकळत त्याने मन घट्ट केले..
वडीलांना आणि आईला सांगितले,`आता झाले तेवढे पुरे झाले. मला माझा रस्ता शोधू द्या.`
आई काहीशी नाराज भासली. पण शब्दातून धीर देत तिनेही, `जा बाळा कुठेही जा..पण स्वतःला जप..आमची गरीबी आहे. आम्ही न शिकलेले..पण गरीबीतही दोन घाक देऊ शकलो..आता तुझा मार्ग तुच निवडला आहेस...जपून जा..`
शब्दातली आर्तता कळत होती. कवळ धीर नव्हता तर ते आशीर्वाद होते.
मनातली ती आशा बळावत चालली..दिशा दिसत नव्हती..पण आशा होती..पुढे काही तरी नक्की घडेल....पुढचा प्रवास सूरु झाला..
तीव्र अशी इच्छाशक्ती आणि त्याला मिळालेली वातावरणाची साथ..सारेच मोलाचे होते. असे आता तरी वाटत होते...
मार्ग खुणावत होता...उद्याचा सूर्य..इथे नाही तरी कुठे तरी नक्की दिसणार होता...
 

थोडा काळ मागे वळून पाहू लागलो..घरातले सारे चित्र धुसर होते..मातीच्या भिंतीतून पावसाळ्यात पाणी भरुन रहायचे. पत्र्याच्या छतातून पाणी गळायचे. ते पाणी टिपण्यासाठी बादल्या, भांडी, आणि तपेली यांचा संसार मांडला जायचा. छतावरुन गळणारे पाणी साठवून ठेऊ ते वापरायला घ्यायचे. रात्री जर पाऊस आला तर झोपायच्या गाद्यावरही पावसाच्या पाण्याचे तुषार त्या बादल्यातून अंगावर झेपावत यायचे.
पण याही परिस्थितीत घरात वातावरण आनंदी असायचे. हा भाग एखाद्याच्या कथेत असावा असा आहे..पण ही कथाच आहे. पण ती कल्पनेत नाही ते सत्य होते.
आर्थिक परिस्थितीचे चटके आणि त्यात घरातले सारेच जण हे ना ते काम करत आमच्या आयुष्यात संस्काराचे मर्म ओतप्रात भरुन राहले होते.



अजुनही आठवताते ते दिवस. सकाळ झाली की सूर्यदेवाचे दर्शन खिडिकतल्या गजातून व्हायचे. थंडीच्या दिवसात तर हे ऊन मन मोहरुन टाकायचे. 
 मागच्या अंगणात तगरीच्या झाडावर पांढरी शुभ्र फुले उमलेलेली असायची . मुकी जास्वंदाची नाजुकशी फुलंही झाडावरही देवासाठी सज्ज झालेली असायची. देवासाठी भरुन ठेवलेलल्या गडूतल्या पाण्य़ाने पूजा सहजपणे पार पडायची..देवासाठी अर्धी चमचा साखरही भरपूर वाटायची.




एकूणच मन प्रसन्न करणारी ती सारी स्थिती आठवून पुन्हा ते दिवस यावेत यासाठी देवाकडे मागणं मागावे इतके ते दिवस मोहरलेले होते. मुख्यतः घरातल्या सा-या वातावरणातील आई-वडीलांचा तो जिव्हाळा..ती माया..
त्या दिवसातला आनंद आजही हवाहवासा वाटतो...कजाचित पुन्हा त्या दिवसात जाण्यासाठी मनाची तयारी आहे..पण वय..वर्षे आणि गेलेले दिवस पुन्हा येण्याचे कौशल्य आपल्य हात नाही म्हणून..



सुभाष इनामदार,पुणे
(अपूर्ण)


नाट्यपदांची दखल घेतली पद्म पुरस्काराने


पद्म पुरस्काराची कधी अपेक्षाच केली नव्हती. त्यामुळे एकप्रकारे "सरप्राईज' मिळाले. खूप आनंद झाला.
मराठी संगीत नाटकात आणि नाट्यसंगीतात स्वतःचे स्वतंत्र नाव केलेल्या जयमाला शिलेदार यांची ही होती पुरस्कार जाहिर झाल्यानंतरची तातडीची प्रतिक्रिया..

 आज त्या फारसे बोलण्याच्या अवस्थेत नाहीत..त्यांना फार चालणेही अशक्य नाही.  वयही आता ८६ आहे.
खरं सांगायचे म्हणजे त्या आता नाटकातच काय पण बाहेरही फारशा दिसू शकत नाहीत.
खरे म्हणजे पुन्हा तिच खंत व्यक्त करावीशी वाटते....या कलावंतांना ऐन उमेदीच्या काळात जर असे पुरस्कार मिळाले असेते..तर सा-यांची उमेद अधिक वाढली असती..नाही काय?
मात्र त्यांच्या भूमिका पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या संगीत नाटकांच्या रसिकांच्या मनी त्यांची प्रतिमा अजुनही ताजी टवटवीत आणि सुरेल पदांनी नाटकात संगीताचा रंग भरणा-या एका श्रेष्ठ कलावांताची असावी अशीच आहे.
त्यांचे ते मधुर भाषण आणि तेवढीच सुमधूर पदे यांनी त्यांच्या प्रत्येक नाटकाने संगीत रसिकांवर मोहिनीच पाडली आहे. त्यांची कन्या कीर्ति  त्यांची आई होऊन काय हवे नको ते पहाते..त्यांच्या या नव्या पुरस्काराने खचित सा-या संगीत नाटकात काम केलेल्या अनेक कलावंतांनाही खूप आनंद  होत असेल.

संगीत रंगभूमीच्या इतिहासात ज्या अनेक नामवंत आणि गुणवंतांची नावे अजरामर झाली आहेत, त्यामध्ये जयराम आणि जयमाला शिलेदार ही नावे ठळकपणे दिसतात.  संगीत रंगभूमीसाठी सतत मनापासून प्रयत्न करणाऱ्या एका गुणी, कष्टाळू कलावंताच्या योगदानाला मिळालेली ही एक पावती होय.


रंगभूमीच्या या पडत्या काळात तिला जगवण्यासाठी ज्या कलावंतांनी प्रचंड कष्ट घेतले त्यामध्ये शिलेदार कुटुंबीयांचे नाव अग्रभागी आहे.

जयमालाबाईंना संगीताची तालीम मिळाली तीच गोविंदराव टेंबे यांच्याकडून. माहेरच्या प्रमिला जाधव यांनी टेंबे यांच्या ‘वेषांतर’ या नाटकात पहिल्यांदा भूमिका केली आणि त्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरचा रंगही पुसला नाही आणि गळय़ातील अभिजात संगीताची साथही सोडली नाही. १९५० मध्ये त्यांचा जयराम शिलेदार यांच्याशी विवाह झाला, तेव्हा ‘रामजोशी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ते लोकप्रिय झाले होते; परंतु त्यांचा जीव  मात्र संगीत रंगभूमीवरच रमला. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळातही रसिकांची पावले नाटय़गृहाकडे वळण्यासाठी शिलेदार पतीपत्नींनी खूपच कष्ट घेतले. त्या काळात गाजलेल्या बहुतेक सर्व संगीत नाटकांचे प्रयोग त्यांनी सादर केले आणि त्यांना रसिकांनीही उत्तम साथ दिली.

‘मराठी रंगभूमी’ ही त्यांची संस्था रसिकमान्य झाली आणि गेली पन्नासहून अधिक वर्षे ती कार्यरत आहे. शिलेदार कुटुंबाला सारा महाराष्ट्र गाणारे कुटुंब म्हणून ओळखतो.


संगीत अलंकार परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जयमालाबाईंना नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे तीनही पुरस्कार मिळाले आहेत. मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला आहे. पतिनिधनानंतरही जयमालाबाईंनी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटय़ सेवा ट्रस्ट’ ही संस्था सुरू केली. पुढील पिढीतील कलावंत घडवण्याचे कामही त्यांनी आवर्जून केले.

त्यांना मिळालेल्या या पुरस्कारचे मोल खरेच अनमोल आहे.त्यांच्यासारख्या अनेकांना यामुळे नवी उभारी येईन अशी आशा..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, January 25, 2013

विजयदुर्गावर तिसरे दुर्ग साहित्य संमेलन भरणार


 दुर्गप्रेमी गोनीदांच्या नावाने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रियजनांकडून ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम भरवले जातात. त्या उपक्रमांपैकीच एक आहे ‘दुर्ग साहित्य संमेलन’. संमेलनाचं येणारं वर्ष हे तिसरं वर्ष. येत्या वर्षात म्हणजे २५ ते २७ जानेवारी २०१३ या कालावधीत हे संमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग समुद्रात असणा-या किल्ल्यावर घेण्यात येणार आहे.

यापूर्वी राजमाची, कर्नाळा या दोन किल्ल्यांवर ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवण्यात आलं होतं. त्यापैकी राजमाची हा गिरी दुर्ग आहे. तर कर्नाळा हा भुई कोट. त्यामुळे तिसरं संमेलन जलदुर्गावर घेण्याचा संस्थेचा मानस होता.

‘विजयदुर्ग’ हा छत्रपती शिवरायांच्या अभेद्य आरमारातील एक महत्त्वाचं जलदुर्ग! अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील भोज राजाने विजयदुर्ग किल्ला बांधला. १६५३मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. आणि हा किल्ला मराठय़ांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र बनला. जंजि-याच्या सिद्दीपासून ते इंग्रज, डच, पोर्तुगीजांसारख्या अनेक विदेशी शक्तीचे या किल्ल्यांने पराभव पाहिले आहेत. तर अशा कित्येक ऐतिहासिक घटनांनी विजयदुर्ग भारावलेला आहे. त्यामुळे तिस-या दुर्ग साहित्य संमेलनासाठी विजयदुर्गची निवड करण्यात आली. भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अ‍ॅडमिरल मनोहर आवटी हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. तर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघोजी आंग्रे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

‘विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’तर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तीनदिवसीय संमेलन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. ‘शोध किल्ल्यांचा’, ‘दुर्ग संवर्धन चळवळ’, ‘दुर्ग साहित्याचा प्रवास’, ‘मराठ्यांचे आरमार’ हे विशेष परिसंवाद सोहळय़ाचं आकर्षण असतील. ‘विजयदुर्गचं रहस्य’ या विषयावर निनाद बेडेकरांचं विशेष व्याख्यान होईल. संमेलनात दोन प्रदर्शनं भरतील. भारतीय पुरातत्त्व विभाग किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवेल. दुस-या प्रदर्शनात कोकणाची वैशिष्टय़ं सांगणारी भास्कर सगर यांची जलचित्रांची चित्रमालिका पाहता येईल. गो.नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळय़ावर आधारित ‘ही तो श्रींची इच्छा’ या कादंबरीचं अभिवाचन केलं जाणार आहे. त्यात डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, रुचिर कुलकर्णी, विराजस कुलकर्णी यांचा सहभाग असेल. 

संमेलनात किल्ल्यांचं महत्त्व सांगणारे माहितीपट दाखवले जातील. या माहितीपटांत पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेचा माहितीपट पाहता येईल. सोहळय़ात उपस्थित मान्यवरांचं मनोरंजन करण्यासाठी मर्दानी खेळ, दोन लेझीम स्पर्धा, ग्रंथदिंडी, दशावतारी नाटक या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विजयदुर्गाचं समुद्रातून चौफेर दर्शन घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांच्या दिमतीला छोट्या होड्याही असणार आहेत.



Tuesday, January 22, 2013

`सुनो भाई साधो..`पुन्हा पुन्हा अनुभवा


संत कबीर..एक धाडसी संत. आजच्या काळातही त्याचे कवित्व..त्याने लिहलेले दोहे अजरामर आहेत. ते काळाच्या ओघात नव्या संदर्भात सुसंगत वाटताहेत...हेच सारे त्यांनी स्पष्ट तर करुन दिलेच पण त्यांनी कविता खरवंडीकर यांच्या आवाजातून आणि धनंजय खरवंडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मखमली पोतडीतून निटसपणे अर्थ पोचवत रसिंकांसमोर पुन्हा जेव्हा उलगडले तेव्हा टाळ्यांची दाद मिळत गेली..रंगत जसजशी वाढत गेली तशी उत्सुकताही वाढत गेली....





हा अनुभव पुणेकर रसिकांना मिळाला एस एम जोशी सभागृहात.. रविवारी ( २० जानेवारी २०१३) संध्याकाळी. तो अधिक मनात रुंजी घालू लागला तो डॉ. अनिल अवचट यांच्या सहज आणि प्रत्ययकारी निरुपणामुळे..त्यांनी या महान संतांच्या रचनांना स्वतःचा स्वतंत्र दृष्टीक्षेप जोडला..कुठल्याही धर्माची पताका न फडकवता त्यांनी माणसातल्या अस्सलतेचे दर्शन घडविणा-या रचना लिहिल्या. त्या १४व्या आणि १५व्या शतकात रचल्या गेल्या असाव्यात..पण त्या वरवर श्रीमंती मिरविणा-या माणसांना त्यांच्या वेदनवांवर आजही घाव घालतात. हेच तर सारे अवचटांनी पटवून दिले. त्यांची भाषा कमालीची लाघवी तर होतीच पण त्यात सहजी मार्मिकतेचे दर्शन घडत होते.





अनिल अवचट यांनी या निमित्ताने रसिकांना संत कबीर आणि त्यांच्या रचनांमागचे सार समजावून दिले. त्यांच्या दृष्टीने ते संत तुकारामांचे त्या अर्थाने पूर्वज मानावे लागेल. आजच्या काळात अनेक सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांचे विचार आजही लागू पडत असल्याचा पुरावा त्यांना आपल्या सूत्रातून सांगितला. कदाचित आजच्या समाजाला ते वाट दाखवीत आहेत असेच जणू यातून दर्शन घडले.



त्यांच्या एका अभंगात सबूरी हा शब्द आहे..सबुरी म्हणजे संयम. पण जिथे हा शब्द वापरला जातो तिथे संयमाचा पूर्ण अभाव असल्याचे दिसते..त्यांनी सबुरी तून सारे साधेल असे म्हटले आहे.

जीवनात साधेपणा महत्वाचा आहे. केवळ मोठेपणाचे दर्शन न घडता..मन मोठे करुन आहे तसे रहा असा सल्लाही दिला. सगळी माणसे सारखी आहेत. सगळ्यांचा उगम एकाच मार्गातून झाला आहे..मग जातीचे वेगळेपण कशासाठी. कबीराच्या दृष्टीने परमेश्वरापेक्षाही गुरु मोठा कारण तो परमेश्वरापाशी जाण्याचा मार्ग दाखवितो.



अहंकार सोडून इतरांमध्ये विरघळून जगायला शिका असा संदेशही कबीराच्या रचनेत असल्याचे मर्म डॉ. अनिल अवचट सांगतात.

एक अभंग ऐकविला की कविता खरवंडीकर तोच अभंग आपल्या सुरेल आणि विविध सप्तकात फिरणारा सूर आळवत शब्दांना नेमक्या मुशीत फिरवून पुन्हा समेवर आणायच्या...शब्द स्वर आणि ताल यांची ही रंगलेली मैफल प्रत्येक अभंगादरम्यान अधिक हवीहवीशी वाटू लागली..



हमन है इश्क मस्तना. ए दिल गाफिल गफलत मतकर. मन लागो मेरे यार फकिरी मे. मत करो मोह तू हरिभजन को मान रे. हम बिगडे तो बिगडे भाई, तुम बिगडे तो राम दुहाई.

किंवा

आई गवना की सारी. नैना झंकार झनकारे, झीनी झीनी बीनी चदरीया. प्रितम घर आये, रहेना नही देस बिराना है आणि शेवटी ये संसार कारे की बाही- उलझ पुलझ मर जाना है...

( कदाचित रचना मला जी ऐकू आली...त्यात बदल असू शकेल..क्षमस्व)



अनेक रचनांचा पोत त्याला धनंजय खरवंडीकर यांनी दिलेली स्वरचाल फारच मोहकपणे कविता खरवंडीकर यांनी सादर केली..त्यातला भाव..त्यातली आर्तता आणि त्याची परिणीती ती भावना नेमकी स्पष्ट सांगणारी होती.

म्हणूनच `सुनो भाई साधो..` हा एक अतिशय सुंदर कार्य़क्रम देऊन  त्यांना आपली उत्तम छाप रसिकांवर टाकली यात कोणतेही अतिशयोक्ति विधान नाही. धनंजय खरवंडीकर यांची तबला संगत आणि राजीव परांजपे यांनी तेवढीच ऑर्गनवर केलेली साथ यातून कबीररचना समजण्यास आणि त्यारचना मनापर्य़ंत पोचण्यास कार्यभूत  झाली..




जेव्हा केव्हा तो कार्यक्रम जिथे असेल..तिथे मात्र डॉ. अनिल अवचट यांची निरुपणाची साथ हवी..त्यातूनच कबीर तर समजण्यास मदत होईलच . पण आजच्या काळातही या रचना किती समर्पक आहेत याचे दर्शन होईल. पुन्हा हा कार्यक्रम व्हावा हिच अपेक्षा..आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच.


सुभाष इनामदार,पुणे

9552596276


subhashinamdar@gmail.com