Wednesday, August 7, 2013

जयमालाबाइंच्या जाण्याने .संगीत रंगभूमी पोरकी



वय वर्षे ८७ चालू असताना किडनी काम करेनासे झाल्याने जयमालाबाई शिलेदार यांचे बुधवारी उशिरा रात्री २ च्या सुमारास निधन झाले..त्यांच्या दोन्ही कन्या कीर्ती आणि लता दोघीही त्यांच्याजवळ होत्या..त्यांच्यावर गुरूवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वौकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंतीम संस्कार करण्यात
आले..

गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे पार्थीव शरीर दर्शनासाठी..घरुन निघून बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर आणि टिळकस्मारक मंदिरात ठेवण्यात आले. संगीत, नाटक आणि कला क्षेत्रातल्या कलावंतांनी अंतीम दर्शन घेऊन झाल्यावर दुपारी पुण्यातल्या वैकुंठात अंतीम क्रियाकर्म करण्यातक आले. तिथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यांच्याविषयीचे आज गाणे संपले यां शब्दात त्यांच्याविषयीचे वर्णन एका शब्दात केले.


गंधर्वयुगाची परंपरा जपणा-या ..ती परंपरा स्वतः अऩुभवून ती आपल्या नाटकातून प्रज्वलीत करून ..पुढच्या पिढीपर्यंत पोचविणा-या मराठी रंगभूमीवर स्वतःची छाप पसविणा-या श्रेष्ठ ..अभिनय आणि गान कुशल अशा जयमालाबाई शिलेदार यांच्या निधनाने आज खरच मराठी संगीत रंगभूमी आईविना पोरकी झाली.

गेली काही वर्षे त्या सारे काही पाहू शकत होत्या पण बोलू आणि गाऊही शकत नव्हत्या..कीर्ती शिलेदार एका समारंभात मागे म्हणाल्या प्रमाणे ...`तिची आता मी आई झाले आहे.`..इतक्यापध्दतीने जपता जपता आज अखेरीस त्यांच्यावर नियतीने घाला घातला आणि त्यांचे निधन झाले..चेतनेतून त्यांचा देह अचानक अचेतन झाला..

संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणारी आणि बालगंधर्वांच्या बरोबरीने काम केलेल्या कांही हयात असलेल्या मोजक्याच नव्हे तर अखेरच्या या शिलेदाराची आज अखेर झाली असे लिहले तरी ते योग्य होईल.

आपला सारा संसारच त्यांनी मराठी संगीत रंभूमीला बहाल केला..त्यातून दोन रत्ने मराठी रंगभूमीला अर्पण केली कीर्ती आणि लता... स्वतःची मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. जयराम शिलेदारांच्या खांद्याला खांदा लावून ती संस्था त्यांनी जपली, टिकविली, वाढविली...त्यांच्या भूमिकांचे गारूड आजही संगीत रसिक विसरु शकत नाहीत.

रंगभूमीवर कसे दिसावे..गाताने गालावर प्रेक्षकांना आनंद कसा दाखवावा..गाण्यात सहजता कशी अशावी..उत्तम वेशभूषा कशी करावी..अभिनयाचा भाग कितपत आणि किती असावा..इतर पात्रे गात असताना स्वतः कशी दाद द्यावी..सारे काही प्रत्यक्ष करुन दाखविणारी ही कर्तृत्ववान श्रेष्ठ कलाकार आज काळाच्या ओघात स्वतःचा ठसा मागे ठेवत आठवणीतच जगत राहिल्या आहेत.

थोडे मागे वळून पाहताना.. संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात शिलेदार कुटुंबाची घराणेशाही अशीच लोकांनी स्वीकारलेली ,. ‘मराठी रंगभूमी’ ही शिलेदार कुटुंबाची नाटय़संस्था यांनी जयराम आणि जयमालाबाई शिलेदार यांनी संगीत रंगभूमीवर अनेक उत्तमोत्तम नाटके सादर केली.  विवाहापूर्वी जयमालाबाई या प्रमिला जाधव या नावाने रंगभूमीवर सक्रीय होत्याच. १९४२ ते १९६७ हा त्यांच्या नाटय़कीर्दीतील बहराचा काळ. ‘देशांतर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. गोविंदराव टेंबे त्यांचे मार्गदर्शक होते. साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात त्यांनी बालगंधर्वाबरोबर प्रथम ‘सं. शारदा’मध्ये काम केले. पुढे त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. बालगंधर्व जेव्हा केव्हा काही कारणांनी नाटकात काम करू शकत नसत तेव्हा त्या त्यांच्या भूमिकेत उभ्या राहत. त्यांची उणीव सहज भरून काढत. गायनात बालगंधर्व त्यांचे आदर्श होते. त्यांचे अनमोल मार्गदर्शन जयमालाबाईंना  जयमालाबाईंना लाभले. 

सुरेल, लयीबरोबर जाणारे, भावस्पर्शी, लडिवाळ गाणे हे बालगंधर्वाच्या गाण्याचे वैशिष्टय़ जयमालाबाईंच्या गायनातही आढळते. अभिनयाचे धडे तर त्यांनी गणपतराव बोडस व चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या दिग्गजांकडून घेतले. हसरा चेहरा व सहज, लाघवी संवादोच्चार हे त्यांच्या अभिनयाचे विशेष. 


‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. ‘शाकुंतल’मध्ये त्यांनी जयराम शिलेदारांबरोबर प्रथम एकत्र काम केले आणि पुढे त्या त्यांच्या सहचारिणीच झाल्या. उभयतांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली आणि प्रारंभी बाळ कोल्हटकरांच्या ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’ इ. नाटकांची तसेच ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ यांसारख्या नाटकांची निर्मिती केली. जुन्या संगीत नाटकांचे प्रयोगही संस्थेतर्फे करण्यात येऊ लागले. आपल्या संस्थेशिवाय इतर संस्थांतूनही त्या कामे करत. छोटा गंधर्वाबरोबरची त्यांची अनेक नाटके गाजली. . 

त्यांनी नाटकात काम करण्याबरोवरच नवी पिढी जी नाट्यसंगीत शिकू इच्छीत आहेत त्यांना नाट्यसंगीताचे धडे देण्याचे काम केले..म्हणूनच आज संगीता नाटके जरी कमी होत असली तरी नाट्यसंगीता्च्या मैफली बहारदार होताहेत...याचे क्षेय जयमालाबाईंसारख्या काळाच्या पुढे पहाणा-या कलावंताना द्यायाला हवे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानीत अशा या जयमालाबाईंनी वयपरत्वे काम करणे बंद केले.तरीही संगीत नाटकाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती..त्यांचे याही स्थितीत मार्गदर्शन सुरुच असायचे...खरे सांगायचे म्हणजे त्यांनी संगीत नाटके जगविली..त्यांना नवे घुमारे दिले. नवी पिढी तयार केली..आजही कीर्ती शिलेदारांच्या रुपाने संगीत नाटकांचा हा प्रवास एकांडे ध्येयपथीकाच्या रुपात पुढे सुरु ठेवला आहे..

आजही त्यांची ती संगीत नाटकातली मानापनातील `भामिनी`,स्वयंवरीतली `रूक्मीणी`,सौभदातली `सुभद्रा`..एवढेच नव्हे शारदेतली `सिंधू` समोर उभी राहून रसिकांना मनमोहक अशा संगीताभिनयाने मोहवित असल्याचा भास होत आहे...अशा श्रेष्ठ आणि पिढी घडविणा-या ज्येष्ठ आणि सर्वांच्या मनात भरून राहिलेल्या जयमालाबाईंच्या स्मृतीत राहणेच मराठी रसिक अधिक पसंत करतील..

त्यांच्या गाण्यांची मोहिनी काळानुरुप कमी झाली असली तरी त्यांची ती स्नेहल मुद्रा आजही रसिकांच्या मनात तेवढीच जिवंत आहे..त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली..
या रुपाने हिच आमची शब्दांजली....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, August 4, 2013

मैत्री म्हणजे ...

आज मैत्री दिवस साजरा केला जातो..खरे मित्र कोण जो संकटाच्या वेळी उपयोगी पडतो...असे वस्तुतः म्हटले जाते..पण या मैत्री दिवसाचे वर्णन करणारी ही रचना ...



मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे 
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..

मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
 मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..

मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे 
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..

मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची 
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची.. 

मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र 
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...





-संगीता बर्वे, पुणे