Friday, March 14, 2014

`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे..



`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे इप्टाच्या माहितीपटातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचले...आणि सातारच्या घरातली आपली पारंपारिक कला घेऊन ते आता रंगभाषेच्या माध्यमातून देशाच्या नाट्यपरंपरेतले चेहरे सजविणारे कलावंत म्हणून सुपरिचित झाले .....

त्यांचे वेगळेपण हे सांगितले गेले की ,
`ते माणसातला कलाकार जागा करतात..तर कलाकारातला माणूस घडवितात...`

पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांसोबतच "इप्टा‘, "पीडीए‘, थिएटर ऍकॅडमीसारख्या अनेक नाट्य संस्थांच्या प्रयोगांमधून त्यांनी रंगभूषेची किमया केली आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका या नावानेच ओळखले जातात. रुपेरी पडद्यावर जेव्हा हा माहितीपट झळकला तेव्हाही उपस्थित तरुण कलावंतांनी पुन्हा एकदा..आव्वाज कुणाचा..भावे काकांचा..म्हणत एकच गजर करत त्यांच्या प्रेमाचे पुरते दर्शन घडविले..

रोहिणी हट्टंगडी, प्रसाद वनारसे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, मंगेश तेंडूलकर,शर्वरी जमेनिस, मनीषा साठे, अभिराम भडकमकर, अतुल पेठे, दीपक रेगे, रवींद्र खरे, प्रवीण तरडे ,अंजली परांजपे, कीर्ती शिलेदार, डॉ. माधवी वैद्य.. आणि माधव वझे...यांनी या चित्रफितीतून  भावे काकांच्या गुणांचे कौतूक करत..त्यांच्यासारखा रुजू माणूस दुसरा नसल्याची ग्वाहीही अनेकांनी दिली...एसपी आणि फर्ग्यूसनच्या संघांनी भावे यांच्या शिवाय मेकअपच्या विविध छटा किती निराळ्या होत्या याची उदाहरणेच सांगितली.. त्यांनी मारलेल्या गुलाबपाण्याच्या फवा-यानेही आम्ही धन्य़ झाल्याची भावनाही तिथे व्यक्त झाली..

कलाकारांच्या तोंडाला रंग लावून त्यांना सज्ज करण्याचा वसा ४५ वर्षे निष्ठेने सांभाळणारे.. सुरांची जाण असतानाही केवळ हौसेखातर ऑर्गन वादन करीत रंगभूषेला प्राधान्य देणारे.. कलाप्रवासातील अनुभवांवर रंगभूषा हे पुस्तक लिहिणारे.. ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्याविषयीचे सारे मनातले प्रत्येकाच्याच ओठावर आले तेही अगदी मनो'भावे'. भावे काकांविषयीच्या मनोगतांचा पट पडद्यावर उलगडला.

प्रभाकर भावे यांच्या रंगभूषेच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना थोर लेखक आणि कलावंत पु ल देशपांडे यांनीही त्यांची स्तुती करुन तुम्ही एकच पुस्त लिहून थांबू नका..यावर आणखी लिहण्याचा आग्रह केलेलाही या माहितीपटात दिसतो..त्यांच्या आशिर्वादाने भावे पावन झाले आहेत... ही पुस्तके पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचीही कुणकुण इथे रंगकर्मीत ऐकू आली.

मुखवटे तयार करणारे भावे...तेवढेच जुन्या कात्रणातून कोलाज करणारे भावे..ऑर्गनवर गाणे वाजवितानाचे भावे..रंगपटात चेहरे नटवितानाचे भावे..समाजात काम करताना सामाजिक भान ठेवणारे भावे...पैसे नसताना मोफत रंगभूषा करणारे भावे...कितीतरी पदर या माहितीपटात सामावले गेले आहेत.


आपण जे काही आहोत..ते वडिलांच्या कलागुंणांच्या शिकवणुकीने..आणि रंगभूषेतल्या कलेचा ध्यास घेऊन जगलो ..परमेश्वराने आपल्याला यासाठीच जन्माला घातले..ह्या धारणेने...मात्र मी आज प्रेम पाहून काय बोलावे..तेच कळत नाही...माझ्या काकांनी (मुकुंद भावे) तर मला साक्षात दंडवत घालून मला लाजविले...याउपर मी काय बोलावे..हेच कळत नाही....प्रभाकर भावे आज इथे मात्र खरोखरच निशब्द झाले..

गुरुवार संध्याकाळी सारे तरुण रंगकर्मी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या चित्रपटगृहात एकत्र होऊन..भावेमय रंगून गेले होते..इप्टाच्या पुणे शाखेच्या या माहितीपटाचे कोतूक करण्यासाठी मुंबईहून  व इप्टाचे माजी उपाध्यक्ष व अभिनेते अंजन श्रीवास्तव  , अभिनेते मोहन आगाशे,ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे ,इप्टाचे (महाराष्ट्र) सरचिटणीस रवींद्र देवधर, शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रशांत पाठराबे, यांच्यासह अनेक जण अमृत सामक यांनी बनविलेला पाहण्यासाठी आणि प्रभाकर भावेंच्या कार्याची तोंडभरून स्तुती करण्यासाठी हजर होते...
मुखवट्यांच्या अभ्यासानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कागदाचे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे, प्लॅस्टिकचे, लेदरपासून तयार केलेले मुखवटे मागणीनुसार ते बनवतात. अशा मुखवट्यांची ३२ प्रदर्शने आजपर्यंत देशभरात झाली. यादरम्यान "रंगभूषा' नावाचे पुस्तक पु.लंच्या हस्ते प्रकाशित झाल्यानंतर राज्य शासनाने पुरस्कृत केले. हौशी रंगभूमीसाठी कार्यरत असणारे कलाकार आपल्या कलेचा वारसा इतर कलाकारांपर्यंत पोचण्यासाठी भारतभर कार्यशाळा, शिबिरे, मार्गदर्शन करतात.

हरहुन्नरी कलावंत..काय काय करु शिकतो...ते त्यांच्या रंगभूषेच्या प्रदिर्घ कारकीर्दीने समजते...शिवाय त्यांचे मुखवटे आणि रंगभूषेविषयीचे पुस्तकही तेवढेच उत्तम साकारले गेले आहे...कलाकारातला माणूसही तेवढाच जागा आहे...भावे काकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे..ते माणसातल्या कालकाराला बाहेर काढतात..त्यांनी चेहरा रंगविला की तो तो रहात नाही तो नट बनतो..आणि आपली  भूमिका उत्तम रिच्या वठविण्याचा आत्मविश्वास आपल्यात सहजपणे प्राप्त होतो..अशी तरुण रंगकर्मीची श्रध्दा आहे.

अनेक कलावंत आणि पुरुषोत्तम गाजविणारे..गाजविलेले कलाकार भावेंविषयी काय सांगतात..ते ऐकणे फार मोलाचे आहे...प्रभाकर भावे यांचा सन्मानही इथे केला गेला...मोहन आगाशे यांनी तो केला..एका रंगकर्मीला असा रसिकांचा लोभ मिळणे हे आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे..ती त्यांना त्यांच्या रुजू बोलण्यातून..कामाच्या निष्ठेतून मिळाली..हेच यातून दिसते....त्यांच्या या क्षेत्रातल्या लेखनकार्यालाही नाट्यकर्र्मींच्या लेखी एक प्रयत्नातून सिध्द झालेला ठेवा प्राप्त होत आहे..तो जपून ठेवावा आणि त्यांच्या लेखनाला महत्व प्राप्त व्हावे अशीच सा-यांची इच्छा आहे.

 फक्त एक गोष्ट जाणवली ती ही की ,हा माहितीपट फार बोलका होतो..काहींचे आवाज मागे ठेऊन ते काम करताना प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद अधिक बोलका होईल...प्रत्यक्ष मेकअप करताना कलावंतांशी झालेले संवाद हा पटच अधिक बोलका करतील..आणि ही केवळ मराठी भाषेत न रहाता..याचे भाषांतर किमान इंग्रजी आणि हिंदीत होणे आवश्यक आहे...असे वाटते.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276